MPSC परीक्षेची तयारी म्हणजे केवळ अभ्यास, पुस्तके आणि परीक्षांचा प्रवास नाही. या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांना आपले कुटुंब, मित्र, आवडी-निवडी आणि आयुष्यातील महत्त्वाचे क्षण मागे सोडावे लागतात.
वर्षानुवर्षे मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही, अपयशाचे चक्र सुरूच राहते आणि कधी कधी स्वतःच्या अस्तित्वाबद्दलही प्रश्न निर्माण होतात.
MPSC च्या अशाच एका कठीण प्रवासातील वास्तव मांडणारी ही कविता प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याच्या मनाला भिडणारी आहे.
MPSC – एक मायाजाल
MPSC क्षेत्र निवडलं, पुण्यात राहणं चालू केलं,
रात्र-दिवस नाही कळलं, वर्षामागून वर्ष गेलं,
फॅमिली दूर होत गेली, ना कोणी मित्र राहिलं,
अपयशामागे अपयश आलं, भावनांचं मातेरं झालं,
सण-समारंभ विसरलो, लग्न ही नाही केलं,
एकट्यात राहणं पसंत केलं, तरुण वय असंच गेलं,
चहाने आता जास्तच घेरलं, वडापावनं पोट भरलं,
बसून-बसून वजन वाढलं, सुंदर दिसणंही कमी झालं,
कलियुगात देवानं असं-कसं चक्र उभारलं, MPSC च्या जाळ्यात अडकवलं,
लायब्ररी, मेस, परीक्षा जीवन बनलं, MPSC सोडणं मुश्किल झालं,
काळजात माझ्या धस्स झालं, जेव्हा पेपरफुटीचं जीवघेणं लफडं गाजलं,
तरीही आता पुन्हा उभं राहायचं ठरवलं, हा MPSC चा चक्रव्यूह भेदणं-
अनिवार्य बनलं...!
– एक लढवय्या जोडी (Manisha & Sanket)
प्रत्येक MPSC विद्यार्थ्याच्या मनातील भावना…
या कवितेतून व्यक्त होणारा संघर्ष अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी मिळताजुळता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केवळ परीक्षेचा अभ्यास होत नसतो, तर अनेक वैयक्तिक तडजोडीही कराव्या लागतात.
मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे – परीक्षेतील अपयश म्हणजे आयुष्यातील अपयश नव्हे. स्वतःची किंमत केवळ एका निकालावर ठरवू नका.
संघर्ष करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःसाठी उभे राहा.
ही कविता MPSC च्या प्रवासातील संघर्ष व्यक्त करणाऱ्या एका लढवय्या जोडीची भावना आहे.