गॅरी स्टार्कवेदर
गॅरी स्टार्कवेदर

-स्टार्कवेदर हे झेरॉक्स कॉर्पोरेशन या न्यूयॉर्कमधील रॉचेस्टर येथे असलेल्या कंपनीत १९६४ मध्ये कनिष्ठ अभियंता होते.

-कुठलेही तंत्रज्ञान हे मानवाच्या ज्ञानकक्षांबरोबरच कामाचा वेग वाढवत असते. आज घराघरांतील संगणकांशी जोडलेले लेसर छपाई तंत्रज्ञान हे त्याचेच उदाहरण. जगातील पहिला लेसर मुद्रक तयार करणारे गॅरी स्टार्कवेदर अलीकडेच निवर्तले.

-स्टार्कवेदर हे झेरॉक्स कॉर्पोरेशन या न्यूयॉर्कमधील रॉचेस्टर येथे असलेल्या कंपनीत १९६४ मध्ये कनिष्ठ अभियंता होते. याच कंपनीने छायाप्रत काढणारे फोटोकॉपियर यंत्र अमेरिकेत तयार केले. नंतर ते अनेक कार्यालयांत दिसू लागले. पुढला टप्पा गाठायचा तर, अशा दोन यंत्रांत माहितीचे आदानप्रदान होणे आवश्यक होते. कारण तसे केले तर एखाद्या कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत दुसरीकडच्या यंत्रावर प्राप्त होणार होती. त्यासाठी स्टार्कवेदर यांनी लेसरची मदत घेण्याचे ठरवले.

– प्रतिमा कागदावर उतरवण्यासाठी त्यांनी लेसर किरणांचा वापर केला. नंतर अशा ठिपक्यांच्या प्रतिमा एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यासाठी आपल्या कंपनीची यंत्रे वापरण्याऐवजी त्या एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे पाठवण्याची कल्पना त्यांनी वरिष्ठांकडे मांडली तेव्हा मात्र ‘तुम्हाला तुमची कल्पना एवढीच प्रिय वाटत असेल तर दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधा’ असे सुनावण्यात आले. पण त्याच वेळी या कंपनीच्या उत्तर कॅलिफोर्नियातील शाखेत नवीन डिजिटल तंत्रज्ञान प्रयोगशाळा सुरू झाली होती. तेथे व्यक्तिगत संगणक म्हणजे पर्सनल कॉम्प्युटरच्या निर्मितीचे काम सुरू होते. त्यामुळे नोकरीही गेली नाही आणि जगाला लेसर मुद्रकही मिळाला.

-पावलो अल्टो संशोधन केंद्रात त्यांनी १९७१ मध्ये हा पहिला लेसर मुद्रक नऊ महिन्यांत तयार केला. १९९० मध्ये तो सगळ्या कार्यालयांत, पुढे घरांतही दिसू लागला!

-गॅरी कीथ स्टार्कवेदर यांचा जन्म मिशिगनमधील लॅनसिंगचा. लहानपणापासून जुने रेडिओ, वॉशिंग मशीन, मोटारींचे भाग ते घरी आणत व त्यावर प्रयोग करीत बसत. मिशिगन विद्यापीठातून भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ बॉश अॅण्ड लॉम्ब या चष्मे-कंपनीत काम केले. नंतर झेरॉक्स कंपनीच्या नवतंत्रज्ञान प्रयोगशाळेत नोकरीला लागले.

-स्टार्कवेदर यांनी बनवलेला मुद्रक त्या काळात सेकंदाला एक पान छापत होता. त्या काळात या मुद्रकाची किंमत पाच हजार डॉलर्स होती. नंतर या मुद्रकात अनेक बदल झाले. त्याची किंमत ३८ डॉलर्स झाली. त्यामुळे हे तंत्रज्ञान घरोघरी पोहोचले. स्टार्कवेदर यांच्या रूपाने तंत्रज्ञान-पंढरीचा वारकरी कायमचा निघून गेला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.