बाबा आमटे
बाबा आमटे

जन्म :- २६ डिसेंबर, १९१४
मृत्यू :- फेब्रुवारी, २००८
जन्मस्थळ :- हिंगणघाट, वर्धा जिल्हा
पूर्ण नाव :- मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे
पत्नीचे नाव :- श्रीमती साधना आमटे

एक मराठी समाजसेवक होते. आधुनिक भारताचे संत

कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला.

ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले.

त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या.

आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते.

परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले.

यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली.

इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.

इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली.

पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता.

राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते.

यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला.

नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

बाबा आमटे आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे.

आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी (तुळशीराम) पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. गांधींनी ज्याला गौरविले होते अश्या अभयसाधकाला त्या कुष्ठारोग्याला पाहून भीती वाटली. त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण झाले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली.

इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.

इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला.

भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.

या कार्यात बाबांच्या पत्‍नी श्रीमती साधना आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे.

साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्‍या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो.

बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.

एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली.

शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले.

गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती.

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले.

९ फेब्रुवारी, २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.