बिली आयलिश
बिली आयलिश

– तिचे पूर्ण नाव बिली आयलिश पायरेट बेअर्ड ओक् नॉल असे प्रदीर्घ आहे. एमपीथ्रीमुळे संगीत उद्योगातील ‘अर्थ’भान उलथापालथ झालेल्या २००१ चा तिचा जन्म आहे.

– अवघ्या अठराव्या वर्षांत आपल्या पहिल्या संगीत कर्तुकीसाठी ‘ग्रॅमी’च्या पाच बाहुल्या घरी घेऊन जाणारी भाग्यवंत हा आज तिचा लौकिक सर्वत्र दुमदुमत आहे. तिची ही ओळख पुढल्या कित्येक दशकांत पुसली जाऊ शकणार नाही. दोन हजारोत्तर काळात यू-टय़ूब आणि इतर समाजमाध्यमांनी संगीतवाहक म्हणून अप्रत्यक्षपणे घेतलेल्या भूमिकेतून जस्टिन बिबर, एड शिरन, टेलर स्वीफ्ट, पोस्ट मलोन, लेडी गागा यांसारख्या हौशा-गवशांना संगीताच्या मुख्य धारेत आणले.

– म्युझिक कंपन्यांतील ‘टॅलेंट हंट’ व्यवस्थापकांच्या भूमिका बदलल्या आणि संगीत कलाकार घडण्याचा अन् त्याची जनप्रियता तयार होण्याचा पारंपरिक वेग पूर्ण बदलला. अशास्त्रीय किंवा सुगम संगीत अनंत प्रकारे तयार होऊ लागले. कानांना सुखविण्यासाठी तंत्राची, संगणकाची आणि वाद्यपूरक यंत्रणांची उपयोजित प्रणाली वापरण्यात आली.

– कायगो या नॉर्वेजियन संगीतकार-तंत्रज्ञाने साध्या गाण्यांमध्ये वापरलेल्या वाद्यावळांतून गेल्या काही वर्षांत केलेले प्रयोग जागतिक पॉप संगीत श्रवणात क्रांतिकारक बदल ठरणारे आहेत. बिली आयलिशची गाणी याच पंथातील म्हणता येतील. कानांना सुखवता सुखवता डोक्यालाही जाणवणारी इलेक्ट्रॉनिक वाद्यांची ‘डीजेटीक’ भर असलेली गाणी बिली आयलिशने गेल्या तीन-चार वर्षांत दिली आहेत. ‘ओशन आय’ हे हौसेतून तयार केलेले गाणे २०१६ मध्ये ‘साउंडक्लाउड’ या संगीतवाहक माध्यमावर तिने प्रसारित केले.

– रातोरात गाणे व्हायरल झाले आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनात आणखी भर पडली. आई-वडील-मोठा भाऊ असे सगळेच संगीतात तज्ज्ञावस्थेत असल्यामुळे पुढचा प्रवास तिच्यासाठी अवघड राहिला नाही. वयाच्या चौथ्या बोबडवर्षी तिच्या हातून पहिले गाणे लिहिले गेले. पालकांनी तिला आणि तिच्या भावाला विविध वाद्यांमध्ये पारंगत करीत घरातच संगीत-समूह तयार केला.

– अभिनयासाठी चेहरा, ऊर्जा आणि आत्मविश्वास यांचा पुरेपूर साठा असतानाही तिने त्या क्षेत्राला नाकारत संगीताकडे आपले लक्ष वळविले. अन् ती निवड किती अचूक आहे, हे जगाला दाखवून दिले. ‘अल्बम ऑफ द इयर’, ‘साँग ऑफ द इयर’, ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’ या ‘ग्रॅमी’तील परमोच्च पुरस्कारांसह नव्या कलाकारासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठीही तिला आपल्या पोतडीत जागा तयार करावी लागली. दोन गिनेस बुक रेकॉर्ड आणि आणखी काही महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरविलेली ही कलाकार सध्या जगभरातील घराघरांत लोकप्रिय होत चालली आहे. तुम्ही अद्याप ऐकली नसेल, तरी येत्या काही दिवसांत तिची गाणी तुमचा कानस्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.