मेरी हिगिन्स क्लार्क
मेरी हिगिन्स क्लार्क

– फक्त त्यांचा वाचकवर्ग हा जगभरात विखुरला गेला असल्यामुळे पुस्तक खपाच्या समीकरणातून त्या कायम रहस्यसम्राज्ञी राहिल्या

– रहस्यकथा आवडीने वाचणारे अल्पांश आणि त्यांच्या वाटेला कधीही न जाणारे बहुतांश, अशी जगाची विभागणी केल्यास या प्रांताबाबत अनभिज्ञतेचाच प्रसार अधिक झाल्याचे लक्षात येते. म्हणजे ‘रहस्यकथेची सम्राज्ञी’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या अॅगाथा ख्रिस्तीची ख्याती (अजिबात न वाचणाऱ्यांनाही) सुपरिचित असते; पण रहस्य घटकाभोवती लिहिणाऱ्या इतर डझनावरी लेखकांची महती फक्त त्यांच्या परमवाचक भक्तांपुरतीच मर्यादित राहते.

– मराठीत बाबूराव अर्नाळकर-गुरुनाथ नाईक यांच्याइतकेच लिहिणारे एस. एम. काशीकर, शरश्चंद्र वाळिंबे, अनिल टी. कुलकर्णी, राजा पारगावकर यांची नावे झाकोळली गेली. हिंदूीतही सुरेंद्र मोहन पाठक, वेदप्रकाश शर्मा यांच्यानंतर विलक्षण नायकांचा ताफा उभारणारे शैलेंद्र तिवारी, राजभारती हे त्यांच्या कट्टर वाचकांखेरीज सर्वज्ञात नाहीत.

– अमेरिकी लेखिका मेरी हिगिन्स क्लार्क यांची रहस्यसम्राज्ञी म्हणून ओळख ही अशाच प्रकारे सांगावी लागेल. फक्त त्यांचा वाचकवर्ग हा जगभरात विखुरला गेला असल्यामुळे पुस्तक खपाच्या समीकरणातून त्या कायम रहस्यसम्राज्ञी राहिल्या

. महायुद्धानंतर आर्थिक मंदीच्या घरघरीत अमेरिकेत क्षुधाशांतिगृह मालकाच्या घरात जन्मलेल्या मेरी यांचे लहानपण सुखवस्तू, तर मध्यमवयीन जीवन ओढग्रस्तीने व्यापले. घराची आर्थिक जबाबदारी पेलून आणि शिक्षणाचा डोलारा सांभाळत त्यांनी आपल्या लेखनप्रेमाचा विकास केला. सुरुवातीला अनेक मासिकांतून कथा ‘साभार परत’ येण्याच्या अनुभवांतूनही नाउमेद न होता त्यांनी लेखनाला धार काढणे सुरू ठेवले. पहिल्या चरित्रात्मक कादंबरीनंतर त्यांनी ‘व्हेअर आर द चिल्ड्रन?’ (१९७५) या कादंबरीपासून रहस्यरंजनाचा विडा उचलला.

– गेल्या वर्षीपर्यंत या कादंबरीच्या ७५ हून अधिक आवृत्त्या छापल्या गेल्या आहेत. यावरूनच त्यांच्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद ओळखता येऊ शकतो. रहस्यकथा आणि कादंबऱ्यांमध्ये घटनांना प्रचंड वेग असतो. तंत्रज्ञान विकासाबरोबर माणसाच्या जगण्याला मोबाइल, ई-मेल आणि समाजमाध्यमांमुळे जो वेग आला, त्या वेगालाही मेरी यांच्या लेखनामध्ये स्थान मिळाले. त्यामुळे जुन्या अभिजात रहस्यशैलीसह नव्याचा अंगीकार करीत त्यांची लेखणी रहस्याची नवी बीजे घेऊन बहरत राहिली. ऐंशीच्या दशकानंतर त्यांचे येणारे प्रत्येक पुस्तक हे ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या खुपविक्या पुस्तकयादीमध्ये अग्रस्थानी राहू लागले.

– पन्नासहून अधिक कादंबऱ्या आणि कथासंग्रह, बालपुस्तके, ऐतिहासिक कादंबरी, आत्मचरित्र अशी भलीमोठी साहित्यसंपदा मेरी यांच्या नावावर आहे. ‘किस द गर्ल्स अॅण्ड मेक देम क्राय’ ही तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेली कादंबरी. ‘गॉन गर्ल’कार गिलियन फ्लीन आणि ‘गर्ल ऑन द ट्रेन’कर्त्यां पॉला हॉकिन्स यांनी या दशकात रहस्यरंजनाचा तोंडवळा बदलेला असताना; मेरी हिगिन्स क्लार्क यांचा मोठा वाचकवर्ग अजूनही शाबूत आहे, जो त्यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने प्रचंड हळहळला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.