विक्रमवीर मयांक अग्रवाल
विक्रमवीर मयांक अग्रवाल

– बालपणी पायलट होण्याचं स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. तो पायलट काही होऊ शकला नाही. पण उत्तुंग भरारीचे स्वप्न मात्र त्याने क्रिकेटमध्ये साकार केलेच. हा विक्रमवीर खेळाडू आहे मयांक अग्रवाल.

– बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात मयांकने ३३० चेंडूंमध्ये २४३ धावांची उत्तुंग द्विशतकी खेळी साकारत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.

– डॉन ब्रॅडमन यांचा १३ सामन्यांत दोन द्विशतकांचा विक्रम तर त्याने मोडीत काढलाच शिवाय २८ वर्षीय मयांकने अ‌वघ्या १२ सामन्यांतच ही किमया साधली. असे असले तरी या कर्नाटकच्या गुणी खेळाडूला क्रिकेटमधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. एकीकडे तो भारत अ संघाकडून धावांचा रतीब घालत होता तेव्हा स्थानिक स्पर्धांतही त्याची बॅट तळपत होती. २०१७ मध्ये रणजी करंडक स्पर्धेत त्याने महाराष्ट्राविरुद्ध त्रिशतक झळकावले होते.

– तरीही भारतीय संघाचे दार साधे किलकिलेही झाले नाही. उलट त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ संघात आला. यातूनही तो खचला नाही. अपयशाची भीती कधी बाळगायची नाही, याच निग्रहाने तो खेळत राहिला. त्याचा प्रत्यय त्याच्या या द्विशतकी खेळीत दिसतो. कसोटी कारकिर्दीतले त्याचे हे दुसरे द्विशतक. गेल्या महिन्यातच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही २१५ धावांची खेळी साकारली होती.

– षटकार खेचून द्विशतक साकारणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा फलंदाज आहे. मयांकने एकाच मोसमात सलामीला दोन द्विशतके झळकावत वीरेंद्र सेहवागशीही बरोबरी साधली. कदाचित पायलट बनण्याच्या स्वप्नामागे विक्रमी भरारी घेण्याचं एक स्वप्न त्याच्या अंतरीत दडलेलं असावं. ती भरारी तो आता २२ यार्डाच्या हेलिपॅडवरून पूर्ण करीत आहे. आपली योग्यता सिद्ध करीत तो भारतीय फलंदाजीचा कणा होईल, अशी आशा आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.