विष्णूबुवा ब्रह्मचारी
विष्णूबुवा ब्रह्मचारी

जन्म :- १८२५
मृत्यू :- १८ फेब्रुवारी १८७१
मूळ नाव:– विष्णू भिकाजी गोखले.
स्वतंत्र विचारसरणीचे धर्मसुधारक व एक विचारवंत.
टोपण नाव :- विष्णुबोवा (विष्णुबावा) ब्रह्मचारी म्हणूनही परिचित.
मूळ गाव:- शिरवली (ता. माणगाव) रायगड जिल्ह्या.
आईचे नाव:- उमाबाई.

आपल्या आई-वडिलांचे विष्णुबुवा हे दहावे अपत्य होते.
ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे लहानपणापासूनच ते छोटामोठा व्यवसाय-धंदा करण्याचा प्रयत्न करत होते.

वयाच्या नवव्या वर्षी ते जमीन महसूल खात्यात कामाला लागले, परंतु घरच्या अडचणींमुळे त्यांना हे काम सोडावे लागले.

पुढे ते महाडला एका किराणा मालाच्या दुकानात काम करत. त्यानंतर ते साष्टी तालुक्यात सीमाशुल्क (कस्टम) खात्यात नोकरीस लागले.

वसई, कल्याण, भिवंडी व उरण इ. ठिकाणी त्यांनी नोकरी केली.

मात्र विष्णुबुवा यांची धार्मिक वृत्ती अधिक वाढत गेली आणि प्रवचन, कीर्तन व भजन इ. माध्यमांतून त्यांनी प्रबोधन करण्यास सुरुवात केली. प्राकृत भाषेतील धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी केला.

वयाच्या १३ व्या वर्षी विष्णुबुवा यांनी सप्तश्रृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या सुरू केली.

सुखाचा मार्ग म्हणजे वैदिक धर्माची पुन:स्थापना झाली पाहिजे, जेणेकरून अत्यंत उज्ज्वल व श्रेष्ठ धर्माची लोकांना ओळख होईल.

धर्माच्या नावाखाली माजलेल्या आचारांचे अवास्तव स्तोम जर थोपवायचे असेल, तर ‘पाखंड मतांचे खंडन करून वैदिक धर्माची पुन:स्थापना करण्याचा प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपणास आदेश दिला’ अशी त्यांची भावना होती.

सप्तश्रृंगीचा डोंगर सोडल्यानंतर विष्णुबुवा नाशिकमार्गे पंढरपूरला आले, तेथे त्यांनी लोकांना वैदिक धर्माचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. भावार्थ रामायणाची दोन पारायणे केली.

१८५६ मध्ये त्यांनी भावार्थ सिंधू नावाचा ग्रंथ ओवीबद्ध केला.

मुंबईमध्ये त्यांना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धार्मिक कार्याची ओळख झाली. इंग्रजांनी केवळ राजसत्ताच बळकावलेली नाही, तर हिंदू समाजावर त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक आक्रमणही चालू आहे, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे अशी विष्णुबुवा यांची धारणा झाली.

ख्रिश्चन मिशनऱ्यांनी विविध हिंदू धर्मग्रंथांच्या हस्तलिखितांमधून त्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्याला उपयोगी पडतील अशी हिंदू धर्मातील दोषस्थळे निवडून काढलेली होती.

जॉन स्टीव्हन्सन याने ऋग्वेदातील सूक्तांचे भाषांतर केले, रॉबर्ट निज्बिटने भगवद्गीतेचे सारांश रूपात संपादन केले, तर जॉन विल्सन याने हिंदू धर्म प्रसिद्धीकरण लिहिले.

या पार्श्वभूमीवर विष्णुबुवा यांनी वैदिक धर्माचे वास्तव स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठी भावार्थ सिंधू व वेदोक्त धर्मप्रकाश (१८५९) हे ग्रंथ लिहिले होते. याशिवाय जाहीर व्याख्याने देऊन लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी केले.

ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी विष्णुबुवा यांनी २० सप्टेंबर १८५६ पासून दर शनिवारी प्रभू लोकांच्या विद्यालयात व्याख्याने देण्यास सुरुवात केली.

बंदिस्त जागेत अस्पृश्य व ख्रिश्चन लोकांना प्रतिबंध असल्या कारणाने १५ जानेवारी १८५७ पासून दर गुरुवारी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जाहीर व्याख्याने त्यांनी सुरू केली.

या सभांमध्ये ख्रिश्चन मिशनरी जी-वोटन हेही येत असत.

या व्याख्यानांमधील वादविवाद बॉम्बे गार्डीयन मधून प्रसिद्ध होत असे. तसेच रेव्हरंड जॉर्ज बोएन ह्यांनी संपादिलेल्या समुद्रकिनारीचा वादविवाद (१८७२) ह्या ग्रंथात विष्णुबुवा आणि ख्रिस्तीउपदेशक ह्यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या धर्मविषयक वादविवादांचे हकीकत आलेली आहे.

विष्णुबुवा यांनी समाजातील जाती व्यवस्थेलाही विरोध केलेला दिसतो.

समाजात निर्माण झालेली विषमता त्यांना मान्य नव्हती.

प्रचलित जातिभेद हे वेदकालीन वर्णव्यवस्थेला सोडून आहेत, असे त्यांचे मत होते.

गुण–कर्मानुसारची वर्णव्यवस्था हा त्यांच्या मते आदर्श समाजव्यवस्थेचा पाया आहे.

जात किंवा वर्ण जन्मावरून न ठरविता कर्मावरून ठरविल्या जाव्यात, या विचाराचे ते होते.

समाजातील अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती, त्यासंबंधी त्यांचे विचारही अतिशय परखड होते.

पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण, मंदिर प्रवेश इत्यादी सामाजिक प्रश्नासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी स्वरूपाचे होते.

स्त्रीदास्य विमोचनाच्या संदर्भातही त्यांनी कार्य केलेले दिसते.

स्त्रीदास्यत्व जर नष्ट करावयाचे असेल, तर स्त्रीशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते.

विवाहासंबंधी स्त्रीला स्वातंत्र्य असले पाहिजे, विधवेला पुर्नविवाहाचा अधिकार असला पाहिजे, सती प्रथा बंद झाली पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते होते.

 वेदोक्त धर्मप्रकाश व सुखदायक राज्यप्रकरणी निबंध (१८६७) ह्या त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांचे प्रागतिक विचार विशेषत्वाने व्यक्त झाले आहेत.  

‘राज्यकारभार चालवणारे कामगार’ कधीही वंशपरंपरा नेमता कामा नयेत असा स्पष्ट इशारा त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश ह्या ग्रंथात दिला होता.

माणसांच्या सुखासाठी, त्यांना मजुरी आणि अन्न-वस्त्र मिळविण्यासाठी कारखाने काढणे जरूरीचे आहे, हे त्यांनी सांगितले.

लहान मुलीबरोबर विवाह करणाऱ्या वृद्धाला शासन केले जावे, एखाद्या विधवा स्त्रीचा एखाद्या पुरुषाशी संबंध आहे असे दिसल्यास त्या स्त्रीच्या वा पुरुषाच्या जातीचा विचार न करता त्या दोघांचा विवाह लावून द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

न्यायाधीशाने अन्यायी ब्राह्मण आणि अन्यायी महार या दोघांस सारख्या मानाने उभे करून अथवा बसवून न्याय करावा.

परंतु महार दरवाजाबाहेर आणि ब्राह्मण आत असा पक्षपात करू नये, असा विचार त्यांनी मांडला.

प्रजेतल्या कोणत्याही माणसाला स्वकर्तृत्वाने राजा होता येईल अशी परिस्थिती असली पाहिजे, असेही त्यांचे मत होते.

राज्याच्या सैन्यात, तसेच लेखनकामादी अनेक कामे करणाऱ्यांत सर्व वर्णांच्या व जातीजमातींच्या लोकांचा समावेश असावा, सर्वांनाच लेखन-वाचनाचे ज्ञान मिळावे, राजा नेमण्याचा अधिकार प्रजेचा असावा, सूर्याच्या रश्मिरूपी अग्नीत पृथ्वीवरील पाण्याचा होणारा होम हाच पाऊस पडण्याचा यज्ञ-होम होय इ. त्यांची मते वेदोक्त धर्मप्रकाशात व्यक्त झालेली असून ते काळाच्या किती पुढे होते, ह्याची कल्पना त्यांवरून येते.

इंग्रज शासन काळात भारतात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले व कारखानदारी उदयास आली.

त्या माध्यमातून तेवढ्याच प्रमाणात कामगार वर्गही उदयास आला.

या कामगारांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण व त्यांच्या संबंधीचे विचार त्यांनी सुखदायक राज्यप्रकरणी निबंध या ग्रंथात मांडलेले आहेत.

राजा, शेतकरी आदींनी एकाच प्रकारचे ‘अहिंसक’ अन्न खावे.

लग्ने करण्यासाठी राजाने खास खाते काढावे व त्या खात्यामार्फत लग्ने व्हावीत.

ज्या दांपत्याचे जमणार नाही, त्यांनी परस्परांपासून वेगळे व्हावे व अन्य जोडीदार निवडावेत.

स्वयंवराला मान्यता असावी. मुले पाच वर्षांची झाली, की आईवडिलांनी त्यांना राजाच्या ताब्यात द्यावे.

राजाने त्यांची विद्या शिकवण्याची व्यवस्था करावी.

नंतर ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला काम द्यावे.

वृद्धांना बसून खाण्याची सोय असावी इ. पुरोगामी विचार त्यांनी ह्या ग्रंथात मांडले आहेत.

हे पाहता त्यांत समाजवादी मनोवृत्ती प्रकट झाल्यासारखे वाटते. अशा विचारांची सैद्धांतिक आणि तर्कशुद्ध मांडणी करण्याची क्षमता त्यांनी न दाखविल्यामुळे हे विचार स्वप्नरंजनात्मक आहेत असे म्हटले जात असले, तरी त्यांच्या काळाच्या पलीकडे जाऊन साम्यवादी विचारसरणीचा पुरोगामी विचार मांडण्याचा अग्रेसरत्वाचा मान त्यांच्याकडे जातो, असेही म्हटले गेले आहे.

परंतु हा निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर विविध ज्ञानविस्तारनेटिव्ह ओपिनियन यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांच्यावर टीका झालेली दिसते.

मात्र त्यांनी याचा विचार न करता बाळ भास्कर शिंदे यांच्याकडून सदर निबंधाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेऊन ते १८६९ मध्ये प्रकाशित केले.

विष्णुबुवांनी रचिलेल्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत चतु:श्लोकी श्रीभागवताचा मराठी भाषेत अर्थ (१८६७), सहजस्थितीचा निबंध (१८६८), वेदोक्त धर्माचा विचार व ख्रिस्तीमत खंडन (शिकवणुकीचे सार; १८७४), सेतुबंधनी टीका (१८९०) यांचा समावेश होतो. 

सेतुबंधनी टीका ही भगवद्गीतेवरील टीका होय.

‘अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा सेतू’ असे ह्या टीकालेखनाचे स्वरूप आहे.

ही टीका त्यांनी वैज्ञानिक परिभाषेत केलेली असून शरीरविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र ह्यांच्या त्या काळी उपलब्घ असलेल्या ज्ञानाच्या आधारे गीतेतील प्रतिपादनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ह्यातूनही त्यांच्या प्रतिमेचे वेगळेपण प्रत्ययास येते.

विष्णबुवांच्या विचारप्रवर्तक व्याख्यानामुळे मोठ्या प्रमाणात समाजात जागृती निर्माण झाली.

ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रचाराला आळा बसला, हिंदू समाजात धर्माभिमान निर्माण होण्यास मदत झाली.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.