१६ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |16 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ सप्टेंबर चालू घडामोडी

रोहित शर्माने रचला इतिहास, भारताकडून ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू

 • भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध मेहंदी हसन मिराजचा अप्रतिम झेल घेतला. रोहित शर्माचा हा झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने एका खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वास्तविक, रोहित शर्मा भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०० झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा पाचव्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मा २०० झेल घेणारा भारताचा ठरला पाचवा खेळाडू –

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० झेलांचा आकडा गाठणाऱ्या भारताच्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या आधी हा विक्रम राहुल द्रविड, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांनी केला आहे. आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर सामन्यात रोहित शर्माने बांगलादेशचा फलंदाज मेहंदी हसन मिराजचा झेल घेताच हा पराक्रम केला. याशिवाय भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ४४९व्या सामन्यात हा पराक्रम केला.
 • भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने खूप पूर्वी झेलांचे त्रिशतक पूर्ण केले होते. त्याने भारताकडून आतापर्यंत ५०५ सामन्यांमध्ये ३०३ झेल घेतले आहेत. या बाबतीत भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ४३३ सामन्यांमध्ये २६१ झेल घेतले, तर माजी फलंदाज सचिन तेंडुलकर ६६४ सामन्यांमध्ये २५६ झेल घेऊन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तसेच सुरेश रैनाने ३२२ सामन्यांमध्ये १६७ झेल घेतले. तो सहाव्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविड ३३४ झेलांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेतलेले खेळाडू –

 • राहुल द्रविड – ५०९ सामने – ३३४ झेल
 • विराट कोहली – ५०५ सामने – ३०३ झेल
 • मो. अझरुदिन- ४३३ सामने – २६१ झेल
 • सचिन तेंडुलकर – ६६४ सामने – २५६ झेल
 • रोहित शर्मा – ४४९ सामने – २०० झेल
 • सुरेश रैना – ३२२ सामने – १६७ झेल

तलाठी भरती परीक्षेला आठ लाख ६४ हजार परीक्षार्थ्यांची हजेरी, जागा ४४६६

 • Talathi recruitment exam बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.
 • मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षेच्या सर्व सत्रांची माहिती  टीसीएस कंपनीच्या सव्‍‌र्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे.
 • त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आणि काहींना अटकही करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयातील कंत्राटी पदभरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ही पदभरती तात्पुरत्या…’

 • राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
 • श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या अन्नदान कक्षाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ अडते विलास भुजबळ, राजेंद्र घुले, राजेश मोहोळ, पंडित आहेर, किसन कानगुडे, शंकर साबळे, प्रमोद जाधव यांना पवार यांच्या हस्ते शारदा गजानन पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध भोसले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
 • पवार म्हणाले, ‘कंत्राटी पदभरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकाच्या काळात घेण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये. कायमस्वरूपी पद भरती होईपर्यंत कंत्राटी भरती करण्यात येणार असल्याने शासकीय सेवेसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी काळजी करू नये. राज्य सरकारच्या विविध विभागामंध्ये सध्या सुमारे दीड लाख पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण आदी विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे अपेक्षित असते. कायमस्वरूपी पद भरती होईपर्यंत जागा रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कंत्राटी पदभरती करण्यात येणार आहे. ‘राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात सेवेत घेण्यात आले आहे’ असेही पवार म्हणाले.

निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करू

 • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल. पक्ष आणि चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसाठीची तयारी पूर्ण केली आहे. सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला बोलावले आहे. दोन्ही गट बाजू मांडतील. पक्ष आणि चिन्ह ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय दोन्ही गटांना मान्य करावा लागणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोटा येथे वसतिगृह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 • राजस्थानच्या कोटा येथील वसतिगृह प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना मानसिक आणि वर्तणूक समुपदेशन, भोजन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची काळजी घेण्यांसंबंधित इतर पैलूंचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. कोटा हे अभियांत्रिकी-वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांच्या तयारीचे केंद्र आहे. अतितणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांना सक्षम करण्याच्या उपायांचा हा एक भाग आहे.
 • कोटा येथील चंबळ होस्टेल असोसिएशन, कोरल हॉस्टेल असोसिएशन आणि कोटा हॉस्टेल असोसिएशन या तीन वसतिगृह संघटनांनी येथील जय मिनेश आदिवासी विद्यापीठाशी वसतिगृह प्रमुख आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष वसतिगृह व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यासाठी करार केला. अभियांत्रिकी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) अशा स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारासाठी दर वर्षी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी कोटा येथील शिकवण्यांमध्ये प्रवेश घेतात. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, २७ ऑगस्ट रोजी अवघ्या काही तासांतच दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. बुधवारी एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. गेल्या वर्षी येथे १५ जणांनी आत्महत्या केली होती.

संजय मिश्रा अखेर निवृत्त; ईडीच्या प्रभारी संचालकपदी राहुल नवीन

 • सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा हे शुक्रवारी अखेर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालाप्रमाणे मिश्रा यांना जुलैअखेर निवृत्त होण्यास सांगितले होते. मात्र केंद्र सरकारने त्यांना १५ ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयाने राष्ट्रीय हित लक्षात घेऊन त्यांना १५ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली होती.  दरम्यान, सरकारने  शुक्रवारीच भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राहुल नवीन यांची सक्तवसुली संचालनालयाच्या  प्रभारी संचालकपदी नियुक्ती केली.
 • नवीन हे १९९३ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. या पदावर नियमित संचालक नियुक्त होईपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही नियुक्ती असेल. ते ईडीचे विशेष संचालक होते. संजय कुमार मिश्रा हे त्यांना मिळणाऱ्या मुदतवाढींमुळे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ते १९८४च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेचे (आयआरएस) अधिकारी झाले होते. ईडीचे संचालक होण्यापूर्वी मिश्रा हे दिल्लीत आयकर विभागाचे मुख्य आयुक्त होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या आयकर प्रकरणांचा तपास केल्याचे सांगण्यात येते.
 • ऑक्टोबर २०१८मध्ये मिश्रा यांच्याकडे ईडीचे अंतरिम संचालकपद सोपवण्यात आले होते. मात्र नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना दोन वर्षांच्या मुदतीसाठी पूर्णवेळ संचालक करण्यात आले. त्यांची मुदत २०२० मध्ये संपणार होती, मात्र केंद्र सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांऐवजी तीन वर्षांचा केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर २०२१मध्ये न्यायालयाने आदेश दिला की मिश्रा यांना यापुढे मुदतवाढ देण्यात येऊ नये. त्यानंतर केंद्र सरकारने अध्यादेश काढून मिश्रा यांना आणखी वर्षांची मुदतवाढ दिली.

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ बनले सिंगापूरचे राष्ट्रपती, चिनी नागरिकांचं मिळालं सर्वाधिक समर्थन!

 • सिंगापूरमध्ये जन्माला आलेले पण भारतीय वंशाचे असलेले अर्थतज्ज्ञ थरमन शनमुगरत्नम यांनी गुरुवारी सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. थरमन हे सिंगापूरचे नववे राष्ट्रपती आहेत. ६६ वर्षीय थरमन पुढील सहा वर्षे सिंगापूरचे राष्ट्रपतीपद सांभाळणार आहेत. सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हलिमाह याकोब यांचा कार्यकाळ १३ सप्टेंबर रोजी संपला आहे.
 • थरमन यांचे सिंगापूरच्या राजकारणात मोठे नाव आहे. सिंगापूरमधील चिनी समाजाचं त्यांना मोठं समर्थन आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान त्यांनी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले. २०१५ ते २०२३ दरम्यान सामाजिक धोरणांसाठी समन्वय मंत्री; आणि २०११ ते २०२३ दरम्यान सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय. मे २०११ ते मे २०१९ पर्यंत ते सिंगापूरचे उपपंतप्रधानही होते.

सर्वाधिक मते मिळून राष्ट्रपती पदावर विराजमान

 • शनमुगरत्नम यांनी १ सप्टेंबर रोजी राष्ट्रापती पदाची निवडणूक जिंकली. मतदानावेळी सिंगापूरमध्ये २० लाखांहून अधिक मते पडली होती. त्यापैकी १७ लाख मेत शनमुगरत्नम यांना मिळाली आहेत. त्यांनी चिनी वंशाचे कोक सॉन्ग आणि टॅन किन लियान यांचा पराभव केला आहे.

सिंगापूरमध्ये आतापर्यंत भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्रपती

सिंगापूरमध्ये यापूर्वी दोन भारतीय वंशाचे राष्ट्रपती राहिले होते. भारतीय वंशाचे असलेले सेल्लापन रामनाथन हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष होते. ते सर्वाधिक काळ येथील राष्ट्राध्यक्ष होते. तर, देवर नायर हे १९८१ ते १९८५ या काळात सिंगापूरचे राष्ट्रपती होते. तर, भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्रपती म्हणून शनमुगरत्नम यांनी शपथ घेतली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.