२ जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२ जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |2 June 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२ जून चालू घडामोडी

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा: किरण, लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत

 • पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या किरण जॉर्ज आणि लक्ष्य सेन यांनी आपली विजयी लय कायम राखताना थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत सायना नेहवाल, अश्मिता चलिहा, तर पुरुष दुहेरीत भारताची आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीचे आव्हान संपुष्टात आले.
 • लक्ष्यने चीनच्या लि शी फेंगला २१-१७, २१-१५ असे नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर मलेशियाच्या लेओंग जून हाओचे आव्हान असेल. पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत किरणने चीनच्या वेंग हाँग यांगला २१-११, २१-१९ असे सरळ गेममध्ये नमवताना आगेकूच केली.
 • महिला एकेरीत सायनाने चीनच्या हे बिंग जिआओकडून ११-२१,१४-२१ अशी हार पत्करली. अश्मिताला स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून १८-२१, १३-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या मोहम्मद शोशिबूल फिक्री व बेगास मौलाना जोडीने सात्त्विक व चिराग जोडीला २४-२६, २१-११, २१-१७ असे नमवले.

नागपूर ‘एम्स’ला ‘एनएबीएच’ मानांकन, देशात पहिलेच रुग्णालय, पंतप्रधानांकडून अभिनंदन

 • नागपूर ‘एम्स’ने स्वच्छतेपासून इतर सर्वच सोयींवर विशेष लक्ष दिले. त्यामुळे ‘एम्स’ला नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) मानांकन मिळाले असून, देशातील हे मानांकन असलेले नागपूर ‘एम्स’ पहिले रुग्णालय ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.
 • रुग्णांवर चांगला उपचार करण्यासाठी ‘एम्स’ प्रशासन येथील स्वच्छता, शस्त्रक्रियेचे तंत्र, प्रयोगशाळेतील विविध तपासणी, रुग्णांना औषधांच्या दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांसह लहान- सहान गोष्टींवर लक्ष ठेवते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी ‘एनएबीएच’ मानांकनासाठी अर्ज केला. त्यांनाच यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले. ‘एनएबीएच’ चमूने पहिल्या निरीक्षणानंतर ‘एम्स’मध्ये सुमारे २५ त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटी दूर करून ‘एम्स’ने पुन्हा आपली बाजू मांडली. त्यानंतर हे मानांकन ‘एम्स’ला मिळाले आहे. दरम्यान, नागपूर ‘एम्स’ने ‘ट्विट’ करून ही माहिती सार्वजनिक केली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक ‘ट्विट’ केले. त्यात पंतप्रधान म्हणाले, की या कामगिरीबद्दल ‘एम्स’ नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.

गडकरींची भूमिका महत्त्वाची

 • नागपूर ‘एम्स’साठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच जोर लावला होता. त्यानंतर नागपूर एम्सला झटपट शैक्षणिक वर्ग सुरू करण्यासह या प्रकल्पाच्या बांधकाम व रुग्णसेवेला गती देण्यासाठी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातले, हे विशेष.

भारत-नेपाळ संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

 • भारत आणि नेपाळ यांच्या संबंधाने हिमालयाची उंची गाठावी यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर दिले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये गुरुवारी विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या वेळी दोन्ही देशांमधील सीमावाद आणि इतर प्रश्न सोडवण्यावर एकमत झाले.
 • चर्चेनंतर माध्यमांना दिलेल्या निवेदनामध्ये मोदी यांनी नमूद केले की, भविष्यामध्ये दोन्ही देशांतील संबंध सुदृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या काही प्रकल्पांचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारत आणि नेपाळदरम्यान काही करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यामध्ये सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन, संयुक्त चेकपोस्ट उभारणे आणि जलविद्युत ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवणे यांचा समावेश आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला.
 • या वेळी पंतप्रधान प्रचंड यांनी पंतप्रधान मोदींच्या शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध अतिशय जुने आणि बहुआयामी आहेत.

राष्ट्रपतींकडून प्रचंड यांचे स्वागत

 • नेपाळ हा भारतासाठी नेहमी प्राधान्यक्रमावरील देश राहिला आहे, असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी नेपाळच्या पंतप्रधानांना दिले. पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड यांनी राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्या वेळी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले.

उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानंतर आता लोकशाही, राजकीय पक्षही NCERT च्या पुस्तकांमधून हद्दपार!

 • काही दिवसांपूर्वी NCERT च्या पुस्तकातून चार्ल्स डार्विनचा थिअरी ऑफ इव्होल्युशन अर्थात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यामुळे मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. देशभरातील शिक्षणसंस्थांमधून केंद्र सरकारकडे आपला निषेध व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा एनसीईआरटीनं मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रम सुधारणा मोहिमेअंतर्गत दहावीच्या पुस्तकातून लोकशाहीसमोरील आव्हाने, राजकीय पक्ष, सत्तासंघर्ष आणि चळवळ यावरचे धडेच हद्दपार केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरून देशभर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

नव्याने काय वगळलं NCERT ने?

 • NCERTने इयत्ता दहावीच्या पुस्तकातून विज्ञान आणि लोकशाही राजकारण अर्थात सायन्स आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन या विषयांमधून प्रत्येकी तीन ती धडे गाळले आहेत. यामध्ये सायन्स विषयातील पिरिऑडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, सोर्सेस ऑफ एनर्जी आणि सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅच्युरल रिसोर्सेस हे तीन धडे वगळण्यात आले आहेत.
 • डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन विषयातून पॉप्युलर स्ट्रगल्स अँड मूव्हमेंट्स, पॉलिटिकल पार्टीज आणि चॅलेंजेस टू डेमॉक्रसी हे तीन धडे वगळले आहेत. एकीकडे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसताना आता पुन्हा एकदा नव्याने NCERTच्या पुस्तकातून हे धडे वगळल्याने त्यावर शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

NCERT म्हणते…

 • दरम्यान, यासंदर्भात एनसीईआरटीनं प्रतिक्रिया दिल्याचं एनडीटीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. यानुसार, “करोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणं फार महत्त्वाचं झालं आहे. अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी, विषयांची द्विरुक्ती आणि सध्याच्या काळात गैरलागू ठरलेला मजकूर ही संबंधित धडे वगळण्यामागची महत्त्वाची कारणं ठरली आहेत”, असं एनसीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Renault चा मोठा रेकॉर्ड; भारतात ११ वर्षांमध्ये केली तब्बल ‘एवढ्या’ लाख गाड्यांची विक्रमी विक्री

 • Renault ही एक फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. मात्र कंपनीसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेनॉल्ट कंपनीने ११ वर्षांमध्ये तब्बल ९ लाख गाड्यांची विक्री केली आहे. तसेच विक्री करत असताना कंपनीने विविध प्रॉडक्ट्सच्या पोर्टफोलिओने देशातील ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राथमिकता पूर्ण केली आहे.
 • रेनॉल्ट कंपनीचे देशामध्ये ४५० पेक्षा जास्त विक्री आणि ५३० सर्व्हिस स्टेशन्सचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कंपनीच्या प्रत्येक ग्राहकाला मदत आणि व्यक्तिगत सर्व्हिस देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
 • रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, ” या उल्लेखनीय कामगिरीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. मागील काही वर्षांमध्ये आम्ही भारतामध्ये एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडियाच्या’ व्हिजनसाठी कंपनीची वचनबद्धता अतूट आहे. रेनॉल्टने आपल्या आगामी उत्पादनांसाठी ९० टक्के स्थानिकीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
 • ” भारत एक धोरणात्मक देश असून रेनॉल्ट ग्रुपसाठी टॉप ५ बाजारपेठांपैकी एक आहे. भारतासाठी आमच्याकडे एक दीर्घकालीन धोरण देखील आहे. आम्ही भारतासाठी एक मजबूत उत्पादन योजना तयार केली आहे. त्यामध्ये स्थानिकरणावर जास्त जोर देण्यात आला आहे. ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि सेवा यामध्ये काही नवीन कल्पना आणायची रेनॉल्ट ग्रुपची योजना आहे.” असे वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.