Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |23 August 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२३ ऑगस्ट चालू घडामोडी
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत: प्रज्ञानंद-कार्लसन पहिला डाव बरोबरीत
- भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मंगळवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनविरुद्धचा पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला. भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंदने स्वत:च्याच वेगळय़ा शैलीच्या खेळाने आपल्यापेक्षा सरस असलेल्या अव्वल मानांकित कार्लसनला ३५ चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले.
- पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञानंदने भक्कम खेळ केला. लढत बरोबरीत सोडवणे त्याला फारसे कठिण गेले नाही. पूर्ण डावात मी कधी अडचणीत आलो होते, असे वाटले नाही, अशी प्रतिक्रिया प्रज्ञानंदने दिली. पारंपरिक पद्धतीतील दुसरा डाव बुधवारी खेळला जाईल, तेव्हा कार्लसनकडे पांढरे मोहरे असल्यामुळे त्याचे पारडे जड राहिल असे जाणकारांना वाटते.
- ‘फिडे’च्या ‘ट्विटर’ अकाऊंडवर दिलेल्या प्रतिक्रियेत प्रज्ञानंदने एकवेळ हत्तीच्या चालीला मला काही तरी करणे अपेक्षित होते. मात्र, कार्लसनची ही चाल भक्कम असल्यामुळे मला फार काही करता आले नाही, असे सांगितले. दुसऱ्या डावाविषयी बोलताना प्रज्ञानंदने, माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले जातील. पांढरे मोहरे कार्लसनकडे असल्याने तो जोरात खेळेल यात शंका नाही. पण, आता विश्रांती घेऊन दुसऱ्या डावात पूर्ण शांतपणे उतरण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगितले.
- कार्लसन पहिला डाव पूर्ण शारीरिक ताकदीने खेळू शकला नाही. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे कार्लसन पूर्ण क्षमतेने त्याला खेळण्यास अडथळा येत होता. ‘‘अंतिम फेरीपूर्वी मला विश्रांती मिळाली होती. पण, प्रज्ञानंदला ‘टायब्रेकर’ खेळावा लागल्याने त्याला पुरेश विश्रांती मिळाली नव्हती. मी पहिला डाव पूर्ण क्षमतेने खेळू शकलो नाही,’’ असे कार्लसन म्हणाला. ‘‘प्रज्ञानंदकडून इंग्लिश ओपिनगची अपेक्षा मी बाळगली नव्हती. त्यामुळे मला नियोजन बदलावे लागले. त्यानंतरही पहिल्या डावात अडचणींवर मात करून लढत बरोबरीत सोडवू शकलो यात मी समाधानी आहे,’’ असेही कार्लसनने सांगितले.
तलाठी भरतीसाठीच्या परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी; अन्यथा उमेदवारांवर थेट फौजदारी कारवाई
- Talathi recruitment 2023 तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही परीक्षा घेताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षेसाठी जाताना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर जाताना करण्यात येणाऱ्या तपासणीत इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्यास तातडीने संबंधित उमेदवारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा भूमी अभिलेख विभागाने दिला आहे.
- राज्यभरात तलाठी पदासाठी चार हजार ४६६ जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्याकरिता दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती दाखल झाले. १७ ऑगस्टला सुरू झालेली ही १४ सप्टेंबपर्यंत होणार आहे. आतापर्यंत १७, १८, १९, २०, २१ आणि मंगळवारी २२ ऑगस्ट असे सहा दिवस तीन सत्रांत राज्यभरात परीक्षा झाली. त्यामध्ये राज्यात काही ठिकाणी पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोमवारी (२१ ऑगस्ट) तांत्रिक कारणांमुळे परीक्षा दोन तास विलंबाने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून काटेकोर नियोजन करत उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घातली आहे.
- अप्पर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते म्हणाले, की तलाठी भरतीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी केली आहे. त्याबाबत उमेदवारांना यापूर्वीच कळवण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांवर तपासणीदेखील करण्यात येत आहे. या तपासणीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- दरम्यान, ऑनलाइन परीक्षा नको असणाऱ्या घटकांकडून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, टीसीएस कंपनीचा अधिकारी यांची समिती केली आहे. अनुचित घटना घडल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही रायते यांनी सांगितले.
अशी होईल परीक्षा
- पहिल्या टप्प्यातील १७ ते २२ ऑगस्टपर्यंत परीक्षा पार पडली आहे. आता परीक्षेचा दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत, तर तिसरा टप्प्यात ४ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा होणार आहे. २३, २४, २५ ऑगस्ट, तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या दिवशी परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले नाही, असेही भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत; आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होणार
- दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणात भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता.
- करोना महासाथीनंतर ‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे. ही परिषद मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस चालणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्सच्या रशिया वगळता इतर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांची भेट होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असल्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेला न जाता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
- त्यापूर्वी, शिखर परिषदेसाठी निघताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील मोठय़ा लोकसंख्येच्या समस्यांवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी ब्रिक्स हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामध्ये अनेक स्तरांवर विकास आणि सुधारणा यांचा समावेश आहे. या शिखर परिषदेमध्ये सदस्य देशांना भविष्यात सहकार्याचे क्षेत्र ओळखणे आणि संस्थात्मक विकासांचा आढावा घेणे यासाठी उपयुक्त संधी मिळणार आहे. या परिषदेसाठी आफ्रिका खंडातील आणि पश्चिम आशियामधील २० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी आणि गुरुवारी होणाऱ्या विविध चर्चामध्ये हे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. तर बुधवारी होणाऱ्या शिखर परिषदेत केवळ ‘ब्रिक्स’चे सदस्य देश सहभागी होणार आहेत.
जगात ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांचे स्थान
- ‘ब्रिक्स’ गटामधील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये जगातील ४१ टक्के लोकसंख्या राहते आणि या पाच देशांचा जागतिक जीडीपीचा वाटा २४ टक्के आहे. तसेच या पाच देशांमध्ये होणारा व्यापार हा जागतिक व्यापाराच्या १६ टक्के आहे.
इतिहास घडविण्यास ‘इस्रो’ सज्ज; ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडरचे आज चंद्र पृष्ठावर अवतरण
- ISRO Chandrayaan-3 Moon Mission Landing ४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे.
- बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडरचे चंद्रपृष्ठावर अवतरण करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले. ‘चंद्रयान-३’ ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण करणारा भारत चौथा देश बनणार आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया या देशांच्या अंतराळ यानाचे चंद्रपृष्ठावर अवतरण करण्यात आले आहे. २०१९ मध्ये अपयशी ठरलेल्या ‘चंद्रयान-२’चीच पुढील मोहीम म्हणून ‘चंद्रयान-३’ मोहीम आखण्यात आली होती.
- चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि अलगद अवतरण, चंद्राचा अभ्यास आणि वैज्ञानिक प्रयोग करणे ही या मोहिमेची वैशिष्टय़े आहेत. अवतरणापूर्वी विक्रम मॉडय़ूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त अवतरण स्थळी सूर्योदयाची प्रतीक्षा केली जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण करण्यापूर्वी ५.४५ वाजता अवतरणाची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे, असे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले.
अडचणी आल्यास अवतरण लांबणीवर
- ‘चंद्रयान-३’चे अवतरण बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता करणार असले, तरी काही अडचणी आल्यास अवतरणाची वेळ बदण्यात येऊ शकते, अशी माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी दिली. बुधवारी अलगद अवतरणात काही समस्या अथवा अडथळे आल्यास चंद्रपृष्ठावर यान उतरण्याची प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असे देसाई यांनी सांगितले. ‘इस्रो’कडून यंत्रणेची नियमित तपासणी सुरू असून सर्व काही सुरळीत सुरू आहे. बुधवारी वेळापत्रकानुसारच अलगद अवतरण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही देसाई म्हणाले.
भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने एकाच दिवशी ठोकले २ शतक, आजपर्यंत मोडला नाही १२५ वर्षांपूर्वीचा हा विक्रम
- क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम रचले गेले आहेत. परंतु, १२७ वर्षांपूर्वी म्हणजे आजच्याच दिवशी २२ ऑगस्टला भारताच्या एका दिग्गज खेळाडूनं मैदानात धावांचा पाऊस पाडून एकाच दिवशी दोन शतक ठोकले होते. या खेळाडूच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद असून आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटरने हा विक्रम मोडला नाहीय. कुमार श्री रणजीत सिंहजी असं या स्टार खेळाडूचं नाव असून त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये या विक्रमाला गवसणी घातली होती. एक दिवसात दोनवेळा शतक ठोकण्याचा कारनामा त्यांनी केला होता.
- रणजीत सिंहजीने वर्ष १८९६ मध्ये ससेक्ससाठी खेळत असताना ही चमकदार कामगिरी केली होती. इंग्लडच्या होव शहरात खेळलेल्या त्या सामन्यात यॉर्कशायरने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात ससेक्सच्या टीमने तिसऱ्या दिवशी रणजीत सिंहजी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९१ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. त्यानंतर रणजीत सिंहजीने तिसऱ्या दिवशी पुन्हा शतकी खेळी करून ससेक्सला दोन विकेट्स गमावल्यानंतर २६० धावांपर्यंत पोहोचवलं आणि सामना रद्द झाला.
- रणजीत सिंहजी यांच्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने दोन शतक ठोकले नाहीत. विक्टोरियासाठी खेळताना मॅथ्यू एलियटने ३१ डिसेंबर १९९५ ला १०४ धावा केल्या आणि त्यानंतर फॉलोऑन इनिंग्समध्ये १३५ धावा केल्या. परंतु, एलियटने पहिल्या डावात केलेल्या धावांमधून ९८ धावा ३० डिसेंबरलाच केल्या होत्या. मात्र, एलियटची तुलना रणजीत सिंहजी यांच्या विक्रमाशी करता येऊ शकत नाही.
- स्पेनचा फलंदाज तारिक अली अवानने यूरोपियन चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन २ मध्ये ४ सप्टेंबर २०१२ ला दोन शतक केले होते. पहिल्यांदा तरिकने एस्टोनिया विरोधात ६६ चेंडूत नाबाद १५० धावांची खेळी केली होती. पुन्हा त्याच दिवशी पोर्तुगालविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये १४८ धावा केल्या. तारिक अली अवानने टी-२० क्रिकेटमध्ये हे दोन्ही शतक ठोकले होते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २२ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- २१ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- २० ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १९ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १८ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |