२५ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |25 August 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ ऑगस्ट चालू घडामोडी

Chandrayaan 3: चंद्रयान-३ च्या यशात खासगी क्षेत्राचे योगदान

 • चंद्रयान-३ मोहिमेला मिळालेल्या यशामुळे इस्रोवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. त्याचवेळी या मोहिमेमध्ये खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच केरळचे उद्योगमंत्री पी राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील सहा सार्वजनिक क्षेत्रातील आणि २० खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी चंद्रयान-३ मोहिमेमध्ये आपले योगदान दिले. 
 • टाटा कन्सल्टिंग इंजीनियिरग लिमिटेड (टीसीई) या कंपनीने अद्वितीय आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने महत्त्वाच्या प्रणाली आणि उप-प्रणालींची बांधणी केली. त्यामध्ये सॉलिड प्रोपेलंट प्लँट, व्हेईकल असेंब्ली बिल्डिंग आणि मोबाईल लाँच पेडस्टल यांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीने चंद्रयान-३ मोहिमेसाठी विविध घटकांचा पुरवठा केला. कंपनीच्या पवई येथील कारखान्यात मधील भाग आणि नोझल बकेट फ्लँग यांची निर्मिती केली तर जमीन व उड्डाण अम्बिलिकल प्लेट यांची निर्मिती कोईम्बतूरला करण्यात आली. वालचंदनगर इंडस्ट्रीजने प्रक्षेपकाचे काही भाग, पहिल्या टप्प्याचे बुस्टर आणि ८० फूट उंचीची व १२ फुटांपेक्षा जास्त व्यासांची फ्लेक्स नोझल कंट्रोल टँक यांची निर्मिती केली. गोदरेज अँड बॉयस या कंपनीने एल११० इंजिन आणि सीई२० इंजिन थ्रस्ट चेंबरच्या निर्मितीमध्ये योगदान दिले.
 • सेंटम इलेक्ट्रॉनिक्सने एलव्हीएम३ एम४ साठी अत्यंत महत्त्वाचे २०० पेक्षा जास्त मोडय़ूल आणि उपयंत्रणा पुरवल्या. अनंत टेक्नॉलॉजिज (एटीएल) या कंपनीने प्रक्षेपकासाठी (एलव्हीएम३) संगण, दिशादर्शन यंत्रणा, नियंत्रण इलेक्ट्रॉनिक, टेलिमेट्री आणि ऊर्जा प्रणाली यासारख्या घटकांचा पुरवठा केला. त्याशिवाय विद्युत व इलेक्ट्रॉनिक यंत्रणांशी संबंधित अनेक उपकरणांचा पुरवठा केला. ओम्नीप्रेझेंट रोबोटिक टेक्नॉलॉजिज लि. यांनी प्रज्ञान रोव्हरवरील प्रोसेसिंग इमेजसाठी वापरलेले सॉफ्टवेअर तयार केले. सेमीकंडक्टर लॅबोरेटरीज (एससीएल) या कंपनीने एलव्हीएम३ साठी विक्रम प्रोसेसर (१६०१ पीई०१) आणि सीएमओएस कॅमेरा कॉन्फिग्युरेटर (एससी१२१६-०) तयार केले.
 • हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीने रोव्हर आणि लँडरसाठी धातू आणि संयुगांच्या रचना, सर्व प्रोपेलंट टाक्या आणि बस रचना तयार करण्यात योगदान दिले. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (बीएचईएल) लँडर मोडय़ूल आणि प्रोपल्शन मोडय़ूलसाठी लिथियम आयन बॅटरी आणि टिटॅनियम अलॉय प्रोपेलंट टाकी तयार केली. एमटीएआर टेक्नॉलॉजिजने एलव्हीएम३ साठी विकास इंजिने, टबरे पम्प, बूस्टर पम्प, वायू जनरेटर आणि इंजेक्टर गेड व इलेक्ट्रो-न्युमॅटिक मोडय़ूल यांच्यासह क्रायोजेनिक इंजिन उपयंत्रणांचा पुरवठा केला.

आता वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा होणार, सरकारचा मोठा निर्णय

 • शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार करण्यात आला आहे. या नवीन आराखड्यानुसार, बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण मिळवण्याची संधी मिळेल. वर्षातून एकदाच बोर्डाची परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो, हा ताण कमी करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल उचलल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
 • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी जाहीर केलं की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, नवीन अभ्यासक्रम आराखडा (NCF) तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ साठी पाठ्यपुस्तकंही विकसित केली जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
 • नवीन शैक्षणिक धोरणानुसार, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. यातील एक भारतीय भाषा असेल. हा निर्णय केवळ भाषिक विविधता आणण्यासाठी नव्हे तर देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी घेतला आहे, असं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये म्हटलं आहे.
 • “विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी. त्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी, या हेतुने वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा घेतल्या जातील. ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते परीक्षेसाठी तयार आहेत, असं जेव्हा विद्यार्थ्यांना वाटेल. तेव्हा त्याच विषयांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतील,” असंही नवीन अभ्यासक्रम आराखड्यात म्हटलं आहे.

सीमेवर शांतता हवी!; संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे जिनपिंग यांना आवाहन

 • भारत आणि चीनचे संबंध सुधारण्यासाठी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना केले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोघांची ओझरती भेट झाली. यावेळी अधिकारीस्तरावर सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चाची व्याप्ती वाढविण्यावर दोघांचे एकमत झाल्याचे परराष्ट्र सचिव विनय ख्वात्रा यांनी सांगितले.
 • जोहान्सबर्गमध्ये पंतप्रधानांची जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली नाही. मात्र पत्रकार परिषदेपूर्वी दोघांची ओझरती भेट आणि अत्यंत थोडक्यात चर्चा झाल्याचे ख्वात्रा म्हणाले. सीमाभागामध्ये शांतता राहणे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर केला जाणे हे भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या पार्श्वभूमीवर सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या लष्करी अधिकारी स्तरावरील चर्चाची तीव्रता वाढविण्याचे आदेश आपापल्या अधिकाऱ्यांना देण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविल्याचे ख्वात्रा यांनी स्पष्ट केले. मे २०२०मध्ये लडाख सीमेवर चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे मोठा संघर्ष उफाळला होता. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
 • तणाव कमी करण्यासाठी आतापर्यंत लष्करी अधिकारी स्तरावर १९ बैठका झाल्या असल्या तरी त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. सप्टेंबर २०२२मध्ये बालीमध्ये झालेल्या मोदी-जिनपिंग भेटीवेळी दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भारताकडून सांगण्यात आले होते. मात्र गेल्या महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्या भेटीत लडाखचा विषय चर्चिला गेल्याचे सांगितल्यामुळे भारताच्या परराष्ट्र खात्यालाही तसे निवेदन जारी करावे लागले होते. यावेळी मात्र भेट झाल्याच्या दिवशीच परराष्ट्र सचिवांनी चर्चेचा तपशील जाहीर केला आहे. गुरूवारच्या भेटीबाबत चीनकडून अद्याप अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही.

‘ब्रिक्स’ गटात सहा नवे देश; नव्या सदस्यांच्या समावेशामुळे अधिक मजबुती : मोदी

 • ‘ब्रिक्स’ गटाच्या राष्ट्रप्रमुखांनी गुरुवारी अर्जेटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सहा देशांचा ‘ब्रिक्स’मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. या सहा देशांना पूर्णवेळ सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे. हे सदस्यत्व १ जानेवारी २०२४ पासून अमलात येईल.
 • ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे यजमान आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अखेरच्या दिवशी पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा केली. सहा नवीन देशांच्या समावेशामुळे ब्रिक्स गटाची सदस्य संख्या आता ११ इतकी होणार आहे. सध्या ब्राझील, भारत, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका हे ‘ब्रिक्स’चे पूर्णवेळ सदस्य आहेत. रामाफोसा यांच्याबरोबर या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनॅशियो लुला दा सिल्वा हे उपस्थित होते. ‘ब्रिक्स’च्या विस्ताराबद्दल काही काळापासून चर्चा सुरू होती. विस्तार प्रक्रियेची मार्गदर्शक तत्वे, मानके, निकष आणि कार्यपद्धती यावर या परिषदेत सहमती झाल्याचे रामाफोसा यांनी सांगितले.
 • तर, बदलत्या काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल करायला हवेत हा संदेश ‘ब्रिक्स’चा विस्तार आणि आधुनिकीकरणाने दिला आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्यांनी सांगितले की, ‘भारताने नेहमीच ‘ब्रिक्स’च्या विस्ताराला पूर्ण पाठिंबा दिला आहे. नवीन सदस्यांच्या समावेशामुळे एक संस्था म्हणून ‘ब्रिक्स’ अधिक मजबूत होईल असे भारताचे मत आहे’. ‘ब्रिक्स’चा विस्तार ही सहकार्याची नवीन सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया चीनकडून व्यक्त करण्यात आली. दूरदृश्य पद्धतीने परिषदेत सहभागी झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही या निर्णयाची प्रशंसा केली.

प्रज्ञानंदची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली, फायनलच्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने मारली बाजी

 • भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
 • बुद्धिबळ विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या टायब्रेकर सामन्यात भारताचा युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद जगातील नंबर-1 खेळाडू कार्लसनच्या मागे पडला. यानंतर दोघांमधील फायनल स्कोअर कार्लसन १.५ तर प्रज्ञानंदसाठी ०.५ असा राहिला होता. या सामन्यात १८ चालीनंतर क्वीन्स बदलण्यात आल्या, पण त्याचा फायदा कार्लसनला मिळाला.
 • टायब्रेकर सामन्यात दोन्ही खेळाडूंना २५-२५ मिनिटे मिळतात. त्याचबरोबर प्रत्येक चालीनंतर, खेळाडूच्या वेळेत १० सेकंद जोडले जातात. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पहिल्या २ सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पहिला सामना २२ ऑगस्ट रोजी झाला होता. यामध्ये प्रज्ञानंदने पांढऱ्या आणि कार्लसनने काळ्या मोहऱ्यांसह हा सामना खेळला, त्यानंतर ३५ चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी हातमिळवणी केली आणि सामना अनिर्णित राहिला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.