२५ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |25 October 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ ऑक्टोबर चालू घडामोडी

गिनीज बुकात नोंद झालेल्या जगातल्या सर्वात वृद्ध श्वानाचं निधन, ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

 • फेब्रुवारी २०२३ या महिन्यात बॉबी या श्वानाच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आला. कारण ३० वर्षे २६६ दिवस जगलेला जगातला तो एकमेव श्वान ठरला होता. मात्र आता वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. बॉबी नावाच्या श्वानाचं वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झालं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटनेच हे वृत्त दिलं आहे.
 • बॉबी हा श्वान पोर्तुगालच्या लीरिया प्रांतातल्या कॉनकिरोज शहरातल्या एका गावात कोस्टा परिवारात वास्तव्य करत होता. राफिरो डो एलनतेजो या ब्रिडचा तो श्वान होता. खरंतर श्वानाचं आयुष्य हे सरासरी १२ ते १५ वर्षे असतं. मात्र बॉबी हा ३१ वर्षे जगला. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलिनय कॅटल डॉग ब्लुईच्या नावे होता. ब्लुई १९१० ते १९३९ अशी २९ वर्षे जगला होता. मात्र बॉबी हा श्वान ३१ वर्षे जगला. बॉबीच्या जन्माची नोंद लीरियाच्या व्हेटरीनरी मेडिकल सर्विल ऑफ लीरिया मध्ये करण्यात आली आहे.
 • बॉबीचा जन्म ११ मे १९९२ रोजी झाला होता. त्याच्या वयाचं वर्ल्ड रेकॉर्ड नुकतंच म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये झालं होतं. त्यानंतर आता याच बॉबी या श्वानाचा मृत्यू झाला आहे. कोस्टा कुटुंबाचा हा पाळीव श्वान होता. त्याची गोष्टही रंजक आहे. ३८ वर्षीय लियोनल कोस्टा म्हणाले होते, माझे वडील शिकारी होते, त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो आणि आमच्याकडे अनेक पाळीव श्वान होते. त्यामुळे नव्या पिल्लांना आपण नको ठेवुयात असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. घरातल्या श्वानांना जेव्हा पिल्लं झाली त्यातच एक बॉबीही होता. माझ्या वडिलांनी इतर पिल्लांना सोडून दिलं. पण बॉबीला त्यांनी पाहिलं नाही. मग तो आमच्याबरोबरच राहिला. माझ्या आईने म्हणजे गीराने बॉबीला वडिलांच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने सांभाळलं. वडिलांना समजलं तेव्हा बराच उशीर झाला होता. पण मग त्यांनीही त्याला स्वीकारलं आणि मग बॉबी हा श्वान आमच्या कुटुंबाचाच एक भाग झाला असं लियोनेलने सांगितलं होतं. जगातल्या सर्वात वृद्ध श्वानाचा आता मृत्यू झाला आहे.

सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताचीच! केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या अहवालाचा दावा

 • जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कायम राहील, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अहवालात सोमवारी वर्तविण्यात आला. देशांतर्गत भक्कम वित्तीय स्थिती आणि महागाईचा दर सौम्य राहण्याची अपेक्षा यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • सप्टेंबरचा मासिक आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, पर्शियन आखातातील सुरू असलेल्या घडामोडी आणि परिस्थितीत होणाऱ्या बदलांनुसार खनिज तेलाच्या भावात वाढ होण्याची शक्यता यामुळे जागतिक पातळीवरील अनिश्चितता आहे. अमेरिकेत पतधोरण अजूनही कठोर पातळीवर असून, त्यामुळे वित्तीय स्थितीवर परिणाम होऊ शकतो. सध्या अमेरिकेतील भांडवली बाजारांमध्ये वाढ होण्यापेक्षा घसरण होण्याचा धोका अधिक आहे. जर घसरण झाली तर त्याचे परिणाम इतर बाजारांवरही होतील. भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर जोखीम वाढू शकते. ही जोखीम आणखी वाढून कायम राहिल्यास त्याचा परिणाम भारतांसह इतर देशांतील आर्थिक घडामोडींवर होऊ शकतो.
 • चालू आर्थिक वर्षात भारताच्या समष्टी अर्थव्यवस्थेविषयक अनुमान चांगले आहेत. देशांतर्गत वित्तीय स्थिती भक्कम आहे. याचबरोबर क्रयशक्ती आणि गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. आगामी रब्बी हंगामातील उत्पादनाने धान्यसाठ्यामध्ये सुधारणा होईल. खाद्यवस्तूंची महागाई कमी झाली असून, मूळ महागाईही कमी होत आहे. कमी झालेली व्यापारी तूट आणि पुरेशी परकीय गंगाजळी यामुळे भारताची बाह्य आर्थिक स्थिती चांगली आहे. रिझर्व्ह बँकेने निर्मिती, ग्राहक विश्वास, रोजगार आणि महागाईबाबत केलेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचे स्थान चालू आर्थिक वर्षात कायम राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही वर्तविला आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि भू-राजकीय आव्हाने असूनही भारताच्या आर्थिक ताकदीबाबत जागतिक विश्लेषकांचा आत्मविश्वास वाढत आहे.

अखेर चीनच्या ‘बेपत्ता’ संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी; जनरल ली शांगफू यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा अद्याप नाही

 • गेल्या दोन महिन्यांपासून कुणालाही न दिसलेले चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांची अखेर पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कुणाची नेमणूक करणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामुळे क्षी जिनपिंग यांच्या प्रशासनात सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा पद्धतीने ‘बेपत्ता’ झाल्यानंतर हकालपट्टी झालेले ते दुसरे उच्चपदस्थ आहेत.
 • मार्चमध्ये जिनपिंग यांनी केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलांत शांगफू यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्रीपदावर पोहोचलेले शांगफू २९ ऑगस्टला एका भाषणात दिसले होते. अशाच पद्धतीने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री चिन गांगदेखील बेपत्ता झाले होते. मंगळवारी चीनच्या सरकारी सीसीटीव्ही वाहिनीने शांगफू आणि चिन गांग यांना पदावरून हटविल्याचे जाहीर केले. यामुळे दोघांच्याही राजकीय कारकीर्दीचा अंत झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी होणार का, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
 • शांगफू आणि गांग यांचे गायब होणे आणि त्यानंतर झालेली हकालपट्टी याचा संबंध चीनच्या परराष्ट्र धोरणांशी जोडला जात असून जिनपिंग यांच्याबाबत मंत्रिमंडळात नाराजी असल्याचीही चर्चा रंगली आहे. जिनपिंग यांना अन्य कशाहीपेक्षा निष्ठा महत्त्वाची असल्याचे मानले जाते. त्यांनी अलीकडेच काही उच्चपदस्थांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून चौकशी सुरू केली होती. प्रशासनातील विरोधकांना संपविण्यासाठी जिनपिंग यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. शिवाय शांगफू यांच्यावर रशियाकडून अनधिकृतरीत्या शस्त्रास्त्र खरेदी केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने त्यांच्यावर प्रवेशबंदी लादली होती. याबाबत अर्थातच चीन सरकारने पूर्णत: मौन आहे.

मराठमोळ्या शास्त्रज्ञाचा अमेरिकेत डंका, बायडेन यांच्या हस्ते सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित

 • अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये दोन भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांचा सत्कार केला. नॅशनल मेडल फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन या पुरस्काराने या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला आहे. अशोक गाडगीळ आणि सुब्रा सुरेश अशी या दोन्ही शास्त्रज्ञांची नावं आहेत. लोकांचे जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय उपचार पद्धतींना अधिक सक्षम करू शकतील असे शोध लावणे, विविध आजारांशी लढण्यास मदत करणे आणि अन्न सुरक्षा सुधारण्यासह वेगवेगळ्या संशोधन कार्यात महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल या दोन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला आहे.
 • अशोक गाडगीळ हे अमेरिकेच्या लॉरेन्स बर्कली नॅशनल लॅबोरेटरीत वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. तसेच ते कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. गाडगीळ यांनी त्यांचं उच्च शिक्षण आयआयटी कानपूर आणि बर्कली विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. तर सुब्रा सुरेश हे मुळचे मुंबईकर आहेत. ते सध्या कार्नेजी मेलन विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सुरेश हे अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे संचालकही आहेत. यापूर्वी ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या अभियांत्रिकी विभागाचे कुलगुरू होते.
 • गाडगीळ आणि सुरेश यांचा गौरव करताना व्हाईट हाऊसने म्हटलं आहे की, आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन अनेक शास्त्रज्ञांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि नॅशनल मेडल फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशनने सन्मानित करत आहेत. आपल्या देशाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ज्यांनी नवं तंत्रज्ञान शोधलं आहे, नवे शोध लावले त्यांचा विज्ञान क्षेत्रातल्या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरव करत आहोत. १९५९ पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती.
 • व्हाईट हाऊसने यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. या निवदेनात म्हटलं आहे की, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, शैक्षणिक विज्ञान, अभियांत्रिकी, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सामाजिक, व्यावहारिक आणि आर्थिक विज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणारे शास्त्रज्ञ हे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या हस्ते विशेष सन्मानास पात्र आहेत.

राज्यात नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढणार

 • देशातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड तापमान वाढ दिसून आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडी घट झाली असून काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातही काही भागात थंडी जाणवू लागली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे.
 • अरबी समुद्रात “तेज” चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात “हमून” चक्रीवादळ तयार झाले आहे. २०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरातवर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केले.
 • गुजरातमध्ये आगामी पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.