Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |26 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२६ सप्टेंबर चालू घडामोडी
विश्वविक्रमासह सांघिक सुवर्ण!
- ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेता रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंह पन्वर आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांच्या भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सांघिक विभागात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. सोमवारी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला नेमबाजीत एकूण तीन पदके मिळाली. वैयक्तिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने चुरशीच्या लढतीनंतर शूट-ऑफमध्ये कांस्यपदक मिळवले. पाठोपाठ पुरुषांच्याच २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक विभागात भारताने कांस्यपदक पटकावले.
- यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे खाते उघडून देताना ठाणेकर रुद्रांक्ष, दिव्यांश आणि ऐश्वर्य या त्रिकुटाने पात्रता फेरीतच १८९३.७ गुणांसह चीन आणि दक्षिण कोरियाचे तगडे आव्हान परतवून लावले. रुद्रांक्षने यापूर्वी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवला आहे. वयाच्या १९व्या वर्षीच कमालीची प्रगल्भता दाखवणाऱ्या रुद्रांक्षने ६३२.५, तोमरने ६३१.६, तर दिव्यांशने ६२९.६ गुणांची कमाई करताना एकत्रित जागतिक विक्रमाचाही वेध घेतला. कोरियाला (१८९०.१) रौप्य, तर चीनला (१८८८.२) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- ‘‘स्पर्धा सोपी नव्हती. आमच्यासमोर आव्हान कठीण होते. सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहेच, पण त्यापेक्षा चीनला हरवले याचा आनंद अधिक आहे,’’ असे ऐश्वर्य तोमर म्हणाला. सांघिक प्रकारात रुद्रांक्ष आणि दिव्यांशने अचूक वेध घेतला. वैयक्तिक प्रकारात दिव्यांश अपयशी ठरला. रुद्रांक्ष तिसऱ्या क्रमांकाने, तर ऐश्वर्य पाचव्या क्रमांकाने मुख्य फेरीत दाखल झाला. दिव्यांश आठवा आला. जागतिक अजिंक्यपद, विश्वचषक स्पर्धावगळून अन्य एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी तीन भारतीय प्रथमच अंतिम फेरीत खेळले.
- मुख्य फेरीत संघ रुद्रांक्षबरोबर झालेल्या तीव्र चढाओढीनंतर शूट-ऑफमध्ये ऐश्वर्यने २२८.८ गुणांसह कांस्यपदक आपल्या नावे केले. ऐश्वर्यला रौप्यपदकाची संधी होती. मात्र, कोरियाच्या पार्क हजूनने कामगिरी उंचावताना ऐश्वर्यला रौप्यपदकाच्या शर्यतीतून बाहेर काढले. चीनच्या शेंग लिहाओने २५३.३ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक विभागात अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंह या त्रिकुटाने कांस्यपदक मिळवले.
मध्य प्रदेशात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना उतरवलं मैदानात
- मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात तीन केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
- भाजपानं ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मंत्री फग्गन सिंह कुलस्ते आणि मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार गणेश सिंह, खासदार राकेश सिंह, खासदार रीति पाठक, खासदार उदयप्रताप सिंह यांच्यासह भाजपा महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.
- सतना मतदारसंघातून गणेश सिंह, सीधीमधून रीति पाठक, मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना निवास मतदारसंघातून, प्रल्हाद सिंह पटेल यांना नरसिंहपूर या मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलं आहे.
- दरम्यान, १७ ऑगस्टला भाजपानं पहिली यादी जाहीर केली होती. तेव्हा, ३९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत भाजपानं ७८ उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.
निकाल जाहीर! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची शिक्षक पात्रता परीक्षा
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’तर्फे शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लाखो उमेदवारांसाठी हा मोठा दिलासा आहे. यात उत्तीर्ण उमेदवार विविध प्राथमिक आणि देशभरातील केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय मंडळाच्या सीबीएसई, सीआयएससीई, एनआयओएस, आदी माध्यमिक शाळांमध्ये नोकरी साठी प्रयत्न करू शकतात.
- उमेदवारांना या परीक्षेचा निकाल सीटीइटी डॉट एनआयसी डॉट इन या लिंकवर पाहता येईल. यशस्वी उमेदवारांना मंडळाकडून प्रमाणपत्र मिळणार असून त्या आधारे ते नोकरीसाठी पात्र ठरतील. जुलै २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
भारताच्या व्हिसाबंदी निर्णयामुळे कॅनडाला चिंता; निज्जर हत्या प्रकरण
- भारत आणि कॅनडादरम्यान वाढलेल्या तणावात भारताने केलेल्या काही उपाययोजनांवर कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेअर यांनी चिंता व्यक्त केली. तसेच प्रतिबंधित केटीएफचा प्रमुख हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासामध्ये भारताने सहकार्य करावे आणि ही समस्या योग्य मार्गाने सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे अशी विनंतीही केली.
- जूनमध्ये कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात सरे येथे गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या झाली होती. त्यामध्ये भारताचा हात असल्याची शक्यता असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे वक्तव्य पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पार्लमेंटमध्ये केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने ट्रुडो यांचे आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली, तसेच भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे थांबवले. ‘सीबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलताना, ब्लेअर यांनी भारताने केलेल्या उपायांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘कॅनडामध्ये मोठय़ा प्रमाणात भारताशी संबंधित लोक राहतात. त्यांचे भारतामध्ये कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे भारताने केलेल्या उपायांबद्दल आपल्याला चिंता वाटते.
- निज्जरच्या हत्येसंबंधी आमच्याकडे विश्वसनीय पुरावे आहेत अशी आमची खात्री आहे आणि कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.’ या प्रकरणात आपण कोणत्याही सूत्रांची किंवा माहितीची पुष्टी करणार नाही किंवा ओळख पटवणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात आमच्या होती कोणते किंवा कशा प्रकारचे पुरावे लागले आहेत त्याबाबतही आम्ही आताच काही सांगणार नाही असे ब्लेअर यांनी स्पष्ट केले. यासंबंधीची माहिती कॅनडा आणि आमच्या मित्र देशांसाठी महत्त्वाची आहे असे ब्लेअर यांनी सीबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीला सांगितले. भारताने तपासात सहकार्य केले तर दोन्ही देशांना सत्य काय ते कळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
…म्हणून वंदे भारत ट्रेनमधील ‘ही’ सुविधा पुढील सहा महिने राहणार बंद; रेल्वे प्रशासनाने उचलले महत्त्वाचे पाऊल
- देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संख्या सातत्याने वाढत आहे. यात २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी नऊ नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भेट दिल्या आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांतील प्रवाशांना प्रवास जलद करण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने एक परिपत्रक जारी करत, पुढील सहा महिने वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेज फूड दिले जाणार नाही असे जाहीर केले आहे. आरोग्य स्वच्छता आणि ग्राहकांच्या प्रतिसादानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पण, प्रशासनाने अचानक वंदे भारत ट्रेनमधील पॅकेट फूड देणे का बंद केले जाणून घेऊ…
‘या’ कारणासाठी पॅकेट फूडची सुविधा केली बंद
- प्रवाशांच्या सूचना आणि तक्रारींच्या आधारे रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, बेकरी प्रोडक्ट्स, वेफर्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या.
- रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या आत फेरीवाल्यांमुळे होणारी समस्या, द्रेनमधील खाद्यपदार्थांचा जास्त साठा आणि दरवाजे वारंवार उघडणे यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या गोष्टी लक्षात घेऊन वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेट फूड वस्तूंच्या विक्रीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयआरसीटीसीला देण्यात आल्या ‘या’ सूचना
- वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने IRCTC ला राउंड ट्रिपसाठी ‘रेल नीर’ बाटलीबंद पाण्याचा साठा न करण्याचेही निर्देश दिले आहेत. कारण या बाटल्या अधिक जागा घेतात. यामुळे आता एका ट्रीपपूर्ताच बाटल्यांचा साठा केला जाईल.
जेवणासाठी करावे लागेल प्री-बुकिंग
- रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आता प्रवाशांना खानपान सेवांबाबत प्री-बुकिंग करावे लागणार आहे. वंदे भारत प्रवाशांना प्रवासापूर्वी २४ ते ४८ तास आधी पुन्हा एक एसएमएस पाठवेल. जे प्रीपेड जेवण निवडत नाहीत त्यांनी ट्रेनमध्ये ऑर्डर दिल्यास आणि जेवण उपलब्ध असल्यास ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. या एसएमएसद्वारे प्रवाशांना जेवण आणि जेवणाचे प्रमाणदेखील कळेल.
भारतीय वायू दलात दाखल झालेल्या नव्या ‘सी – २९५’ मालवाहू विमानाचे महत्व काय?
- वायू दलामध्ये लढाऊ विमानांचे अनन्य साधारण महत्व आहे. शत्रु प्रदेशात खोलवर मारा करण्यासाठी, हवाई वर्चस्व गाजवण्यासाठी, स्वप्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची लढाऊ विमाने ही सेवेत असतात. एककीडे लढाऊ विमानांना वायू दलात महत्व आहेच पण मालवाहु विमानांशिवाय वायू दलाच्या ताकदीचे वर्तुळ हे पुर्ण होऊ शकत नाही. वेगाने कसरती करत कमांडोना युद्धभुमिवर उतरवणे, लष्करासाठी आवश्यक मालवाहतुक करणे गरज पडल्यास आप्तकालिन नागरी वापराकरता धावून जाणे अशीही कामगिरी मालवाहु विमाने चोखपणे पार पाडतात.
- भारतीय वायू दलात असंच ताज्या दमाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले एअरबसचे ( airbus company) सी – २९५ ( C – 295 ) हे मालवाहू विमान दाखल झाले आहे. सोमवारी नवी दिल्ली इथल्या वायू दलाच्या तळावर एका शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सी – २९५ चा वायू दलात सहभागी होण्याचा शानदार कार्यक्रम पार पडला.
- ४ ते १० टन वजन वाहून नेण्याची या मालवाहू विमानाची क्षमता आहे. तसंच एकाच वेळी सुमारे ७० सैनिकांना किंवा मग ४५ पेक्षा जास्त छत्रीधारी सैनिकांना ( paratroopers ) यामधून नेलं जाऊ शकतं. वैद्यकीय मदतीच्या वेळी सुमारे ३० स्ट्रेचर असलेल्या रुग्णांना हे विमान नेऊ शकते. या विमानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे कच्च्या धावपट्टीवरुन कमी अंतर कापत उतरण्याची किंवा उड्डाण करण्याची या विमानाची अनोखी क्षमता आहे.
- विशेष म्हणजे चीनच्या सीमेलगतत अत्यंत प्रतिकुल असं वातावरण असलेल्या विमानतळावर याचा वापर सहज शक्य होणार आहे. आप्तकालिन प्रसंगी नागरी वापराकरताही हे विमान महत्त्वाची भुमिका बजावू शकते. या विमानाच्या मागे असलेला दरवाजामुळे विविध कामांकरता याचा वापर करणे हे सहज सोपे ठरणार आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२६ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २५ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २४ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २३ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २२ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २१ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |