यावल अभयारण्य (Yawal Wildlife Sanctuary)
यावल अभयारण्य (Yawal Wildlife Sanctuary)

यावल अभयारण्य (Yawal Wildlife Sanctuary)

सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्त्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली.

वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून ज्यांना वन्यजीव पहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अनेर आणि सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्‌टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात तर पर्वतरांगांमध्ये विसावणाऱ्या ढगांनी सातपुड्यावर धुक्याची दुलई पांघरली आहे की काय असं वाटू लागतं.

वनस्पती

या अभयारण्यात मौल्यवान वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य औषधी वनस्पती आढळतात. अभयारण्याचे क्षेत्र नैसर्गिक उच्च प्रतीचे वन याप्रकारात मोडते. अभयारण्याचे क्षेत्र 177.52 चौ.कि.मी असून या लगत प्रादेशिक यावल विभागाचे एकूण 995.39 चौ.कि.मी वनक्षेत्र आहे. अभयारण्यात सुकी धरण 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले. हे धरण वन्यजीवांची तहान भागवते. क्षेत्रात विविध निरिक्षणस्थळे आहेत. यात चिंचाटी व्ह्यू पाँईट, पालोबा पाँईट, पाच पांडव ही ऊंच शिखरे असून तेथून परिसराचा रमणीय देखावा दिसून येतो.

अभयारण्यात गारबर्डी, जामन्या, गाड्या, उस्मळी, यासारखी गावं समाविष्ट असून तिथे प्रामुख्याने तडवी, पावरा, कोळी, भिल या आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. त्यांची पारंपरिक लोकसंस्कृतीही या जंगल भ्रमंतीत आनंद देऊन जाते. संत मुक्ताबाईचे दर्शन, संत चांगदेवांचे मंदिर आपण पाहू शकतो. मनुदेवीच्या दर्शनानंतर उनपदेव हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पहायाला हरकत नाही. रानवाटांवरून ज्यांना जायला आवडतं त्यांच्यासाठी मध्यप्रदेश – महाराष्ट्राच्या सीमेवर खुपसदेव आणि ताजुद्दिन अवलियाचे दर्शन मन प्रसन्न करणारे आहे. त्यात शिरवेलचे महादेव आणि गोरक्षनाथाचे मंदिर आनंद द्विगुणित करतात.

अभयारण्यात वर्षभर फिरता येते. जळगाव जिल्ह्यातलं हे एकमेव अभयारण्य आहे. पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आसपासच्या क्षेत्रात थंड हवेचे ठिकाण नसल्याने पर्यटकांची शिवाय दुचाकीवर येणाऱ्या वनपर्यटकांची संख्याही हजारोंनी आहे.

धुळे वनवृत्तात संवेदनशील बिनतारी संदेश यंत्रणा ऑगस्ट 2000 पासून सुरु करण्यात आली. ती यावल अभयारण्यात जामन्या आणि लंगडाआंबा या दोन मुख्य ठिकाणी स्थापन करण्यात आली. सात हॅन्डसेट क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून दोन मोबाईल सेट शासकीय जीपवर बसविण्यात आले आहेत. याशिवाय पाल, खिरोदा, यावल, लालमती, रावेर, वाघझिरा, देवझिरी या प्रादेशिक विभागाच्या नियंत्रणाखाली मुख्य ठाण्यांचा उपयोग केला जातो. अवैध चराई, वनवणवा, अवैध वृक्षतोड, अवैध वृक्षकटाई यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बिनतारी संदेश यंत्रणेचा खूप उपयोग होतो.

पर्यटनाचा उत्तम कालावधी

पर्यटनाचा उत्तम कालावधी हा सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी जळगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे शासकीय विश्रामगृहाबरोबर खाजगी निवास व्यवस्थाही उपलब्ध आहे. पाल येथे वनउद्यान आणि विश्रामगृहाबरोबर एका युवक वसतिगृहाची देखील सोय आहे. याचे आरक्षण उपवनसंरक्षक, यावलस्थित जळगाव येथे होते.

जवळचे बस स्थानक व रेल्वे स्टेशन

जवळचे रावेर रेल्वेस्टेशन 25 कि.मी अंतरावर आहे. तर भूसावळ 50 कि.मी अंतरावर आहे. पाल, रावेर, सावदा, भुसावळ ही जवळची बसस्थानके आहेत. ज्यांना विमान प्रवास करावयाचा आहे त्यांना 260 कि.मी अंतरावर औरंगाबाद विमानतळ आहे.

जळगाव जिल्ह्यातील इको टुरिझमला गती देणारं हे अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे. दाटीवाटीने उभी राहिलेली झाडं आणि खान्देशासाठी पाऊस अडवणारी सातपुडा पर्वत रांग डोळ्यांचे पारणे फेडत या वनसंपदेला अंगाखांद्यावर खेळवतांना दिसते. त्यामुळेच यावल अभयारण्य पर्यटकांना खुणावत राहातं आणि यावं यावं असं म्हणत राहातं…

– डॉ. सुरेखा म. मुळे
[email protected]

Source: mahanews.gov.in

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.