यांचा जन्म २३नवम्बर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला.
वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले.
वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले.
बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शीलाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली.
एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली.
मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.