११ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 11 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ नोव्हेंबर चालू घडामोडी

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : शिवा थापा अंतिम फेरीत; भारताच्या चार बॉक्सिंगपटूंची कांस्यपदकाची कमाई:

  • सहा आशियाई पदक विजेता बॉक्सिंगपटू शिवा थापाने जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई वरिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत गुरूवारी अंतिम फेरीत धडक मारली. तर अन्य चार बॉक्सिंगपटूंना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. थापाने (६३.५ किलो वजनी गट) उपांत्य सामन्यात ताजिकिस्तानच्या बाखोदुर उस्मोनोवला ४-१ अशा फरकाने पराभूत करत आगेकूच केली.
  • अंतिम फेरीत त्याचा सामना उज्बेकिस्तानच्या अब्दुलाएव रूसलानशी होईल. थायलंड स्पर्धेत जेतेपद मिळवणारे सुमित आणि गोविंद कुमार यांना आपापल्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदक मिळाले. त्यांच्याशिवाय नरेंदरला (९२ किलोहून अधिक) उपांत्य सामन्याच्या पूढे आगेकूच करता आला नाही.
  • गोविंदने (४८ किलो) कझाकस्तानच्या सानझार ताशकेनबेकडून ०-४ अशी हार पत्करली. सुमितला (७५ किलो) उज्बेकिस्तानच्या आशियाई विजेत्या जाफारोव साईदजामशिदकडून ०-५ असे पराभूत व्हावे लागले. दोन राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हुसामुद्दीनला (५७ किलो) उपांत्यपूर्व सामन्यात डोळय़ाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उपांत्य सामन्यात उतरला नाही. अखेर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नरेंदरला उज्बेकिस्तानच्या मुलोजोनोव लाजिजबेकने ०-५ असे नमवले.
  • शुक्रवारी पाच महिला बॉक्सिंगपटू सुवर्णपदकाच्या लढतीत सहभाग नोंदवतील. ज्यामध्ये टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोरगोहेन (७५ किलो) आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती परवीनचा (६३ किलो) समावेश आहे. स्वीटीनेही (८१ किलो) अंतिम फेरीत स्थान मिळवले असून तिचा सामना कझाकस्तानच्या गुलसाया येरझानशी होईल.

ज्ञानवापी मशीदप्रकरणी आज खंडपीठाची स्थापना:

  • ज्ञानवापी काशी विश्वनाथप्रकरणी सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी खंडपीठाची स्थापना करणार आहे. हिंदूवादी संघटनेच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी गुरुवारी याप्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. यानंतर मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करण्याचे स्पष्ट केले.
  • मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील  पीठाने गुरुवारी काही हिंदू भाविकांच्या वतीने विष्णू शंकर जैन यांनी मांडलेली बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सुरक्षा देण्याचा आदेश १२ नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे.
  • मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, उद्या दुपारी ३ वाजता एका पीठाची स्थापना करणार आहोत. हिंदू पक्षाने ज्ञानवापी परिसरातील तळघराचे कुलूप उघडून पाहणी करण्याची मागणी केली होती.  दाव्यानुसार त्या ठिकाणी ‘शिविलग’ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी एक  आदेश देत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराच्या अंतर्गत सुरक्षेचे निर्देश दिले होते. 

११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर मार्क झकरबर्गने मागितली माफी, म्हणाला “दुर्दैवाने माझ्या…”:

  • फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी (एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के) कमी करण्याची घोषणा बुधवारी केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. झकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले असून, घटलेला महसूल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या हे यामागील कारण असल्याचं सांगितलं आहे. झकरबर्ग यांनी या निर्णयाची जबाबदारी घेतली आहे.
  • “आम्ही सध्या जिथपर्यंत पोहोचलो आहोत त्याची आणि या निर्णयाची जबाबदारी मी घेत आहे,” असं झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर मेटा कर्मचाऱ्यांसाठी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. “हे सर्वांसाठी फारच कठीण असल्याची मला जाणीव आहे. ज्यांना याचा फटका बसला आहे त्यांची मी माफी मागतो,” असं झकरबर्ग यांनी सांगितलं आहे.
  • ‘‘करोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरून आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत,’’ असे झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
  • ‘मेटा’ने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने ‘मेटाव्हर्स’ या नव्या संकल्पनेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अ‍ॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये ‘टिकटॉक’ अधिक लोकप्रिय होत असून त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.

मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे ऋषी सुनक दबावाखाली:

  • ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा दिल्याने  राजकीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांच्या  निकटवर्तीय मंत्र्यांनी त्यांच्यावरील दमदाटीच्या आरोपांची चौकशी प्रलंबित असताना आपल्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला. विरोधी मजूर पक्षाने या प्रकरणी सुनक यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
  • सर गेव्हिन विल्यम्सन हे सुनक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. अद्याप त्यांना खाते मिळावयाचे होते. त्यांच्यावर हुजूर पक्षाचे त्यांचेच सहकारी आणि सनदी सेवकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप होता. त्यांनी ‘ट्विटर’वर आपला राजीनामा प्रसृत केला. विरोधी मजूर पक्षाने सुनक यांच्याकडे सक्षम सहकारी निवडण्याची क्षमता नसून, त्यांचे नेतृत्व सक्षम नसल्याचे हे निदर्शक असल्याची टीका केली आहे. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये पंतप्रधानांना विचारावयाच्या साप्ताहिक प्रश्नाच्या अधिकारात हा मुद्दा उपस्थित करून सुनक यांच्यावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील.
  • मजूर पक्षाच्या उपनेत्या अँजेला रेनर म्हणाल्या, की विल्यमसन यांच्यावरील गंभीर आरोपांची कल्पना असतानाही सुनक यांनी त्यांना मंत्रिपदी नियुक्त केले, विश्वास व्यक्त केला. हे ऋषी सुनक यांच्या खराब निर्णयांचे व कमकुवत नेतृत्वाचे आणखी एक उदाहरण आहे. या पदावर निवडून येण्यासाठी केलेल्या ‘तडजोडीं’मुळे सुनक हतबल आहेत. पक्षासाठी त्यांनी देश वेठीस धरला आहे.

मेरीलँड लेफ्टनंट गव्हर्नरपदी अरुणा मिलर:

  • अरुणा मिलर यांनी मेरीलँड राज्यातील ‘लेफ्टनंट गव्हर्नर’पदासाठीची निवडणूक जिंकली. ही निवडणूक जिंकणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन नेत्या ठरल्या आहेत. मेरीलँडच्या गव्हर्नरपदी डेमोक्रॅटिक पक्षाचेच वेस मूर निर्वाचित झाले आहेत. अमेरिकेच्या राजधानीलगतचे हे राज्य आहे.
  • मंगळवारी संध्याकाळी मतदानानंतर लगेचच झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. त्यानुसार मूर आणि मिलर हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिस्पर्ध्याना पराभूत करून निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. अमेरिकेचा अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस या दोघांनीही मूर आणि मिलर यांचा प्रचार केला होता. ५८ वर्षीय मिलर मेरीलँड लोकप्रतिनिधी गृहाच्या माजी सदस्य आहेत. गव्हर्नरपदाच्या खालोखाल ‘लेफ्टनंट गव्हर्नर’कडे राज्याच्या प्रमुखपदाचे अधिकार असतात.
  • आई-वडिलांसह अमेरिकेत स्थलांतरित होण्यापूर्वी मिलर यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. मिलर म्हणाल्या, की आम्ही १९७२ मध्ये अमेरिकेत आलो. तेव्हापासून मला अमेरिकेतील सुसंधी हमीबद्दल विश्वास होता. ही संधीची हमी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. प्रत्येकास प्रगतीची समान संधी यापुढेही कायम मिळत राहावी, यासाठी मी संघर्षरत राहीन. माझ्या कर्तृत्वातून मी वचनपूर्ती करेन, मेरीलँड कर्तृत्व असलेल्या कुणालाही वंचित ठेवत नाही. जेव्हा ‘गव्हर्नर’ राज्याबाहेर असतात किंवा कुठल्याही कारणाने सक्षम नसतात, तेव्हा ते ‘लेफ्टनंट गव्हर्नर’ त्यांची धुरा सांभाळतात. तसेच ‘गव्हर्नर’ मृत्युमुखी पडल्यास अथवा पदच्युत केल्यास ‘गव्हर्नर’पदाची सूत्रे ‘लेफ्टनंट गव्हर्नर’कडे येतात.
  • या निवडणुकीत मिलर यांच्यावर त्या हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हा आरोप फेटाळत व आक्रमक प्रचाराला समर्थपणे तोंड देत मिलर यांनी अखेर मात केली. खरं तर, मेरीलँडमधील भारतीय-अमेरिकनांमध्ये तिची लोकप्रियता ‘डेमोक्रॅटिक’सह ‘रिपब्लिकन’ पक्षातही आहे. ट्रम्प आणि रिपब्लिकन समर्थकांपैकी काहींनी मिलर यांना पाठिंबा दिला होता. त्यात जसदीप सिंग जस्सी यांचा समावेश आहे.

आयुष्यात कधीही चुकवलं नाही मतदान; श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार:

  • स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं शनिवारी (०५ नोव्हेंबर) हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात निधन झालं. १०५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेगी यांचं आपल्या राहत्या घरात वृद्धापकाळाने निधन झालं. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी २ नोव्हेंबर रोजीच टपालद्वारे मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदान करण्याची त्यांची ही ३४ वी वेळ होती.
  • श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार – १०५ वर्षीय श्याम सरन नेगी यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा मतदान केलं होतं. १९५१-५२ सालच्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, भौगोलिक कारणांमुळे किन्नौर येथे काही महिने आधीच मतदान घेण्यात आलं. कारण हा जिल्हा समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर आहे. त्यामुळे हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते, अशा स्थितीत या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवणं कठीण झालं असते, त्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत हिमाचल प्रदेशातील किन्नोर याठिकाणी काही महिने आधीच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
  • या निवडणुकीत श्याम सरन नेगी यांनी सर्वात आधी मतदान केलं. त्यामुळे ते स्वतंत्र भारतातील पहिले मतदार बनले. त्यावेळी त्यांचं वय ३४ वर्षे होतं. त्यांनी किन्नोर जिल्ह्यातील कल्पा येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. १ जुलै १९१७ रोजी नेगी यांचा जन्म झाला असून त्यांनी प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुकीत मतदान केलं आहे, असा दावा त्यांनी स्वत: केला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.