१३ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१३ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 October 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१३ ऑक्टोबर चालू घडामोडी

तारापूर प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन प्रश्न प्रलंबित का राहिला?

 • तारापूर येथील देशाच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पालगत ५४० मेगावॉटच्या दोन नव्या अणुभट्ट्या उभारण्याचे काम या भागातील ग्रामस्थांच्या विरोधामुळे नेहमीच चर्चेत राहिले. अणुऊर्जा विभागाने (एनपीसीआयएल) आगामी काळात अणुऊर्जा कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला. पालघर तालुक्यातील अक्करपट्टी व पोफरण या दोन गावांचे यानिमित्ताने पुनर्वसन करण्याचेही ठरविण्यात आले होते. मात्र या पुनर्वसनाच्या निमित्ताने अनेक प्रलंबित बाबी आणि न्यायप्रविष्ट प्रकरणे उभी राहिल्याने अणुऊर्जा विस्ताराच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तीव्र विरोध झाला. याप्रकरणी न्यायालयात येत्या १३ ॲाक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध कशासाठी?

 • जड पाण्याचा वापर करून उच्च दाबाच्या स्थितीत (प्रेशराईज हेवी वॉटर रिॲक्टर) ५४० मेगावॉट अणुऊर्जा उत्पादन करण्याचे दोन मोठे प्रकल्प उभारण्याचे अणुऊर्जा विभागाने ठरविले आहे. या प्रकल्पांसाठी तसेच आगामी काळातील संभाव्य अणुऊर्जा विस्तार कार्यक्रमासाठी भूसंपादन आवश्यक असल्याने पालघर तालुक्यातील अक्करपट्टी व पोफरण या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले होते. शासनाच्या या प्रस्तावाला स्थानिकांनी विरोध केला. यामुळे विस्थापनासोबत पुनर्वसित होणाऱ्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती प्रकल्पग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे. तेथूनच हा विरोध तीव्र होऊ लागला आहे.
 • या दोन गावांचे पुनर्वसन कसे झाले ?
 • पोफरण येथील ५३३ तसेच अक्करपट्टी येथील ५१७ कुटुंबे असे एकूण १२५० कुटुंबांचे तारापूर गावाजवळ असलेल्या शासकीय जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. ही नवीन वसाहत उभारताना प्रत्येक भूखंडावर राहण्यासाठी घर बांधण्यासाठी प्रत्येकी एक लाख ९२ हजार रुपयांचा मोबदला राज्य शासनाला देण्यात आला होता. याखेरीज या नवीन वसाहतीमध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एनपीसीआयएलतर्फे राज्य शासनाला पुनर्वसन निधी देण्यात आला.

पुनर्वसन संदर्भात सुरुवातीपासून असंतोष का होता?

 • पुनर्वसन होताना उपजीविकेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी मिळावी ही प्रमुख मागणी होती. पुनर्वसन ठिकाणी राज्य शासनातर्फे उभारण्यात आलेल्या घरांचा दर्जा निकृष्ट असल्याने त्या ठिकाणी राहणे शक्य नव्हते. शिवाय पुनर्वसित गावांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव दिसून आला होता. पोखरण येथील २८९ व अक्करपट्टी येथील २४३ कुटुंबियांकडे आवश्यक कागदपत्रे असतानादेखील त्यांना या प्रक्रियेतून डावलण्यात आले. यामुळे प्रकल्पाविषयी नाराजीची भावना वाढू लागली. आता या नाराजीला अनेक भागात आंदोलनाचे स्वरूप मिळू लागले आहे.

राज्यातील आठ बारवांची टपाल विभागाकडून नोंद; माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी पुस्तिका प्रकाशित

 • वालूरची चक्राकार बारव (स्टेपवेल) टपाल तिकिटावर उमटल्यानंतर आता डाक विभागाने बारवांचा वारसा, संवर्धन आणि त्यासंदर्भातील माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी वास्तुशास्त्रीय आरेखन पूर्ण झालेल्या राज्यातील आठ बारवांची नोंद घेतलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे.
 • राष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून ही माहिती पुस्तिका मुख्य पोस्टमास्टर जनरल (महाराष्ट्र क्षेत्र) के. के. शर्मा आणि पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी बुधवारी प्रकाशित केली आहे. तीत राज्यातील आठ बारवांचा समावेश आहे. त्यातही चार बारव या मराठवाडय़ाच्या परभणी जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती महाराष्ट्र बारव संवर्धन मोहिमेचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी दिली.  परभणी जिल्ह्यातील आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर या बारवांची माहिती पुस्तिकेत नोंद आहे, तर अन्य चार बारवांत अमरावतीतील महिमापूर, साताऱ्यातील बाजीराव विहीर, पुण्यातील मंचर आणि नाशिकमधील गिरनारे येथील बारवचा समावेश आहे.
 • महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी सहकाऱ्यांसह बारव संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. अनेक नामशेष आणि बुजलेल्या बारवांचा शोधही या मोहिमेतून लावण्यात आला आहे. वास्तुशास्त्र आणि जलस्रोताचा वारसा सांगणाऱ्या दोन हजार बारवांच्या संवर्धनाचे काम लोकसहभागातून हाती घेऊन राज्यातील दोन हजार बारवांची अचूक ठिकाणे नकाशावर आणली आहेत.

संकेतस्थळावर तपशील..

 • राज्यातील दोन हजार बारवांची माहिती ‘इंडियन स्टेपवेल्स’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हेलिकल, एल-झेड आकार, शिविपडी आकार, चौकोनी, आयताकृती आकारातील विविध वास्तू स्वरुपातील या बारव आहेत. परंतु त्यांचे आकार, वापरलेली सामग्री आणि पाण्याची साठवण क्षमता भिन्न असल्याचे सांगण्यात आले.

“दहशतवादी संघटनांना X वर स्थान नाही”, हमासशी संबंधित सगळी अकाऊंट्स एलॉन मस्क यांनी हटवली

 • इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) चे संस्थापक एलॉन मस्क यांनी हमास शी संबंधित शेकडो खाती हटवली आहेत. दहशतवादी संघटनांसाठी X वर काहीही स्थान नाही असं म्हणत ही अकाऊंट हटवण्यात आली आहेत.
 • X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी म्हटलं आहे की, “X लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, सध्याचा काळ महत्वाचा आहे. आमच्या माध्यमावर पोस्ट केल्या जाणाऱ्या बेकायदा आणि चुकीच्या पोस्टने काय होऊ शकतं हे आम्हाला माहित आहे. दहशतवादी संघटना, फुटिरतावादी यांना X वर काहीही स्थान नाही. आत्तापर्यंत अशी शेकडो खाती हटवण्यात आली आहेत आणि ही प्रक्रिया यापुढेही सुरु राहणार आहे.”
 • सोशल मीडियावर जो मजकूर पोस्ट करण्यात येतो त्याबाबत युरोपियन संघाने चिंता व्यक्त केली होती. एक्स आणि फेसबुक अशा दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह किंवा भावना भडकवणारा, चिथावणी देणारा मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेत हमास या दहशतवादी संघटनेला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना X वर स्थान नाही म्हणत शेकडो अकाऊंट्स हटवली आहेत आणि ही प्रक्रिया यापुढेही चालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन दिल्लीला पोहचलं विमान, मायदेशी परतल्यावर व्यक्त केल्या ‘या’ भावना

 • इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. इस्रायलमधल्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याची मोहीम सुरु झाली आहे. ऑपरेशन अजय असं नाव या मोहिमेला देण्यात आलं आहे. याच अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन पहिलं विमान बेन गुरियन विमानतळावरुन दिल्ली विमानतळावर पोहचलं आहे. एअर इंडियाचं हे विमान आज सकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झालं. त्यावेळी दिल्ली विमातळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इस्रायलहून आलेल्या भारतीयांचं स्वागत केलं.
 • ऑपरेशन अजय ही इस्रायलमधल्या युद्धाच्या प्रसंगात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठीची भारताची मोहीम आहे. ७ ऑक्टोबरला तिथे युद्ध सुरु झालं. त्यानंतर एअर इंडियाने तातडीचा निर्णय घेत इस्रायलहून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं रद्द केली होती. त्यामुळे असे अनेक भारतीय इस्रायलमध्ये अडकून पडले होते ज्यांना मायदेशी परतायचं होतं. आता ऑपरेशन अजयच्या अंतर्गत तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणलं जातं आहे. तसंच भारत सरकारने हा सगळा खर्च केला आहे. या विमानांतून आलेल्या भारतीयांना तिकिटाच पैसे आकारण्यात आलेले नाहीत.
 • ऑपरेशन अजयच्या अंतर्गत भारतात येण्यासाठी तेल अवीव या विमानतळावरही गर्दी झाली आहे. जे भारतीय इस्रायलहून भारतात परतत आहेत त्यांच्यात बहुसंख्य विद्यार्थी आहेत. इस्रायलमध्ये शिक्षण घेणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याने सांगितलं की जेव्हा इस्रायलमध्ये युद्ध सुरु झालं तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होतो. मात्र भारतीय दुतावासाने आम्हाला मदत केली. त्यामुळे आमचं मनोधैर्य वाढलं आणि आम्हाला भारतात आज परत येता आलं त्याचं आम्हाला समाधान आहे.

तरुणांच्या विकासासाठी केंद्राची डिजिटल शाखा; ‘मेरा भारत’ संस्थेचे ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण

 • आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांप्रमाणे तरुणही निर्णायक मतदार असल्याने केंद्र सरकारने आता युवाशक्तीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तरुणांच्या विकासासाठी केंद्राची युवा डिजिटल शाखा उघडली जाणार असून तिचे ‘माय भारत’ असे नामकरण करण्यात आले आहे. या डिजिटल संस्थेच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
 • मेरा युवा भारत (माय भारत) ही नवी डिजिटल संस्था देशातील तरुणांच्या नेतृत्वक्षमतांचा व कौशल्यांचा विकास करण्यासाठी उभारली जात असून सरदार पटेल यांच्या जयंतीला, ३१ ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नेहरू युवा केंद्र संघटना’ नावाची संस्था आहे. त्याचा कारभार केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत चालवला जातो. आता त्याच धर्तीवर केंद्र सरकार दुसरी संस्था निर्माण करत आहे. ‘एनवायसी’सारखी संस्था अस्तित्वात असली तरी तरुणांसाठी नवी संस्था स्थापन करण्यात गैर नाही, असे ठाकूर यांनी सांगितले. ‘मेरा भारत’ ही संस्थाही केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करेल. ‘मेरा भारत’ या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट तरुणांच्या विकासासाठी अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे असून देशात १५ ते १९ या वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुणांना ‘मेरा भारत’ या संस्थेचा लाभ होईल, असा दावा ठाकूर यांनी केला.

‘मेरा भारत’चे प्रयोजन

 • तरुणांना विकासाच्या विविध संधी उपलब्ध असू शकतात पण, त्याची एकत्रित माहिती मिळण्याची सुविधा नाही, ती ‘मेरा भारत’द्वारे मिळू शकेल. शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ही संस्था माध्यम असेल. सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांची माहिती मिळू शकेल. कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागी होता येईल. ही संस्था केंद्र सरकारकडून कार्यान्वित होणार असली तरी, त्यासाठी केंद्राने अर्थसाह्य दिलेले नाही. तरुणांनी स्वयंप्रेरणेने या संस्थेच्या कारभारामध्ये सहभागी होणे व त्याचा अधिकाधिक लाभ घेणे अपेक्षित आहे. 

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.