Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 June 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१९ जून चालू घडामोडी
भारताला इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद
- कर्णधार सुनील छेत्री आणि लिल्लजुआला छांगते यांनी झळकावलेल्या गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात लेबननला २-० असे नमवत इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
- सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या आक्रमणाला फारशी धार नव्हती. त्यामुळे मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी होती. यानंतर ४६व्या मिनिटाला छेत्रीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. हा त्याचा ८७वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. या गोलसाठी साहाय्य (असिस्ट) करणाऱ्या छांगतेने ६६व्या मिनिटाला गोल झळकावत भारताची आघाडी दुप्पट केली.
- बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या नाओरेम सिंहने छेत्रीच्या पासवर गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेबननच्या गोलरक्षकाने त्याचा प्रयत्न हाणून पाडला. परंतु, भारताने अखेपर्यंत आघाडी राखताना विजय नोंदवला. जागतिक क्रमवारीत १०१व्या स्थानी असलेल्या भारताने दुसऱ्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.
तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, ४ हजार ६६४ जागांवर पदभरती, जाणून घ्या कुठल्या जिल्ह्यात किती जागा असणार?
- बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या बातमीमुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील तलाठ्यांच्या चार हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. यासंदर्भात सरकारला कळविण्यात आले आहे. याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत म्हणाले, ‘या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे. येत्या २० जूनच्या जवळपास ही लिंक खुली होईल, अशी अपेक्षा आहे. सुमारे पाच लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार, तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल.’
- तलाठी पदाच्या परीक्षेचे प्रारूप तयार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाही. त्यामुळे लवकरच परीक्षेच्या अर्जाच्या नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर २१ दिवसांची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे, अमरावती यासारख्या १२ जिल्ह्यांमध्ये आदिवासींचे प्राबल्य आहे. त्या लोकसंख्येच्या आधारावर तलाठ्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत.
आणीबाणी इतिहासातील काळे पर्व- नरेंद्र मोदी
- आणीबाणी हे भारतीय इतिहासातील ‘काळे पर्व’ होते, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की लोकशाही समर्थकांवर केलेले अत्याचार आणि त्या काळात त्यांचा ज्या प्रकारे छळ केला गेला, त्याच्या नुसत्या आठवणीने आजही शहारे येतात.नभोवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक संवाद कार्यक्रमातील १०२ व्या भागातमोदी बोलत होते.
- भारत ही ‘लोकशाहीची जननी’ आहे, जी लोकशाही मूल्य, आदर्श आणि राज्यघटनेला सर्वोच्च मानते. त्यामुळे २५ जून ही तारीख कधीही विसरता येणार नाही. या दिवशी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लागू केली होती. भारताच्या लोकशाही इतिहासातील ही एक मोठी घटना होती. ते एक काळे पर्व होते. लाखो नागरिकांनी आणीबाणीला पूर्ण शक्तिनिशी विरोध केला. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांच्या आठवणी आजही शहारे आणतात. देश जेव्हा ७५ वर्षांवरून स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षांकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीसारख्या गुन्ह्यांचे अवलोकन करणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण
- मोदींनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासह त्यांचा राज्यकारभार आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत केलेले कार्य आजही भारतीय इतिहासाची शान वाढवत आहे. त्यांनी बांधलेले किल्ले इतक्या शतकांनंतरही समुद्रात अभिमानाने उभे आहेत.
ऑटिझमग्रस्त मॅक्स पार्कने २१ व्या वर्षी केला विश्वविक्रम; फक्त ३.१३ सेकंदात सोडवला ३×३×३ रुबिक क्यूब
- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आलेल्या लीजेंड ॲण्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये २१ वर्षीय अमेरिकन तरुणाने इतिहास रचला आहे. कमी वेळात ३x३x३ रुबिक क्यूब सोडवून रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या या तरुणाचे नाव मॅक्स पार्क आहे. सध्या सोशल मीडियावर मॅक्स पार्क आणि त्याच्या या वर्ल्ड रेकॉर्डची चांगलीच चर्चा सुरू आहे.
मॅक्स पार्कने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
- मॅक्स पार्कनी ३x३x३ रुबिक क्यूब फक्त ३.१३ सेकंदात सोडवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याआधी कमी वेळात रुबिक क्यूब सोडविण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या एका युशेंग डू नावाच्या व्यक्तीकडे होता. २०१८ मध्ये युशेंग डू याने ३.४७ मिनिटांमध्ये रुबिक क्यूब सोडवला होता पण आता मॅक्सने हा रेकॉर्ड मोडला आहे.
व्हिडीओ व्हायरल
- Guinness World Records च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा मॅक्सचा रुबिक क्यूब सोडवितानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मॅक्सनी फक्त ३.१३ सेकंदात कसा रुबिक क्यूब सोडवला. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की मॅक्सने खूप कमी वेळात रुबिक क्यूब सोडवून वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले आणि टाळ्या वाजवून मॅक्सचे कौतुक केले. मॅक्सच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.
मॅक्सच्या नावे आणखी कोणते रेकॉर्ड आहेत?
- मॅक्सने ३.१३ सेकंदात ३x३x३ रुबिक क्यूब सोडवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे, मात्र याआधीही त्याच्या नावी ४x४x४, ५x५x५, ६x६x६ आणि ७x७x७ स्पीड क्यूबिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
कोण आहे मॅक्स?
- २८ नोव्हेंबर २००१ रोजी जन्मलेल्या मॅक्स पार्कला ‘Rubik’s Cube speedsolver’ म्हणून ओळखले जाते. मॅक्सच्या नावे स्पीड क्यूबिंगचे अनेक रेकॉर्ड आहे. मॅक्स सीरिटोस कॅलिफोर्नियामध्ये (Cerritos California) राहतो. त्याच्या आईवडिलांचे नाव मिकी आणि श्वान पार्क आहेत.
- मॅक्स जेव्हा दोन वर्षांचा होता तेव्हापासून तो ऑटिझम या आजाराने त्रस्त आहे. ऑटिझम हा एक प्रकारचा न्यूरो डेव्हलपमेंट प्रकार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला संवाद साधताना किंवा परस्पर बोलताना अडचण येते. ऑटिझम आजाराने ग्रस्त असूनसुद्धा मॅक्सने केलेल्या आतापर्यंतचे वर्ल्ड रेकॉर्ड कौतुकास्पद आहेत. मॅक्सवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
‘या’ उपकरणामुळे मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश
- देशाच्या अवकाश मोहिमांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आदित्य एल-१ या सौरमोहिमेसाठी ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (सूट) या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांनी या उपकरणाची निर्मिती केली असून, सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षण ‘सूट’मुळे मिळू शकणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे.
- आयुकाचे प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नुकतेच सूट हे उपकरण आयुकाकडून इस्रोला हस्तांतरित करण्यात आले. आयुकामध्ये प्रथमच पूर्ण अवकाशीय उपकरण विकसित करण्यात आले. त्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा आयुकामध्ये विकसित करण्यात आल्या. आदित्य-एल१ वरील मुख्य पेलोड्सपैकी एक असलेल्या ‘सूट’मुळे सूर्यापासून जवळच्या-अतिनील किरणोत्सर्गाची उत्पत्ती, भिन्नता आणि सौरज्वालांसारख्या उच्च ऊर्जा स्फोटांबद्दल नवीन माहिती मिळेल. उपकरणाच्या हार्डवेअरसाठी इस्रोकडून आयुकाला २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
- प्रा. त्रिपाठी म्हणाले, की प्रकाशाच्या २०० ते ४०० नॅनोमीटर तरंगलांबी श्रेणीतील एक दुर्बीण आहे. त्याद्वारे सूर्याच्या संपूर्ण कड्याची (डिस्क) प्रतिमा मिळेल. सूर्याच्या वातावरणातील महत्त्वपूर्ण निरीक्षणाची क्षमता या उपकरणात आहे. आतापर्यंत संपूर्ण तरंगलांबी श्रेणीतील पूर्ण डिस्क प्रतिमा कधीही प्राप्त झाल्या नाहीत. सौरज्वाला आणि चुंबकीकृत प्लाझ्माच्या उद्रेकामुळे दिशानिर्देशन उपग्रह आणि मानवी अंतराळ उड्डाणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा अभ्यास या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागाबरोबरच सौरज्वालांच्या अभ्यासासाठी सूटची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन आणि ऑक्सिजन पातळी नियंत्रित करण्यातील सूर्याची भूमिका स्पष्ट होईल. सूर्यकिरणातील त्वचेच्या कर्करोगासाठी घातक अतिनील विकिरण मोजणे शक्य होईल.
- ‘सूट’ हे उपकरण ४५ किलोचे आहे. सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षण ‘सूट’मुळे प्राप्त होणार आहे. सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे, असे प्रा. रामप्रकाश यांनी सांगितले.
‘जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार’साठी महाराष्ट्रातील तीन शाळांना नामांकन, मुंबईतील ‘या’ दोन शाळांचीही निवड
- जागतिक सर्वोच्च शाळा पुरस्कारांसाठी नामांकित झालेल्या जगभरातील १० शाळांपैकी पाच शाळा भारतातील निवडण्यात आल्या आहेत. आनंदाची बाब अशी की, त्यातील तीन शाळा महाराष्ट्रातील आहेत. तर, उर्वरित एक शाळा दिल्लीची असून एक अहमदाबादची आहे. समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. गुरुवारी ही नावे जाहीर करण्यात आली.
- युकेतील T4 एज्युकेशनकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा Accenture, American Express, Yayasan Hasanah आणि Lemann Foundation यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. Community Collaboration (समुदाय सहयोग), Environmental Action (पर्यावरणीय कृती), Innovation (नावीन्य), Overcoming Adversity (प्रतिकूलतेवर मात करणे) आणि Supporting Healthy Lives (निरोगी जीवनाचे समर्थन करणे) या श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
- २०२२ पासून हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. दहापैकी टॉप तीन शाळांची नावे सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहेत. तर, विजेत्या शाळेचं नाव ऑक्टोबरमध्ये जाहीर केलं जाईल. या पुरस्कारासाठी युएसडी २५०००० रुपयांच्या निधीची तरतूद आहे. टॉप फाईव्ह विजेत्यांना यापैकी युएसडी ५०००० रक्कम प्रत्येकाला देण्यात येणार आहे.
भारतातील ‘या’ शाळांना मिळाले नामांकन
- Community Collaboration या श्रेणीत भारताच्या ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेचा समावेश आहे. ही मुंबईतील शाळा असून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे.
- Overcoming Advertisy या श्रेणीमध्ये स्नेहलया इंग्रजी माध्यम या महाराष्ट्राच्या शाळेचा समावेश आहे. ही अहमदनगर येथील एक धर्मादाय शाळा असून या शाळेने एड्सग्रस्त पालकांच्या मुलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवला आहे.
- मुंबईतील शिंदेवाडी पब्लिक स्कूल (आकांक्षा फाऊंडेशन) या शाळेलाही Supporting Healthy Lives या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. लॉकडाऊनंतर या शाळेने रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आणि कुपोषित बालकांसाठी काम केले.
- दिल्लीतील नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय एफ ब्लॉक, दिलशाद कॉलनी ही सरकारी शाळाही या स्पर्धेसाठी Community Collaboration या श्रेणीसाठी नामांकित झाली आहे.
- गुजरातमधील अहमदाबाद येथील रिवरसाईड शाळेलाही या स्पर्धेसाठी इनोवेशन श्रेणीत नामांकन मिळालं आहे. या शाळेने I Can ही सुरू केलेली योजना जगभर प्रसिद्ध झाली आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१९ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १८ जून २०२३ चालू घडामोडी
- १७ जून २०२३ चालू घडामोडी
- १६ जून २०२३ चालू घडामोडी
- १५ जून २०२३ चालू घडामोडी
- १४ जून २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |