२१ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ डिसेंबर चालू घडामोडी

शैक्षणिक अभ्यासक्रमातून आता निवडणूक प्रक्रियेचे धडे… नेमके होणार काय?

 • देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून, त्या अनुषंगाने उच्च शिक्षणातील विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता या विषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले आहेत.
 • युजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे, वयाची १७ वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणीसाठी संस्थास्तरावरील आराखडा तयार करून एआयएसएसई आणि युडायइस संकेतस्थळाला जोडणे, संबंधित विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे, अध्यापनासाठी शिक्षक-प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षित करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान आणि त्याबाबतचे प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
 • निवडणूक प्रक्रियेमध्ये, विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल उपयोजन, बॅलेट युनिट, मतदान विभाग, नियंत्रण विभाग, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे आदींबाबतची माहिती दिली जाईल. निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन जागरूक करण्याचा उद्देश आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अभिरूप निवडणूक (मॉक पोल) घेतली जाणार आहे. तसेच येत्या २५ जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

सांगलीत शनिवार, रविवारी ३६ वे राज्य पक्षीमित्र संमेलन

 • महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड साँग एज्युकेशन रिसर्च आणि पब्लिकेशन क्लब सांगलीच्या पुढाकाराने ३६  वे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन २३ आणि २४ डिसेंबरला शांतीनिकेतन लोक विद्यापीठाच्या निसर्गरम्य प्रांगणात संपन्न होणार असून त्याला जोडूनच  २२  डिसेंबरला पक्षांची भाषा या विषयांवर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदही होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे यांनी बुधवारी दिली. 
 • संमेलनाचे उदघाटन, पश्चिम घाट पर्यावरण आणि संरक्षक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धक माजी मानद वन्यजीव रक्षक तथा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित ऊर्फ पापा पाटील हे असणार आहेत. तर ज्येष्ठ वन्य जीव अभ्यासात बीएनएचएसचे संचालक आणि सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक किशोर रिठे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सदर,संमेलनात भारती विद्यापीठाचे पर्यावरण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक  डॉ.इरच भरूचा, फेदर लायब्ररीच्या संस्थापिका इशा मुन्शी, आयसर पुण्याचे श्रेयस माणगावे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
 • या दोन दिवसीय संमेलनात पिसे व पिसारा या प्रमुख विषयांवर सादरीकरणे, शोध निबंध, विद्यार्थ्यांचे शोध निबंध, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक शरद आपटे यांची मुलाखत, सहली, वृक्षदिंडी, प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने अशा कार्यक्रमांची रेलचल असणार आहे. दरम्यान  २२ डिसेंबरला पक्ष्यांची भाषा या विषयावरील परिषदेत डॉक्टर एरिच भरूचा, किशोर रिठे, इशा मुन्शि, शरद आपटे मार्गदर्शन करणार आहेत.

संसदेत ‘इंडिया’चे ९३ खासदार शिल्लक; आणखी दोघांचे निलंबन

 • संसदेच्या सुरक्षाभंगप्रकरणी लोकसभेत फलक घेऊन आलेले केरळ काँग्रेस (एम)चे  सी. थॉमस आणि माकपचे ए. एम. आरिफ या आणखी दोन विरोधी खासदारांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे संसदेतील निलंबित खासदारांची संख्या १४३ झाली असून दोन्ही सदनांमध्ये ‘इंडिया’ महाआघाडीतील फक्त ९३ खासदार उरले आहेत.
 • लोकसभेमध्ये काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे १०, तृणमूल काँग्रेसचे ९, तर द्रमुकच्या ८ खासदारांवर अद्याप तरी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. लोकसभेत ‘इंडिया’चे ४३ खासदार निलंबनमुक्त असल्याने ते अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र, बुधवारी यापैकी एकही खासदार सभागृहामध्ये उपस्थित नव्हता.
 • राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, मनमोहन सिंग, शरद पवार, राघव चड्ढा, संजय राऊत, शिबू सोरेन, मिसा भारती, जयंत चौधरी आदी ‘इंडिया’च्या ५० खासदारांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. संसदेतील सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी खासदार करत होते. त्यांच्या न्याय्य मागणीला अव्हेरून १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले असून ही कारवाई ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी खरगे यांनी संसदेबाहेर केली.दोन्ही सदनांमधील बहुतांश विरोधी खासदारांना निलंबित केल्यामुळे दिवसभर सभागृहांमध्ये प्रचंड शांतता होती. विरोधी बाकांवरच नव्हे तर सत्ताधारी बाकांवरही तुरळक हजेरी होती.

JN.1 या नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही, राज्य सरकार तयार

 • कोरोना विषाणूच्या नव्या जेएन.१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव सध्या देशभरात पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केरळ आणि कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय योजले आहेतच.
 • त्याशिवाय महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थाही अलर्ट मोडवर असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. नव्या विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण महाराष्ट्रात आढळला असला तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर! मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, सात्विक-चिरागला खेलरत्न

 • क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. या दोघांनी जगभरात बॅडमिंटन दुहेरीत भारताचे नाव लौकिक मिळवले आहे. क्रीडा मंत्रालयाने या सर्व नावांना दुजोरा दिला आहे.
 • जानेवारीमध्ये सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान हे क्रीडा पुरस्कार दिले जातील. खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडूंची निवड त्यांच्या त्या वर्षातील कामगिरीच्या आधारे केली जाते. क्रीडा विभाग त्याच्या नावाची शिफारस करतो. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत लांब उडीपटू श्रीशंकर, स्टार पॅरा अॅथलीट शीतल देवी, स्टार महिला हॉकीपटू सुशीला चानू यांच्यासह २६ खेळाडूंचा समावेश आहे.
 • क्रीडा मंत्रालयाच्या माहितीनुसार, विविध समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि सखोल तपासणीनंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मंत्रालयाने सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.