Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 24 December 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२४ डिसेंबर चालू घडामोडी
माजी सैनिकांना सन्मानभेट; ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेत सुधारणेचा सरकारचा निर्णय:
- एक हुद्दा, एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेन्शन-ओआरओपी) योजनेअंतर्गत सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात सुधारणा करण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. या निर्णयाचा लाभ सुमारे २५ लाख निवृत्त सैनिकांना होईल. तसेच हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने, १ जुलै २०१९पासून लागू करण्यात येणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या ‘एक हुद्दा, एक निवृत्तीवेतन’ योजनेत सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आली. हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने, १ जुलै २०१९ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आली.
- जुलै २०१९ ते जून २०२२ या कालावधीतील थकबाकीपोटी निवृत्ती वेतनधारकांना २३,६३८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ८,४५० कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक बोजा सरकारवर पडेल, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. शहिदांच्या पत्नींना आणि अपंग निवृत्तीवेतनधारकांसह कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ दिला जाईल. थकबाकी चार सहामाही हप्त्यांमध्ये दिली जाईल. तथापि, विशेष कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांसह सर्व कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना एका हप्तय़ात थकबाकी दिली जाईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे..
- मागील निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतन २०१८मध्ये निवृत्त झालेल्या सैनिकांच्या किमान आणि कमाल निवृत्तीवेतनाच्या सरासरीच्या आधारावर त्याच श्रेणी व सेवा कालावधीसह पुनर्रनिश्चित केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. ३० जून २०१९ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल, परंतु १ जुलै २०१४ पासून मुदतपूर्व निवृत्त झालेल्यांना मात्र त्यातून वगळण्यात येईल.
- सरकारने २०१५मध्ये एक हुद्दा, एक निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा करून तशी अधिसूचना जारी केली होती. त्यात दर पाच वर्षांनी निवृत्तीवेतनाचा आढावा घेण्याची तरतूद केली होती. माजी सैनिकही निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची मागणी करीत होते.
करोनाबाबत केंद्र सरकारची सावध पावलं, राज्यांना केलं अलर्ट; जाणून घ्या काय दिल्या सूचना:
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये करोना वाढतो आहे त्यामुळे केंद्र सरकार प्रचंड सावध झाल्याची चिन्हं या बैठकीत दिसून आली आहेत. कारण सलग तीन दिवस करोनावर उपाय योजना करण्यासाठी बैठक घेण्यात येते आहे.
- मनसुख मांडवीय यांनी राज्यांना काय सूचना दिल्या आहेत – नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तो लक्षात घेऊन टेस्ट- ट्रॅक-ट्रीट आणि व्हॅक्सिनेशन यावर भर द्या अशी महत्त्वाची सूचना दिली आहे
- याशिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मास्क लावणं, हात स्वच्छ ठेवणं आणि सोशल डिस्टन्सिंग कसं राहिल हे पाहणं म्हणजेच कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याचं नागरिकांना आवाहन करावं अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
- केंद्र सरकारने फ्ल्यू किंवा इतर गंभीर आजारांच्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष ठेवण्याच्या सूचनाही राज्यांना दिल्या आहेत. सगळ्या राज्यांनी कोव्हिड १९ संदर्भातली तयारी करून ठेवा आणि आरोग्य विषयक तयारी सुसज्ज ठेवा अशाही सूचना दिल्या आहेत. आपण आजवर करोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. जर करोनाची चौथी लाट आली तर त्या लाटेला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलावीत असंही केंद्र सरकारने सुचवलं आहे.
पहिल्या टप्प्यात ‘हे’ पाच खेळाडू ठरले सर्वात महागडे, पाहा कोण आहेत:
- आयपीएल २०२३ साठी, २३ डिसेंबर (शुक्रवार) रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होत आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांसोबतच चाहते आणि क्रिकेटपटूही आयपीएलच्या या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजेपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाच खेळाडू सर्वात महागडे ठरले आहेत. ज्यामध्ये एका भारतीयाचा आणि चार विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
- इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी सगळेच संघ मैदानात उतरले होते. आयपीएल इतिहासातील आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मागे टाकत सर्वात मोठी बोली लागणारा तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्सने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. टाटा आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी बोली लागली.
- ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीनसाठी करननंतर सगळे मागे लागले होते. ज्यामध्ये दिल्ली आणि मुंबई त्याच्यासाठी प्रयत्न करताना दिसले. अखेर मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. तसेच तो या लिलावातील दुसरा सर्वात महाग खेळाडू ठरला.
- इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आपला मागील आयपीएलमधील विक्रम मोडणार का? अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. तो अपेक्षाप्रमाणे भाव खाऊ शकला नाही. त्याला धोनीच्या चेन्नईने १६.२५ कोटीला खरेदी केले. मागच्या वेळी त्याने १५ कोटीच्या आसपास कमावले होते. तो यंदाच्या लिलावातील तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे.
- इंग्लंडचा हॅरि ब्रूकसाठी सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये चढाओढ सुरु होती. तो १३.२५ कोटी रुपयांना विकला केला. त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील केले. हॅरि आतापर्यंतच्या लिलावातील चौथा महागडा खेळाडू ठरला आहे.
उच्च शिक्षणाच्या कोटा फॅक्टरीत अस्वस्थता; अति अभ्यासाचा ताण कमी करण्याची स्पर्धा परीक्षार्थीची मागणी:
- आठवडय़ातले सहा दिवस सात ते आठ तासांची शिकवणी, अनेकदा साप्ताहिक सुट्टीतही अतिरिक्त वर्ग आणि एका आठवडय़ात दोन चाचण्या अशा दडपून टाकणाऱ्या वेळापत्रकामुळे कोटा या स्पर्धा परीक्षेच्या देशप्रसिद्ध शिकवणी केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळे जेईई आणि नीटची तयारी करणारे विद्यार्थी दोन साप्ताहिक सुटटय़ांबरोबरच चाचण्यांची संख्या कमी करण्याची एखमुखी मागणी करीत आहेत.
- स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे केंद्र म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटा शहरातील शिकवणी वर्गाच्या वेळापत्रकाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवार ते शनिवार दररोज सात ते आठ तासांच्या शिकवणीचा ताण असतो. या आठ तासांत त्यांना अतिशय कमी मोकळा वेळ दिला जातो. त्याशिवाय, काहीवेळा रविवारीही शंका-समाधान सत्रे आणि अतिरिक्त शिकवणी घेतली जाते.
- त्याचबरोबर दर आठवडय़ाला तीन अंतर्गत चाचण्या आणि महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक मोठी चाचणी घेतली जाते. शिकवणी वर्गाच्या या अभ्यासताणाचा मुद्दा गेल्या महिन्याभरात तीन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे चर्चेत आला आहे. आता ‘जेईई’ आणि ‘नीट’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच ताण कमी करण्याची मागणी केली आहे.
- आम्ही वेळेशी स्पर्धा करतो आणि एक दिवसाची विश्रांती घेतली तर अन्य हजारो विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतो, असे अभ्यास आणि शिकवण्यांच्या भरगच्च वेळापत्रकानुसार धावणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
चार्ल्स शोभराजची फ्रान्सला पाठवणी:
- नेपाळमध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला फ्रेंच ‘सीरियल किलर’ चार्ल्स शोभराजची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याला काठमांडूतील विमानतळावरून फ्रान्सला पाठवण्यात आले. ७८ वर्षीय शोभराजची गुरुवारी कारागृहातून सुटका झाली होती.
- मध्यवर्ती कारागृहातून त्याला सोडण्यात आल्यानंतर त्याच्या प्रवासाच्या कागदपत्राचे सोपस्कार इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पूर्ण केले. सर्वोच्च न्यायालयाने सुटका केल्यानंतर शोभराजला मायदेशी परत पाठवण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून त्याला मायदेशात पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण केली.
- शोभराजला फ्रान्सला पाठवण्यासाठी त्याला शुक्रवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले, अशी माहिती त्याचे वकील गोपाल शिवकोटी चिंतन यांनी दिली. शोभराज प्रथम दोहा आणि त्यानंतर कतार एअरवेजच्या विमानाने संध्याकाळी ६ वाजता पॅरिसला पोहोचेल, असे चिंतन म्हणाले.
- नेपाळमध्ये कायमची बंदी – शोभराजला आयुष्यभर नेपाळला परतण्यापासून रोखले जाणार आहे. एकदा मायदेशी परतल्यानंतर त्याला पुन्हा नेपाळमध्ये प्रवेश करण्यास कायमची बंदी घातली जाणार असल्याचे वृत्त नेपाळमधील वृत्तपत्रांनी दिले आहे. शोभराजवर २०१७ मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे १० दिवस उपचारांसाठी गंगालाल रुग्णालयात दाखल करण्याची विनंती त्याने केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची तात्काळ मायदेशी रवानगी करण्याचे निर्देश दिले होते.
‘प्रलय’ क्षेपणास्त्राची दुसरी यशस्वी चाचणी:
- स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी (फ्लाइट टेस्ट) भारताने गुरुवारी यशस्वीरित्या केली.
- संरक्षण संशोदन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या एखाद्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचण्या सलग दोन दिवस यशस्वीरित्या करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे, असे डीआरडीओने सांगितले. ओडिशा किनाऱ्यानजिकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने ठरवून दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण केल्याचीही माहिती संस्थेने दिली. यापूर्वी बुधवारी या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली होती.
- ‘प्रलय’च्या दुसऱ्या प्रक्षेपणावर सर्व रेंज सेंसर्स आणि टेलिमेट्री, रडार व इलेक्ट्रो- ऑप्टीक ट्रॅकिंग सिस्टिमसह पूर्व किनाऱ्यावर तैनात करण्यात आलेल्या उपकरणांच्या, तसेच ‘इम्पॅक्ट पॉइंट’ नजिक उभ्या करण्यात आलेल्या जहाजांच्या सहाय्याने देखरेख ठेवण्यात आली होती, असे डीआरडीओने सांगितले.
डॉ. अरुण मांडे यांना ‘धन्वंतरी सन्मान पुरस्कार’ प्रदान:
- ‘आरोग्य भारती’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘धन्वंतरी सन्मान पुरस्कार’ यंदा डॉ. अरुण मांडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. संस्थेचे अखिल भारतीय संघटन सचिव अशोक वाष्र्णेय यांच्या हस्ते पुरस्कार डॉ. मांडे यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला.
- सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे प्रांत सदस्य डॉ. किशोरकुमार पूरकर, पश्चिम क्षेत्र संयोजक मुकेश कसबेकर, जिल्हाध्यक्ष अशोकराव करंदीकर, श्रीपाद शिंदीकर, मिलिंद चवंडके, प्रकाश गोसावी, ज्योती गोसावी, डॉ. पौर्णिमा पुरकर, निर्मला मांडे आदी उपस्थित होते.
- पूरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन करून डॉ. मांडे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील निरपेक्ष योगदानाची माहिती दिली. डॉ. मांडे यांच्या कार्याचा गौरव करून वाष्र्णेय म्हणाले,की आजारी व्यक्तीची प्रामाणिकपणे सेवा करणे हा वैद्यकीय सेवेचा मूळ हेतू आहे. अलिकडे आजारी व्यक्तीला विविध तपासण्यांमध्ये अडकवून आर्थिकदृष्टय़ा लुटण्याचे सुरू झालेले काम वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणारे आहे.
- उच्चतंत्रज्ञान व अद्ययावत मशिनरी हाती असूनही अचूक निदान करता येत नाही, ही वस्तुस्थिती मन सुन्न करते. रुग्णाशी चर्चा करायला डॉक्टरांना वेळ नाही. जास्तीत जास्त रुग्ण हाताळण्यात धन्यता मानली जाते. चर्चा करण्यामधून समोर येणारे नवनीत रुग्णास आजारपणामधून कायमस्वरूपी बाहेर काढण्यास उपयुक्त ठरते. आज अशा डॉक्टरांचीच समाजाला खरी गरज आहे. सत्कारास उत्तर देताना डॉ.अरुण मांडे म्हणाले, रुग्णसेवा करताना अनेक कुटुंबांचा ‘फॅमिली डॉक्टर’ होता आले, याचे समाधान वाटते. निर्मला मांडे यांनी भक्तिगीत गायले.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही:
- परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
- राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. सदस्य अभिजित वंजारी, अनिल तटकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. कुठलेही विलंब शुल्क न भरता इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.”
सांगलीतील अपंग कारागिराची भंगारातून मोटार निर्मिती; प्रसिद्ध उद्योजक आनंद मंहिद्र यांच्याकडून दखल:
- सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावातील एका अल्पशिक्षित, अपंग कारागिराने भंगारातील साहित्याचे जुगाड करून चारचाकी मोटार बनविली आहे. दुचाकीचे इंजिन वापरून तयार करण्यात आलेली ही मोटार ताशी ४० किलोमीटर गतीने धावते आहे. त्याच्या या प्रयोगशीलतेची दखल प्रसिद्ध वाहन उद्योजक आनंद र्मंहद्र यांनी घेतली असून त्यांनी या मोटारीच्या बदल्यात त्यांना बोलेरो ही अत्याधुनिक मोटार देऊ केली आहे.
- महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ असलेल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांची ही यशोगाथा. लोहार हे एका हाताने अपंग असून अल्पशिक्षित आहेत. घरीच ते र्वेंल्डगचा व्यवसाय करतात. मुलींना शाळेला सोडण्यासाठी ते दुचाकीचा वापर करीत होते. मुलींने त्यांच्याकडे मोटारीची मागणी केली. यातून त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी भंगारातील साहित्य वापरून ही छोटीशी मोटार बनवली.
- यासाठी त्यांनी दुचाकीच्या इंजिनचा वापर केला असून पुढील बाजूस रिक्षाची तर मागील बाजूस अन्य एका छोट्या दुचाकीची चाके बसवली आहेत. पुढील बाजूस चालकासह दोन आणि मागील बाजूस दोन अशा चार जणांची या मोटारीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोटारीचा ताशी कमाल वेग ४० किलोमीटर आहे. तर एक लिटर पेट्रोलमध्ये ही मोटार ४० किलोमीटर धावू शकते.
- इंधनासाठी पाच लिटर क्षमतेची टाकीही बसविण्यात आली आहे. गंमत अशी,की ही मोटार दुचाकीपासून बनवलेली असल्याने ती चालू करण्यासाठी तशीच ‘किक’ची रचना ठेवलेली आहे. चालकाच्या बाजूला असलेल्या ‘किक’ने ही मोटार सुरू होते.
Omicron: देशात पुन्हा एकदा लॉकडाउन:
- ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत २३६ हून अधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून यामधील १०४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.
- महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यानंतर दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याची तयारी सुरु झाली असताना केंद्राकडूनही कठोर निर्णयाची शक्यता आहे. भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत.
- करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी करोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
“देशात लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका”
- भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केलं असून लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका असं म्हटलं आहे. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे.
- “ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील,” असं ते म्हणाले आहेत.
‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास मंजुरी:
जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
याला चालना देण्यासाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या पहिल्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.
‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली असून कोणत्याही लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना वर्धक मात्रा म्हणून ही लस घेता येणार आहे.
भारत बायोटेकने तयार केलेल्या ‘इन्कोव्हॅक’ किंवा ‘बीबीव्ही 154’ लसीच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे.
‘को-विन’ संकेतस्थळ आणि अॅप्लिकेशनवर शुक्रवार संध्याकाळपासून या वर्धक मात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे.
लस 18 वर्षांवरील व्यक्तींना वर्धक मात्रा म्हणून देण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) नोव्हेंबरमध्येच मंजुरी दिली होती.
राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला पुन्हा मान्यता:
- जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) पुन्हा मान्यता बहाल केली आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
- जागतिक स्तराच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे 2019मध्ये ‘वाडा’कडून या प्रयोगशाळेला निलंबित करण्यात आले होते.
- ‘वाडा’ने जाहीर केलेल्या उत्तेजक सेवन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. या यादीत रशिया अव्वल स्थानी आहे.
- निलंबनाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यास मनाई करण्यात आली होती.
- परंतु या कालावधीत चाचण्यांचे नमुने ‘वाडा’ची मान्यता असलेल्या दोहा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.
हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा:
- कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
- 41 वर्षीय ऑफ-स्पिनर हरभजनची भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते.
- तर त्याने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 ट्वेन्टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 417, 269 आणि 25 मोहरे टिपले.
- 1998मध्ये शारजा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजनने मार्च 2016मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला.
माजी गोलरक्षक सनत सेठ यांचे निधन:
- भारताचे माजी गोलरक्षक सनत सेठ यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
- 1949मध्ये ईस्टर्न रेल्वे एफसी संघाकडून सेठ यांनी कारकीर्दीला प्रारंभ केला. नंतर ते आर्यन क्लबकडून खेळू लागले.
- 1957मध्ये ईस्ट बंगाल संघाने सेठ यांना स्थान दिले. मात्र वर्षभरातच त्यांनी मोहन बगान संघात स्थान मिळवले. या संघाकडून ते सहा वर्षे खेळले.
- 1953 आणि 1955 मधील संतोष करंडक विजेत्या बंगाल संघात त्यांचा समावेश होता.
- तर सेठ यांनी 1954मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२४ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २३ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २२ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २१ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २० डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- १९ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |