Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 May 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२४ मे चालू घडामोडी
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : गनीमत, दर्शनाची ऐतिहासिक कामगिरी
- विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील स्कीट प्रकारात भारताच्या गनीमत सेखों आणि दर्शना राठोड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. विश्वचषकातील स्कीट प्रकारात भारताच्या दोन महिला नेमबाजांनी पदके मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. कझाकस्तानच्या एसेम ओरिनबेने ‘शूट-ऑफ’मध्ये गनीमतला पराभूत करत सुवर्णपदक मिळवले.
- गनीमत व ओरिनबेने ६० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ५०-५० गुण मिळवले होते. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या ‘शूट-ऑफ’मध्ये गनीमत दोनपैकी एका लक्ष्याचा वेध घेण्यापासून चुकली. तर, ओरिनबेने दोन्ही वेळा लक्ष्य अचूक वेधले. त्यामुळे गनीमतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विश्वचषकात तिचे हे दुसरे वैयक्तिक पदक ठरले. दर्शनाने वरिष्ठ स्तरावरील प्रथमच अंतिम फेरी गाठताना पदक निश्चित केले. त्यापूर्वी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दर्शनाने १२० गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करत सहा महिलांच्या अंतिम फेरीसाठी दुसऱ्या स्थानासह पात्रता मिळवली.
- गनीमत ११७ गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. ओरिनबे १२१ गुणांसह पदकतालिकेत शीर्ष स्थानी राहिली. अंतिम फेरीत ३० फैऱ्यांनंतर चार नेमबाज शिल्लक राहिले. ज्यामध्ये २५ गुणांसह दर्शना अग्रस्थानी होती. तर, ओरिनबे २४ गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. दर्शना चेक प्रजासत्ताकच्या बारबोरासह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर होती. पुढील १० फैऱ्यांमध्ये बारबोरा बाहेर पडली आणि भारताची ऐतिहासिक दोन पदके निश्चित झाली. पुरुषांच्या स्कीटमध्ये मैराज खान (११९ गुण), गुरजोत खंगुरा (११९) व अनंतजीत सिंह नरूका (११८) या तिघांनाही अंतिम फेरी गाठता आली नाही.
ऑस्ट्रेलियातील उद्योजकांना मोदींचे भारतात गुंतवणुकीचे आवाहन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या उद्योजकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आणि तंत्रज्ञान, कौशल्यवर्धन आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योजकांशी सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.
- पंतप्रधानांनी हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्षा जीना राइनहार्ट, फोर्टेस्क्यु फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष अँडर्य़ू फॉरेस्ट आणि ऑस्ट्रेलियन सुपरचे सीईओ पॉल श्रॉडर यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या. राइनहार्ट यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी भारतातील सुधारणा आणि नवीन उपक्रमांवर भर दिला आणि त्यांना तंत्रज्ञान, खनिकर्म आणि खनिज क्षेत्रात कौशल्यवर्धन आणि गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण दिले.
- श्रॉडर यांच्याबरोबरच्या बैठकीत पंतप्रधानांनी भारत हा जगात परकीय गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा देश असल्याचे सांगितले. फॉरेस्ट यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये भारतीय कंपन्यांशी भागीदारीचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी उद्योजकांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्यास तसेच भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यास उत्सुकता दर्शवली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियामधील विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सामाजिक कार्य आणि कला व संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. त्यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते ब्रायन पॉल श्मिट, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक मार्क बल्ला, कलाकार डॅनियल मेट, रॉकस्टार गाय सेबॅस्टियन आणि नावाजलेले शेफ व हॉटेल उद्योजक सारा टॉड यांचा समावेश होता. त्याशिवाय सिडनीमधील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिटय़ूटचे मुख्य शास्त्रज्ञ प्रा. टोबी वॉल्श, आणि समाजशास्त्रज्ञ, संशोधक व लेखक साल्वाटोर बेबोन्स यांचीही त्यांनी भेट घेतली.
- त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेला पापुआ न्यू गिनी देश कुठे आहे? काय आहे या देशाचं वैशिष्ट्य?
- पापुआ न्यू गिनी या देशाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिली. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थाटामाटात स्वागतही झालं. या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले. सोशल मीडियावर हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला. याबाबत संजय राऊत यांनी कडाडून टीकाही केली. ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या सन्मानाने याच देशात मोदींना गौरवण्यात आलं. मात्र हा देश कुठे आहे? या देशाचं वैशिष्ट्य काय? याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
- कुठे आहे पापुआ न्यू गिनी हा देश? लोकसंख्या किती?
- उत्तर: पापुआ न्यू गिनी हा देश इंडोनेशिया जवळ प्रशांत महासागरच्या क्षेत्रात आहे. दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्रातला हा द्वीपसमूह आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या देशाची लोकसंख्या साधारण ९८ लाखांच्या घरात आहे.
- पापुआ न्यू गिनी देशात कुठला धर्म मानला जातो?
- उत्तर: पापुआ न्यू गिनी या देशात ख्रिश्चन हा प्रमुख धर्म आहे. देशाच्या लोकसंख्येतले ९५ टक्के नागरिक हे ख्रिश्चन आहेत.
- पापुआ न्यू गिनी देशाची राजधानी काय आहे?
- उत्तर:पोर्ट मोरेस्बी ही या देशाची राजधानी आहे.
- पापुआ न्यू गिनी या देशात किती भाषा बोलल्या जातात?
- उत्तर: पापुआ न्यू गिनी या देशात ८५० भाषा बोलल्या जातात.
- या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे?
- पापुआ न्यू गिनी हे जगातील तिसरे मोठे बेट आहे. कमी मध्यम उत्पन्न असणाऱ्या या देशाचा बराचसा भाग ग्रामीण लोकसंख्येचा आहे. भाषेच्या बाबतीत जगातील सर्वात वैविध्यपूर्ण म्हणून पापुआ न्यू गिनीकडे पाहिले जाते. इथे ८५० भाषा बोलणारे लोक राहतात. वर्ल्ड फॅक्टबुकच्या माहितीनुसार या बेटावरील लोकसंख्या ९८ लाख १९ हजार ३५० एवढी आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये अनेक स्थानिक जमाती आहेत. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. बाहेरील जगाशी त्यांचा क्वचितच संबंध येतो.
पापुआ न्यू गिनी हे नाव कसं पडलं?
- १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनी एक स्वतंत्र देश अस्तित्त्वात येईपर्यंत १८८० पासून इथे जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने राज्य केले होते. वर्ल्ड फॅक्टबुकच्या माहितीनुसार पापुआ हा शब्द मलय (मलेशियाची भाषा) भाषेतील पापुहा (papuah) या शब्दापासून तयार झाला. पापुहा म्हणजे मलेनेशियन नागरिकांचे कुरळे केस. स्पॅनिश एक्सप्लोरर वायनिगो ओर्टिझ याला आफ्रिकेतील गिनी बेटावरील साधर्म्य याठिकाणी आढळून आल्यानंतर त्याने या बेटाला न्यू गिनी असे नाव १५४५ साली दिले होते. त्यामुळे या बेटाचे नाव पापुआ न्यू गिनी असे पडलेले आहे.
“ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र
- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. देशातल्या पहिल्या चारही क्रमांकांवर मुलीचंच वर्चस्व दिसून आलं. देशातल्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुलं आहेत. संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इशिताची देशभर चर्चा आहेच. त्यासोबत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या गरिमा लोहिया हिचंदेखील कौतुक होत आहे. विशेष म्हणजे गरिमाने कोणत्याही खासगी क्लासेसला न जाता घरीच परिक्षेची तयारी केली आणि देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
- आपला पाल्य यूपीएससी ही नागरी सेवा परिक्षा उत्तीर्ण व्हावा म्हणून अनेक पालक मुलांच्या खासगी क्लासेसवर लाखो रुपये खर्च करतात. परंतु गरिमा लोहियाने घरीच अभ्यास करून ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. टीव्ही ९ भारतवर्षशी बोलताना गरिमा म्हणाली की, मी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार केला होता. आपल्या वाटेत कितीही अडथळे आले तरी थांबायचं नाही असं मी ठरवलं होतं.
- गरिमाने सांगितलं की, तिने ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ पुस्तकांची मदत घेतली. तसेच ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती त्यासाठी तिने गूगलची मदत घेतली. तिला पहिल्याचं प्रयत्नात या परिक्षेत उत्तीर्ण व्हायचं होतं. परंतु पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तरीदेखील तिने दुसऱ्यांदा प्रयत्न करायचं ठरवलं. दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. दोन्ही परिक्षांच्या वेळी तिला स्वतःवर विश्वास होता की, ती उत्तीर्ण होईल. परंतु पहिल्यांदा परिक्षा दिली तेव्हा ती काही गुणांनी मागे पडली. त्यावेळी ती थोडी निराश झाली होती. परंतु तिच्या आईने तिचा आत्मविश्वास वाढवला.
- गरिमा म्हणाली, “मी स्वतःला खूप नशीबवान मानते. याआधी इतकी आनंदी कधीच झाले नव्हते. मी माझ्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय याचा खूप आनंद आहे. माझ्या मुलीने अधिकारी व्हावं असं माझ्या आई-वडिलांचं स्वप्न होतं. त्यांचं मागणं देवाने ऐकलंय. आज माझे बाबा असते तर खूप आनंदी झाले असते.” गरिमाच्या वडिलांचं २०१५ साली निधन झालं आहे.
नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, देशात आणि राज्यात मुलींचाच डंका
- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात राज्यातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. परीक्षेचा निकाल http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. त्यात इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरती एन, स्मृती मिश्रा, मयूर हजारिका, गहना नव्या जेम्स, वसीम अहमद भट, अनिरुद्ध यादव, कनिका गोयल, राहुल श्रीवास्तव हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या दहा क्रमांकावर आहेत.
- एकूण प्रसिद्ध झालेल्या ९९३ नावांमध्ये पहिला टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्रातील विजेत्यांची नावे
- १. कश्मिरा संख्ये (२५)
- २. वसंत दाभोळकर (१२७)
- ३. गौरव कायंदे-पाटील (१४६)
- ४.ऋषिकेश शिंदे (१८३)
- ५. अभिषेक दुधाळ (२८७)
- ६. श्रुतिषा पाताडे (२८१)
- ७. स्वप्नील पवार (२८७)
- ८.अनिकेत हिरडे (३४९)
देशातील टॉप दहा उमेदवारांची यादी
- १.इशिता किशोर
- २.गरिमा लोहिया
- ३.उमा हरति एन
- ४.स्मृति मिश्रा
- ५.मयूर हजारिका
- ६.गहना नव्या जेम्स
- ७.वसीम अहमद
- ८.अनिरुद्ध यादव
- ९. कनिका गोयल
- १०.राहुल श्रीवास्तव
ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले, “मी पुन्हा आलो…” पण का? जाणून घ्या
- जी-७ परिषदेत आपली छाप पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. सिडनीतल्या कुडोस बँक एरिनामध्ये भारतीय पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येथे जमलेल्या हजारो अनिवासी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांशी नरेंद्र मोदी संवाद साधत आहेत. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच भारतीय पंतप्रधानांनी उपस्थितांना त्यांच्या जुन्या वचनाची आठवण करून दिली.
- नरेंद्र मोदी म्हणाले, मी २०१४ ला ऑस्ट्रेलियाला आलो होतो, तेव्हा मी एक वचन दिलं होतं की तुम्हाला पुन्हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही. बघा आता मी पुन्हा तुमच्यासमोर हजर झालोय. यावेळी मी एकटा आलो नाही, तर एक खास व्यक्ती माझ्याबरोबर आहे. माझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीसही आले आहेत. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून या कार्यक्रमासाठी वेळ काढला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
- भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सिडनी येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ वर्षांनी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. ऑस्ट्रेलियातले भारतीय वंशाचे लोक त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने जमले आहेत.
- सिडनीच्या एरिना स्टेडियमवर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, क्रिकेटने आपल्याला (भारत आणि ऑस्ट्रेलिया) अनेक वर्षांपासून बांधून ठेवलं आहे. त्याचबरोबर आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडून ठेवत आहेत. आपले खाद्यपदार्थ आणि खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, पण आता आपल्याला मास्टर शेफने जोडलं आहे.
- मोदींनी भाषणाला सुरुवात करायच्या आधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीस म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश खूप जुने मित्र आहेत. त्यांनी मोदींना बॉस अशी हाक मारली आणि म्हणाले, पंतप्रधान मोदींचं स्वागत करणं ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.
नव्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात ‘एक राज्य एक गणवेश योजना’, दीपक केसरकर यांची घोषणा
- महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतले विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू होईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी हेदेखील स्पष्ट केलं आहे की सरकारच्या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर काही शाळांनी दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
काय म्हटलं आहे दीपक केसरकर यांनी?
- एक राज्य एक गणेवश ही संकल्पना या वर्षापासून आम्ही अस्तित्त्वात आणतो आहोत. परंतू काही शाळांनी काही ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे तीन दिवस शाळेने ठरवून दिलेला गणवेश आणि तीन दिवस सरकारने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी वापरतील. शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस परिधान करतील. तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परिधान करतील असा पर्याय आम्ही आता काढला आहे असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
कोणत्या रंगाचा आहे सरकारी गणवेश?
- आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा हा गणवेश असेल. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. जर शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाची असं असेल असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं. मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा गणवेश हा स्काऊट गाईडशी साधर्म्य साधणारा असेल असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. या विद्यार्थ्यांना सरकार बूट आणि मोजेही देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी टापटीप आणि छान दिसतील. अनेकदा ग्रामीण भागात अनवाणी मुलं जातात. तसं आता होणार नाही. आधी मागासवर्गीय मुलांना गणवेश देत होतो आता सगळ्या मुलांना गणवेश दिला जाणार आहे.
आमचा निर्णय शासकीय शाळांसाठीच आहे
- आमचा हा निर्णय शासकीय शाळांसाठीच आहे. मात्र खासगी शाळांनी विचार केला पाहिजे. कारण आम्ही खासगी शाळा काढल्या, १०० टक्के पगार शासनाकडून घेतो, इतर खर्च शासनाकडून घेतो. परंतु त्या शाळा शासकीय नाहीत त्यामुळे याचा विचार केलाच पाहिजे. मी एकदा शैक्षणिक संस्थांसोबत बसणार आहे. त्या मुलांनाही गणवेश दिला जाईल असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. खासगी शाळा चालक यासाठी पुढे येणार का? हा प्रश्न आहे. आमच्यासाठी मुलांचं हित हे सर्वोच्च आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २३ मे २०२३ चालू घडामोडी
- २२ मे २०२३ चालू घडामोडी
- २१ मे २०२३ चालू घडामोडी
- २० मे २०२३ चालू घडामोडी
- १९ मे २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |