Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |28 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२८ सप्टेंबर चालू घडामोडी
रोहित शर्मा ठरला खरा ‘सिक्सर किंग’, षटकारांची बरसात करत नोंदवला सर्वात मोठा विक्रम
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या कांगारू संघाने भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. आता भारतीय संघही जशास तसे उत्तर देताना दिसत आहे. या दरम्यान रोहित शर्माने शानदार फलंदाजी करताना ८१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. तसेच त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे. त्याने सर्वात वेगवान ५५० षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ५५३ षटकार मारण्यासाठी ५५१ डाव घेतले. मात्र रोहित शर्मा या महान विक्रमाकडे वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. रोहित शर्माने ५५० षटकार ठोकणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. ही कामगिरी करण्यासाठी त्याने केवळ ४७० डाव घेतले. आता तो ख्रिस गेलच्या विक्रमापासून फक्त ३ षटकार दूर आहे. रोहित शर्माने ४ षटकार मारताच ख्रिस गेलला या बाबतीत मागे टाकेल. ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढण्यासाठी तो फक्त एक-दोन डाव घेणार हे त्याच्या आक्रमक शैलीवरून स्पष्ट होते.
हिटमॅनने ठोकले स्फोटक अर्धशतक –
- प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने भारतासमोर ३५३ धावांचा डोंगर उभा केला. पण हिटमॅनच्या वादळीपुढे हे लक्ष्य खूपच किरकोळ दिसत होते. रोहित शर्मा येताच त्याने षटकार मारण्यास सुरुवात केली. त्याने ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने स्फोटक शैलीत अर्धशतक झळकावले. हिटमॅनच्या जबरदस्त फॉर्मनंतर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर आहे. आता पाहुणे संघ पुनरागमन करण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहायचे आहे.
- यादरम्यान रोहित शर्माने ५ षटकारांच्या मदतीने अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह कर्णधार रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० षटकात ५० पेक्षा जास्त धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी ही कामगिरी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी केली होती.
मुंबईतील हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद, पालिकेने सांगितलं ‘हे’ कारण!
- मुंबईची जुनी ओळख असलेली आणि उंचावर बांधण्यात आलेले ब्रिटीशकालीन हँगिग गार्डन आता पुढील सात वर्षांसाठी बंद होणार आहे. १३६ वर्षांचा इतिहास असलेले हँगिग गार्डन त्या खाली असलेल्या जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
- २०१७ साली हँगिग गार्डनच्या खाली असलेल्या जलायशयाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. त्यावेळी जलाशयाच्या छताकडील भाग आणि आधारासाठी उभारलेले स्तंभ कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. या टाकीची क्षमता १४७ लीटर दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे ती पूर्णपणे पाडल्याशिवाय त्याचे बांधकाम होणे अशक्य असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. परिणामी या जलशयाचे बांधकाम करण्याकरता हँगिग गार्डन टप्प्याटप्प्याने सात वर्षांसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, जलाशयाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी ६९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- हँगिग गार्डन येथील या जलाशयाच्या विकासकामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक बोलावली आहे. हँगिग गार्डनमधील या जलाशयातून दक्षिण मुंबईच्या अनेक भागात पाणीपुरवठा केला जातो. शहरातील उंचीपैकी असलेल्या जागेवर हे जलाशय बांधण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेत काहीतरी पर्यायी मार्ग शोधण्याचं आश्वासन लोढा यांनी दिलं स्थानिकांना दिलं आहे.
- पालिकेच्या स्थायी समितीने २०२२ मध्ये या टाकीची क्षमता १४७ दशलक्ष लीटरहून १९१ दशलक्ष लीटरपर्यंत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. दक्षिण मुंबईच्या ३० लाखांहून अधिक नागरिकांना या जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता.
ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण उद्या गुरुवारी (२८ सप्टेंबर) रोजी साजरा होणार आहे. यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा पोलीस प्रशासनावर ताण येणार आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे. तसेच पोलिसांना गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता यावं. यासाठी २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती या संघटनेनं केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.
- अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात
- अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
- ‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. ‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.
भारत लवकरच आर्थिक महासत्ता; पंतप्रधानांचा आशावाद
- ‘‘भारताला जागतिक विकासाचे ‘इंजिन’ बनवणे हे आपले ध्येय आहे. आपला देश लवकरच जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘व्हायब्रंट गुजरात परिषदे’ला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते म्हणाले की, २० वर्षांपूर्वी त्यांनी ‘व्हायब्रंट गुजरात’चे छोटे बीज पेरले होते आणि आज त्याचा महाकाय वृक्ष झाला आहे. केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) तत्कालीन केंद्र सरकार राज्याच्या औद्योगिक प्रगतीबाबत ‘उदासीन’ असताना ‘व्हायब्रंट गुजरात’ यशस्वी झाले होते.
- गुजरातला भारताच्या विकासाचे इंजिन बनवण्यासाठी आम्ही ‘व्हायब्रंट गुजरात’चे आयोजन केले. देशाने हे स्वप्न साकारताना पाहिले. २०१४ मध्ये जेव्हा माझ्याकडे देशाची सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हा भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवणे हे माझे ध्येय होते. मोदींनी सांगितले, की देश अशा वळणावर आहे, की तो लवकरच जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. जागतिक स्तरावरील संस्था आणि तज्ज्ञही याचे संकेत देत आहेत. काही वर्षांतच तुमच्या डोळय़ांसमोर, भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल, ही मोदींची हमी आहे. भारताला अधिक प्रबळ बनवणाऱ्या कोणत्या नवीन क्षेत्रात संधी आहेत, हे शोधण्याचे आवाहन मोदींनी देशातील उद्योग क्षेत्राला केले. ‘व्हायब्रंट गुजरात’द्वारे ही मोहीम कशी अधिक गतिमान करता येईल, याचाही विचार व्हावा.
- ‘व्हायब्रंट गुजरात’ उपक्रमाचा साध्या पद्धतीने प्रारंभ झाला. त्याला एका भव्य संस्थेचे रूप कसे प्राप्त झाले, या उपक्रमाचा झालेला विस्तार आणि त्यानंतर अनेक राज्यांनी त्याचे अनुकरण करून गुंतवणूक परिषदा आयोजित केल्या, यावर मोदींनी प्रकाश टाकला. ‘व्हायब्रंट गुजरात’च्या यशाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, की स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की प्रत्येक काम तीन टप्प्यांतून जाते – प्रथम त्याची थट्टा केली जाते, नंतर त्यास विरोधाचा सामना करावा लागतो आणि शेवटी ते स्वीकारले जाते. विशेषत: जेव्हा काही कल्पना काळाच्या पुढच्या असतात, तेव्हा त्यांना असे तोंड द्यावे लागते.
- ‘व्हायब्रंट गुजरात’चे यश आज जगाला दिसत आहे; परंतु जेव्हा ते आयोजित केले गेले तेव्हा तत्कालीन केंद्र सरकारने गुजरातच्या विकासाबाबत उदासीनता दाखवल्याची टीका करून मोदी म्हणाले, की मी नेहमीच गुजरातच्या विकासाद्वारे भारताच्या विकासाचीच चर्चा केली; पण केंद्रात सत्तेत असलेल्यांनी गुजरातच्या विकासाचा संबंध राजकारणाशीही जोडला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी या परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. खासगीत होकार दिल्यानंतर नंतर श्रेष्ठींच्या दबावामुळे त्यांनी मला नकार दिला होता. सहकार्यही न करता माझ्यासमोर अडथळे निर्माण केले गेले. विदेशी गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये गुंतवणूक करू नये, म्हणून धमकावण्यात आले; पण अशा धमक्या येऊनही, तत्कालीन गुजरातमध्ये कोणतीही विशेष अनुकूलता नसतानाही परदेशी गुंतवणूकदारांनी गुजरातला भेट दिली व गुंतवणूकही केली.
‘माझ्या सरकारतर्फे लाखो कन्या घरमालक’
- ‘‘माझ्या मालकीचे अद्याप कोणतेही घर नाही. मात्र माझ्या सरकारने देशातील लाखो कन्यांना घरमालक बनवले आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात शिक्षणक्षेत्राशी संबंधित साडेचार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांसह पाच हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले, आज मी समाधानी आहे कारण माझ्या सरकारने देशभरातील नागरिकांसाठी चार कोटी घरे बांधली आहेत. पूर्वीच्या सरकारांप्रमाणे ‘गरिबांसाठी घर’ ही केवळ सांगण्यासाठीची आकडेवारी नाही. आम्ही गरिबांसाठी घरे बांधून त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम करत आहोत.
ऑस्करसाठी भारताकडून ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’
- २०१८ मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या मळय़ाळम चित्रपटाची निवड ‘ऑस्कर पुरस्कार-२०२४’साठी भारतातर्फे अधिकृतपणे करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (फिल्म फेडरेशन) बुधवारी याबाबत घोषणा केली. निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते गिरीश कासारवल्ली यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवड समितीतील १६ सदस्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या मल्याळम चित्रपटाची एकमताने निवड केली. या चित्रपटाची निवड करण्यापूर्वी सर्व सदस्यांशी दीर्घ चर्चा केल्याचे कासारवल्ली यांनी सांगितले.
- ‘‘आम्ही एका आठवडय़ाच्या कालावधीत २२ चित्रपट पाहिले. त्यानंतर या चित्रपटाची निवड केली. या २२ चित्रपटांपैकी अनेक चित्रपट दर्जेदार होते. त्यामुळे हा एक कठीण निर्णय होता. प्रत्येक चित्रपटाचे विश्लेषण केल्यानंतर आम्ही ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाची निवड केली,’’ असे कासारवल्ली म्हणाले. या २२ चित्रपटांमध्ये ‘केरळ स्टोरी’, ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’, ‘गदर-२’ या हिंदी चित्रपटांसह ‘वाळवी’, ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटांचीही चर्चा झाली.
‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ चित्रपटाविषयी.
ज्युड अँथनी जोसेफ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय लोकाचार, परिस्थिती आणि नागरिकांचे मनोविश्व यावर प्रकाश टाकतो. हा चित्रपट २०१८ मध्ये केरळला आलेल्या आपत्तीबद्दल बोलतो. मात्र केवळ भारताचेच नव्हे तर जगभरात घडत असलेल्या आपत्तीचेही प्रतिनिधित्व करतो. चित्रपट सिनेमॅटिक आणि तांत्रिकदृष्टय़ाही उत्कृष्ट आहे, अशी माहिती गिरीश कासारवल्ली यांनी दिली. हा चित्रपट हवामान बदल आणि तथाकथित विकासकामांबाबतही भाष्य करतो, असे ते म्हणाले. टोविनो थॉमस या अभिनेत्याने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २७ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २६ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २५ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २४ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- २३ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |