२९ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२९ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |29 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२९ मार्च चालू घडामोडी

आकांक्षाची पुन्हा आंतरराष्ट्रीय झेप- युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक

  • वेटलिफ्टिंगसारख्या खेळात मनमाडची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात येऊ लागली असून अल्बेनियातील दुर्रेस येथे सुरू असलेल्या जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारे हिने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करीत ४५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे.
  • जगभरातील विविध १२ देशांच्या खेळाडूंमध्ये या स्पर्धेत चुरशीची लढत झाली. आकांक्षाने स्नॅचच्या आपल्या तिसर्या प्रयत्नांत ६८ किलो वजन उचलले तर, क्लिन जर्कमध्ये ८२ किलो वजन उचलले. एकूण १५० किलो वजन उचलून सलग तिसर्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्याची किमया साधली. आकांक्षाला अल्बेनिया येथे भारतीय वेटलिफ्टिंग संघाची प्रमुख म्हणून उपस्थित असलेली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर आणि छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रविण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
  • आकांक्षा ही येथील गुरू गोविंदसिंग विद्यालयात इयत्ता १० वीत शिकत आहे. इयत्ता १० वी परीक्षेच्या वेळीच युवा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा आल्याने परीक्षा द्यावी की, स्पर्धेत भाग घ्यावा, अशा दोलायमान स्थितीत असतांना तिने अखेर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय किती योग्य होता, हे तिनेच पदक मिळवून दाखवून दिले आहे.

इस्रोच्या ‘वनवेब’ मोहिमेचे यश महत्त्वाचे का?

भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया प्रा. लि.’ची ही दुसरी यशस्वी मोहीम आहे.

इस्रोची ही व्यावसायिक मोहीम काय आहे?

  • इस्रोने इतिहास रचत २६ मार्चला सकाळी ९ वाजता ‘एलव्हीएम३’चे यशस्वी प्रक्षेपण केले. हे इस्रोचे सर्वात वजनदार प्रक्षेपण यान असून त्याच्या मदतीने ब्रिटनच्या ‘वनवेब ग्रूप कंपनी’च्या ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. कमी उंचीच्या कक्षेत एकूण ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने ब्रिटनच्या नेटवर्क ॲक्सेस असोसिएट्स लिमिटेड (वनवेब ग्रूप कंपनी) यांच्याबरोबर करार केला आहे. ‘एलव्हीएम३-एम/ वनवेब इंडिया-२’ अशी ही मोहीम आहे. या मोहिमेतील पहिले ३६ उपग्रह गेल्या वर्षी २३ ऑक्टोबरला प्रक्षेपित करण्यात आले, तर उर्वरित ३६ उपग्रह दुसऱ्या टप्प्यात २६ मार्च रोजी तमिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या तळावरून प्रक्षेपित करण्यात आले. उड्डाणानंतर प्रक्षेपणास्त्राने सर्व उपग्रह क्रमाक्रमाने त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये प्रस्थापित केले. हे उपग्रह नियोजित कक्षांमध्ये स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यावसायिक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

‘एलव्हीएम३’ या प्रक्षेपण यानाचे वैशिष्ट्य काय?

  • ‘एलव्हीएम३’ हे इस्रोचे महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे. या प्रक्षेपण यानाची उंची ४३.४३ मीटर उंच असून त्याचे वजन ६४४ टन आहे. हे प्रक्षेपण यान आठ हजार किलोग्रॅम वजन पेलण्यासही सक्षम आहे. हे भारताचे सर्वांत वजनदार प्रक्षेपण यान आहे. त्याचे तीन स्तर आहेत. या प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून इस्रोने ५ जून २०१७ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘जीएसएलव्ही एमके३’ची पहिली कक्षीय चाचणी यशस्वी प्रक्षेपित केली होती. आता झालेले ‘एलव्हीएम३’चे हे सहावे प्रक्षेपण होते. २०१९ मध्ये चांद्रयान-२चे प्रक्षेपणही याच प्रक्षेपणास्त्राद्वारे झाले होते. आता कमी उंचीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित केली आहे. या प्रक्षेपण यानात नजीकच्या काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून मानवी मोहिमांसाठी ते अधिकाधिक उपयुक्त करण्याचा मानस इस्रोने व्यक्त केला आहे. भारताची ‘गगनयान’ ही महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे यान उपयुक्त ठरणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

इस्रोच्या या मोहिमेमुळे आर्थिक लाभ किती?

  • या मोहिमेमुळे केवळ इस्रोचे महत्त्व वाढले नाही तर या भारतीय अंतराळ केंद्राला एक हजार कोटी रुपयांची कमाईही झाली आहे. अंतराळ क्षेत्राच्या अर्थसंकल्पावरील संसदीय स्थायी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, २०१९मध्ये तयार करण्यात आलेल्या इस्रोची व्यावसायिक उपशाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’च्या कमाईत वाढ झाली आहे. अहवालानुसार २०२१-२२ मध्ये १,७३१ कोटी रुपयांची कमाई झाली असून २०२३-२४ मध्ये ती ३,५०९ कोटींपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी! पीएफवरील व्याजदरात वाढ; सध्याच्या ८.०५ टक्क्यांवरून व्याजदर…

पगारदार नोकरवर्गासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यासंदर्भात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज अर्थात CBT ची दोन दिवसीय बैठक २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत बैठक संपल्यावर केंद्र सरकारकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात येणार आहे.

किती झाली वाढ?

  • कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवर २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.०५ टक्के व्याजदर देण्यात येत होता. आता २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. देशभरात सध्या जवळपास ५ कोटी पीएफ खातेधारक असून त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कसे बदलले व्याजदर?

  • गेल्या काही वर्षांमध्ये पीएफवरील व्याजदरात चढ-उतार पाहायला मिळाले. २०१३-१४ मध्ये पीएफवरील व्याजदर सर्वाधिक ८.७५ टक्के इतके होते. २०१८मध्ये ते ८.६५ टक्के करण्यात आले होते. २०१९-२० साठी पीएफवरील व्याजदर ८.५ टक्के होते. २०२०-२१मध्ये हेच दर कायम होते, तर २०२१-२२साठी हे दर ८.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते. आता या वर्षी त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

नव्या व्याजदरानुसार खात्यांमध्ये कधी जमा होणार रक्कम?

  • दरम्यान, व्याजदर जाहीर झाल्यानंतर ती रक्कम खात्यात जमा होईपर्यंतची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक असतं. CBT च्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेल्या व्याजदराचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाला मंजुरीसाठी पाठवला जातो. अर्थमंत्रालयाने त्याला मंजुरी दिल्यानंतर त्यानुसार व्याजदराची रक्कम जमा होऊ शकते. यानुसार, पुढील वर्षी ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

पेन्शनमध्येही वाढ होणार?

  • दरम्यान, एकीकडे व्याजदरासंदर्भात CBT च्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पेन्शनदेखील वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

इस्रायलमधील आंदोलने शमण्याची चिन्हे, पंतप्रधान नेतान्याहू यांनी न्यायालयीन बदल स्थगित केल्याने परिस्थितीत सुधारणा

  • वादग्रस्त पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी न्यायालयीन प्रक्रियेतील प्रस्तावित बदल स्थगित केल्यामुळे इस्रायलच्या राजकीय पक्ष-गटांनी वाटाघाटीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या विषयावर वाटाघाटीसाठी समिती स्थापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या बदलांना देशांतर्गत कडाडून विरोध झाला. तीव्र आंदोलने झाल्यानंतर परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पंतप्रधान नेतान्याहू यांनी सोमवारी माघार घेतली.
  • या प्रश्नी नेतान्याहू यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तडजोड दृष्टिपथात येत नव्हती. इस्रायल या देशाचे स्वरूप कसे असावे, या मूलभूत प्रश्नाभोवती हा संघर्ष केंद्रित झाला होता. दोन्ही बाजूंनी ताठर भूमिका घेतल्याने परिस्थिती चिघळली होती. या प्रस्तावित दुरुस्तीच्या विरोधात तीन महिने निदर्शने होत होती. हे आंदोलन या आठवडय़ात तीव्र झाले. इस्रायलच्या मुख्य कामगार संघटनेने सार्वत्रिक संप जाहीर केला. त्यामुळे अराजकता निर्माण होऊन देशाचा बहुतांश भाग ठप्प झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेस धोका निर्माण झाला होता.
  • नेतान्याहू यांनी सोमवारी रात्री केलेल्या भाषणात या प्रश्नावरून निर्माण झालेल्या दुफळीमुळे देशाला धोका निर्माण झाल्याची कबुली दिली व या प्रस्तावित बदलांना महिनाभरासाठी स्थगित केले. आपल्याला गृहयुद्ध टाळायचे असल्याचे सांगून त्यांनी राजकीय विरोधकांशी तडजोड करण्याची तयारी दर्शवली. जेरुसलेममधील लोकप्रतिनिधीगृहाच्या भवनाबाहेर हजारो नागरिकांनी निदर्शने केल्यानंतर नेतान्याहू हे भाषण करून माघार घेतली.
  •  विश्लेषकांनी निदर्शनास आणून दिले की रविवारी रात्री नेतान्याहू यांनी न्यायालयीन बदल मागे घेण्याची मागणी करणाऱ्या संरक्षणमंत्री योअ‍ॅव गलांट यांना हटवल्याने हा असंतोष तीव्र झाला होता. नेतान्याहू यांच्या स्वत:च्या लिकुड पक्षातील विश्वासार्हतेसही त्यामुळे धक्का बसला होता. त्यामुळे इस्रायलचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणाऱ्या नेतान्याहूंसमोर हे बदल मागे घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. ‘इस्रायल डेमोक्रसी इन्स्टिटय़ूट’चे अध्यक्ष योहानन प्लेसनर म्हणाले, की आपली कोंडी झाल्याचे नेतान्याहू यांना उमगले. ते खूप अनुभवी असल्याने आता सुधारण्याची वेळ आल्याचे त्यांना समजले.

३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान ‘सावरकर गौरव यात्रा’

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षांकडून होत असलेला अपमान बघता जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
  • वेगवेगळय़ा विभागासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडे या गौरव यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात आमदार संजय कुटे व रणधीर सावरकर आणि पूर्व विभागात आमदार प्रवीण दटके आणि विजय रहांगडाले यांच्यावर या गौरव यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांच्या त्यांच्या भागात सहभागी होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
  • सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांच्या प्रतिमेला बाळासाहेबांनी चपल मारली होती. आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याची हिंमत करणार का, असा सवाल बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसशी फारकत घेण्याबाबत मंगळवार सकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यांनी फारकत घेण्याचे जाहीर केले असते तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी स्वत: गेलो असतो असे बावनकुळे यांनी सांगितले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२९ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.