Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |30 August 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
३० ऑगस्ट चालू घडामोडी
कॅलिफोर्नियात जातिभेदविरोधी विधेयकाला मंजुरी; अमेरिकेतील पहिलेच राज्य
- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने जातिभेदविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. जातिभेदाचे निर्मूलन करून राज्यातील वंचित समाजांचे रक्षण करण्याच्या हेतूने हे विधेयक तयार करण्यात आले आहे. या विधेयकाला सोमवारी मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आता गव्हर्नर गॅव्हिन न्यूसोम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. भेदभावविरोधी कायद्यांत जातीचा समावेश संरक्षित श्रेणीत करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. हे विधेयक प्रथम स्टेट सिनेटर आयशा वहाब यांनी सादर केले होते.
- त्याला देशभरातील जातिसमानता मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. विधेयकाला (एसबी ४०३) पाठिंबा दिलेल्या सर्व सिनेटरचे वहाब यांनी आभार मानले असून जातिभेदाचा सामना करणाऱ्या लोकांचे आम्ही रक्षण करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
- हिंदू संघटनेकडून निषेध अ कोअॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (कोहना) या हिंदू संघटनेने हे विधेयक मंजूर झाल्याचा निषेध केला असून हा कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे. हे विधेयक अमेरिकेतील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आहे, असा आरोप कोहनाने केला आहे.
साथरोगांच्या नियंत्रणासाठी जागतिक निधी; जी-२० च्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
- करोनासारख्या संभाव्य साथरोगांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक निधी उभारण्याचा निर्णय ‘जी-२०’च्या देशांतील आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक बँकेने पहिल्या टप्प्यामध्ये ३० कोटी डॉलरची तरतूद केली असून, या निधीचा विस्तार करण्यावर ‘जी-२०’ देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहमती झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
- जगभरात करोनाच्या साथरोगाचा सर्वाधिक फटका निम्न व मध्यम आर्थिक उत्पन्न गटांतील देशांना बसला होता. करोनाच्या काळात अनेक विकसनशील देशांना भारताने प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला होता. करोना काळातील संभाव्य गंभीर परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्याच्या क्षेत्रातील विविध स्वरूपाची तयारी करण्याची गरज असल्याने जागतिक फंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- जागतिक बँकेचा ३० कोटी डॉलरचा निधी प्रामुख्याने ‘जी-२०’ देशच नव्हे, तर अन्य विकसनशील देशांतील साथरोगाच्या नमुना चाचण्या, सर्वेक्षण-देखरेख व आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ विकासासाठी खर्च केले जाणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासह लसी व औषधांच्या पुरवठय़ावरही भर देण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेसंदर्भात ‘जी-२०’ देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत भारताने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
- या बैठकीमध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित योजनांवरही चर्चा करण्यात आली. करोनाच्या लसीकरणाची सर्व प्रक्रिया ‘को-विन’ या मोबाइल अॅपवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी करण्यात आली होती. आरोग्यविषयक तंत्रज्ञानावर आधारित योजनांचा वापर विकसित देशांमध्ये केला जाणार आहे.
चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश, चंद्रावर आढळलं ऑक्सिजन, सल्फर अन् लोखंड; तर…
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’नं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हरने बाहेर येत संशोधनाला सुरूवात केली आहे. आता चांद्रयान-३ बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
- चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश हाती आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळून आली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी ( एलआयबीएस ) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे.
- ‘प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर ( एस ) असल्याचं आढळून आलं. तर, हायड्रोजनचा ( एच ) शोध घेतला जात असल्याचं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.
- ‘इस्रो’नं ट्वीट करत सांगितलं की, “रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सल्फर ( एस ) आढळून आलं. अल्युमिनियम ( एआय ), सल्फर ( एस ), कॅल्शियम ( सीए ), लोखंड ( एफई ), क्रोमियम ( सीआर ), टायटॅनियम ( टीआय ), मँगनीज ( एमएन ), सिलिकॉन आणि ऑक्सिजन ( ओ ) आढळलं आहे. हायड्रोजनचा ( एच ) शोध सुरू आहे.”
शनिवारी सूर्याकडे प्रयाण! ‘आदित्य- एल१’चे २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपण; सौरअभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम
- ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ची (इस्रो) पहिली सौरमोहीम सुरू होणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१’ या यानाचे प्रक्षेपण शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता होणार असल्याचे ‘इस्रो’ने सोमवारी जाहीर केले.
- सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘एल-१’ या बिंदूभोवती परिभ्रमण करून हे यान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा म्हणजे कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी यानामध्ये सात विविध उपकरणे बसविण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम या मोहिमेतून केले जाणार आहे. सूर्याचा पृष्ठभाग ६००० अंश सेंटीग्रेडवर असताना कोरोनाचे तापमान सुमारे एक दशलक्ष अंशापर्यंत कसे पोहोचते, याबाबतची माहिती मिळविण्याचे कामही होणार आहे.
‘एल-१’ म्हणजे काय?
- अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. सूर्य आणि पृथ्वीशी संबंधित असलेला एल-१ हा बिंदू आहे.
पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग
- ‘आदित्य एल-१’ ही मोहीम संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. देशभरातील विविध संस्थांनी तयार केलेली उपकरणे यानावर बसविण्यात आली आहेत. पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेने तयार केलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (एसयूआयटी) पेलोड विकसित केला आहे. याखेरीज बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयआयए) संस्थेने विकसित केलेला ‘व्हिजिबल एमिशन लाइन करोनाग्राफ’ (व्हीईएलसी) हे उपकरणही यानावर असेल.
मोहिमेची चार प्रमुख उद्दिष्टे
- * सूर्याच्या बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिती अभ्यासणे
- * सूर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास
- * सौरवाऱ्यांची दिशा, तापमानातील फरक अभ्यासणे.
- * सौरवादळांचा पृथ्वीवर होणारा परिणाम
‘प्रज्ञान’ने खड्डा चुकवला..
- ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हरच्या मार्गात मोठा खड्डा (पहिले छायाचित्र) आला. त्यानंतर त्याला मार्ग बदलण्याची सूचना करण्यात आली व रोव्हर दुसऱ्या मार्गावरून (दुसरे छायाचित्र) मार्गस्थ झाला.
चाहत्यांसाठी खूशखबर आशिया कपचे सर्व सामने तुम्ही पाहू शकता विनामूल्य; कधी, कुठे? जाणून घ्या
- बुधवारी (३० ऑगस्ट) पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभही आयोजित केला जाणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेतील १३ पैकी चार सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने श्रीलंकेसोबत सह-यजमानपदाचा निर्णय घेतला. स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल.
- भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याच मैदानावर त्याचा दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळशी होणार आहे. आशिया चषकाचे सामने पाकिस्तानातील मुलतान येथील मुल्तान क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. याशिवाय, कॅंडी, श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवरही सामने होणार आहेत.
या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत
- यावेळी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ खेळणार आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर-४ मध्ये जातील. तेथून दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
कुठे होणार आशिया कपचा उद्घाटन सोहळा?
- आशिया कपचा उद्घाटन सोहळा पाकिस्तानातील मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आशिया कपचा उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होईल?
- पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्याआधी उद्घाटन सोहळा होणार आहे.
आशिया चषक उद्घाटन समारंभ आणि सामने यांचे थेट प्रक्षेपण भारतात कोठे असेल?
- आशिया चषक उद्घाटन सोहळा स्टार स्पोर्ट्सद्वारे भारतात थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतातील आशिया कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण देखील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर टीव्हीवर पाहता येणार आहे. त्याच वेळी, विनामूल्य डीटीएच वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने पाहू शकतील. या वाहिनीवर अंतिम सामनाही प्रसारित केला जाणार आहे.
लोकांमध्ये नाराजी असल्याचे सर्वेक्षणामधून कळताच भाजपाकडून एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात
- काही महिन्यांमध्ये पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांसाठी सदासर्वकाळ तयार राहणाऱ्या भाजपाने या निवडणुकांची संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केलेली आहेच. त्यात आता जनमताचा अंदाज घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो, असे ग्राऊंड सर्व्हेमधून दिसताच मंगळवारी (२९ ऑगस्ट) एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करण्यात आली. भाजपाच्या अंतर्गत माहितीनुसार आणि खासगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, महागाईमुळे महिला मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मतदानाच्या दृष्टिकोनातून महिलावर्ग भाजपासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोठ्या घटकाकडे भाजपाचे लक्ष आहे. त्यासाठीच पक्षाच्या रणनीतीकारांनी केंद्र सरकारला महागाईवर तोडगा काढण्याची शिफारस केली.
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, रक्षाबंधन आणि ओनम सणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला भेट दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजीचे दर सर्व ग्राहकांसाठी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार ७५ लाख नव्या एलपीजी जोडणी मोफत करून देणार आहे”, असेही ठाकूर यांनी जाहीर केले.
- सरकारच्या निवदेनानुसार, पीएम उज्ज्वला योजनेमधील (PMUY) ग्राहकांना प्रतिसिलिंडर जी २०० रुपयांची कपात मिळते, त्याच्याव्यतिरिक्त आणखी २०० रुपयांचे अनुदान या निर्णयामुळे मिळणार आहे. या निर्णयानंतर PMUY योजनेच्या दिल्लीतील लाभार्थींसाठी दरकपात केल्यानंतर प्रतिसिलिंडर ७०३ रुपये मोजावे लागणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना नागरिकांना जे आश्वासन दिले होते, त्याचाच एक भाग म्हणून या दरकपातीकडे पाहिले जात आहे. करोना महामारी आणि त्यानंतर सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जग महागाईशी झगडत असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. “भारताने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील काळापेक्षा काही प्रमाणात आपल्याला यश मिळाले आहे; परंतु त्यावर आपण समाधानी राहू शकत नाही. आपल्याकडे जगापेक्षा चांगली परिस्थिती आहे, यावर आपण आत्मसंतुष्ट होता कामा नये. माझ्या देशातील नागरिकांवरील महागाईचा भार कमी करण्यासाठी मला आणखी प्रयत्न करावे लागतील आणि त्या दिशेने आम्ही पावले टाकत राहणार आहोत. माझे प्रयत्न सुरूच राहतील”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आश्वासित केले होते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
३० ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २९ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- २८ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- २७ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- २६ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- २५ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |