Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 June 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
८ जून चालू घडामोडी
वनरक्षक भरती, २१३८ जागांसाठी जाहिरात, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्ण संधी
- प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ च्या २१३८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उत्तीर्ण झालेला उमेदवार यासाठी पात्र ठरणार आहे. इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात आल्याने अनेकांना संधी मिळणार आहे. यासाठी १० जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून ३० जूनपर्यंत अर्जाची शेवटची तारीख आहे.
- वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने http://www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
- प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अमेरिका अध्यक्षपद निवडणूक;माइक पेन्स यांच्याकडून उमेदवारी जाहीर
- भिन्न काळासाठी भिन्न नेतृत्व असे आवाहन करत अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली. पेन्स हे रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आयोवा राज्यातील द मॉइन येथे आपला अधिकृत संदेश असलेला व्हिडीओ प्रसारित करून त्यांनी आपल्या ६४ व्या वाढदिवशी प्रचाराला सरुवात केली.
- पेन्स उपाध्यक्ष असताना अध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत. आपल्या या सर्वोत्तम देशाचे सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत असे वचन पेन्स यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिले.
- त्यांनी प्रचार सोहळय़ाला सुरुवात करण्यापूर्वी फॉक्स न्यूज आणि ट्विटरवर हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. आपल्या पक्षाला आणि आपल्या देशाला आपल्यातील अधिक चांगल्या गोष्टींना आकर्षित करणारा नेता हवा आहे असा दावा त्यांनी केला. निष्क्रिय राहणे सोपे असते पण माझा तो स्वभाव नाही. त्यामुळे आज मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढत असल्याचे जाहीर करतो अशी घोषणा त्यांनी केली.
- पेन्स हे सामाजिकदृष्टय़ा सनातनी विचारांचे, सौम्य स्वभावाचे आणि अतिशय धार्मिक प्रवृत्ती असलेले नेते म्हणून ओळखले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात लोकप्रिय विचारांना थारा देण्यास त्यांनी विरोध केला होता. आता त्यांना रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावान मतदार आणि इतर मतदार स्वीकारतात का याकडे निरीक्षकांचे लक्ष आहे.
तब्बल २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा; भारतातील ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा
- देशामध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्याचा वापर नागरिक इंटरनेट वापरण्यासाठी करतात. आजकाल इंटरनेट हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. आपली बरीचशी कामे इंटरनेटच्या माध्यमातूनच केली जातात. आता इंटरनेटबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती बातमी काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
- केरळ सरकारने इंटरनेटबाबत एक घोषणा केली आहे. केरळ सरकार दारिद्र्यरेषेखाली (BPL )असणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबाना मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या दृष्टीने राज्यभरामध्ये केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (KFON) सुरू केले आहे. KFON ची अधिकृत घोषणा झाल्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात उतरला आहे. रिपोर्टनुसार,७ हजार कटुंबाना मोफत इंटरनेटची सुविधा मिळाली आहे. राज्यामध्ये इंटरनेट हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याची घोषणा सत्ताधारी पक्षाने केली आहे.
- KFON ही स्वतःची इंटरनेट सेवा असलेले केरळ पहिले राज्य आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १५ MBPS च्या स्पीडप्रमाणे डेली १.५ जीबी डेटा मिळणार आहे. The Hindu च्या एका रिपोर्टनुसार, ही सेवा केवळ घरांसाठी मर्यादित नसून, ३० हजारपेक्षा जास्त सरकारी संस्था ज्यामध्ये कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलचा समावेश आहे. या ठिकाणी देखील KFON सुविधा मिळणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अधिकृतपणे राज्यात इंटरनेट सुविधा सुरू केली आहे.
- कोणतीही योजना सुरू करायची असल्यास त्यासाठी काही पायाभूत सुविधांची गरज असते. या योजनेसाठी देखील सरकारने दुर्गम भागांमध्ये काही पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्यावर फायबर नेटसाठी केबल टाकण्यात आल्या. रिपोर्टनुसार राज्यभरामध्ये आतापर्यंत ३४,००० किमी इतक्या केबल टाकण्यात आल्या आहेत.
- जुलै २०२२ मध्ये दूरसंचार विभाग (DoT) ने KFON ला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर(IPL) आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर(ISP) चे लायसेन्स दिले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत सरकारला २० लाख BPL कुटुंबापर्यंत इंटरनेट सेवा द्यायची आहे. पहिल्या टप्यामध्ये १४ हजार घरांची निवड करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार कुटुंबाना मोफत इंटरनेट सेवा मिळाली आहे. त्यानंतर १४० विधानसभा मतदारसंघातून १०० कुटुंबांना या योजनेसाठी निवडले जाईल.
मंदीचे सावट अजूनही कायम; आता ‘ही’ कंपनी करणार कर्मचाऱ्यांची कपात
- सध्या जगभरामध्ये अनेक जागतिक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. आता पर्यंत Meta, Twitter, Amazonसह अनेक कंपन्यांनी कपात केली आहे. आता Reddit या कंपनीने देखील कर्मचारी कपात केली आहे.
- सोशल प्लॅटफॉर्म असणाऱ्या Reddit कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे ९० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे आता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये Reddit चा समावेश झाला आहे. मेटा प्लॅटफॉर्मसह अनेक टेक कंपन्या महामारीच्या काळामध्ये नोकरीवर घेतल्यावर आता नोकऱ्यांची कपात करत आहेत. कारण आर्थिक मंदीचा सामना करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. याबाबतचे वृत्त moneycontrol ने दिले आहे.
- २०११ मध्ये कॉन्डे नास्ट या मासिकामधून वेगळे करण्यात आले होते. सध्याच्या काळामध्ये Reddit ला वॉलस्ट्रीटबेट्स आणि त्याच्या प्लॅटफॉर्मवरील इतर ठिकाणी लोकप्रियतेत वाढ झाली. जे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी स्टॉकवर सट्टा लावण्याचे ठिकाण बनले आहे.
- कंपनीचे सीईओ स्टीव्ह हफमन यांनी कर्मचारी कपातीबद्दल कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेलचा दाखला देत The Wall Street Journal ने मंगळवारी Reddit च्या या निर्णयाची माहिती दिली. The Wall Street Journal च्या रिपोर्टनुसार, हफमन यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेलमध्ये म्हणाले, या निर्णयाअंतर्गत खुल्या पदांची संख्या ३०० वरून १०० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील विजेची मागणी पुन्हा २८ हजार ‘मेगावॅट’वर; वीजपुरवठा कुठून?
- राज्यात हवामान बदलामुळे विजेच्या मागणीतही चढ-उतार दिसत आहे. बुधवारी विजेची मागणी वाढून २८ हजार ‘मेगावॅट’वर आली. एकीकडे मागणी वाढली, तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पातील ६६० ‘मेगावॅट’च्या दोन संचात दुरुस्ती होऊन वीजनिर्मितीही वाढल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला नाही.
- राज्यातील बऱ्याच भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. या वातावरण बदलाचा विजेच्या मागणीवरही परिणाम होत आहे. ३ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता राज्यात विजेची मागणी २८ हजार ‘मेगावॅट’ होती. परंतु, अवेळी पावसामुळे ५ जूनला मागणी २६ हजार ८३० ‘मेगावॅट’वर खाली आली. तापमानात घट होऊन वातानुकूलित यंत्र, कृषीपंपासह इतर विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्याने मागणी घटल्याचा महावितरणचा अंदाज होता.
- बुधवारी (७ जून) राज्यात विजेची मागणी दुपारी ३ वाजता पुन्हा वाढून २७ हजार ९६२ ‘मेगावॅट’वर आली. त्यापैकी राज्यात बुधवारी दुपारी ३ वाजता १६ हजार १७५ ‘मेगावॅट’ वीजनिर्मिती होत होती. तर केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला १० हजार २४८ ‘मेगावॅट’ वीज मिळत होती. राज्याला मिळणाऱ्या विजेमध्ये महानिर्मितीच्या ७ हजार ६१४ ‘मेगावॅट’, अदानी ३ हजार १७७ ‘मेगावॅट’, जिंदल १ हजार १०६ ‘मेगावॅट’, रतन इंडिया ३ हजार १७७ ‘मेगावॅट’ आणि इतर कंपन्यांकडून निर्माण विजेचाही समावेश होता. या वृत्ताला महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
वीजनिर्मितीत दुप्पट वाढ, पुरवठ्यावर परिणाम नाही
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील ६६० ‘मेगावॅट’च्या दोन संचात दोन-तीन दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या संचातून वीजनिर्मिती बंद होऊन इतर यंत्रातील वीजनिर्मिती केवळ ६०० ते ७०० ‘मेगावॅट’ दरम्यान आली होती. परंतु, मंगळवारी दोन्ही संचात दुरुस्ती होऊन ते पुन्हा सुरू झाल्याने येथील वीजनिर्मिती बुधवारी १ हजार ५४१ ‘मेगावॅट’वर आली. त्यामुळे मागणी वाढूनही पुरवठ्यावर परिणाम झाला नाही.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ७ जून २०२३ चालू घडामोडी
- ६ जून २०२३ चालू घडामोडी
- ५ जून २०२३ चालू घडामोडी
- ४ जून २०२३ चालू घडामोडी
- ३ जून २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |