९ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 January 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ जानेवारी चालू घडामोडी

वरुण, ईशाला ऑलिम्पिक कोटा; पिस्तूल प्रकारात चमकदार कामगिरी

  • भारताच्या वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी सोमवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतून भारताला पिस्तूल प्रकारात दोन ऑलिम्पिक कोटा मिळवून दिले. दोघांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची नोंद केली.या कामगिरीनंतर भारताच्या १५ नेमबाजांचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित झाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने १५ प्रवेश मिळवले होते. या वर्षी जुलै महिन्यात आणखी पात्रता फेरी शिल्लक असल्यामुळे भारत आणखी ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • आशियाई पात्रता फेरीत पहिल्याच दिवशी भारताने सहा पदकांची कमाई केली. यामध्ये दोन सांघिक सुवर्णपदकांचाही समावेश आहे. वैयक्तिक प्रकारात २० वर्षीय वरुणने २३९.६ गुणांसह सोनेरी यश मिळविले. भारताचाच अर्जुन चीमा २७३.३ गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. मंगोलियाच्या दवाखु एंखताईवानने कांस्यपदक मिळवले. त्यापूर्वी वरुण (५८६), चीमा (५७९), उज्वल मलिक (५७५) यांनी एकूण १७४० गुणांची कमाई करताना भारताला सांघिक सुवर्णपदक पटकावले. इराण, कोरिया रौप्य आणि कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
  • पाठोपाठ १९ वर्षीय इशाने २४३.१ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. पाकिस्तानची किशमला तलत रौप्य, तर भारताची रिदम सांगवान कांस्यपदकाची मानकरी ठरली. इशा, रिदम आणि सुरभी राव यांनी १७३६ गुणांची कमाई करताना सांघिक सुवर्णपदकाचीही कमाई केली.

दहावी, बारावीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ; राज्य मंडळाकडून कारणांचा अभ्यास

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा अचानक विद्यार्थिसंख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.
  • राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. दर वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे १४ लाख ६० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
  • या पार्श्वभूमीवर यंदाच्या नोंदणीमध्ये विद्यार्थिसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दहावीची विद्यार्थिसंख्या १६ लाख १० हजार जास्त, तर बारावीची विद्यार्थिसंख्या १५ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. तसेच अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत असल्याने विद्यार्थिसंख्येत भरच पडणार आहे. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थिसंख्या का वाढली, त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.
  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपूर्वी दहावीचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात आले होते. त्यामुळे निकालात वाढ झाली होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. पण दहावीचे सुमारे २५ हजार विद्यार्थी वाढल्याचे दिसून येत आहे. ते का वाढले आहेत, याचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत परीक्षा पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित करण्यात असल्याने खासगी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असू शकते.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा चौथ्यांदा ऐतिहासिक विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फोन, म्हणाले…

  • नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा ‘ऐतिहासिक’ विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे अभिनंदन केले . बांगलादेशमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी बांगलादेशमध्ये केवळ ४० टक्के मतदान झाले. या मतदानाचा निकाल आज लागला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटलं की, “पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी बोललो आणि संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बांगलादेशातील जनतेचे निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले. आम्ही बांगलादेशसोबत आम्ही लोककेंद्रित भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
  • बांगलादेशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीने (बीएनपी) रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, दिवसभरात ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली होती.
  • २००९ पासून हसिना शेख बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. निवडणुकीपूर्वी बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे बीएनपी पक्षाने या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. बांगलादेश निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार,  एकूण ३०० मतदारसंघांपैकी २९९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. एका मतदारसंघात अवामी लीगच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे तिथे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तर, हसिना यांच्या अवामी लीगने सार्वत्रिक निवडणुकीत २२३ जागा जिंकल्या आहेत. जापा या विरोधी पक्षाला ११ जागा आणि सत्ताधारी पक्षाच्या बंडखोरांसह अपक्ष उमेदवारांना ६१ जागा मिळाल्या आहेत.

“कमळवालेच राममंदिर बनवणार..”, २०० वर्षांपूर्वीच्या ‘या’ नाण्यात मिळाला पुरावा? ब्रिटिशांनी रामाची नाणी घडवली का?

  • राम मंदिराच्या अभूतपूर्व सोहळ्यापूर्वी लाइटहाऊस जर्नालिज्मला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असलेली पोस्ट आढळून आली. पोस्टमध्ये नमूद केले आहे की या चित्रात २०० वर्षांपूर्वी इंग्रजांनी बनवलेले हे नाणे दिसतेय. ज्यामध्ये एका बाजूला कमळ आणि दुसऱ्या बाजूला भगवान रामाचे सीता- लक्ष्मण व हनुमानासह चित्र आहे. राममंदिर ‘कमळवालेचं’ बांधणार हे इंग्रजांनाही माहीत होते, असा उल्लेख या पोस्टमध्ये केलेला आहे. मराठीत असणारी ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
  • काय होत आहे व्हायरल?
  • फेसबुक यूजर ललिता पाटीलने व्हायरल पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.
  • इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत पोस्ट शेअर करत आहेत.
  • तपास:
  • आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आमचा तपास सुरू केला आणि आम्हाला फ्लिपकार्ट या ईकॉमर्स वेबसाइटवर नाण्याची इमेज शेअर केली गेली असल्याचे समजले. डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: COINS WORLD 1818 TWO ANNA 250 GRAMS SUPER HEAVY RAM DARBAR TOKEN Ancient Coin Collection (1 Coins)
  • https://www.flipkart.com/coins-world-1818-two-anna-250-grams-super-heavy-ram-darbar-token-ancient-coin-collection/p/itm99c084b292ba5
  • तपासाच्या पुढील टप्प्यात, आम्ही प्राचीन भारतीय नाण्यांचा शोध घेतला आणि IndianCoins.com नावाची वेबसाइट सापडली. संकेतस्थळावर अनेक नाण्यांचे संदर्भ व फोटो आढळून आले.
  • आम्ही फोनवरून इंडियनकॉइन्सचे सुलतान यांच्याशी संपर्क साधला आणि व्हायरल इमेजबद्दल चौकशी केली. त्यांनी माहिती दिली की अशी नाणी काल्पनिक संग्रहातील आहेत आणि ती खरी नाहीत. व्हायरल झालेले नाणे बनावट असून ते ब्रिटिशकालीन नाही. आम्ही आरबीआयची वेबसाइटवर ठराविक कालावधीतील भारतीय नाण्यांचे फोटो सुद्धा तपासून पाहिले.

कुटुंबातील उमेदवारांना समान गुण! तलाठी भरती प्रकरण; सरकार तपास करत नसल्याचा आरोप

  • तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
  • राज्यातून आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. गुण ठरवण्यासाठी सामान्यीकरणाचे (नॉर्मलायझेशन) सूत्र वापरल्याने अधिकचे गुण दिसत असल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाकडून देण्यात आले. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण आहेत. एकाला २०२.४५ तर दुसऱ्याला १९४.०६९ गुण आहेत. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. यात क्रमश: २०१.३३, १९९.८९ व १९५.२७ गुण आहेत. असाच प्रकार २०१९च्या तलाठी भरतीमध्येही घडला होता. तेव्हा ‘लोकसत्ता’ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.

‘सरकारने तपासात पुढाकार घ्यावा’

  • तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली. मात्र, आरोप होत असताना शासन स्वत: दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करीत नाही, परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केला आहे. तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्रांचे चित्रीकरण आहे. त्यातून तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे

सखोल चौकशी करा सुप्रिया सुळे

  • नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. या परीक्षांसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जाते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुण्यात जेएन.१ चा धोका वाढला! तब्बल १५० रुग्ण; राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या

  • राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल १५० रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ५९ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
  • राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यात जेएन.१ चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक ५९ रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १५० असून, राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे.
  • राज्यात मागील २४ तासांत करोनाच्या ६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याच वेळी ७० रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के असून, मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात मागील २४ तासांत २ हजार ७२८ चाचण्या झाल्या. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर २.२३ टक्के आहे. राज्यात एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद मागील २४ तासांत झालेली नाही, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.

पीसीबीचा मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूला केले पाकिस्तान टी-२० संघाचा उपकर्णधार, काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

  • गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट संघात सातत्याने मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत पीसीबीने मोहम्मद रिझवानला टी-२० फॉरमॅटसाठी उपकर्णधार म्हणून घोषित केले आहे. मंडळाने सोमवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने घसरलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद बदलल्यानंतर मोहम्मद रिझवानला आता न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टी-२०चा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अलीकडेच, पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे, जी आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे.
  • पाकिस्तानचा संघ १२ ते २१ जानेवारी दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर असेल. येथे दोघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाची कमान शाहीन आफ्रिदीकडे आहे, तर अनुभवी रिझवानकडे संघाचे उपकर्णधार असेल. दरम्यान हा निर्णय अचानक घेण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शाहीनच्या नेतृत्वाखाली संघ ऑकलंडला पोहोचला

  • वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली संघ आगामी दौऱ्यासाठी ऑकलंडला पोहोचला आहे. पाकिस्तानने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण केला आहे. या काळात संघाला कसोटी मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, आता टी-२० संघाचे सदस्य सिडनीहून थेट न्यूझीलंडला पोहोचले आहेत.
  • गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानची कामगिरी फारशी प्रभावशाली नाही. आशिया चषकानंतर एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर कसोटी मालिका गमावल्यामुळेही संघाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉरमॅटच्या संघात बरेच बदल केले आहेत, ज्यामध्ये बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवणे महत्त्वाचे होते. आता शाहीन आफ्रिदीचा टी-२० कर्णधार म्हणून हा पहिलाच दौरा असेल.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

९ जानेवारी  चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.