Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 January 2024
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
८ जानेवारी चालू घडामोडी
स्मृती मंधानाने केला मोठा पराक्रम, रोहित-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाली सामील
- भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मंधानाने ५२ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंधानाने तिच्या या खेळीने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये तीन हजार धावाही पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडू खेळून हा आकडा गाठणारी ती महिला क्रिकेटपटू ठरली. या बाबतीत तिने न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनचा विक्रम मोडला.
- स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अवघ्या २४६१ चेंडूत तीन हजार धावा पूर्ण केल्या. यासाठी सोफी डिव्हाईनने २४७० चेंडूंचा सामना केला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग तिसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंडची सुझी बेट्स चौथ्या स्थानावर आहे. लॅनिंगने २५९७ चेंडूंत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर बेट्सने २६७९ चेंडूंत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
मंधाना रोहित-कोहलीच्या क्लबमध्ये सामील –
- आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारी मंधाना ही चौथी भारतीय खेळाडू आहे. तिच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावावर ही कामगिरी नोंदवली गेली आहे. कोहलीने १०७ डावात ४००८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहितच्या नावावर १४० डावांमध्ये ३८५३ धावा आहेत. हरमनप्रीत कौरने १४३ डावात ३१९५ धावा केल्या आहेत. आता मंधाना या यादीत सामील झाली आहे. तिने १२२ डावात ३०५२ धावा केल्या आहेत.
शफालीबरोबर तिसरी शतकी भागीदारी –
- स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शफाली वर्माबरोबर पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. शफालीबरोबर तिने तिसऱ्यांदा टी-२० मध्ये शतकी भागीदारी केली आहे. भारतासाठी सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी ही जोडी ठरली. मंधाना आणि शेफालीने हा पराक्र तीनदा केला आहे. यापूर्वी मंधानाने माजी कर्णधार मिताली राजसोबत दोनदा शतकी भागीदारी केली होती.
मोदी आजपासून तीन दिवस गुजरातमध्ये
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जानेवारी दरम्यान गुजरातचा दौरा करणार आहेत. या काळात ते ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद-२०२४’चे उद्घाटन करतील. या शिखर परिषदेदरम्यान मोदी जागतिक नेते, सर्वोच्च जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
- ‘व्हायब्रंट गुजरात’ विश्व परिषदेचे हे दहावे पर्व गुजरातमधील गांधीनगर येथे १० ते १२ जानेवारी २०१४ दरम्यान होणार आहे. ‘भविष्याचे प्रवेशद्वार’ (गेट वे टू द फ्युचर) असा त्याचा यंदाचा मुख्य विषय आहे. या वर्षी ३४ सहभागी देश आणि १६ भागीदार संस्था या परिषदेत सहभागी होत आहेत.
- तंत्रज्ञान आणि नवकल्पना, शाश्वत उत्पादन, हरित हायड्रोजन ऊर्जा विनियोग, विजेवरील वाहने आणि अक्षय ऊर्जा आणि शाश्वतता यासारख्या जागतिक स्तरीय विषयांवर चर्चासत्र आणि परिषदांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या शिखर परिषदेत केले जाईल. ‘व्हीजीजीएस’मध्ये कंपन्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील. ई-वाहतूक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, सागरी अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा यावर प्रामुख्याने भर दिला जाईल.
- या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यात जागतिक नेत्यांबरोबर चर्चा, अग्रगण्य जागतिक कंपन्यांच्या सीईओंबरोबर बैठक, ‘व्हायब्रंट गुजरात’ जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन, ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४’चे उद्घाटन, ‘गिफ्ट सिटी’मध्ये उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी चर्चा अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.
Boycott Maldives का होतेय ट्रेंड? पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर भारतीयांनी का रद्द केला मालदीव दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेटाची भ्रमंती केली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून मालदीवमध्ये मोठा गदारोळ माजला आहे. मालदीवच्या काही सर्वोच्च मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काही अपमानास्पद टीका केल्या आहेत.
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केली टीका
- मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन (Mariyam Shiuna) यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोंवर कमेट्स करीत त्यांना ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे संबोधले आहे. हे पोस्ट डिलीट करण्यात आली असून त्याचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहे. हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धात इस्रायल गुंतलेला असतानाही भारताने त्या देशाशी चांगले संबंध राखल्याने त्यांनी अशी टीका केली आहे. पण, भारताने संघर्ष सुरू झाल्यापासून मानवता म्हणून पॅलेस्टाइनला मदत केली आहे.
पतंप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला दिली भेट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी रोजी लक्षद्वीपला दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. मालदीवबाबत एकाही शब्दाचा उल्लेख न करता, पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “अलीकडेच मला लक्षद्वीपच्या लोकांसह राहण्याची संधी मिळाली. मी अजूनही येथील बेटांचे अविश्वसनीय सौंदर्य पाहून थक्क आहे. मला आगत्ती, बंगाराम व कवरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी बेटावरील लोकांनी आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लक्षद्वीपच्या हवाई दृश्यांसंह येथील सोंदर्याची झलक दाखवणारे फोटो येथे आहेत.”
Rich Dad, Poor Dad : श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या लेखकाच्या डोक्यावर १.२ अब्ज डॉलर्सचं कर्ज
- कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात, रस्त्याकडेला असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर एक पुस्तक आपल्याला हमखास पाहायला मिळतं, ते म्हणजे ‘रिच डॅड, पुअर डॅड’. श्रीमंत कसं व्हायचं? किंवा अधिक पैसे कसे कमवायचे? कुठे गुंतवणूक करायची? यासंबंधीचे सल्ले देणारं ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग (सर्वाधिक विकलं गेलेलं) पुस्तकांपैकी एक आहे. परंतु, जगाला श्रीमंत कसं व्हायचं याबाबत सल्ले देणारं पुस्तक लिहिणारा लेखक मात्र प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सध्या १.२ अब्ज डॉलर्सचं (९ हजार ९८२ कोटी रुपये)कर्ज आहे. परंतु, त्यांना या कर्जाची चिंता नाही. उलट रॉबर्ट कियोसाकी लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत.
- प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांचं एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, माझं कर्ज १ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलंय. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील नाही.
- कियोसाकी म्हणाले, बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढवतात. मुळात त्यांनी कर्ज घेऊन संपत्ती वाढवलेली असते. मला नेहमी वाटतं की, फेरारी आणि रोल्स रॉयससाख्या आलिशान गाड्या म्हणजे तुमची संपत्ती नव्हे. यांना जबाबदाऱ्या मानायला हवं.
रॉबर्ट कियोसाकी यांची संपत्ती किती?
- रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की ते रोख पैसे साठवून ठेवत नाहीत. ते म्हणाले, मी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतो. मी कर्जाला अजिबात घाबरत नाही. कारण कर्ज म्हणजेच पैसे. चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात आणि चुकीच्या कर्जातून कमी कामाई होते. मला वाटतं, लोकांनी कर्ज घ्यावीत आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी. माझ्याकडे सध्या १०० मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मीसुद्धा दिवाळखोरी पाहिली आहे. परंतु, हळूहळू मी त्या समस्येतून बाहेर पडलो आणि यशस्वी झालो.
ऐतिहासिक कामगिरी; पाच महिन्यानंतर ‘आदित्य एल १’ पोहोचले निश्चित स्थळी; पंतप्रधान मोदी म्हणाले..
- देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर यशस्वीरित्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान ११० दिवसांनी पोहोचले आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा यशस्वी टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचे अभिनंदन व्यक्त केले आहे.
- भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. “भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल१ हे उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचेच हे यश आहे. संपूर्ण देश या कामगिरीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन व्यक्त करत असताना मीदेखील त्यात सामील होत आहे. मानवतेच्या विकासासाठी विज्ञानाचे नवे नवे क्षितीज गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
- सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवले आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणे (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.
‘एल-१’ म्हणजे काय?
- अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदूू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत. ‘आदित्य’ हे अंतराळयान एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव ‘आदित्य एल-१’ असे ठेवण्यात आले आहे. अलीकडेच ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने (ईएसए) संयुक्तपणे काढलेल्या ‘सोलर ऑर्बिटर’ मोहिमेतून तुलनेने लहान सौरवाऱ्यांचा शोध लागला होता. आदित्यच्या निरीक्षणांमधून यावर अधिक प्रकाश पडेल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ७ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
- ६ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
- ५ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
- ४ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
- ३ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |