मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी आज दिनांक १७ मार्च २०२० मंगळवार रोजी पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. जयराम हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे सासरे होते.
शाळेत असल्यापासूनच जयराम कुलकर्णी यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.
१९५६ मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली. व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती.
मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम कुलकर्णी यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने अभिनयाची आवड आणि नोकरी संभाळताना अनेकदा जयराम कुलकर्णी यांची तारेवरची कसरत व्हायची. अनेकदा त्यांच्या नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे १९७० च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनय श्रेत्राकडे वळले.
जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.