कर्नाळा पक्षी अभयारण्य (Karnala Bird Sanctuary)
Address: NH 66, Karnala, Maharashtra 410206
Area: 446 km²
Phone: 086918 91100
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. 12.155 चौ.कि.मी. च्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचं दिवस रात्र संम्मेलन भरलेलं दिसतं. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांचे हे माहेरघर आहे. 147 प्रजातीचे पक्षी आपण येथे पाहू शकतो ज्यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरीत किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, ऊझ्बेकिस्तान, सायबेरियातून पक्षी येथे येतात कधी कधी काही प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या 15 हजारांहून अधिक असते…
कर्नाळा हे मुंबईकरांच्या मनाच्या खूप जवळ कारण धकाधकीच्या आयुष्यात वेळ कमी असतांना ज्या काही गोष्टी मुंबईकरांच्या मनाला आनंद देऊन जातात त्यात या कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश होतो. भल्या पहाटे निघालं तर एका दिवसाच्या भटकंतीमध्ये या अभयारण्य भ्रमंतीचा आनंद घेता येतो. मुंबईप्रमाणे हे अभयारण्य सतत पक्षांच्या किलबिलाटानं जागं असल्याचं लक्षात येतं.
कर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे. तर दऱ्याखोऱ्यातील नाल्या लगतच्या खोलगट भागात अल्प प्रमाणात सदाहरीत नदीकाठची वने आहेत. यात विविध प्रकारच्या 642 वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पती अस्तित्त्वात आहेत. आपटा, आवळा, उंबर, ऐन, कोकम, खैर, चिंच, जांभूळ, बेल, मोह, यासारखे मोठे वृक्ष तर आवळा, कोकम, बेहडा, रिठा यासारख्या औषधी वनस्पती येथे आहेत. झुडूप वर्गीय वनस्पतींमध्ये अडुळसा, एरंड, करवंट, घाणेरी, निरगुडी या वनस्पती तर वेलींमध्ये गुळवेल, पळसवेल, मोरवेल, गारंबी या वेली आपण पाहू शकतो. अनंत प्रकारच्या पक्षांना येथील वातावरणाने भूरळ घातली आहे.
पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षी निरक्षणाच्यादृष्टीने महत्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्त्वात आहेत.
कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून 445 मीटर ऊंचीवर आहे दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढतांना तटबंदी लागते त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठ्यासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्षांचंच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.
पावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक छोटे छोटे ओहळ इथे वाहत असतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच मोहक दिसतं. अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते. अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पिशव्या व इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. जंगल भटकंतीचे रंजक मार्ग आपल्याला इथे सांगितले जातात. जसे की हरियाल निसर्ग मार्ग हा जवळचा, सोपा मार्ग असला तरी पक्षांच्या मोहमयी दुनियेचं विस्मयकारक दर्शन घडवून आणतो. लांबवर चालत जाऊन ज्यांना रानवाटांचा अधिक आनंद लुटायचा आहे त्यांनी मोरटाक मार्गानं जावं. तो सरळ अभयारण्यातून 6 कि.मी लांबवर जातो. वेगवेगळ्या रंगांची भरपूर फुलपाखरं आपण इथं पाहू शकतो.
या ठिकाणी आपण केव्हाही गेलो तरी वेगवेगळे पक्षी आपण पाहू शकतो. तुरेवाला सर्पगरुड, खरूची, कापशी, शिक्रा असे शिकारी पक्षी, जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश, होले असे अनेक मोठे पक्षी, देखणा मोर, याठिकाणी पहायला मिळतो. लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक आणि शामा हे तर पक्षीप्रेमींसाठींचे इथले आकर्षणच. तिबोटी खंड्या, सुभग, चष्मेवाला कोतवाल, नाचण, दयाळ, चातक, पावश्या, राखी वटवट्या, तांबट, कुरटुक, शिंजीर, याबरोबरच रनकस्तूर, रक्ताभ सुतार, हरितांग, मिलिंद, सोनेरी पाठीचा सुतार, नवरंग, असे अनेक आकर्षक पक्षी याठिकाणी मनसोक्त बागडतांना दिसतात. नीलिमा, नीलमणी, शैल कस्तूर, सागर, पर्वत कस्तूर, निलांग, खंड्या पाचूकवडा असे अनेक येथे दिसणारे मनमोहक पक्षी म्हणजे जणू नीलरंगाची उधळणच.
निवास
राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास पुढे सुमारे 1 ते 2 कि.मी. अंतरावर मयूर आणि भारद्वाज ही वन विभागाची विश्रामगृहे आपल्या निवासासाठी उपलब्ध आहेत. तसेच पश्चिमेकडील भागात निसर्ग माहिती केंद्र, पर्यटक कुटी आणि हॉल आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या मागणीनुसार राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. बचतगटांच्या माध्यमातून खास घरगुती जेवणही आपल्याला येथे मिळते.
जवळचं विमानतळ- मुंबई, जवळचं रेल्वे स्टेशन- पनवेल
रस्ता- पनवेल पासून 12 कि.मी. एस.टी महामंडळाची मुंबई सेंट्रल ते कर्नाळा अशी नियमित बससेवा आहे.
भेट देण्याचा उत्तम कालावधी – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
शहराच्या गजबजाटात तुमचा श्वास कोंडत असेल, थोडा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर कर्नाळ्याला एकदा गेलंच पाहिजे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने तुमचं मन प्रसन्न होतं. गरज आहे मनावरचे सगळे पोकळ पापुद्रे बाजूला काढत निर्मळ मनाने आनंद लुटायची… कर्नाळा तुम्हाला हा आनंद नक्कीच देईल.…
– डॉ. सुरेखा म. मुळे
विभागीय संपर्क अधिकारी
[email protected]
Source: https://www.mahanews.gov.in