Manjira River

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.

मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *