Pune University
Pune University

पुणे विद्यापीठाची स्थापना जुन्या मुंबई प्रांतातील मराठी भाषिक लोकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी झाली होती. शिक्षण तसेच संशोधनात गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष देणारे ते पश्चिम भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक होते. विविध विद्याशाखांतील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिल्याने आज विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली आहे. सामाजिक गरजांकडे लक्ष देणारे विद्यापीठ असल्याने उच्चशिक्षण ग्रामीण, शहरी तसेच आदिवासी भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.

पुणे विद्यापीठ जगातील एक अत्यंत मोठे व सुप्रसिद्ध विद्यापीठ आहे. विद्यापीठात सुमारे 6.5 लाख विद्यार्थी, 42 शैक्षणिक विभाग, 12 आंतरविद्याशाखा व केंद्र, 6 स्वायत्त यूनिट्स, 6 अन्य शैक्षणिक व सेवा यूनिट्स, 20 अध्यासने, 8 राष्ट्रीय व प्रादेशिक केंद्र आहेत. 696 संलग्न महाविद्यालये, 287 मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्था, 121 मान्यताप्राप्त संशोधन केंद्र विद्यापीठाशी संलग्न आहेत. या विद्यापीठाची स्थापना 1949 साली झाली, डॉ. बाबासाहेब जयकर हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. आज या विद्यापीठाने विविध क्षेत्रात उत्कृष्टतेच्या व यशस्वीतेच्या संस्मरणीय पायऱ्या ओलांडून अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. विद्यापीठाची संशोधन व प्रशिक्षण कार्यात उत्तम दर्जा असलेली अनेक यूनिट्स आहेत.

विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागात 60 विविध देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक कार्याखेरीज विद्यापीठाने विविध सामाजिक गटांच्या उदाहरणार्थ, ज्येष्ठ नागरिक, असंघटित मजूर, महिला, युवक, आदिवासी विद्यार्थी, शेतकरी, अल्पसंख्याक, इत्यादी गटांच्या गरजा भागविण्यासाठी समाजाभिमुख विस्तार योजना कार्यक्रमातही मोठे यश मिळविले आहे. विद्यापीठाने इतर विभागातही म्हणजे परीक्षा, अर्थ व अन्य प्रशासकीय विभागातही चमकदार यश मिळविले आहे.

संशोधनासाठी लागणारा पुरेसा निधी विद्यापीठ विभागांना पुरविते. विद्यापीठाने विज्ञानासाठी तसेच मानवशास्त्रासाठी प्रत्येकी एक संशोधन सल्लागार समितीची (रिसर्च ॲड्व्हायजरी कमिटी) (आर.ए.सी.) स्थापना केली आहे. आर.ए.सी. प्राध्यापकांना मार्गदर्शन करेल त्याचबरोबर संशोधन प्रगतीवर लक्षही ठेवेल. विद्यापीठाने प्रकाशित तसेच पीएच.डी. शोधप्रबंधातील चौर्यकर्म शोधण्यासाठी सॉफ्टवेअर घेतले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यापीठ ‘इनोव्हेशन’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करते. महाविद्यालय पातळीवर पाठ्यक्रमात कौशल्य आधारित कार्यक्रमांच्या समावेशासाठी विद्यापीठाने कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे. विद्यापीठ विभागांमध्ये श्रेणी पद्धतीची यशस्वी सुरुवात विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाने पाठ्यक्रम विकास केंद्राचीही स्थापना केली आहे.

शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी विद्यापीठाने विदेशी सहयोग करार केले आहेत. अध्यापनामध्ये विविधता यावी, शिक्षकांची प्रगती व्हावी व अध्यापन, अध्ययन व मूल्यमापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच उच्च दर्जाचे संशोधन व्हावे असा या करारामागचा हेतू आहे.

उद्दिष्ट

पुणे विद्यापीठ ज्ञानाचे संरक्षण, निर्मिती, प्रगती आणि प्रसार या दृष्टींनी जागतिक दर्जाचे आणि सामाजिक जाणीवयुक्त उत्कृष्ट गुणवत्तेचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्नरत आहे. सभोवती घडणाऱ्या विशाल परिवर्तनातून निर्माण होणारी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनणे त्यांचे उदि्दष्ट आहे.

विद्यापीठ परिसर

विद्यापीठाचा एकूण परिसर 490 एकरांचा असून त्यास अतिशय दुर्मीळ, सुंदर आणि चित्रपूर्ण वातावरण लाभले आहे. घनदाट हिरवळ, शोभिवंत ब्रिटिशकालीन कारंजे आणि पुणे विद्यापीठाची दिमाखदार इमारत, इत्यादी गोष्टी निसर्गप्रेमी, चित्रपट निर्माते, संगीतकार आणि ख्यातनाम लोकांचे आकर्षण केंद्र आहे. विद्यापीठाचा संपूर्ण परिसर असंख्य जुन्या वृक्षांनी व्यापलेला आहे. या वृक्षांची छाया, सौंदर्य आणि उत्साह निर्माण करणारे वातावरण विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधन करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करीत असते. पुणे विद्यापीठाने रास अल् खैमा (संयुक्त अरब अमिरात) येथे आपली शाखा सुरु केली असून 2009 पासून विद्यापीठाने तेथे ई-एम.बी.ए. आणि एम.बी.ए. चे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

मुख्य इमारत

पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत ही विद्यापीठाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. वास्तुकलेचा एक सुंदर नमुना असणाऱ्या या ऐतिहासिक इमारतीच्या आकाशाकडे भरारी घेणाऱ्या मनोऱ्यावर विद्यापीठाचा ध्वज फडकत असतो. विद्यापीठाच्या या इमारतीत कुलगुरुंचे कार्यालय, अधिष्ठाता कक्ष आणि दस्तावेज विभाग आहेत. विविध शैक्षणिक मंडळाच्या सभा ह्या मुख्य इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृह, संत ज्ञानेश्वर सभागृह, शिवाजी सभागृह आणि संत गाडगे महाराज सभागृह या चार प्रतिष्ठित व वैभवशाली सभागृहात होतात. मुख्य इमारतीचे मूळ वैभव जपण्यासाठी इमारतीच्या बांधकामाची काळजीपूर्वक सुधारणा सतत केली जाते.

इतर इमारती

विद्यापीठाच्या परिसरात भव्य व महत्त्वाच्या अशा अनेक इमारती आहेत. उदा. प्रशासकीय इमारत, सेट भवन, विविध पदव्युत्तर विभागांच्या इमारती, विद्यार्थी कल्याण मंडळ, स्पर्धा परीक्षा केंद्र, जयकर ग्रंथालय, खेर वाङ्मय भवन, मुद्रणालय, मुलांची व मुलींची वसतिगृहे, अनेक उपाहारगृहे, आरोग्य केंद्र आणि भोजनालय, इत्यादी. मास कम्युनिकेशन विभाग नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत स्थलांतरित झालेला असून वाणिज्य शाखेसाठीसुद्धा नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे.

जयकर ग्रंथालय

जयकर ग्रंथालय हे संदर्भ व माहिती ग्रंथांसाठीचे भारतातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथालयापैकी एक आहे. जयकर ग्रंथालयात भारतीय आणि विदेशी मासिके घेतली जातात तसेच ग्रंथालयास काही नियतकालिके मोफत व बदली तत्त्वावरही मिळतात. ग्रंथालयात 4,96,436 पुस्तके आहेत आणि विविध विषयांवरील मासिकेही आहेत. महाविद्यालयांना, संस्थांना आणि शासकीय संस्थांना आंतरग्रंथालयीन सेवा जयकर ग्रंथालयातर्फे पुरविण्यात येते. जयकर ग्रंथालयात प्राचीन भारताची संपत्ती असणारे लेखन पुस्तके व हस्तलिखितांच्या स्वरुपात जतन करुन ठेवले आहे. ग्रंथालयात संगणकीकृत नेटवर्क आहे तसेच डिजिटल ग्रंथालय व्यवस्थापन कार्यान्वित करण्याचे काम सुरु असून कार्यकारी व व्यवस्थापन मंडळांच्या सभेचे कार्यवृत्त व महत्त्वाचे दस्तावेज स्कॅन करण्यात आले आहेत. जेणेकरुन ते हवे तेव्हा लगेच उपलब्ध होऊ शकतील.

वसतिगृहे, अतिथिगृहे आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने

विद्यापीठात मुलांची आठ आणि मुलींची आठ वसतिगृहे असून, त्यांत 2189 हून अधिक विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. आरामदायी व फर्निचरसहित असलेल्या अतिथिगृहात खोल्या आहेत, तसेच भोजनकक्षसुद्धा उपलब्ध आहे. सेट भवन अतिथिगृहात भोजनकक्षासह 16 एकेरी व 16 दुहेरी खोल्या आहेत. विद्यापीठाच्या आवारात 115 प्राध्यापकांसाठी तसेच 294 प्राध्यापक कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था आहे. या सर्व सोयीसुविधांमध्ये वेळोवेळी सुधारणा करुन त्या जतन केल्या जातात.

भोजनगृह

समाजशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागाच्या मध्यभागी स्वच्छ-सुंदर परिसरामध्ये एक भोजनगृह चालविण्यात येत असून येथे माफक दरात जेवण मिळते. या भोजन गृहाव्यतिरिक्त विद्यापीठ परिसरात ठिकठिकाणी उपाहारगृहांचीही व्यवस्था आहे. तेथे उपाहाराचे व इतर खाद्यपदार्थ सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपलब्ध असतात.

क्रीडासंकुल व करमणुकीच्या सोई – सुविधा

विद्यापीठाच्या परिसरात बास्केटबॉल, हॉलीबॉल, कोर्ट, क्रिकेट व फुटबॉलचे मैदान, व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव आणि क्रीडा वसतीगृह, चार भव्य सभागृहे व एक ॲम्फिथिएटर तसेच सुशोभित बगिचांची व्यवस्था आहे.

मैदानी खेळ व बंदिस्त जागेतील खेळ या दोन्ही प्रकारांच्या खेळांचा या क्रीडासंकुलात अंतर्भाव केला आहे. भारतीय आणि युरोपीयन सांघिक व मैदानी खेळांकरिता क्रीडासंकुलात मोठे मैदान उपलब्ध आहे. साधारणत: ८० स्त्री व पुरुष खेळाडूंची राहण्याची व्यवस्था परिसरात आहे. योजना अधिक विस्तृत करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. क्रिकेट व फुटबॉलची मैदाने नैसर्गिक वाटावीत अशा हिरवळीसह नव्याने तयार करण्यात आलेली आहेत. बंदिस्त जागेतील खेळांसाठी सुविधा व पोहण्याचा तलाव तयार करण्याचे काम सुरु आहे.

विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधा

आरोग्य केंद्र : विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी आणि सेवकवर्ग यांच्यासाठी आरोग्यकेंद्राची 24 तास सुविधा उपलब्ध आहे. ईसीजी, डोळे तपासणी, दंतचिकित्सा व इतर तपासण्या तसेच विशेष वैद्यकीय सल्ला आरोग्य केंद्रामार्फत दिला जातो. अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका व निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. भित्तिपत्रके व इतर लेखनसुविधांच्या माध्यमांतून एड्स, कर्करोग, धूम्रपान, मद्यपान, लसीकरण आणि रक्तदान, इत्यादी संबंधीची जाणीव करुन देणारी व्यापक माहिती येथे दिली जाते. 1999 पासून सुरु झालेल्या मदत केंद्र (हेल्पलाईन) (दूरध्वनीद्वारे समुपदेशन) च्या माध्यमातून लैंगिकतेविषयी व त्यातून निर्माण होणाऱ्या एड्ससारख्या महाभयानक रोगांविषयी माहिती दिली जाते. शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती तपासणी केंद्र 2002 पासून आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाइी सुरु करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्यातून 2002 पासून विद्यापीठात योग-शिक्षण केंद्रही सुरु केले आहे.

जॉगिंग ट्रॅक

सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 1999 साली पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती एक लंब वर्तुळाकार जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. दररोज पहाटे अनेक लोक येथे फिरायला येतात.

बसव्यवस्था

शहराच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारी बसव्यवस्था विद्यापीठातून उपलब्ध आहे.

रोजगार माहिती आणि मार्गदर्शन केंद्र

नोकरीच्या शोधात असणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या केंद्राद्वारे विविध रोजगार योजना राबविल्या जातात. स्वयंरोजगार योजनेतून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही हे केंद्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. भारतात व परदेशात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, शिष्यवृत्या व फेलोशिप्स यांच्याबद्दल माहिती पुरविण्याचे कामही या केंद्रामार्फत केले जाते.

आंतरराष्ट्रीय केंद्र

आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सर्व प्रशासकीय कार्याचे समन्वयन केले जाते. पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (944 विद्यार्थी) विविध देशांमधून येतात. 52 विविध देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व संलग्न महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुणे विद्यापीठाची सर्व कार्य या केंद्रामार्फत केली जातात.

इतर सुविधा

इन्फर्मेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी पार्क, वायरलेस कनेक्टिव्हिटीसह इंटरनेट सुविधा, सार्वजनिक दूरध्वनी- एस.टी.डी/आय.एस.डी., छायांकन व स्कॅनिंग, लिनीअर व नॉनलिनीअर व्हिडीओ एडिटिंग, इत्यादी सुविधा विद्यापीठाच्या परिसरात उपलब्ध आहेत.

मध्यवर्ती कार्यशाळा

1962 साली स्थापन झालेल्या या मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये मॅकेनिकल विभाग, ग्लास ब्लोइंग विभाग, एसी व रेफ्रिजरेटर दुरुस्ती विभाग, सुतारकाम विभाग, फोटोग्राफी सुविधा केंद्र याचा समावेश आहे.

नवीन अभ्यासक्रम आणि विद्याशाखा

औद्योगिक काळाची गरज भागविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने नवीन एम.बी.ए.++ अभ्यासक्रम जुन्या एम.बी.ए. अभ्यासक्रमाच्या जागी 2007-08 पासून सुरु केला आहे. काळाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमाची रचना विविध औद्योगिक क्षेत्रांतील व शैक्षणिक क्षेत्रांतील अनुभवसंपन्न तज्ज्ञांच्या सल्‍लामसलतीने तयार करण्यात आली आहे. ह्या दुर्मीळ अभ्यासांतर्गत संयुक्त विषयांच्या 30 संयोगांपैकी कोणत्याही एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना आहे. पाच विशेष विषयांपैकी एक आणि सहा स्वतंत्र सेक्टरपैकी एक अशी विषयनिवड विद्यार्थ्यांना घेता येते. एम.बी.ए.++ च्या यशस्वीते पाठोपाठ 2008-09 पासून नोकरी स्वतंत्र सेक्टरपैकी एक अशी विषयनिवड विद्यार्थ्यांना घेता येते. एम.बी.ए.++ च्या यशस्वीतेपाठोपाठ 2008-09 पासून नोकरी करणाऱ्यांसाठी व्यावसायिक एम.बी.ए.या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली व त्या अभ्यासक्रमासही उदंड प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे एम. टेक. (बायोइन्फर्मेटिक्स्) एम.ए.(मास रिलेशन्स), एम.लिब.सायन्स (इन्फर्मेशन सायन्स) हे नवे अभ्यासक्रमही सुरु करण्यात आलेले आहेत. 2007-08 पासून स्वतंत्र वाणिज्य विद्याशाखा सुरु करण्यात आली असून विद्यापीठ आवारात वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर विभाग सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षणशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा निर्माण करण्यात आली असून, विद्यापीठ आवारात प्रथमच शारीरिक शिक्षणशास्त्र विभाग स्थापन करण्यात आला आहे.

विद्याशाखा
१. कला, ललितकला व प्रयोजीवीकला विद्याशाखा
२. मानस, नीती आणि समाजविज्ञान विद्याशाखा
३. विज्ञान विद्याशाखा
४. वाणिज्य विद्याशाखा
५. व्यवस्थापन विद्याशाखा
६. अभियांत्रिकी विद्याशाखा
७. शिक्षणशास्त्र विद्याशाखा
८. शारिरिक शिक्षणशास्त्र विद्याशाखा
९. विधी विद्याशाखा
१०. औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखा
११. तंत्रज्ञान विद्याशाखा

संपर्क

विद्यापीठात एकून 11 विद्याशाखा कार्यरत असून त्यात उच्चशिक्षणातील विविध विषयांचा समावेश आहे. या विद्याशाखांच्या अंतर्गत विद्यापीठात पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालविला जातो. त्यासंधीची माहिती पात्रतेविषयीची माहिती व अधिक माहितीसाठी संबंधित विभागांशी अथवा कुलसचिव कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा विद्यापीठाचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.unipune.ac.in पहावे

Source: https://www.mahanews.gov.in

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *