Shivalik River
Shivalik River

उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *