मृदा व कृषी महाराष्ट्र
मृदा व कृषी महाराष्ट्र


या तापमान वाढीचा परिणाम प्राणी मात्रांबरोबरच पिकांवर देखील होतो. कापसाची बोंडंगळ होते,  सोयाबीनची फुलगळ होते, मक्याचे परागीकरण कमी होते. यासारखे दुष्परिणाम पिकांवर दिसून येतात.

महाराष्ट्रात सण 1871 ते 2014 या कालावधीत साधारणतः 25 मोठे दुष्काळ पडले आहे.  त्यापैकी काही भयानक दुष्काळ होते, ज्यात अन्नधान्याची प्रचंड कमतरता जाणवली. परंतु 2016 या वर्षीच्या दुष्काळाची यापूर्वीच्या कोणत्याही दुष्काळाशी करता येणार नाही. कारण या दुष्काळात पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवली आहे. पाणी नसल्याने सर्वच प्राणी मात्रांवर  त्याचा परिणाम होतो आहे. भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खूप खोल गेली आहे, 500 फुटांपर्यंत कूपनलिका खोदून देखील पाणी उपलब्ध होत नाही. महाराष्ट्रात सतत 2 वर्षांपासून पर्जन्यमान घटते आहे. देशात दरवर्षी 0.18 डिग्री सेल्शिअसने तापमानात वाढ होत आहे. सध्यास्थितीत एकूण तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सियसने वाढ झाली आहे.

सततची जंगलतोड, आपली पीक पद्धती ( दुष्काळग्रस्त मराठवाड्यात उसाचे पीक घेणे),  हरितगृह वायूंचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्सर्जन यामुळे वातावरणात बदल होत आहे.  या वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी आपल्या पीक पद्धतीत आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागणार आहे.

दुष्काळग्रस्त भाग म्हणजे ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल आहे अशा ठिकाणी उसासारखे पीक ज्यास सर्वाधिक पाणी लागते असे पीक न घेणे, कोरडवाहू शेतीमध्ये पाण्याचा ताण सहन करणारे, लवकर तयार होणारे तसेच कीड व रोगांना प्रतिकारक्षम वाण निवडणे गरजेचे आहे. याचबरोबर पिकांची योग्य फेरपालट करणे, बहुविध पीक पद्धती,  आंतरपीक पद्धती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती, आच्छादन पिके यासारख्या शेतीपद्धती व पीक पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. मृदेला केंद्रीभूत मानून मृदा व जलसंधारण, मृदेचा पोत, मृदेनुसार पिकांची निवड, मृदेच्या मशागतीच्या पद्धती या सर्व बाबींवर भर द्यावा लागणार आहे.

या प्रकरणात आपण वरील सर्व बाबींबरोबरच मृदा म्हणजे काय, मृदेचे प्रकार, मृदेची वैशिष्ट्ये, मृदेत घेतली जाणारी पिके,  पिकांच्या जाती, त्यावर पडणारे रोग यासारख्या सर्व बाबींचा अभ्यास करणार आहे.

मृदा

मृदेची व्याख्या – मृदा म्हणजे खडकापासून वेगळ्या असलेल्या जमिनीचा असा भूभाग, की जो वनस्पतींना आधार देतो तसेच पोषक अन्नद्रव्ये पुरवितो.

मृदा हा जीवसृष्टीचा आधार आहे. कारण मृदेवर वनस्पती जीवन तर वनस्पती जीवनावर प्राणी  व मानवी जीवन अवलंबून आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मृदा हा महत्त्वाचा घटक आहे. मृदेची निर्मिती व दर्जा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असतो.   साधारणतः मृदा ही खडकांच्या विदरणाने तयार होते. मृदा ज्या खडकांच्या वितरणामुळे तयार झालेली असते त्या खडकांचे गुणधर्म त्या मृदेत आढळतात.

उदा. –   जांभा खडकापासून तयार झालेली मृदा तांबडी असते, तर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली मृदा काळी असते. पठारावरील मृदा उथळ तर मैदानी प्रदेशातील मृदा खोल असते. तापमान व पर्जन्यमान यांचाही प्रभाव मृदेवर होत असतो.  त्यामुळेच महाराष्ट्रातील मृदेचा विचार केला तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात सुपीक, तर अधिक पाऊस पडणाऱ्या भागात हलक्‍या दर्जाची मृदा आढळते.

मृदेचे घटक –  चांगल्या मृदेमध्ये साधारणपणे खालील घटक आढळून येतात.  या घटकांचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास मृदेच्या सुपीकतेवर परिणाम होत.

खनिजद्रव्य – 45%,

सेंद्रिय द्रव्ये – 5%,

जल व वायू –  25% व 25%

मृदेची सुपीकता

पिकांची वाढ होण्याकरिता मृदेची सुपीकता अत्यंत महत्त्वाची असते. मृदेची सुपीकता ही जमिनीचा सामू काढून मोजली जाते. सामू हे मातीचे तुलनात्मक आम्ल, विम्लता दर्शविणारे परिणाम आहे. जर जमिनीचा सामू सात असेल तर ती जमीन/ मृदा उदासीन (Basic) असते. जमिनीचा सामू 7 पेक्षा अधिक असल्यास मृदा ही विम्ल (Alkaline) असते व जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी असेल, तर ती जमीन आम्लधर्मीय (Acidic) असते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सर्व अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध असतात.  ती जमीन पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, असे म्हटले जाते.

जमिनीचा प्रकार

1) क्षारयुक्त जमीन:

जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा थर जमलेला असतो.  या जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो. या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. या जमिनीची सुधारणा करण्याकरिता जमिनीत पुरेसे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा लागतो. हिरवळीची पिके घेऊनदेखील या जमिनीत सुधारणा करता येते.

2) चोपण जमीन:

चोपण जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. जमीन कोरडी झाल्यावर टणक होते, जमिनीत हवा खेळती रहात नाही, त्यामुळे पिकांची योग्य वाढ होऊ शकत नाही.  या जमिनीचा सामू 8.5 ते 10 इतका असतो. या जमिनीच्या सुधारणेकरिता जमिनीत जिप्सम शेणखतात मिसळून टाकतात.

3) चुनखडीयुक्त जमीन:

या जमिनीची जलधारण शक्ती कमी असते. जमिनीचा सामू 8 पेक्षा जास्त असतो. जमिनीत हवा व पाणी यांची पुरेसे प्रमाण पिकांकरिता उपलब्ध होत नाही.  त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. या जमिनीच्या सुधारणेकरिता जमिनीची खोलवर नांगरट करतात हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर केला जातो.

महाराष्ट्रातील 90% पेक्षा अधिक भाग बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे.  परिणामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते.  परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा ही महाराष्ट्रात आढळून येतात.

महाराष्ट्रात साधारणतः पुढील प्रकारच्या मृदा आढळतात

 1. काळी कसदार मृदा / रेगूर मृदा

महाराष्ट्र पठाराचा बराच भाग रेगूर मृदेने व्यापलेला आहे. बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांच्या विदरणापासून या मृदेची निर्मिती झालेली आहे.  या मृदेत ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे सिंचनाच्या सहाय्याने या मृदेतून अनेक पिके घेता येतात. काळ्या मृदेत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे अतिसिंचनामुळे या मृदा दलदलीच्या बनतात.  त्यातील क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर चिकटतात. त्यातून या मृदा निरुपयोगी होण्याची शक्यता असते. काळी मृदा पाणी धरून ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे या मृदेत चुनखडीचे प्रमाण अधिक असते. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक जास्त म्हणजेच 0.50% ते 0.60% असते.

महाराष्ट्रात ही मृदा कृष्णा, भीमा, गोदावरी या प्रमुख पूर्ववाहिनी नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते.  पठारावरील अजिंठा, बालाघाट, व शंभू महादेव डोंगरावरून जस-जसे नदीत खोऱ्याकडे यावे तसतसे या मृदेची जाडी वाढत जाते व रंग गडद होत जातो. तापी नदी खोऱ्यामध्ये या मृदेची सर्वाधिक जास्त जाडी 6 मीटरपर्यंत आहे. तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे जाताना या मृदेचा रंग गडद काळा होत जातो.  महाराष्ट्रात या मृदेला रेगूर मृदा असे म्हटले जाते. ही मृदा आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त आहे.

ऊस, कापूस, तंबाखू या बरोबरच संत्री, मोसंबी, द्राक्षे यासारखी अनेक पिके या मृदेवर घेतली जातात. महाराष्ट्रात या मृदेत विशेषतः कापसाचे पीक घेतले जाते. म्हणून महाराष्ट्रात ही मृदा कापसाची काळी कसदार मृदा म्हणून ओळखली जाते.  

काळ्या मृदेस येणारा काळा रंग हा त्यात असणार्‍या टिटॅनीफेरस मॅग्नेटाइट मुळे येतो.

2) जांभी मृदा :

मृदेच्या लॅटेराइट प्रकारांमध्ये मोडणारी ही मृदा आहे. जांभा खडकांवर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन ही मृदा तयार झालेली आहे.  लोह व ॲल्युमिनियमच्या संयुगामुळे या मृदेला लाल अथवा जांभा रंग प्राप्त होतो. महाराष्ट्रात दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये ही मृदा आढळून येते.

या मृदेत नत्र, पालाश व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून ही मृदा कमी सुपीक असते.  परंतु फळपिकांच्या दृष्टीने ही मृदा अधिक उपयोगी असते. महाराष्ट्रात या मृदेतील काजू व आंबा ही फळपिके महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राचा सह्याद्री डोंगर माथ्यावरील जांभी मृदेच्या थरांना ‘लॅटेराइट कॅप्स’ असे म्हणतात.  जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते. ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही.

त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीनेही ही मृदा अयोग्य आहे

3) लालसर तपकिरी मृदा / तांबडी मृदा:

अतिप्राचीन आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही मृदा निर्माण झालेली असून, जास्त पावसाच्या प्रदेशांत तिचा विकास झालेला आहे. महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक असणाऱ्या पूर्व विदर्भ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण या भागात विदरणापासून ही मृदा तयार झाली आहे. पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिस्ट व निस्ट या मिश्र खडकापासून तयार झाली आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रात जांभी मृदा कठीण बेसॉल्टपासून तयार झाली आहे.  

लोहाच्या संयुगाचे (Iron Peroxide) प्रमाण जास्त असल्याने या मृदेला तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. या मृदेत पालाश, स्फुरद, कॅल्शियम व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण कमी असते.  यातून पाण्याचा निचरा चांगला होतो व ही मृदा रासायनिक खतांना लवकर प्रतिसाद देते. परंतु, या मृदेची सुपीकता कमी असल्याने शेतीसाठी कमी उपयोगी ठरते. महाराष्ट्रात पश्चिम घाट प्रदेश तसेच भंडारा, गोंदिया,  चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. या मृदेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सागाची वने आढळून येतात.

4) गाळाची मृदा :

या मृदेचा रंग फिकट पिवळा असतो.  यात पोटॅशचे प्रमाण कमी असते. वाळूमिश्र्रित लोम प्रकारच्या या मृदेत सेंद्रिय द्रव  व ह्यूमसचे चे प्रमाण जास्त असते. तसेच या मृदेची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमतादेखील जास्त असते.  त्यामुळे ही मृदा सुपीक असते. नद्यांच्या काठावर, किनारपट्टी भाग व प्रदेश यात गाळाची मृदा आढळते.  या मृदेत जलसिंचनाच्या सहाय्याने जी उन्हाळी शेती केली जाते तिला वायंगण शेती असे म्हणतात.

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतात  उगम पावून कोकणात उतरणार्‍या नद्या स्वतःबरोबर मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणतात.  हा गाळ या नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांच्या काठावर साठवला गेल्याने अशा ठिकाणी गाळाच्या मृदेची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रात या मृदेत भात, नाचणी, नारळ, पोफळी ही पिके घेतली जातात.

5) दलदलीची मृदा :

कोकणातून वाहणाऱ्या नद्यांच्या मुखांशी व खाड्यांच्या परिसरात गाळाच्या मृदा पाणथळ व खारवट बनतात.  भरतीच्या पाण्याने या मृदांवर क्षार पसरतात. या मृदांचे खार मृदेमध्ये रूपांतर होते व त्या अनुत्पादक होतात.  महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत खाड्यांच्या मुखालगतच्या प्रदेशात अशा प्रकारच्या मृदा आहेत.

या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अरबी समुद्रालगत दलदलीची मृदा तसेच वर्धा- वैनगंगेच्या खो-यात राखड तपकिरी मृदा आढळते.

मृदेची धूप :

महाराष्ट्रातील जमिनीच्या समस्यांपैकी प्रमुख समस्या म्हणजे मृदेची होणारी धूप.  मृदेची धूप म्हणजे पावसाच्या पाण्याने अथवा नद्या-नाल्यांचा पुराने जमिनीवरचा सुपीक थर वाहून जाऊन जमीन नापीक होणे म्हणजे मृदेची धूप होय. मृदेची धूप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

मृदेच्या धुपचे प्रकार :

 1. चादर धूप (Sheet Erosion) :  पावसाचे पाणी ज्यावेळी जमिनीच्या उतारावरून जोरात वाहू लागते, त्यावेळी जमिनीवरच्या मृदेचा विस्तृत सुपीक थर वाहून जातो. यास चादर धूप असे म्हणतात. महाराष्ट्र पठारावर या प्रकारची धूप मोठ्या प्रमाणावर होते.

    2) नाली धूप (Gully Erosion) :  डोंगराळ प्रदेशात जोरदार वृष्टीच्या वेळी अनेक नाले व ओढे वाहू लागतात. त्यामुळे डोंगराच्या उतारावरील मृदा वाहून घळ्या निर्माण होतात व जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते.  यालाच नाली धूप असे म्हणतात. महाराष्ट्रातील डोंगर रांगांच्या भागात अशा प्रकारची धूप होते.

मृदेची धूप होण्याची कारणे :

1) जमिनीचा उतार :

साधारणतः धूप ही उतार असलेल्या जमिनीवर जास्त होते.  महाराष्ट्र पठाराला असलेला मंद उतार तसे सह्याद्री, सातपुडा व सह्याद्रीच्या उपरांगा या ठिकाणी असणारा तीव्र उतार या भागात मोठ्या प्रमाणावर मृदेची धूप होताना दिसून येते.

2) पावसाचे प्रमाण :

जोरदार वृष्टीने मातीचे कण विलग होतात व वाहून नेले जातात.  महाराष्ट्रात ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे त्या भागात मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते.

3) मृदेचा आकार :

काळा मृदेची जलधारण शक्ती जास्त असल्याने काळ्या मृदेची धूप कमी होते,  तर जांभी मृदा, तांबडी मृदा या मृदेत पाण्याचे निचरण जलद गतीने होत असल्याने या मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते.

4)  वृक्षतोड :

सह्याद्री, सातपुडा याभागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने वनाच्छादन नष्ट झाले व त्यामुळे मृदा उघड्या पडल्या व मृदेची धूप झाली.

5) चराऊ कुरणांचा अति वापर :

गवतामुळे मृदांचे संरक्षण होते.  परंतु महाराष्ट्रातील वाढीव पशुधन हे जमिनीवरील गवत,  वनस्पतींची पाने इत्यादी खाऊन टाकतात. त्यातून जमिनीचा संरक्षक थर नष्ट होतो व मृदेची धूप होते.

6) स्थलांतरीत शेती :

सह्याद्री पर्वतात आदिवासी जमात स्थलांतरीत शेती करतात. या प्रकारात जंगलतोड करून शेती केली जाते.  दोन-तीन वर्षांनी ती शेती सोडून नवीन ठिकाणी पुन्हा जंगलतोड करून नवीन शेती केली जाते. यातून वनाच्छादन नष्ट होते.

7) नद्यांना येणारे पूर :

पावसाळ्यात महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा, कृष्णा यासारख्या नद्यांना पूर आल्याने व नदीच्या पाण्याचा वेग वाढल्याने नदीच्या खोऱ्यातील जमिनीची धूप होते.

महाराष्ट्र मृदा संधारण उपाय :

महाराष्ट्र राज्याकडे एकूण 307 लाख हेक्टर जमीन असून त्यापैकी एक 173.68 लाख हेक्टर जमिनीवर प्रत्यक्ष पिके घेतली जातात. म्हणजेच उर्वरित जमीन बिगर कृषी वापराखाली आहे. त्यामुळे उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करण्याच्या  दृष्टिकोनातून जमिनीची धूप मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने याकरिता स्वतंत्र मृदासंधारण विभाग स्थापन केला आहे.

मृदा संधारणकरिता महाराष्ट्रात पुढील उपाय योजले जात आहे.

 1. वृक्षारोपण : वृक्षांमुळे मृदांचे कण धरून ठेवले जातात व त्यामुळे मृदेचे वाहत्या पाण्यापासून संरक्षण होते.
 1. पिकांची फेरपालट करणे :  वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घेणे.  जेणेकरून जमिनीची धूप कमी होईल.
 1. आच्छादने : पीक लहान अवस्थेत असताना पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप आच्छादनामुळे कमी होते.  तसेच कुरणांमुळे देखील मृदांवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
 1. बांध घालने : उतारावरच्या शेतीच्या भागात विशिष्ट उतारावर जर बांध घातले गेले तर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने  वाहून जाणारे मृदेचे थर बांधाजवळ साठवले जातील व मृदा सपाट होण्यास मदत होईल. यासाठी पुढील पद्धतीने बांध घातले जातात.

अ)  समपातळीवरील वरंबे :

कमी पावसाच्या भागात व जमिनीत साधारणपणे 3 टक्केपर्यंत उतार असल्यास सम पातळीवरील वरंबे पाण्याला अडवून जमिनीत मुरविण्यासाठी मदत करतात.  

ब) ढाळीचे वरंबे :

जास्त पावसाच्या भागात व जमिनीस साधारणपणे 5 ते 10% असल्यास ढाळीचे वरंबे पाण्याला अडवून जमिनीत पाणी मुरण्यास मदत करतात.

क) सरी-वरंबा पद्धत :

जमिनीचा उतार 1ते 3% पर्यंत असल्यास उतारास आडवे एका आड एक सरी वरंबे तयार करावे.  दोन वरंब्यामधील सरीमध्ये पावसाचे पाणी मुरले जाते व वाहणाऱ्या पाण्यास अटकाव होऊन जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.

5)  जमीन नांगरतांना उताराच्या दिशेशी काटकोनात नांगरणी करणे :

काटकोनात नांगरणी केल्यास उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला प्रतिबंध होऊन मृदेची धूप कमी होण्यास मदत होते

6)  पायऱ्यांची शेती :

डोंगराळ भागात जेथे उतारावर शेती केली जाते.  त्या जमिनीवर पायऱ्यांची निर्मिती करून शेती केल्यास मृदेची धूप कमी होण्यास मदत होते.  यास सोपान शेती असे म्हणतात.

महाराष्ट्र कृषी

महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही महाराष्ट्रात प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे.  राज्याच्या स्थूल उत्पन्नात कृषी चा वाटा 10.9% आहे. तर 2011 च्या जनगणनेनुसार कृषी व संलग्न क्षेत्राचा राज्यातील एकूण रोजगारात 52.7% वाटा आहे.

नैसर्गिक हवामानाच्या विभागानुसार भारताचा समावेश मोसमी हवामानाच्या प्रदेशात होतो. पर्यायाने महाराष्ट्राचा देखील मोसमी हवामानाच्या प्रदेशात समावेश होतो. त्यामुळे महाराष्ट्रातही उन्हाळा, हिवाळा याबरोबरच पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आढळतो व त्या अनुषंगाने वेगवेगळे कृषी हंगाम त्या – त्या हंगामाची पिके महाराष्ट्रात काढली जातात.

हंगामऋतूप्रमुख पिके
खरीपजून – सप्टेंबर पावसाळाज्वारी, बाजरी, तांदूळ, कापूस, उडीद, तूर
रब्बीऑक्टोबर – फेब्रुवारी हिवाळागहू, हरबरा, ज्वारी
उन्हाळीफेब्रुवारी – मे उन्हाळाभुईमूग, सूर्यफूल

महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार

तृणधान्येज्वारी, बाजरी, भात, गहू, मका
कडधान्येतूर, मूग, उडीद, मटकी, हरबरा
अन्नधान्येतृणधान्ये + कडधान्ये
गळीत धान्यभुईमूग, करडई, सूर्यफूल, एरंडी, तीळ
नगदी पिकेकापूस, ऊस, हळद, तंबाखू
चारा पिकेमका, ओठ, बरसीम, लसूनघास, नेपिअर गवत, चवळी
वन पिकेबाभूळ, नीम, साग, सरस, चिंच, निलगिरी

महाराष्ट्र जमीन वापर 2014 15

राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र307.58 लाख हेक्टर
पिकाखालील स्थूल क्षेत्र232.72 लाख हेक्टर
निव्वळ पेरणी क्षेत्र173.45 लाख हेक्टर
वनाखाली क्षेत्र52.01लाख हेक्टर (56.4%)
मशागतीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र32.09 लाख हेक्टर (10.4%)
मशागत न केलेले इतर क्षेत्र24.16 लाख हेक्टर (7.9%)
पडीक जमिनीखालील क्षेत्र25.87 लाख हेक्टर (8.4%)

महाराष्ट्राचा पीक आकृतीबंध :

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 307.58 लाख हेक्‍टर इतके म्हणजेच एकूण उपलब्ध जमीन ही  307.58 लाख हेक्टर इतकी आहे. (महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2016 -17) त्यापैकी ज्या क्षेत्रावर  पीक घेतले जाते असे क्षेत्र म्हणजे निव्वळ पेरणी क्षेत्र हे एकूण जमिनीच्या 56.4% म्हणजेच 173.45 लाख हेक्‍टर इतके आहे.  परंतु कृषीखालील क्षेत्राचा विचार करता (दुबार क्षेत्र धरून) महाराष्ट्रातील कृषीखालील जमीन ही 232.73 लाख हेक्टर इतकी आहे.

एकूण कृषी खालील असणाऱ्या जमिनीपैकी

1)तृणधान्य पिकाखाली76.67 लाख हेक्टर
2)कडधान्य पिकाखाली35.44 लाख हेक्टर
3)एकूण अन्नधान्य खाली112.10 लाख हेक्टर
4)तेलबिया पिकांखालील41.95 लाख हेक्टर

महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादन

वर्षउत्पादन
1960 – 196177.44 लाख टन
1990 – 1991121.81 लाख टन
2001 – 2002101.33 लाख टन
2012 – 2013112.42 लाख टन
2013 – 2014144.60 लाख टन
2014 – 2015109.48 लाख टन
2015 – 201683.28 लाख टन

2015 – 2016 अन्नधान्य पिकांखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे प्रमुख जिल्हे उतरत्या क्रमाने

अहमदनगर
सोलापूर
बीड
पुणे
औरंगाबाद

2015 – 2016 नुसार अन्नधान्य पिकांचे सर्वाधिक उत्पादन असणारे प्रमुख जिल्हे उतरत्या क्रमाने नाशिक

नाशिक
पुणे
जळगाव
धुळे
सातारा

महाराष्ट्रातील अन्नधान्य पिकांचा क्षेत्र व उत्पादनानुसार उतरता क्रम

पीकक्षेत्रएकूण क्षेत्रात वाटा
ज्वारी32.17 लाख हेक्टर15.61%
तांदूळ15.03 लाख हेक्टर7.29%
गहू9.11 लाख हेक्टर4.42%
बाजरी8.01 लाख हेक्टर3.88%

पीकउत्पादनएकूण अन्नधान्य उत्पादनात वाटा
तांदूळ25.93 लाख मे. टन31.13%
ज्वारी12.05 लाख मे. टन14.46%
गहू9.81 लाख मे. टन11.77%
बाजरी3.33 लाख मे. टन3.99%

महाराष्ट्रातील प्रमुख पिके (2015 – 16)

ज्वारी :

ज्वारी महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतली जाते. महाराष्ट्रात एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ज्वारी पिकाखाली 15% जमीन आहे.  ज्वारीचे पीक पठारी प्रदेशातील प्रमुख पीक आहे. कोकण व पूर्व विदर्भात अति पावसाच्या जमिनीत ज्वारीचे पीक घेतले जात नाही. ज्वारी पिकाकरिता उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते.

ज्वारीचे पीक 25°C ते 32°C तापमान असणाऱ्या भागात व 40 से. मी. पर्यंत पाऊस पडणाऱ्या भागात चांगले येते. या पिकांकरिता जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. ज्वारीचे पीक हलक्‍या जमिनीत देखील येऊ शकते.

खरिपातील ज्वारीला जोंधळा, असे म्हटले जाते, तर रब्बीच्या ज्वारीला शाळू म्हटले जाते.

प्रमुख जाती :

सुवर्णा, एएच 1 व 2, CSH -9,11, 13, फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माऊली, फुले अनुराधा,  फुले अनुराधा, हुरड्यासाठी फुले उत्तरा, फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी, पापडांसाठी फुले रोहिणी.

क्षेत्र व उत्पादन :

महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील खरिपाचे 6.21 लाख हेक्टर व रब्बीचे 25.97 लाख हेक्टर असे दोन्ही मिळून एकूण 32.17 लाख हेक्‍टर जमीन आहे.  तर उत्पादन खरिपाचे 3.68 लाख टन व रब्बीचे 8.37 लाख टन असे दोन्ही मिळून 12.05 लाख टन इतके आहे.

महाराष्ट्रात ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

सोलापूर
अहमदनगर
बीड

महाराष्ट्रात ज्वारी पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

सातारा
पुणे
सोलापूर

महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र नांदेड व लातूर या जिल्ह्यात आहे, तर रब्बी ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे.

हेक्टरी उत्पादकता – महाराष्ट्रात रब्बी ज्वारी पिकाचे हेक्टरी उत्पादन 322 कि.ग्रॅ. आहे, तर खरीप पिकाचे हेक्टरी उत्पादन 594 कि.ग्रॅ. इतके आहे.

ज्वारी पिकाची उत्पादकता अधिक असणारे जिल्हे पुढीलप्रमाणे

कोल्हापूर
जळगाव
नंदुरबार

रोगांचा प्रादुर्भाव –  खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लालकोळी, खडखड्या

बाजरी

गरिबाचे अन्न अशी ओळख असलेल्या बाजरी पिकांचे उत्पादन खरीप हंगामातच घेतली जाते. महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी फक्त 3.8% जमिनीवर बाजरी पीक घेतले जाते.  महाराष्ट्रातील कोकण व विदर्भात बाजरीचे पीक घेतले जात नाही, तर महाराष्ट्रातील खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते.

बाजरी पिकाकरिता उष्ण व कोरडे हवामान अधिक लाभदायक असते.  बाजरीचे पीक 20°C ते 30°C तापमान असणाऱ्या व 40 ते 60 सेंमी पाऊस पडणाऱ्या भागात अधिक चांगले होते.  बाजरीचे पीक निकृष्ठ जमिनीवरही घेतले जाते. त्या जमिनीचा सामू कमी आहे. या जमिनीवर हे पीक अधिक चांगली येते.

प्रमुख जाती :-

श्रद्धा, MH-143, ICPV 87901, ICTP 8203, MH-169, MH-179, BK-560, धनशक्ती, संकरित जाती – शांती व आदिशक्ती

क्षेत्र व उत्पादन –

महाराष्ट्रात बाजरी पिकाखाली कूण 8.01 लाख हेक्‍टर जमीन आहे. बाजरीचे एकूण उत्पादन 3.33 लाख टन इतके आहे.

महाराष्ट्रात बाजरी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

नाशिक
बीड
अहमदनगर

महाराष्ट्रात बाजरी या पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

नाशिक
धुळे
बीड

हेक्टरी उत्पादकता – महाराष्ट्रात बाजरी या पिकाचे हेक्टरी उत्पादन 416 किलो ग्रॅम इतके आहे. बाजरी पिकाची उत्पादकता अधिक असणारे जिल्हे पुढील प्रमाणे

नंदुरबार
पुणे
जळगाव

रोगांचा  प्रादुर्भाव –  केवडा, गोसावी, अरगट, हिंगे, खोडकीड इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो.

भात / तांदूळ :-

महाराष्ट्रात तांदळाचे पीक अतिपावसाच्या प्रदेशात म्हणजेच कोकण व पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.  तांदूळ पिकाकरिता उष्ण व दमट हवामान अधिक लाभदायक असते. या पिकाच्या वाढीच्या कालावधीत तापमान 25°C ते 30°C असणे आवश्‍यक असते.

या पिकास शेतात पाणी साठत राहणे आवश्‍यक असल्याने 100 सेमी पेक्षा जास्त पर्जन्याची गरज असते.  तांदळाचे पीक खरिपाचे असून कोकणातील काही भागांत उन्हाळ्यात पाटाच्या पाण्याच्या साहाय्याने भात शेती केली जाते, त्यास वायंगण शेती असे म्हणतात. तांदळाच्या पिकाकरिता गाळाची मृदा अधिक योग्य मानली जाते.  परंतु महाराष्ट्रात गडाच्या मृदेबरोबरच जांभ्या मृदेत व तांबड्या मृदेतही भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

प्रमुख जाती :-

कर्जत – 184,  रत्नागिरी – 185-2, पवना, इंद्रायणी, कर्जत 35 – 3, रत्ना, रत्नागिरी 1,  रत्नागिरी 24, पनवेल, आंबेमोहोर, कोळंब, बासमती 370, फुले आरडीएम – 6, संकरित वाण : सह्याद्री 1ते 4

क्षेत्र व उत्पादन :-

महाराष्ट्रात तांदळाच्या पिकाखालील एकूण 15.03 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 48% क्षेत्र हे नागपूर विभागात आहे. महाराष्ट्रात तांदूळाचे एकूण उत्पादन 25.93 लाख मे. टन इतके झाले आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही अन्नधान्य पिकांमध्ये तांदळाचे उत्पादन सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रात तांदूळ या पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

भंडारा
गोंदिया
गडचिरोली

महाराष्ट्रात तांदूळ या पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

रायगड
भंडारा
गोंदिया

हेक्टरी उत्पादकता : – महाराष्ट्रात तांदूळ या पिकाचे हेक्टरी उत्पादन 1725 कि. ग्रॅ. इतके आहे.

तांदूळ पिकाची उत्पादकता अधिक असणारे जिल्हे पुढीलप्रमाणे

सिंधुदुर्ग
रायगड
रत्नागिरी

रोगांचा प्रादुर्भाव :  भात या पिकावर खोडकिडा लष्करी अळी, करपा, पर्ण, कुजवा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो

गहू

गहू या पिकाला थंड हवामानाचा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात गव्हाचे पीक हे रब्बी हंगामात घेतले जाते. महाराष्ट्रातील कोकण वगळता पठारी प्रदेशात सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात गव्हाचे पीक घेतले जाते. गव्हाच्या पिकाच्या वाढीच्या काळात या पिकास 15°C तापमान आवश्‍यक असते. पिकाच्या सुरवातीच्या काळात उबदार व आर्द्र हवेची स्थिती तर परिपक्वतेचा कापणीच्या काळात उष्ण आणि शुष्क हवेची स्थिती आवश्यक असते. या पिकाकरिता मोकळी व सपाट जमीन योग्य असून गाळाची चिकणमाती किंवा लुकण मृदा सर्वात योग्य असते.

प्रमुख जाती :-

कल्याण सोना, सोनालिका, एकेडीडब्ल्यू 2997, एनआयएडडब्ल्यू 1994 (फुले समाधान), एनआयडीडब्ल्यू

295 (गोदावरी),  एनआयडीडब्ल्यू 301 (त्रंबकेश्वर),  एचडीएम 1593, एमएमसीए 5439, एनआय 9947,  एचडीएम 1553, निफाड 34 (उशीरा पेरणी करिता)

क्षेत्र व उत्पादन :

महाराष्ट्रात  गव्हाच्या पिकाखाली एकूण 9.11 लाख हेक्‍टर जमीन आहे, तर महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन 9.81 लाख टन इतके आहे.

महाराष्ट्रात गहू पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

नागपूर
अमरावती
पुणे

महाराष्ट्रात गहू  पिकांचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

पुणे
नागपूर
नाशिक

हेक्टरी उत्पादकता :- महाराष्ट्रात गहू पिकाचे हेक्टरी उत्पादन 1225 किलो ग्रॅम इतके आहे.  गहू पिकाची उत्पादकता अधिक असणारे जिल्हे पुढील प्रमाणे

कोल्हापूर
पुणे
सांगली

रोगांचा प्रादुर्भाव :- गहू पिकावर तंबेरा व करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

कडधान्य

महाराष्ट्रात सर्वच प्रकारचे कडधान्य म्हणजेच हरभरा, तूर, उडीद, मटकी, मूग, चवळी ही पिके तिन्ही हंगामांत घेतली जातात.  कडधान्याची पिके प्रमुख पिकांमध्ये आंतरपीक म्हणूनही घेतली जातात. त्यामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते. जमिनीचा पोत सुधारतो व कसही वाढतो. ही पिके मध्यम ते भारी जमिनीत चांगली येतात.

क्षेत्र व उत्पादन :-

महाराष्ट्रात सर्वच कडधान्य पिकांखालील मिळून एकूण 35.44 लाख हेक्‍टर जमीन आहे, तर सर्व कडधान्यांचे एकूण उत्पादन 14.32 लाख टन इतके आहे.

महाराष्ट्रात कडधान्यांच्या पिकांचे सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

अमरावती
लातूर
यवतमाळ

महाराष्ट्रात कडधान्यांच्या पिकांचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

अमरावती
यवतमाळ
अकोला

महाराष्ट्रातील कडधान्यांचा पीकनिहाय व क्षेत्रानुसार उतरता क्रम

पीकक्षेत्रसर्वाधिक क्षेत्राचा जिल्हापिकांच्या प्रमुख जाती
हरभरा14.42 लाख हेक्टरअहमदनगरचाफा, विजय, विश्वास, विशाल, विराट दिग्विजय, विकास (जी 1)
तूर12.37 लाख हेक्टरयवतमाळटी विशाखा 1, बीडीएन 2, फुले तूर, राजेश्वरी, विपुला
मूग3.66 लाख हेक्टरजालनाजळगाव 781, एम 4, कोपरगाव, पुसा वैशाखी
उडीद2.86 लाख हेक्टरनांदेडटीयू 1, टीपीयू 4, शिंदखेडा 1-1, मेळघाट एकेयू 4

महाराष्ट्रातील कडधान्यांचा पीकनिहाय उत्पादनानुसार उतरता क्रम

पीकउत्पादनसर्वाधिक उत्पादनांचा जिल्हाहेक्टरी उत्पादनहेक्टरी उत्पादन अधिक असणारा जिल्हा
हरभरा7.77 लाख मे.टनअमरावती539जळगाव
तूर4.44 लाख मे.टनयवतमाळ359जळगाव
मूग0.69 लाख मे.टनअमरावती190नाशिक
उडीद0.61 लाख मे.टनजळगाव214सांगली

तेलबिया

महाराष्ट्रातील तेलबियांच्या पिकांमध्ये सूर्यफूल, भुईमूग, करडई, सोयाबीन, तीळ, जवस यासारख्या पिकांचा समावेश होतो.  ही सर्व गळीत धान्य पिके महाराष्ट्रात तिन्ही हंगामांमध्य घेतली जातात. गळीत धान्य पिकांमध्ये सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पिके आहे.

क्षेत्र व उत्पादन:

महाराष्ट्रात सर्व तेलबियांखाली मिळून एकूण 41.95 लाख हेक्टर जमीन आहे, तर सर्व तेलबियांचे एकूण उत्पादन 21.66 लाख टन इतके आहे, व उत्पादकता 516 इतकी आहे.

महाराष्ट्रात तेलबिया पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

अमरावती
लातूर
बुलढाणा

महाराष्ट्रात तेलबिया पिकांखाली सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

कोल्हापूर
वाशीम
सातारा

नगदी पिके

कापूस

 • कापूस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे.
 • राज्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 18% क्षेत्र (सर्वाधिक) कापूस या नगदी पिकाखाली आहे.
 • महाष्ट्रात कोकण व पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया हे जिल्हे वगळता सर्वच भागांत कापसाचे पीक घेतले जाते.
 • कापसाच्या पिकास 25°C ते 35°C तापमान सर्वाधिक योग्य असते, तर 50 ते 110 सें. मी. पर्यंत पर्जन्य मध्यम पर्जन्य आवश्यक असते.  

 • महाराष्ट्रात गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांच्या खोर्‍यात असणाऱ्या काळ्या कसदार रेगूर मृदेत हे पीक घेतले जाते.
 • कापसाच्या पिकामुळे मृदेचा कस कमी होण्याची शक्यता असते.

बीटी कॉटन (Bacillus Thuringiensis) :

हा जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांचा प्रकार आहे. बॅसिलस थुर्टीजिनेसिस या मातीत आढळणाऱ्या जिवाणू मधील डेल्टा इन्डोटॉक्सिन नावाचे बोंडअळी साठी विषारी द्रव्य तयार करणारे जनुक कापसाच्या प्रचलित वाणांमध्ये स्थलांतरित केलेल्या वाणास  बी. टी. वाण असे म्हणतात.

हे जिवाणू कीटकनाशकांसारख्या उपयोग होईल, असे स्फटिकरुपी प्रथिने तयार करतात.

हे प्रथिने बोंडअळीच्या पोटात गेल्यानंतर बोंडअळीच्या अन्ननलिकेला छिद्रे पडतात व बोंडअळी मरण पावते. यातील विषारी प्रथिने मानवाला व प्राण्यांना हानीकारक नसतात.

प्रमुख जाती :

देवराज, लक्ष्मी, कंबोडिया, एच – 4,  सावित्री, पीकेव्ही 2, एकनाथ, एनएच 44, एमएच 12, रोहिणी, वाय 1,  संकरित वाण : एच 10, फुले तरंग, फुले 388

क्षेत्र व उत्पादन

महाराष्ट्रात कापूस पिकाखालील 42.07 लाख  हेक्‍टर जमीन असून कापसाचे उत्पादन 39.14 लाख गाठी ( 1 गाठ = 100 कि ग्रॅम) इतके आहे.

महाराष्ट्रात कापूस पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

जळगाव
औरंगाबाद
यवतमाळ

महाराष्ट्रात कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

जळगाव
यवतमाळ
अमरावती

हेक्टरी उत्पादकता –

महाराष्ट्रात कापूस या पिकांचे हेक्टरी उत्पादन 158 किलो ग्रॅम इतके आहे.  कापूस पिकाची उत्पादकता अधिक असणारे जिल्हे पुढील प्रमाणे

अमरावती
गडचिरोली
वर्धा

रोगांचा प्रादुर्भाव :- बुरशीजन्य करपा, जिवाणूजन्य करपा, मर व फळकूज,  विषाणूजन्य रोग, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी

ऊस

 • महाराष्ट्राच्या पश्चिम पठारी प्रदेशातील प्रमुख नगदी पीक म्हणजे ऊस होय.
 • महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात भारतात दुसरा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • ऊस पिकाकरिता सामान्यपणे 20°C ते 30°C तापमानाची व सुपीक मृदेची आवश्यकता असते.
 • या पिकास गाळाची, चिकन व कसदार मृदा जास्त उपयुक्त असते.  ऊस पीक बारमाही असल्याने सिंचनाच्या सुविधा असणाऱ्या ठिकाणी हे पीक घेतले जाते.
 • गोदावरी,  भीमा, कृष्णा, पंचगंगा या काठालगत मोठे क्षेत्र या पिकाने व्यापलेले आहे.
 • ऊस लागवड वर्षभरात 3 वेळा करता येते.  ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पूर्वहंगामी उस, डिसेंबर ते फेब्रुवारी सुरू उसाची, तर जून-जुलैमध्ये आडसाली उसाची लागवड केली जाते.  राज्यातील साखरेचा सरासरी उतारा हा 11.5 इतका आहे.

प्रमुख जाती

को 740, कृष्णा (को एम 88121),  संपदा (को 7527), संजीवनी (को 7219), महालक्ष्मी (को 8014), को. 86032 (निरा),  शरद

क्षेत्र व उत्पादन

महाराष्ट्रात ऊस पिकाखालील एकूण 9.87 लाख हेक्टर क्षेत्र आहे तर एकूण उत्पादन 692.35 लाख टन इतके आहे.  त्यापैकी 32% क्षेत्र व उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात आहे.

महाराष्ट्रात ऊस पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारी जिल्हे उतरत्या क्रमाने

सोलापूर
कोल्हापूर
पुणे

महाराष्ट्रात ऊस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे उतरत्या क्रमाने

कोल्हापूर
पुणे
सोलापूर

हेक्‍टरी उत्पादकता

महाराष्ट्रात ऊस पिकाचे हेक्टरी उत्पादन 70 टन इतके आहे.  ऊस पिकाची उत्पादकता अधिक असणारे जिल्हे

पुणे
सातारा
सांगली

रोगांचा प्रादुर्भाव:- खोडकिड,  कांडी कीड, हुमणी, पाकोळी, पांढरी माशी.

तंबाखू

दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख नगदी रब्बीचे पीक असलेले तंबाखूचे पीक कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात घेतले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील 1300 हेक्टर जमीन या पिकाखाली असून 2800 टन उत्पादन तंबाखूचे झाले आहे. या पिकाचे हेक्टरी उत्पादन 1760 कि. ग्रॅ. प्रति हेक्टर इतके आहे.

फलोत्पादन :

महाराष्ट्रात कृषी हवामानाबाबत विविधता आहे. राज्यात कृषी हवामान विभागाचे 9 विभाग आहेत. कृषी हवामानाचा विचार करता महाराष्ट्रात विविध फळपिकांना भरपूर वाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विविध विभागांत फळ पिके घेतली जातात. फलोत्पादनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र खालील प्रमाणे विभागला जाऊ शकतो.

कोकणआंबा, काजू, नारळ, सुपारी
खानदेशकेळी
विदर्भसंत्री
मध्य व दक्षिण महाराष्ट्रडाळिंब व मोसंबी
पुणे, नाशिक, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूरद्राक्षे

महाराष्ट्रात असणाऱ्या कृषी खालील जमिनीपैकी 8% जमिनीवर फलोत्पादन घेतले जाते.  परंतु उत्पादनाचा विचार करता कृषी उत्पादनात फलोत्पादनाचा 25% हून अधिक वाटा आहे.

राज्यातील 2015 – 16 या वर्षातील विविध फळपिकांखालील क्षेत्र 9.09 लाख हेक्‍टर इतके होते.

प्रमुख फळ पीकलागवडी खालील क्षेत्रप्रमुख जाती
आंबा1.62 लाख हेक्टरकेशर, हापूस, नीलम, पायरी, तोतापुरी, लंगडा, दशेरी, आम्रपाली, सिंधु, रत्ना
डाळिंब1.21 लाख हेक्टरमृदुला, फुले-आरक्ता, भगवा, गणेश
संत्री1.07 लाख हेक्टरनागपुरी संत्रा
द्राक्ष0.90 लाख हेक्टरथॉमसन सीडलेस, अनाबेशाही, तास ए गणेश, सोनाटा
केळी0.70 लाख हेक्टरवसई, हरिसाल, लाल वेलची, सफेद वेलची, ग्रँड नैन
मोसंबी0.54 लाख हेक्टरन्यूसेलर
चिकू0.18 लाख हेक्टरक्रिकेट बॉल

फलोत्पादनात प्रसिद्ध ठिकाणे

केळीवसई
आंबेरत्नागिरी
मोसंबीश्रीरामपूर
काजूमालवण / वेंगुर्ला
संत्रीनागपूर
चिकूघोलवड / डहाणू / ठाणे
सीताफळदौलताबाद
द्राक्षेनाशिक
कलिंगडअलिबाग
बोरमेहरूण

पशुसंवर्धन

महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्ये आहे. कृषिप्रधान व्यवस्थेत व ग्रामीण अर्थ व्यवसायात पशुधनाचा महत्त्वपूर्ण वाटा असतो.  पशुसंवर्धन हा बारमाही व्यवसाय असल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासाकरीता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

पशुधन हे शेती उत्पन्नास पूरक आहे. त्याद्वारे रोजगाराच्या संधी, उत्पन्नाच्या संधी निर्माण होतात.

पशुधन गणना :

महाराष्ट्रात पशुधन गणना दर पाच वर्षांनी केली जाते.  सन 2012 मध्ये महाराष्ट्रात 19वी पशुधन गणना करण्यात आली.  राज्यात दर लाख लोकसंख्येमागे एकूण 29 हजार इतके होते.

मागील पशुधन गणनेच्या तुलनेत यावेळेस पशुधन 8 हजार म्हणजे 9.7% ने घट झाली आहे.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला

राष्ट्रीय गुरे व म्हैस  पैदास प्रकल्प या केंद्रशासनाच्या योजनेअंतर्गत (100% केंद्र पुरस्कृत) राज्यात अकोला येथे या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  राज्याच्या मागासलेल्या भागांमध्ये संकरित पैदाशीच्या व्याप्ती वाढवून दुग्धोत्पादन व रोजगार वाढविणे या मंडळाचा उद्देश आहे.

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र

राज्यात सध्या स्थितीत 33 जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र आहे

दुग्ध विकास

दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे.  राज्यातील उपलब्ध पशुधनात 58.49 लाख दुभत्या गाई व म्हशी आहेत. त्यांच्यापासून 2014 – 15 या वर्षात राज्यात 95 लाख टन इतके दुग्धोत्पादन झाले.  दुग्धोत्पादनात राज्याचा देशात सातवा क्रमांक लागतो. 2015 – 16 या आर्थिक वर्षात राज्याचे दुग्धोत्पादन वाढून 101 लाख टन इतके झाले आहे.

प्रमुख पशुधन व त्यांच्या देशी प्रजाती

गाईखिल्लार लाल, कंधारी, गवळाऊ, डांगी, देवणी
म्हशीपंढरपुरी, नागपुरी
मेंढ्यामाडण्याळ व डेक्कनी
शेळ्याउस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी, कोकण कन्याल

मत्स्यव्यवसाय

महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे.  त्याचबरोबर सागरी मासेमारी करिता 1. 12 लाख चौरस किमी चे योग्य असे क्षेत्र आहे.  महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावर मासळी उतरवण्याकरिता 173 केंद्रे आहेत. महाराष्ट्रात समुद्राच्या पाण्याबरोबरच गोड्या पाण्यातील मासेमारी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते.

महाराष्ट्रातील मासेमारीकरिता उपलब्ध क्षेत्र

सागरी मासेमारी1.12 लाख चौरस कि. मी.
गोडया पाण्यातील3.17 लाख हेक्टर
नीम खाऱ्या / खाडी पाण्यातील मासेमारी0.10 लाख हेक्टर

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.