Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |1 May 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१ मे चालू घडामोडी
“मन की बातदरम्यान अनेकदा भावूक झालो, त्यामुळे रेकॉर्डिंग…”, १०० व्या एपिसोडमध्ये नरेंद्र मोदींनी सांगितले किस्से
- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी हा नियम पाळला आहे. याच ‘मन की बात’चा आज १०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. रेडिओच्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या या संवादाचा १०० वा कार्यक्रम दणक्यात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुंबई भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. शहर व उपनगरात पाच हजाराहून अधिक ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी अकरा वाजता करण्यात आले. मन की बात हा कार्यक्रम ऐकण्याासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. विले पार्ले येथे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
- दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले, तुम्ही पाठवलेली पत्रं वाचून मी भावूक झालो. माझ्यासाठी हा कार्यक्रम आता एक पर्व बनलं आहे. या कार्यक्रमाने मला तुमच्यासोबत जोडून ठेवलं आहे. या कार्यक्रमामुळे मी तुमचे विचार समजू शकलो. मन की बात आता माझ्यासाठी कार्यक्रम नसून पूजा आहे.
- पंतप्रधान मोदी म्हणाले, “या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगदरम्यान मी खूप वेळा इतका भावूक झालो की त्या कार्यक्रमाचं पुन्हा रेकॉर्डिंग करावं लागलं. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फी विथ डॉटर या मोहीमेचा यावेळी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, ही मोहीम भारतासह परदेशातही खूप नावाजली गेली. हा सेल्फीचा मुद्दा नव्हता तर मुलींशी संबंधित होता. यात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले. मन की बात हा कार्यक्रम म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या मनातली गोष्ट आहे. त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.
- नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण ३ ऑक्टोबर २०१४ रोजी हा ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटातील लोक ‘मन की बात’मध्ये सहभागी झाले. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनले. मी एकदा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ‘मन की बात’बद्दल काही गोष्टी शेअर केल्या, तेव्हा या कार्यक्रमाची जगभरात त्याची चर्चा झाली.
यशस्वी जैस्वालने ऐतिहासिक सामन्यात रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
- आयपीएल २०२३ मधील ४२ सामना मुंबई आणि राजस्थान संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ६ गडी राखून राजस्थानचा पराभव केला. आयपीएलच्या या १००० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालने पहिले शतक झळकावण्याची ऐतिहासिक संधी निवडली आणि इतिहास रचला. यशस्वी जैस्वाल आयपीएलमधील सर्वात मोठी खेळी करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध धडाकेबाज खेळी करताना १२४ धावा केल्या, जी लीगमधील अनकॅप्ड खेळाडूने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
- डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सच्या जबरदस्त वेगवान आक्रमणासमोर केवळ ६२ चेंडूत १२४ धावा केल्या, ज्यात १६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट २०० चा होता. परंतु, यशस्वी जैस्वालचे शतक व्यर्थ गेले, कारण राजस्थान रॉयल्सने २१२ धावा करुनही त्यांना पराभूत व्हावे लागले. परंतु चांगली गोष्ट म्हणजे यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, जो त्याच्यासाठी एक संस्मरणीय क्षण ठरला.
सर्वात मोठी खेळी खेळणारा यशस्वी जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज –
- वास्तविक, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा यशस्वी जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज आणि सर्वात मोठी इनिंग खेळणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. जैस्वालच्या आधी २००८ च्या हंगामात, ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने पंजाबसाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११५ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध आरसीबीसाठी नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे यशस्वी जैस्वालने या सर्वांना मागे टाकले आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे –
- या शतकामुळे जैस्वाल आयपीएल २०२३ च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे गेला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात ४२८ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने ३ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्याने आरसीबीचा सलामीवीर फाफ डुप्लेसिसला मागे टाकले आहे, ज्याने आपल्या संघासाठी ८ डावात ४२२ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत ४१४ धावा केल्या आहेत. या तिन्ही फलंदाजांनी आयपीएलच्या १६ व्या मोसमात आतापर्यंत ४०० चा टप्पा पार केला आहे. ऋतुराज गायकवाडने ३५४ आणि विराट कोहली आणि शुभमन गिलने ३३३-३३३ धावा केल्या आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी वाचणार बिबलीकल बुकचा काही अंश, ‘हे’ आहे कारण
- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देशाच्या परंपरेप्रमाणे एक प्रथा पाळणार आहेत. महाराज किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ऋषी सुनक हे बिबलीकल बुक ऑफ कोलोसियनचा काही अंश वाचणार आहेत. आर्चबिशप ऑफ कँटरबरी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान आहेत आणि ते हिंदू धर्म मानतात. असं असूनही ते ख्रिश्चन धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या या पुस्तकाचा काही अंश वाचणार आहेत. त्यामुळे विविध धर्मांबाबत असणारा त्यांचा आदर प्रतिबिंबित होणार आहे.
बिबलीकल बुक ऑफ कोलोसियनचा अंश का वाचणार आहेत सुनक?
- ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले असे पंतप्रधान आहेत जे हिंदू धर्म मानतात. बिबलीकल बुक ऑफ कोलोसियनचा काही अंश वाचण्याचं त्यांचं मुख्य कारण आहे की ते याद्वारे ख्रिश्चन धर्माचा सगळ्या धर्मांवर असलेला विश्वास पुढे नेण्याचं काम करणार आहेत. लँबेथ पॅलेस कँटरबरीच्या आर्कबिशप ऑफिसचे रेवरेंड जस्टिन वेल्बी यांनी हे सांगितलं की इतर धर्मावर श्रद्धा असलेली व्यक्ती पहिल्यांदा हे पुस्तक वाचत आहेत.
- पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हे वाचन केल्यानंतर किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला हे पवित्र मानलं जाणारं भोजन करतील. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी युनायटेड किंग्डम सह इतर अनेक देशांमधले काही निवडक पाहुणे येणार आहेत.
- किंग चार्ल्स थ्री यांच्या राज्याभिषेकाची थीम Called To Serve अशी आहे. देशात चालत आलेली परंपरा आणि याआधी सत्तेत असणारे सत्ताधीश यांच्या स्मरणार्थ एक विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात हिंदू, शीख, इस्लाम या धर्मांमधल्या ही काही निवडक आणि महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या जाणार आहेत.
कामगिरी उंचावण्याचे भारतीय बॉक्सिंगपटूंचे उद्दिष्ट; पुरुषांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा आजपासून
- पुरुष विभागाच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होत असून, भारतीय बॉक्सिंगपटू या स्पर्धेत आपली कामगिरी उंचावण्याच्या इराद्याने उतरतील. स्पर्धेच्या अखेरच्या पर्वात भारताला केवळ एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. स्पर्धेत एकूण सात गतविजेते सहभागी झाले आहेत.
- महिला स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेलाही ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा नाही. यानंतरही आशियातील बॉक्सिंगपटू आशियाई क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे बघतील. ऑलिम्पिकसाठी पुरुष गटातही वजन गट बदलण्यात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत १३ ऐवजी सातच वजनी गटांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ५१, ५७, ६३.५, ७१, ८०, ९२ आणि ९२ किलोपेक्षा अधिक अशा वजनी गटांचा समावेश आहे.
- भारताची मदार प्रामुख्याने सहा आशियाई पदकविजेता राहिलेल्या शिवा थापा याच्यावर असेल. शिवा ६३.५ किलो वजन गटातून खेळणार आहे. याशिवाय २०१९ स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा अमित पंघाल आणि गतवर्षीचा कांस्यदक विजेता आकाश कुमार यांच्याही कामगिरीकडे नजरा असतील. शिवाने सहा आशियाई पदके मिळवली असून, २०१५ मध्ये जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकही त्याच्या नावावर आहे. आता या वेळी पदकाचा रंग बदलण्यासाठी शिवा अधिक उत्सुक असेल.
- याखेरीज हुसामुद्दिन (५७ किलो) आणि आशीष चौधरी (८० किलो) यांच्याही कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल. हुसामुद्दिन राष्ट्रकुल पदक विजेता आहे, तर आशीष आशियाई स्पर्धेतील माजी पदक विजेता आहे. त्याच्याकडे टोक्यो ऑलिम्पिकचाही अनुभव आहे. ही आशीषची दुसरी जागतिक स्पर्धा आहे. सचिन सिवस (५४ किलो) आणि हर्ष चौधरी (८६ किलो) हे युवा खेळाडूही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज असतील. विरदर सिंग (६० किलो), आकाश सांगवान (६७ किलो), निशांत देव (७१ किलो), सुमित कुंडू (७५ किलो) हे अन्य खेळाडूही भारतीय संघात आहेत.
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : डिंग लिरेनला जगज्जेतेपद; ‘टायब्रेकर’मध्ये विजयी; नेपोम्नियाशी सलग दुसऱ्यांदा उपविजेता
- ग्रँडमास्टर डिंग लिरेनने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला जगज्जेता बुद्धिबळपटू म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या ‘टायब्रेकर’मधील चौथ्या व अखेरच्या डावात रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीवर मात केली. त्यामुळे नेपोम्नियाशीला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर लिरेन १७वा जगज्जेता ठरला.
- लिरेनच्या विजयामुळे बुद्धिबळविश्वाला २०१३ नंतर प्रथमच नवा जगज्जेता मिळाला आहे. विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मॅग्नस कार्लसनने यंदाच्या जागतिक लढतीतून माघार घेतली होती. त्यामुळे लिरेन व नेपोम्नियाशी यांना जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.
- लिरेन आणि नेपोम्नियाशी यांच्यात १४ डावांअंती ७-७ अशी बरोबरी होती. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद लढतीचा विजेता ठरवण्यासाठी ‘टायब्रेकर’चा अवलंब करण्यात आला. रविवारी झालेल्या जलद (रॅपिड) ‘टायब्रेकर’मधील पहिले तीन डाव बरोबरीत सुटले. मात्र, चौथ्या डावात लिरेनला सर्वोत्तम खेळ करण्यात यश आले.
- चौथ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या नेपोम्नियाशीने ‘रुइ लोपेझ’ पद्धतीने सुरुवात केली. लिरेनने ११व्या चालीत आपला मोहरा ‘ए४’वर नेला आणि अदलाबदलीला सुरुवात केली. पटावरील स्थिती पाहता हा डावही बरोबरीत सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, लिरेनने ९० सेकंदांपेक्षाही कमी वेळ शिल्लक असतानाही आक्रमक चाली रचल्या आणि नेपोम्नियाशीवर दडपण आणले. अखेर नेपोम्नियाशीचा खेळ खालावला व लिरेनने जेतेपद मिळवले.
- मी जिंकलो, तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. मला अश्रू अनावर होतील हे ठाऊक होते आणि तसेच झाले. मी जगज्जेतेपद मिळवेन असा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. जगज्जेतेपद माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाही. विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जाणे हे माझे ध्येय होते आणि ते गाठण्याच्या मी जवळ आहे.
महाराष्ट्राबद्दल ‘या’ २० खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
१) महाराष्ट्र हे आकारमानानुसार देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे कुवेत, कतार, ओमन, आर्यलँड, भूतान देशांपेक्षाही आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौकिमी आहे.
२) लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२
३) महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
४) महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६ कोटी २४ लाख ८१ हजारहून अधिक आहे.
५) महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.
६) महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे.
७) महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
८) महाराष्ट्रात १७ थंड हवेची ठिकाणे आहेत.
९) महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे
१०) महाराष्ट्राचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे भाग पडतात.
११) सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची ओळख असून या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात.
१२) एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.
१३) भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई आहे.
१४) भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे.
१५) मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.
१६) गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.
१७) महाराष्ट्रातील शनीशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. याच कारणामुळे हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहे.
१८) महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.
१९) मुंबईमधील लोकल ट्रेनमधून रोज जवळजवळ ६० लाख प्रवासी प्रवास करतात. हा आकडा इस्त्राइलच्या लोकसंख्येहून अधिक आहे.
२०) महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधून आल्याचे मानले जाते. संस्कृतमधील ‘महा’ म्हणजेच महान आणि ‘राष्ट्र’ म्हणजे देश हे दोन शब्दांना एकत्रित करुन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ३० एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २९ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २८ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २७ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २६ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |