१० जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१० जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 10 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१० जानेवारी चालू घडामोडी

आरोग्य वार्ता : बागकामामुळे कर्करोगाचा धोका कमी, मानसिक आरोग्यात सुधारणा: 

  • एखाद्या छंदात स्वत:ला गुंतवून घेतले आणि त्याचा आनंद घेत राहिला की मानसिक आरोग्य सुधारते. बागकाम हा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो, असे एका संशोधनात दिसून आले.
  • अमेरिकन कर्करोग सोसायटी आणि ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. सामुदायिक बागकाम केल्याने अधिक फायबर खाल्ले जाते आणि शारीरिक हालचाली अधिक होतात, असे या संशोधकांनी केलेल्या चाचणीतून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे कर्करोग आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो आणि मानसिक आरोग्यही सुधारते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. बागकामामुळे तणाव आणि चिंतेची पातळीही लक्षणीयरीत्या कमी होते, असे या संशोधकांनी सांगितले. ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
  •  ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’चे संशोधक लिट म्हणाले, ‘‘बागकाम करणाऱ्या अनेकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की बागकामामध्ये असे काही तरी आहे की ज्याने बरे वाटते. बागकामामुळे मानसिक आनंद मिळतो. काही लहान निरीक्षणांमध्ये असे आढळून आले की, जे लोक बाग करतात ते अधिक फळे आणि भाज्या खातात आणि आरोग्यदृष्टय़ा ते मजबूत असतात.

उत्तर भारत गारठला! दृश्यमानता अतिशय कमी, अपघातात ४ ठार

  • उत्तर आणि ईशान्य भारत सोमवारी थंडीच्या लाटेने गारठला. धुक्याच्या दाट आवरणामुळे या भागातील दृश्यमानता कमी झाली. यातूनच उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात चार जण ठार झाले.
  • दिल्लीत सलग पाचव्या दिवशी थंडीची लाट कायम होती आणि धुक्यामुळे दृश्यमानता केवळ २५ मीटपर्यंत कमी झाली. राजधानीतील थंडीच्या लाटेची तीव्रता इतकी आहे, की सलग पाचव्या दिवशी हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील बहुतांश भागांपेक्षा या शहरात किमान तापमान कमी नोंदले गेले.
  • खराब हवामानामुळे एकूण २६७ रेल्वे गाडय़ा उशिराने धावत होत्या. पाच विमानांचे मार्ग बदलण्यात आले आणि ३० विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, असे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असल्याने सोमवारी सकाळी एक बस समोरच्या मालमोटारीवर धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. ही बस गुजरातमधील राजकोट येथून नेपाळला जात होती. धुक्याची चादर पंजाब व लगतच्या वायव्य राजस्थानपासून हरयाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशमार्गे बिहापर्यंत पसरली असल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसून आले.

काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते कवी रेहमान राही यांचे निधन

  • काश्मीरचे प्रसिद्ध कवी व काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे सोमवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. येथील नौशेरा भागातील आपल्या राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाले.
  • ६ मे १९२५ रोजी जन्मलेल्या प्रा. राही यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. इतर भाषांतील काही नामांकित कवींच्या कवितांनाही त्यांनी काश्मिरी भाषेत अनुवादित केले. २००७ मध्ये त्यांना ‘सियाह रूद ज़रीन मंज़’ (इन ब्लॅक ड्रिझल) या काव्यसंग्रहासाठी देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान- ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
  • प्रा. राही यांना १९६१ मध्ये त्यांच्या ‘नवरोज़-ए-सबा’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी बाबा फरीद यांच्या रचनांचा काश्मिरी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांच्या प्रारंभीच्या रचनांवर दीनानाथ नदीम यांचा प्रभाव होता. त्यांना राज्यातील विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी  ‘ट्वीट’संदेशात नमूद केले, की काश्मिरी भाषेतील विद्यमान सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे निधन झाल्याबद्दल खूप दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला.

प्रवासी भारतीय हे देशाचे दूतच : मोदी

  • ‘‘परदेशस्थ प्रवासी भारतीय हे भारताचे विदेशातील ‘सदिच्छा दूत’ (ब्रँड अ‍ॅम्बेसेडर) आहेत,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले.
  • मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये १७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले, की  प्रवासी भारतीयांची भूमिका वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही योग, आयुर्वेद, कुटीरोद्योग, हस्तकला आणि तृणधान्यांचे ‘सदिच्छा दूत’ आहात. परदेशातील भारतीयांची नवी पिढीही आपल्या पालकांच्या मूळ देशाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
  •  परदेशस्थ भारतीयांनी संबंधित देशांत दिलेल्या योगदानाचे विद्यार्थी-अभ्यासकांसाठी दस्तऐवजीकरण करावे, असे  आवाहन  त्यांनी विद्यापीठांना केले.
  • प्रमुख पाहुणे गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी सांगितले, की जागतिकीकरण महासाथीत अपयशी झाले असे वाटत असतानाच मोदींनी ते अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. विविध देशांना करोना  लस आणि औषधे प्रदान करण्यासाठी भारताने भरीव मदत दिली.
  • ‘भारत जागतिक स्तरावर विश्वासार्ह साथीदार’ – या संमेलनाचे विशेष पाहुणे सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी म्हणाले, की, प्रादेशिक व जागतिक स्तरावर विश्वासार्ह साथीदार असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. सूरीनामने हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी संस्था स्थापन केली आहे.  विविध क्षेत्रात भारताशी भागीदारी वाढवण्याची सुरीनामची इच्छा आहे.

स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १४३ अब्ज डॉलर्सचा तोटा; ११५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का

  • स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १३२ स्विस फ्रँक म्हणजेच १४३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक तोटा झाला आहे. सोमवारी ही बाब सांगण्यात आली. या बँकेच्या ११५ वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा तोटा आहे. शेअर आणि बॉण्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात घट झाल्याने हा तोटा झाला आहे. या घटनेमुळे बाजारात तेजीत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला.
  • स्विस नॅशनल बँक या प्रकरणात ६ मार्चला तपशीलवार आकडेवारी जाहीर करणार आहे. स्विस फ्रँक कमकुवत झाला याची विविविध कारणं आहेत. स्विस बँकेने ८०० अब्ज किंमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स यामध्येच १३१ अब्ज फ्रँकचं नुकसान झालं. जागतिक शेअर बाजारात मंदी आली. त्यामुळे रोखीच्या किंमती गेल्या वर्षी घसरल्या. यामुळे स्विस नॅशनल बँकेसह सगळ्यात बँकांनी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले. मात्र हे देखील तोट्याच्या दिशेने घेऊन जाणारं कारण ठरलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
  • या सगळ्या घटनेत एकच सकारात्मक बाब ही ठरली की स्विस नॅशनल बँकेचं सोनं २०२१ च्या शेवटी १०४० टन इतकं होतं आणि २०२२ मध्ये बँकेचे ४०० दशलक्ष फ्रँक वाढले. २०२२ मध्ये जो तोटा बँकेला झाला आहे त्यामुळे आता ही बँक केंद्र आणि राज्य सरकारांना नेहमीचं पे आऊट करणार नाही. गेल्यावर्षी स्विस नॅशनल बँकेने ६ अब्ज फ्रँक दिले होते.
  • इतकं प्रचंड नुकसान झालं असलं तरीही त्याचा बँकेच्या धोरणांवर काहीही परिणाम होणार नाही. २०२२ मध्ये चेअरमन थॉम जॉर्डन यांनी स्विस चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरांमध्ये तीनदा वाढ केली होती असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.

तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल तिकीट; जाणून घ्या किंमत

  • जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हे तिकीट बूक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या दर्शनाच्या एका तिकिटाची किंमत ३०० रुपये असणार आहे.
  • तिरुमला तिरुपती देवस्थान भारतातील प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे भगवान वेंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दूरचा प्रवास करून येतात. अशावेळी दर्शनासाठी आधीच बूकिंग उपलब्ध असेल, तर त्यांच्यासाठी अधिक सोयीचे होते. यासाठी ही स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
  • दरम्यान तिरूमला येथे वैकुंठद्वाराचे दर्शन सूरु आहे. २ ते ११ जानेवारी असा १० दिवसांचा वैकुंठ एकादशीचा कालावधी आहे. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दररोज ५०,००० हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठीचे बुकिंग ऑनलाईन सुरू करण्यात आल्याने, त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी माहिती देण्यात आली आहे.

मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार:

  • सहा वेळा विश्वविजेती महिला बॉक्सर मेरी कोमने दुखापतीमुळे यंदाच्या बॉक्सिंग महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
  • जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण आठ पदके जिंकणाऱ्या 40 वर्षीय मेरीने दुखापतीच्या स्वरूपाबाबत स्पष्टीकरण दिले नाही.
  • आईबीए (IBA) वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा यावर्षी 1 ते 15 मे दरम्यान ताश्कंद, उझबेकिस्तान येथे होणार आहे.
  • गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवड चाचणीतून माघार घ्यावी लागल्याने मेरी कोमला गेल्या वर्षी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
  • पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
  • आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी एकमेव बॉक्सर (पुरुष किंवा महिला) आहे.
  • दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे 2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर आणि 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली.
मेरी कोम

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.