Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |12 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१२ सप्टेंबर चालू घडामोडी
आठ गडी बाद होताच पाकिस्तानची शरणागती, भारताचा सर्वात मोठा विजय, १५ वर्ष जुना विक्रम मोडला
- आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये भारताने पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला आहे. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (१० सप्टेंबर) हा सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे केवळ २४ षटकांचाच खेळ होऊ शकला. श्रीलंकेतील सध्याचं वातावरण पाहता आयोजकांनी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. त्यानुसार आज हा सामना २४ षटकांपासून पुढे खेळवण्यात आला. रविवारी खेळ थांबला तेव्हा भारताने २४.१ षटकात २ बाद १४७ धावा जमवल्या होत्या. इथून पुढे खेळताना भारतीय संघाने आज निर्धारित ५० षटकात ३५६ धावांचा डोंगर उभा केला.
- भारताच्या ३५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला ३२ षटकांत आठ गड्यांच्या बदल्यात केवळ १२८ धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. त्यामुळे ८ गडी बाद होताच पाकिस्तानचा डाव संपला. अशा प्रकारे भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल २२८ धावांनी बलाढ्य विजय मिळवला.
- या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. कुलदीप यादवने पाच बळी घेत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला. कुलदीपने ८ षटकात ५ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. पाकिस्तानचे दोन फलंदाज दुखापतीमुळे मैदानात उतरलेच नाहीत.
- तत्पूर्वी भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. रविवारी कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. दोघांनी १२१ धावांची सलामी दिली. रोहित ५६ आणि गिल ५८ धावा करून ८ चेंडूंच्या फरकाने बाद झाले. त्यावेळी भारतीय संघ अडचणीत आला आहे असं वाटतं होतं. परंतु, विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनी भारताचा डाव सावरला.
- विराट आणि राहुल या दोघांनी वैयक्तिक शतकं झळकावत तब्बल २३३ धावांची नाबाद भागिदारी केली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३५० धावांचा टप्पा पार केला. लोकेश राहुलने १०६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १११ धावा फटकावल्या. तर विराट कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२२ धावा फटकावल्या.
सीबीएसई दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरुपात बदल, आता विद्यार्थ्यांचे आकलन ठरणार महत्वाचे
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यात संकल्पना-सक्षमतेवर आधारित प्रश्न, बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपत्रिकांचे प्रारुप जाहीर करण्यात आले आहे.
- सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने आता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती सीबीएसईने दिली. आगामी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकतेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. आता प्रश्नपत्रिकेत अधिक विश्लेषणात्मक, संकल्पनात्मक स्पष्टता विशद करणारे, तसेच विद्यार्थ्यांचे आकलन तपासणाऱ्या बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील. त्यात ५० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित म्हणजे विश्लेषणात्मक प्रकारचे असतील. तर ४५ टक्के बहुपर्यायी प्रश्न एक दोन गुणांसाठीचे असतील. बदललेल्या स्वरुपाची विद्यार्थी, शिक्षक, पालकांना माहिती होण्यासाठी विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे प्रारुप https://cbseacademic.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- प्रश्नपत्रिकांच्या बदललेल्या स्वरुपाविषयी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, की पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे पाठांतर किंवा स्मरणशक्ती महत्त्वाची होती. मात्र नव्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे आकलन किंवा विद्यार्थ्यांना संकल्पना कळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक समजून घेऊन अभ्यास करावा लागेल.
वन शहीद दिन आणि जोधपूर किल्ल्याचा काय संबंध माहितीये? ११ सप्टेंबर १७३० ला जे घडले ते इतिहासात…
- देशात दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन पाळला जातो. भारतातील वन्यजीव, जंगले आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी प्राण गमावलेल्या कामगारांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी देशभरातील वनक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाला महत्त्व दिले जाते.
- ११ सप्टेंबर १७३० साली भारतात ‘खेजर्ली हत्याकांड’ ही एक ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी जोधपूर किल्ला बांधताना चुनखडी आणि लाकडाची गरज होती, म्हणून दिवाण गिरधरदास भंडारी यांनी त्यांच्या सैनिकांना जंगलातून लाकूड आणण्याचा आदेश दिला. सैनिक झाडे तोडण्यासाठी पुढे सरसावले, पण अमृता देवी बिश्नोई नावाच्या महिलेच्या नेतृत्वाखाली काही गावकरी त्यांच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहिले. खेजरीची झाडे आपल्यासाठी पवित्र आहेत आणि ती तोडू देणार नाहीत असे अमृताने सांगितले. यानंतर सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी गावातील लोकांना ठार केले. यात अमृताच्या मुलासह ३५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.
- जेव्हा राजाला ही घटना कळली तेव्हा त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना परत बोलावले आणि त्यांच्यासह विष्णोई समाजाच्या लोकांची माफी मागितली. यानंतर राजा महाराजा अभय सिंह यांनी बिश्नोई समाजाच्या गावांच्या आसपासच्या भागात झाडे तोडली जाणार नाहीत आणि प्राण्यांची हत्या केली जाणार नाही, अशी घोषणा केली.
शिक्षक भरतीबाबत उदासीन प्रतिसाद, कारण काय?
- बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया एक सप्टेंबरपासून सुरू झाली असून, गत दहा दिवसांत केवळ एक लाख पात्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार पात्र असल्याची माहिती आहे.
- १५ सप्टेंबरपर्यंतच नोंदणी मुदत आहे. राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केल्या जाणार आहे. मात्र प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. अद्याप दीड लाखावर उमेदवार नोंदणी बाहेर आहेत. पण त्यापैकी ५० ते ६० हजारच नोंदणी करू शकतात. कारण अनेकांना खूप कमी गुण आहेत. ते इकडे फिरकणार नाहीत.
- पात्रता परीक्षेत जवळपास नऊ हजारांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. ही पदे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय तर खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अश्या दोन्ही प्रकारे भरल्या जाणार आहेत. आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत.
कोण होईल सर्वात आळशी नागरिक? गेल्या २० दिवसांपासून लोळत पडले आहेत स्पर्धक, ‘या’ देशात सुरू आहे विचित्र स्पर्धा
- जगात आळशी लोकांची काही कमरतरता नाही. आळशी लोकांना कसलेही काम करायचे नसते, कसलीच मेहनत करायाला त्यांना आवडतं नाही. पण जर तुम्हीही असेच असाल तर तुम्ही कितीही आळशी असाल तरी त्याने काही फरक पडत नाही. कारण या जगात तुमच्यापेक्षा आळशी लोक आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका देशात एक विचित्र स्पर्धा सुरू आहे. सर्वात आळशी नागरिक ही पदवी मिळवण्यासाठी काही स्पर्धक स्पर्धेत उतरले आहेत आणि गेल्या २० दिवसांपासून लोळत पडले आहेत.
सर्वात आळशी व्यक्तीला मिळणार एवढे बक्षीस
- उत्तर मॉन्टेनेग्रोमधील ब्रेज्ना या गावात ही विचित्र वार्षिक स्पर्धा आयोजित केली जाते. ‘आळशी नागरिक’ ही प्रतिष्ठित पदवी मिळविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. विशेष म्हणजे येथे लोक १०७० डॉलरच्या(१,००० युरो, ८८,७९५.१४ रुपये) भव्य बक्षीसासाठी स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि सलग २० दिवस चटईवर पडून आहेत आणि दिवस मोजत आहेत. गेल्या वर्षीचा ११७ तासांचा विक्रम मोडल्यानंतरही या लोकांनी पुढे जाण्याचा निर्धार Iघेतला आहे.
असे आहेत स्पर्धेचे नियम
- २३ वर्षीय स्पर्धक फिलिप क्नेझेविकयांनी रॉयटर्सला सांगितले की, तो विजयी होईल असा त्याला विश्वास आहे. येथे आळशी क्रमांक १ ला बक्षीस दिले जाईल. तो म्हणाला, “आमच्याकडे जे काही आवश्यक आहे ते येथे उपलब्ध आहे, येथील लोकांचा सहवास विलक्षण आहे, वेळ पटकन जातो.” नुसते उठणे, बसणे, उभे राहणे हे नियमांचे उल्लंघन आहे, पण त्यांना दर आठ तासांनी १० मिनिटांचा बाथरूम ब्रेक मिळतो.
खाणे, पिणे, वाचणे सर्वकाही लोळत करतात स्पर्धक
- स्पर्धकांना खाण्याची, पिण्याची, वाचण्याची आणि मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरण्याची देखील परवानगी आहे – परंतु हे सर्व त्यांनी लोळतच केले पाहिजे. ‘आळशी नागरिक’ स्पर्धेच्या १२व्या आवृत्तीत स्पर्धक सहभाग होत आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी होते स्पर्धा
- स्पर्धेचे आयोजक आणि मालक राडोन्जा ब्लागोजेविक यांनी सांगितले की, ”मॉन्टेनेग्रिन्स (नागरिक) आळशी आहेत या गैरसमजाची खिल्ली उडवण्यासाठी ही स्पर्धा १२ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. स्पर्धेची सुरुवात २१ लोकांपासून सुरू झाली होती पण आता ७ लोक बाकी आहेत आणि ब्लागोजेविक म्हणाले की, ”उर्वरित सात लोक ४६३ तासांपासून लोळत पडून आहेत.
२०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शुल्क परत मिळणार; जाणून घ्या तपशील…
- जिल्हा परिषद भरती २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना पुणे जिल्हा परिषदेकडून शुल्क परत करण्यात येणार आहे. त्यासाठीची माहिती उमेदवारांनी भरण्यासाठी जिल्हा परिषदेने संकेतस्थळ खुले केले आहे.
- जिल्हा परिषद भरती २०१९ रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परताव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य शासनाकडून जिल्हा परिषदांना शुल्काची रक्कम देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेकडून उमेदवारांच्या शुल्क परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा शुल्क परताव्यासाठीची आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रक्रिया करून उमेदवारांना परीक्षा शुल्क परतावा केला जाजाणार आहे. परीक्षा शुल्क परताव्यासंदर्भात उमेदवारांसोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कोलंबो येथील भारत-पाक सामन्यातील पावसाने करून दिली २००२ ची आठवण, जाणून घ्या काय झाले होते?
- कोलंबोमध्ये पावसामुळे आशिया कप २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. रविवारी १० सप्टेंबर २०२३ रोजी हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता जिथे सामना थांबला होता तिथून पुढे सोमवारी सुरू होईल. राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. कोलंबोतील पावसाने २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून दिली आहे, जेव्हा राखीव दिवस असूनही सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि भारत आणि श्रीलंकेला ट्रॉफी शेअर करावी लागली. सौरव गांगुली आणि रसेल अरनॉल्ड यांच्यातील लढतीसाठीही हा सामना लक्षात राहतो.
- चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर, भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने आले. अंतिम सामना रोमांचक होईल, असे मानले जात होते, मात्र पावसाने कोलंबोमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात व्यत्यय आणला. फायनलमध्ये ११०.४ षटके असतानाही भारत आणि श्रीलंकेला जेतेपदावर समाधान मानावे लागले.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सर्वोत्तम कामगिरी –
- सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मायदेशात असो वा परदेशात चांगली कामगिरी करत होती. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर संघाचे मनोबल उंचावले होते. लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात संघाने ३२५ धावांचे लक्ष्य गाठून नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली. यानंतर हेडिंग्ले येथील कसोटीत कठीण परिस्थितीत इंग्लंडचा डावाने पराभव केला.
दोन्ही संघ होते मजबूत –
- टीम इंडिया २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. ही स्पर्धा तिसऱ्यांदा खेळवली जात आहे. आधी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती. श्रीलंकेचा संघही खूप मजबूत होता. कर्णधार सनथ जयसूर्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्यांच्याकडे मारवान अटापट्टू, अरविंद डी सिल्वा, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारासारखे उत्कृष्ट फलंदाज होते. घरच्या खेळपट्ट्यांचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे श्रीलंकेच्या गोलंदाजांना माहीत होते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ११ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १० सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ९ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ८ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ७ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |