१४ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१४ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |14 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१४ मार्च चालू घडामोडी

पहिली रोहिंग्या ग्रॅज्युएट-ताश्मिंदा आहे तरी कोण?

 • अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या अनेकजणी आपल्याला माहिती आहेत. पण प्रत्येकीचा संघर्ष वेगळा असतो. समोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला स्वीकारून मात करत एक मुलगी पदवीधर झाली आहे. तिचं सगळीकडे कौतुक होतंय. याचं कारणही तसंच आहे ती आहे तश्मिंदा- भारतात पदवीधर झालेली पहिली रोहिंग्या तरुणी. परिस्थितीमधून तावून सुलाखून ती निघाली आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली.
 • तश्मिंदा दिल्ली मुक्त विद्यापीठातून बी.ए झाली आहे. पुढच्या शिक्षणासाठी ती टोरांटोमधल्या विलफ्रिड लॉरियर युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे. सर्व औपचारिकता पूर्ण करून तश्मिंदा कदाचित ऑगस्टमध्ये कॅनडात जाईल.
 • तश्मिंदा जौहर मूळची म्यानमारची, पण हे तिचं खरं नाव नाही. तिचं मूळ नाव तस्मीन फातिमा असल्याचं ती सांगते. “पण म्यानमारमध्ये रोहिंग्या नावासह राहणं शक्य नाही. कारण म्यानमारमध्ये रोहिंगे नकोच असल्याची मानसिकता आहे. तुम्हाला एक बौध्दधर्मीय नाव लावावंच लागतं, त्यामुळे माझंही नाव बदललं. शाळेत आमच्यासाठी वेगळे वर्ग आणि परीक्षेलाही सगळ्यांपासून दूर बसावं लागायचं. दहावीपर्यंत पहिले जरी आलो तरी रोहिंग्यांची नावं कधीच मेरिट लिस्टमध्ये नसायची. रोंहिग्यांना कॉलेज शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी म्यानमारची आधीची राजधानी यांगूनमध्ये जावं लागायचं.
 • परिणामी रोहिंगे मुलं क्वचितच पदवीधर होतात. कंटाळून शिक्षण सोडून देतात”, असा अनुभव तश्मिंदा सांगते. याही परिस्थितीत शिक्षण घेतलंच तरी तिथं रोहिंग्यांसाठी नोकऱ्याच नाहीयेत. त्यांना मतदानाचा अधिकारही नाही. रोहिंग्या मुलींना शाळा किंवा अगदी रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरही डोक्याला स्कार्फ बांधण्याची परवानगी नाही. तसंच रोहिंग्या समुदायातच मुलींच्या शिक्षणाला विरोध आहे. “ती शाळेत जाऊन शिकली तर तिचं लग्न कसं होईल? मुलीनं बाहेर जाणं चांगलं नाही, ”अशी अनेक मतं आहेत.

बीबीसीच्या क्षमायाचनेनंतर गॅरी लिनेकर पुन्हा स्टुडिओत

 • ब्रिटनमधील लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आणि पत्रकार गॅरी लिनेकर पुन्हा एकदा ‘मॅच ऑफ द डे’ हा बीबीसीवरील आपला कार्यक्रम सुरू करणार आहेत. गॅरी लिनेकर यांनी ब्रिटन सरकारच्या स्थलांतर धोरणाविरोधात केलेल्या ट्विटनंतर बीबीसीने त्यांना काम थांबवण्यास सांगितले होते. मात्र, त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर बीबीसीने माफी मागितली आणि लिनेकर यांना पुन्हा एकदा कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केले.
 • याबरोबरच बीबीसीेने आपल्या समाजमाध्यमांच्या वापराविषयी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचेही जाहीर केले. गॅरी लिनेकर यांना कार्यक्रम थांबवायला सांगितल्यानंतर त्यांना पािठबा देण्यासाठी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आपले कार्यक्रम सादर करण्यास नकार दिला होता.
 • बीबीसीचे कर्मचारी, निर्माते, सादरकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे प्रेक्षक या सर्वासाठीच हा कठीण काळ होता असे बीबीसीचे महासंचालक टीम डेव्ही यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफीदेखील मागितली. बीबीसीेने २०२० मध्ये समाजमाध्यमांच्या वापराविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे याची जाणीव झाल्याचे डेव्ही म्हणाले.

समिलगी विवाहाबाबतच्या याचिका घटनापीठाकडे ; १८ एप्रिलपासून नियमित सुनावणी

 • समिलगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पाचसदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केल्या. या याचिकांवर घटनापीठासमोरील सुनावणी १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
 • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या याचिका सुनावणीला आल्यानंतर समिलगी विवाहाचा मुद्दा मूलभूतरीत्या महत्त्वाचा असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले.
 • या विषयात एका बाजूला घटनात्मक अधिकार आणि दुसऱ्या बाजूला विशेष विवाह कायद्यासह विशेष वैधानिक अधिनियमिती आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. घटनापीठासमोरील इतर खटल्यांप्रमाणे या खटल्याचेही कामकाज थेट प्रक्षेपित केले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रो लीग हॉकी : भारताचा सलग दुसऱ्यांदा ; जगज्जेत्या जर्मनीला धक्का

 • वेगवान चाली, अचूक पास आणि नियंत्रणाच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा जगज्जेत्या जर्मनीला नमवले. प्रो लीग हॉकीच्या परतीच्या लढतीत सोमवारी भारताने अभिषेक आणि सेल्वम कार्तिकने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर जर्मनीचा ६-३ असा पराभव केला. या विजयासह भारताने या स्पर्धेच्या गुणतालिकेत स्पेनला मागे टाकत अग्रस्थान मिळवले आहे.
 • भारतीय खेळाडूंनी जर्मनीच्या वेगवान खेळाला जशास तसे उत्तर दिले. भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण करतानाच बचाव भक्कम ठेवत आकर्षक विजय मिळवला.
 • अभिषेक (२२ आणि ५१व्या मिनिटाला) व सेल्वम कार्तिक (२४ आणि ४६व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर जुगराज सिंग (२१व्या मि.), हरमनप्रीत सिंग (२६व्या मि.) यांनी एकेक गोल केला. जर्मनीसाठी टॉम ग्रॅमबूश (तिसऱ्या मि.), गोन्झालो पेईलट (२३व्या मि.) आणि माल्टे हेलविगने (३१व्या मि.) गोल केले.

रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदीचा पाकचा प्रयत्न

 • रोख रकमेच्या चणचणीचा सामना करत असलेला पाकिस्तान रशियाकडून प्रति बॅरल ५० डॉलर; म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जी-७ देशांनी लागू केलेल्या किंमत मर्यादेपेक्षा बॅरलमागे १० डॉलर कमी दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा सुनियोजित प्रयत्न करत आहे.
 • कच्चे तेल सध्या जगभरात बॅरलमागे ८२.७८ अमेरिकी डॉलर दराने विकले जात आहे. प्रचंड बाह्य कर्ज आणि कमकुवत झालेले स्थानिक चलन यांच्याशी झगडत असलेला पाकिस्तान काहीही करून रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याचे प्रयत्न करत आहे.
 • मॉस्कोहून कच्च्या तेलाची पहिली खेप पुढील महिनाअखेरीस पाकिस्तानात येण्याचे ठरले असून, यामुळे भविष्यात आणखी मोठय़ा कराराचा मार्ग मोकळा होईल, असे वृत्त ‘दि न्यूज’ने दिले आहे.
 • रशियाच्या बंदरांमधून कच्चे तेल समुद्रमार्गे पाकिस्तानात पोहोचण्यास ३० दिवस लागतील. वाहतुकीच्या खर्चामुळे या तेलाच्या किमतीत बॅरलमागे १०-१५ डॉलरने वाढ होईल, असे या वृत्तात नमूद केले आहे.

‘एसव्हीबी’ संकटाबाबत केंद्र नवउद्यमींशी चर्चा करणार

 • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या आठवडय़ात नवउद्यमींच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) बुडल्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित उद्योग क्षेत्रातील भारतीय नवउद्यमी संकटात सापडले आहेत. त्यासंबंधीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. अमेरिकेत राहून सॉफ्टवेअर सेवा प्रदान करणारे बहुसंख्य नवउद्यमी आणि फर्म यांची खाती एसव्हीबीमध्ये होती, त्यांना ही बँक बुडाल्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
 • एसव्हीबी बंद पडल्याचा जगभरातील नवउद्यमींवर निश्चितच विपरीत परिणाम होणार आहे. नवीन भारताच्या अर्थव्यवस्थेत या नवउद्यमी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल आणि केंद्र सरकार त्यांना या संकटात कशा प्रकारे मदत करू शकेल हे जाणून घेण्यासाठी आपण या आठवडय़ात भारतीय नवउद्यमींची भेट घेणार आहोत असे चंद्रशेखर यांनी रविवारी ट्वीट करून सांगितले.
 • बहुसंख्य नवउद्यमींच्या कर्मचाऱ्यांचे वेतन एसव्हीबीशी वाय कॉम्बिनेटर मार्फत दिले जाते, त्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मात्र, काही नवउद्यमींचे वेतन मीशो, रेझरपे आणि कॅशफ्री पेमेंट यांच्यामार्फत दिले जाते. त्यांना या संकटाची झळ बसणार नाही असे सांगण्यात आले.

‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धा – अंकिता-ऋतुजा जोडी दुहेरीत अजिंक्य :

 • अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियातील बेंडिगो शहरात झालेल्या महिलांच्या ‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे जेतेपद पटकावले.
 • अंतिम सामन्यात अंकिता-ऋतुजा या पुणेकर जोडीने अलेक्झांड्रा बोझोव्हिच (ऑस्ट्रेलिया) आणि वेरॉनिका फाल्कोवस्का (पोलंड) या जोडीला ४-६, ६-३, १०-४ असे नमवले. मागील आठवडय़ात याच ठिकाणी झालेल्या अन्य एका स्पर्धेची अंकित-ऋतुजा जोडीने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कामगिरीत अधिक सुधारणा करत जेतेपदाला गवसणी घातली.
 • ‘‘मी याआधी अंकितासोबत दोन स्पर्धामध्ये खेळले. त्यावेळी एकत्रित आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. मात्र, सामन्यागणिक आमच्या खेळात आणि संवादात सुधारणा होत गेली. त्यामुळेच आम्हाला ही स्पर्धा जिंकणे शक्य झाले,’’ असे ऋतुजाने नमूद केले. अंतिम सामन्यात अंकित-ऋतुजा जोडीने पहिला सेट ४-६ असा गमावला.
 • परंतु दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करताना त्यांनी ६-३ अशी बाजी मारली. मग सुपर टायब्रेकरमध्ये भारतीय जोडीच्या आक्रमक खेळापुढे बोझोव्हिच-फाल्कोवस्का जोडी निष्प्रभ ठरली. ‘‘पहिल्या सेटमध्ये आम्ही काही चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्येही २-२ अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर आम्हाला खेळ उंचावण्यात यश आले,’’ असे अंकिता म्हणाली.

चीनमध्ये करोनाची दोन वर्षांतली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या :

 • चीनमध्ये सध्या नोंदली जाणारी करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ही दोन वर्षांतील सर्वाधिक असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. तेथे २४ तासांत सरासरी सुमारे दोन हजार रुग्ण नोंदले जात आहेत. 
 • मध्यवर्ती चीनमध्ये शनिवारी करोनाचे नवे १८०७ रुग्ण नोंदले गेले. हे सर्व स्थानिक संक्रमणाचे रुग्ण आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या १३१ जणांचे करोना अहवाल होकारात्मक आले आहेत, अशी माहिती आयोगाने रविवारी दिली. आयोगाने म्हटले आहे की, जिलनव्यतिरिक्त शान्डाँगमध्ये १७५, गुआंगडाँगमध्ये ६२, शान्स्कीमध्ये ३९, हेबईमध्ये ३३, जियांग्सूमध्ये २३ आणि तिआनजिनमध्ये १७ रुग्ण नोंदले गेले आहेत. देशाच्या विविध भागांची एकत्रित दैनंदिन रुग्णसंख्या ही सुमारे दोन हजार असून ती दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. बीजिंगमध्येही २० रुग्ण आढळून आले आहेत. 
 • नवे रुग्ण ओमायक्रॉनचे – चीनच्या जिलिन प्रांतात नवे १४१२ स्थानिक रुग्ण आढळून आले. या प्रांताच्या राजधानीचे शहर असलेल्या चंगचूनमध्ये गेल्या शुक्रवारपासून टाळेबंदी लागू केली आहे. या शहरातील ९० लाख लोक टाळेबंदीचे निर्बंध पाळत आहेत. येथे वेगाने प्रसार होणाऱ्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या युचेंग शहरातही टाळेबंदी लागू केली आहे. हे शहर शान्डाँग प्रांतात आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतला तिन्ही दलांच्या शस्त्र सज्जतेचा आढावा; युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिले ‘हे’ निर्देश :

 • युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेचा आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सुरक्षाविषयक मंत्री समिती (सीसीएस)ची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताच्या शस्त्रसज्जतेचा आढावा घेण्याबरोबरच युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.
 • मोदी काय म्हणाले – बैठकीत मोदींनी संरक्षण यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर दिला. तसेच देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असंही मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
 • आपण शस्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी झाल्यास केवळ संरक्षणदृष्ट्याच मजबूत होणार नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेतही भर पडेल, असे मोदींनी म्हटले. जगभरातील देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात सध्या कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं याची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आल्याचं सुत्रांनी म्हटलंय. लष्कराबरोबरच हवाई आणि नौदलासंदर्भातील भारताच्या शस्त्र सज्जतेबद्दल पंतप्रधानांना सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली.

Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा :

 • पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नेटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नेटो देशांना रशिया लवकरच नेटो देशांवर हल्ले करेल असा इशारा दिलाय. 
 • रविवारी रशियाकडून पोलंड आणि युक्रेनच्या सीमा भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा नेटो देशांना त्यांच्या नो फ्लाय झोन घोषित करण्याच्या मागणीची आठवण करुन दिली. ही मागणी नेटोने यापूर्वी फेटाळली होती. मात्र त्यामुळेच रशियाने अशाप्रकारे थेट युक्रेन-पोलंडच्या सीमा भागांमध्ये हल्ला केल्याचा झेलेन्सी यांच्या टीकेचा एकंदरीत सूर होता.
 • “तुम्ही आमच्या देशावरील हवाई क्षेत्रावर उड्डाणास बंदी घातली नाही (नो फ्लाय झोन घोषित केलं नाही) तर काही काळामध्ये रशियाची क्षेपणास्त्र तुमच्या प्रांतावर म्हणजेच नेटोच्या देशांमध्ये पडली. नेटो देशातील नागरिकांवर पडतील. नेटोला मी यापूर्वीही इशारा दिला होता की निर्बंध लागू केले नाहीत तर रशिया युद्धा सुरु करेल. मास्को या युद्धामध्ये नॉर्न स्ट्रीम २ चा वापर शस्त्राप्रमाणे करेल हा इशारा आधी दिलेला,” असं झेलेन्स्की म्हणाले असल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

रशियाचे युक्रेनच्या कोणकोणत्या प्रदेशांवर नियंत्रण ? ब्रिटनने प्रसिद्ध केला नकाशा, दिली ‘ही’ माहिती :

 • रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हवाईहल्ले तसेच तोफगोळ्यांचा मारा करण्यात येतोय. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हच्या परिसरात हल्ला आणखी तीव्र केला असून या आक्रमक धोरणाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या आतापर्यंत किती प्रदेश ताबा मिळवला आहे, हे सांगण्यासाठी ब्रिटनने एक नकाशा प्रसिद्ध केलाय.
 • ब्रिटनने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये काय आहे  : ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने 11 मार्च रोजी एक नकाशा प्रसिद्ध केलाय. या नकाशात रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या किती प्रदेश ताबा मिळवला आहे, हे सविस्तरपणे संगण्यात आलंय. तसेच या नकाशामध्ये सध्या रशियन सैनिक कुठे कुठे जमा झालेले आहेत. रशियन सैनिकांनी आतापर्यंत कोणत्या भागात हल्ले केले आहेत, याची माहिती देण्यात आलीय. ब्रिटनच्या या नकाशानुसार कीव्ह शहराच्या परिसरात रशियाने हल्ला वाढवल्याचं दिसतंय.
 • रशियाने युक्रेनमधील मारियोपोल या बंदर असलेल्या शहरावरही जोरदार हल्ला सुरु केला आहे. तसेच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने पोलंडच्या सीमेजवळ यावोर्कीव येथे युक्रेनियन सैन्यावर हवाई हल्ला केला आहे. यावोर्कीव हा प्रदेशत पोलंडच्या सीमेपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार रशियाने या ठिकाणावर आठ क्षेपणास्त्रे डागली असून अद्यापतरी जीवितहानी झालेली नसून अनेकजण जखमी झाले आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.