१७ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१७ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |17 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१७ एप्रिल चालू घडामोडी

९० मीटरची कामगिरी, जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाचे लक्ष्य – नीरज

  • या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि ९० मीटरची जादूई कामगिरी ही नव्या हंगामातील आपली प्रमुख उद्दिष्टे असल्याचे भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने सांगितले. अर्थात, २०२४ ऑलिम्पिकच्या तयारीकडे लक्ष देताना तंदुरुस्त राहण्याकडेही नीरजचा कल राहणार आहे.
  • नीरज नव्या हंगामास ५ मेपासून सुरुवात करणार आहे. या वेळी तो डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होईल. टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरजला २०२२ जागतिक स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदाचा हंगाम बराच मोठा असेल. ऑक्टोबरमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, त्यानंतर जागतिक स्पर्धा होईल. हा सगळा व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता यशस्वी होण्यासाठी मला पूर्ण हंगामात तंदुरुस्त राहावे लागेल, असे नीरज म्हणाला.
  • ‘‘या वेळी जागतिक स्पर्धा हंगेरीत होणार आहेत. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे माझे स्वप्न आहे. अर्थात, हे स्वप्न या वेळी साकार होईल का त्यासाठी मला आणखी थांबावे लागेल हे माहीत नाही. याचे दडपणही माझ्यावर नाही,’’ असेही नीरजने सांगितले. नीरज सध्या अंताल्या येथील ग्लोरिया स्पोर्ट्स अरिनामध्ये सराव करत आहे. ‘‘ऑलिम्पिक सुवर्णपदक टिकवण्याचे दडपण असेल; पण मी त्याचा दबाव घेणार नाही. हंगाम मोठा आहे.
  • त्यामुळे तंदुरुस्त राहणे आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणे याकडे मी लक्ष देईन,’’ असे नीरज म्हणाला.

८७९ टपाल कार्यालये ‘इंटरनेट’पासून वंचित; महाराष्ट्र विभागातील १०१ कार्यालयांचा समावेश

  • डिजिटल क्रांतीच्या युगातही देशातील ८७९ टपाल कार्यालयांत ‘इंटरनेट’ आणि भ्रमणध्वनीचे ‘नेटवर्क’ उपलब्ध नाही. त्यात महाराष्ट्र सर्कलमधील १०१ कार्यालयांचा समावेश आहे. ही संख्या देशात चौथ्या क्रमांकाची आहे.देशात काही ठिकाणी ‘५-जी’ सेवेला सुरुवात झाली आहे. अनेक सेवा ‘अॅप’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. असे असले तरी अजूनही दुर्गम भागातील अनेक गावे आहेत जेथे या क्रांतीचा लाभ पोहोचला नाही. केंद्रीय दूरसंचार खात्याच्या माहितीनुसार देशभरातील २१ टपाल सर्कलमधील ८७९ टपाल शाखा कार्यालयात भ्रमणध्वनीचे ‘नेटवर्क’ व इंटरनेट ‘कनेक्टिव्हिटी’ नाही. यात महाराष्ट्र सर्कलमधील १०१ टपाल कार्यालयांचा समावेश आहे. या सर्कलमध्ये गोव्याचाही समावेश होतो हे येथे उल्लेखनीय. ही सर्व गावे प्रामुख्याने डोंगराळ भागातील आहेत.
  • देशातील पूर्वेत्तर भागातील राज्यांमधील गावांमध्ये ही समस्या सर्वाधिक आहे. तेथील १५२ टपाल कार्यालयात ‘कनेक्टिव्हिटी’ नाही. जम्मू काश्मीर, लडाख भागातील ११५, पश्चिम बंगाल सर्कलमधील (पश्चिम बंगालसह सिक्कीम-अंदमान निकोबार) १०६ कार्यलयात कनेक्टिव्हिटी नाही. आंध्र प्रदेशात ७६, छत्तीसगडमध्ये ९५ टपाल कार्यालयांचीही हीच स्थिती आहे.

केंद्र सरकारचा पुढाकार..

  • सर्व गावांना ‘इंटरनेट’ने जोडण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ‘कनेक्टिव्हीटी’ नसलेल्या देशभरातील २४ हजार ६८० गावे ‘४-जी’ सेवेत समाविष्ट करण्याची योजना असून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. देशभरात एकूण १ लाख ५९ हजार ३९२ टपाल कार्यालये आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील कार्यालयांची संख्या ही १३,६९१ असून त्यात मुख्य टपाल कार्यालये (६१), उप कार्यालये (२१५४) आणि शाखा कार्यालये (११,४७६) आदींचा समावेश आहे.

काय आहे केंद्राची ‘आकांक्षित’ शहर योजना, राज्यातील कोणत्या शहरांना लाभ मिळणार; वाचा सविस्तर..

  • शहराच्या समतोल विकासासाठी केंद्राच्या ‘आकांक्षित’ शहर योजनेत राज्यातील काही शहरांची निवड करण्यात आली आहे. गतवर्षी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिव व प्रशासकांची परिषद संपन्न झाली होती. या परिषदेत शैक्षणिक धोरण, नागरिक प्रशासन, पीक वैविध्य, कडधान्यात स्वयंपूर्णता अशा विषयांवर चर्चा झाली होती. त्यासोबतच राज्यांसाठी आकांक्षित शहरे कार्यक्रम राबविण्याची सूचना करण्यात आली होती.
  • गावांचे शहरीकरण व त्यातून नव्याने उद्भवलेल्या समस्यांबाबत विविध यंत्रणांसोबत विचारविनिमय करण्यात आला. ‘ड’ वर्ग महानगरपालिका तसेच ‘ब’ व ‘क’ वर्गातील नगरपरिषदा व नगरपंचायती असलेल्या शहरांचा विचार प्राधान्याने झाला. या शहरांचा समतोल, कालबद्ध व सर्वसमावेशक विकास करण्याचे दृष्टीने कार्यक्रम राबविण्याचे ठरले. महाराष्ट्रातदेखील हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय गुरुवारी झाला. त्यासाठी शहरांची निवड दरडोई महसूल, पाणीपुरवठा, पक्क्या घरांची टक्केवारी, अनुसूचित जातीजमातीची लोकसंख्या व तारांकित दर्जा या निकषावर करण्यात आली. निवड झालेली शहरे याप्रमाणे – एकूण १८ ‘ड’ वर्गीय महानगरपालिकांपैकी अकोला, परभणी, लातूर, सोलापूर, मालेगाव, जळगाव, नांदेड, भिवंडी व उल्हासनगर.
  • एकूण ७४ ‘ब’ वर्गातील नगर परिषदांपैकी देगलूर, आर्वी, सेलू, वसमतनगर, गंगाखेड, माजलगाव, मनमाड, सिल्लोड, जिंतूर, पैठण, मूर्तीजापूर व नांदुरा अशा बारा नगरपरिषदा आहे.
  • एकूण १४१ ‘क’ वर्गातील नगरपरिषदांपैकी औसा, किनवट, गडचांदूळ, लोहा, नेर नबाबपूर, मुदखेड, मानवत, तळोदा, चांदूरबाजार, पातूर, बिलोली, नळदूर्ग, मुरूम, परतूर, मुखेड, ईगतपूरी, कन्हानपिपरी व पाथरी अशा एकूण १८ नगरपरिषदा. एकूण १४८ नगरपंचायतींपैकी मानोरा, मालेगाव जहांगीर, अर्धापूर, सडक अर्जूनी, माहूर, सिंदखेडा, मंठा, भातकुली, मोखाडा, पाली, नायगाव, अंगार, भामरागड, फुलूंब्री, नशीराबाद, एटापल्ली, बार्शी टाकळी व पालम अशा १८ नगरपंचायती आहे.

महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींचं दातृत्व, पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान

  • ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्वास सुरू असेपर्यंच हे काम असंच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. हा पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकांचा जनसमुदाय खारघरच्या मैदानात दाखल झाला होता.
  • दरम्यान, आप्पासाहेबांनी पुरस्कारासह मिळालेली २५ लाख रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे. या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड ही सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे केली जाते. या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं.
  • पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आप्पासाहेब म्हणाले की, “पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे”

अमित शाहांची स्तुतीसुमने

  • या पुरस्कार सोहळ्याला आलेले प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “कोणत्याही प्रसिद्धी आणि आपेक्षेशिवाय सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला इतका मोठा जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तीभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो.”

अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची महाभरती; जिल्हा परिषदांकडून परीक्षार्थींना दिशाभूल करणारी माहिती, ग्रामविकास विभागाने घेतली गंभीर दखल

  • गेल्या चार वर्षांपासून पदभरती रखडली असताना स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शासनाने ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्यातील जिल्हा परिषदांकडून परीक्षार्थींना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत असून, ही बाब गंभीर असल्याचे ताशेरे ग्रामविकास विभागाने ओढले आहेत. परीक्षार्थींच्या तक्रारींनंतर ग्रामविकास विभागाने या परीक्षा कशा पद्धतीने होणार, त्याचे आयोजन कोण करणार आहेत, याबाबत सविस्तर निर्देश सर्व जिल्हा परिषदांना दिले आहे.
  • ग्रामविकास विभागाने १२ एप्रिल रोजी एक आदेश काढून ७५ हजार पदभरतीबाबत दिशानिर्देश दिले आहे. सरळसेवा कोट्यातील ही पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेअंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील विविध संवर्गातील एकूण १८ हजार ९३९ पदे भरण्यात येणार आहेत. करोनामुळे जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत नियुक्तीकरीता प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरांतीसाठी पात्र करण्यात आले आहे.
  • सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले. या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार आयबीपीएस कंपनीसोबत बैठक घेऊन एमओयू अंतिम करण्यात आला आहे. सध्यास्थितीत कंपनीतर्फे एमओयूवर स्वाक्षरी करून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला आहे, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले. पदभरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे, याकडे ग्रामविकास विभागाने लक्ष वेधले आहे. पदभरती संदर्भात जिल्हा परिषदस्तरावर करण्यात आलेली कार्यवाही, ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी, शंका निरसन करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

पदभरती निवडणुकीचे आमीष असल्याची शंका

  • गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. ग्रामविकास विभागाकडून सातत्याने परिपत्रक काढून आदेश दिले जातात. मात्र, पदभरती ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन याबाबत कोणतीही स्पष्टता नसते. आतापर्यंत आठ ते नऊ परिपत्रक निघाले. मात्र प्रत्यक्षात पदभरती झाली नाही. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर शासन तरुणांना प्रभावित करण्याठी पदभरतीचे आमीष तर दाखवत नाही ना, अशी शंका येत असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल ठाकरे यांनी दिली.

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत माजी उपमुख्यमंत्री सावदी

  • Karnataka assembly elections 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री व भाजपमधून नुकतेच काँग्रेसप्रवेश केलेल्या लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे. अथनी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
  • कोलार मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. सिद्धरामैया यांना यापूर्वीच वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी राज्यपाल मार्गरेट अल्वा यांचे पुत्र निवेदित यांना कुमटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत २०९ उमेदवार जाहीर केले आहेत.

शेट्टर समर्थक आक्रमक

  • हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात मला उमेदवारी नाकारल्यास भाजपला राज्यात २० ते २५ जागांचा फटका बसू शकतो, असा दावा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला आहे. शनिवारी शेट्टर यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेतली. या मतदारसंघासाठी भाजपने अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र पक्षनेतृत्वाने त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर शेट्टर नाराज आहेत. शेट्टर यांच्या समर्थनार्थ हुबळी-धारवाड महापालिकेच्या भाजपच्या १६ नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे. रविवापर्यंत पक्षाच्या निर्णयाची वाट पाहू, मग पुढील निर्णय घेऊ, असा इशारा शेट्टर यांनी दिला आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी शिग्गावमधून अर्ज दाखल केला.

हिजाब, हलाल हे मुद्दे नाहीत – येडियुरप्पा

  • हिंदू, मुस्लीम यांनी बंधुभावाने राहावे, हिजाब, हलाल हे मुद्दे अनावश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले. अशा मुद्दय़ांना माझा पाठिंबा नाही, असे त्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये या मुद्दय़ांवरून वाद झाला होता. मात्र येडियुरप्पांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षातील बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसेच कल्याणकारी योजना यामुळे कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी आज कोलारमध्ये

  • बंगळूरु : काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी कोलार येथे काँग्रेसच्या सभेमध्ये भाषण करणार आहेत. कोलारमध्येच २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ‘मोदी’ आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१७ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.