Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |17 August 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१७ ऑगस्ट चालू घडामोडी
भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषक स्पर्धेतील यश ऐतिहासिक -आनंद
- विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत एका देशाच्या एका खेळाडूनेही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठणे हे मोठे यश असते. आपल्या तब्बल चार खेळाडूंनी हा टप्पा गाठला आहे. भारतीय बुद्धिबळपटूंचे हे यश ऐतिहासिक आहे, असे गौरवोद्गार पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने काढले.
- भारतातील बुद्धिबळ आणि बुद्धिबळपटूंनी गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने प्रगती केली आहे. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली अलौकिक कामगिरी सध्या बाकू येथे सुरू असलेल्या विश्वचषकातही कायम राखली आहे. भारताच्या डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी आणि अर्जुन एरिगेसी या चार ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यात यश आले आहे.
- ‘‘भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषकातील यश ऐतिहासिक आहे. या स्पर्धेत आव्हान शाबूत असलेल्या आठ बुद्धिबळपटूंपैकी चार भारतीय आहेत. हा भारतासाठी विक्रमच म्हणावा लागेल. आता या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आपल्या एक किंवा दोन बुद्धिबळपटूंना ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतून जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्याला आव्हान देणारा खेळाडू निश्चित केला जाईल. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेची भारतीय बुद्धिबळप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतील,’’ असे आनंदने सांगितले.
- विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन बुद्धिबळपटू पुढील वर्षी कॅनडा येथे होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंद आणि एरिगेसी आमनेसामने आल्याने यापैकी एक स्पर्धेत आगेकूच करणार हे निश्चित आहे. उपांत्य फेरीतही त्यांनी विजय मिळवल्यास त्यांचे ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील स्थान पक्के होईल.
‘चांद्रयान-३’ चंद्राच्या अखेरच्या कक्षेत; प्रोपल्शन आणि लँडर वेगळे होण्याच्या तयारीत
- भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-३’ या अंतराळ यानाने बुधवारी महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. हे यान बुधवारी सकाळी ८.३० वाजता चंद्राच्या पाचव्या व अखेरच्या कक्षेत पोहोचले असून चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ आले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संस्थेने दिली.चांद्रयान-३ ने चौथ्यांदा आपली कक्षा बदलली असून आता ते चंद्राभोवती १५३ किमी ७ १६३ किमी या कक्षेत फिरत आहे.
- चांद्रयान-३ या अंतराळ यानातील प्रोपल्शन मॉडय़ूल आणि लँडर मॉडय़ूल एकमेकांपासून वेगळी होण्याच्या तयारीत आहेत. गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी ते वेगळे करण्याचे नियोजित करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. चांद्रयान-३च्या लँडरमध्ये रोव्हर जोडण्यात आले असून या दोन्हीला मिळून लँडर मॉडय़ूल बोलले जाते. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण धुव्रावर अलगद उतरणार आहे.
राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान महिनाभर नागरिकांसाठी खुले
- राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान बुधवारपासून महिन्याभरासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वर (पूर्वीचे ‘ट्विटर’) प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले, की १६ ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या काळात सर्वाना अमृत उद्यान पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
- १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी द्वितीय उद्यान उत्सवाचे उद्घाटन केले. ‘उद्यान उत्सव-२’अंतर्गत अमृत उद्यान १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ (सोमवार वगळता) जनतेसाठी खुले राहील. पर्यटक सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत (दुपारी ४ ला बागेत अंतिम प्रवेश) या बागेला भेट देऊ शकतात. ‘उद्यान उत्सव-१’अंतर्गत २९ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान अमृत उद्यान खुले करण्यात आले होते. त्या वेळी दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. हे उद्यान यंदा प्रथमच वर्षभरात दुसऱ्यांदा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.
८० टक्के उमेदवार मुलाखतीत पगाराबाबत खोटं सांगतात, PhysicsWallah चा दावा!
- नोकऱ्यांसाठी आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच मुलाखत, चर्चा, पगाराची अपेक्षा वगैरे सगळे रीतसर सोपस्कार पार पाडले असतील. मात्र, आपल्या कंपनीत मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार त्यांच्या पगाराबद्दल किंवा त्यांच्या आधीच्या अनुभवाबद्दल खोटं सांगतात, असा दावा PhysicsWalla च्या एचआर विभागाचे प्रमुख सतीष खेंगरे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी वापरलेल्या एका सॉफ्टवेअरच्या माहितीचा दाखला दिला आहे. मनीकंट्रोलनं ईटीएचआरवर्ल्डच्या दाखल्यानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.
उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तपासणी
- या वृत्तानुसार PhysicsWalla यासाठी उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तपासणी करत आहे. त्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. यातून त्यांच्या पार्श्वभूमीसोबतच उमेदवारांचे बँक अकाऊंट डिटेल्सही तपासले जातात, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
- “कधीकधी उमेदवारांकडून आपल्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तरं खरी नसतात. ते त्यांच्या कामगिरीसंदर्भातील प्रश्नांवरही खोटं बोलू शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या उत्तरांचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. PhysicsWalla डार्विनबॉक्स नावाच्या तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करतं. यातून कंपनीला कर्मचाऱ्यांसाठी टार्गेट, कामाचं मूल्यमापन, त्यांच्या कामासाठी मानांकन आणि ठरवलेलं ध्येय व गाठलेलं ध्येय यातील तफावत अशा गोष्टींचं मापन करता येतं”, अशी प्रतिक्रिया सतीश केंगरेंनी इटीएसआरवर्ल्डला दिली आहे.
- PhysicsWallaकडून त्यांच्या कंपनीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे.
अहमदाबाद सर्वात परवडणारे शहर; पुणे, कोलकता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी
- देशात वाढत्या व्याजदरांमुळे घरे परवडत नसल्याचे चित्र आहे. यातच आता घरे परवडणाऱ्या शहरांमध्ये अहमदाबादने पहिले स्थान पटकाविले आहे. देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये अहमदाबाद अग्रस्थानी असून त्यानंतर कोलकता आणि पुण्याचा संयुक्तपणे दुसरा क्रमांक लागला आहे. या शहरांमध्ये उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्तय़ाचे प्रमाण कमी आहे.
- मालमत्ता क्षेत्रातील नाइट फ्रँक संस्थेने याबाबतचा चालू वर्षांतील पहिल्या सहामाहीचा अहवाल बुधवारी जाहीर केला. त्यात सर्वसाधारण घरातील उत्पन्नाशी कर्जाच्या मासिक हप्तय़ाचे गुणोत्तर तपासण्यात आले. हे गुणोत्तर म्हणजे उत्पन्नापैकी किती पैसे मासिक हप्तय़ासाठी जातात हे दर्शविते. देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये हे गुणोत्तर २०१० ते २०२१ या कालावधीत घसरल्याचे दिसून आले. करोना संकटाच्या काळात रिझव्र्ह बँकेने व्याजदरात कपात करून व्याजदर दशकातील नीचांकी पातळीवर आणले होते. त्यामुळे हे गुणोत्तर घसरले होते. त्यानंतर वाढत्या महागाईमुळे रिझव्र्ह बँकेने व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. तेव्हापासून देशात घरांचे परवडणे कमी झाले आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये अहमदाबादमध्ये घरातील उत्पन्नाशी कर्जाच्या मासिक हप्तय़ाचे गुणोत्तर सर्वात कमी होते.
कौटुंबिक उत्पन्नाच्या तुलनेत मासिक हप्ता
- अहमदाबाद : २३
- पुणे : २६
- कोलकता : २६
- बंगळुरू : २८
- चेन्नई : २८
- दिल्ली : ३०
- हैदराबाद : ३१
- मुंबई : ५५ (टक्क्यांमध्ये)
२० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धा: मोहित कुमारला सुवर्ण ; रशियाच्या एल्डर अखमाडुनिनोवचा अंतिम लढतीत ९-८ असा पराभव
- भारताचा मोहित कुमार (६१ किलो) २० वर्षांखालील गटातील फ्री-स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला. या वयोगटात विजेतेपद मिळविणारा मोहित चौथा भारतीय ठरला. दरम्यान, मुलींच्या ७६ किलो वजनी गटातून प्रियाने अंतिम फेरी गाठली. यापूर्वी मुलींच्या गटात गेल्या वर्षी अंतिम पंघालने ५३ किलो गटात विजेतेपद मिळवले होते.
- मोहितने बुधवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या एल्डर अखमाडुनिनोवचा गुणांवर ९-८ असा पराभव केला. लढतीत एकवेळ मोहित ०-६ असा पिछाडीवर होता. मात्र, वेगवान कुस्ती करण्याच्या नादात एका क्षणी एल्डर उर्जा गमावून बसला आणि त्याचा फायदा घेत मोहितने सलग नऊ गुणांची कमाई करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २० वर्षांखालील गटात भारताला जागतिक स्पर्धेत २०१९ नंतर विजेतेपद मिळाले. त्यावेळी दीपक पुनिया विजेता ठरला होता. दीपक आता वरिष्ठ गटात खेळतो. मोहित भारताचा या गटातील चौथा विजेता ठरला. यापूर्वी पलिवदर चिमा (२००१) आणि रमेश कुमार (२००१) यांनी विजेतेपद पटकावले होते.
- फ्री-स्टाईल विभागात ७४ किलो वजनी गटात जयदीप आणि १२५ किलो वजनी गटात रजत राहुल कांस्यपदकाचे मानकरी ठरले. जयदीपने किर्गिस्तानच्या झॉकशिलीक बेटाशोवाच ४-२, तर राहुलने कॅनडाच्या करनवीर सिंग माहिलचा ९-८ असा पराभव केला. यापूर्वी मंगळवारी झालेल्या लढतीतून सागर जगलने (७९ किलो) रौप्य, तर दीपक चहलने (९७ किलो) कांस्यपदक पटकावले.
- दरम्यान, मुलींच्या गटातून प्रियाने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेच्या केनेडी ब्लेडसचा प्रतिकार सहजपणे एकतर्फी लढतीत १०-० असा मोडून काढ़ला. प्रियाने आपल्या सर्व लढती एकतर्फी जिंकल्या. पहिल्या फेरीत तिने अल्बेनियाच्या मारिया सिलीनवर ४-० अशी मात केली, उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्याच ऑलिआक्झांड्रा काझ्लोवाचा प्रतिकार ११-० असा मोडून काढला. मुलींच्या गटातील अन्य एका लढतीत ६८ किलो वजनी गटात आरजूला उपांत्य फेरीत अल्बेनियाच्या एलिझाबेटा पेटलीकोवाकडून ३-९ असा पराभव पत्करावा लागला. आरजू आता कांस्यपदकाची लढत खेळेल.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १६ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १५ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १४ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १३ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १२ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |