१८ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१८ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 18 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१८ ऑक्टोबर चालू घडामोडी

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती:

  • भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच ९ नोव्हेंबरपासून न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे.
  • तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.
  • हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या ३९ व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली. ते भारतातील सर्वात तरुण वकील बनले. यानंतर लगेचच, १९९८ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली. वकीली करत असताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवला. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठातही अध्यापक (व्हिजिटींग) म्हणून काम केलं आहे.
  • न्यायमूर्ती चंद्रचूड यांची २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तीन वर्षांत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

भारतात गेल्या १५ वर्षात ४१.५ कोटी जनतेची गरिबीतून मुक्तता, ऐतिहासिक बदल असल्याचं संयुक्त राष्ट्रानं केलं नमुद:

  • भारतात गेल्या १५ वर्षांत ४१.५ कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. २००५-०६ ते २०१९-२१ या वर्षांमध्ये देशातील गरिबीमध्ये मोठी घट झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या ‘मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक बदल असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. २०३० पर्यंत दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करण्याचे लक्ष्य शक्य असल्याचे संयुक्त राष्ट्राने या अहवालात म्हटले आहे.
  • संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्रय आणि मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतातील दारिद्रय निर्मुलनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. जागतिक भूक निर्देशांकात इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाल्याचं समोर आल्यानंतर सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यातच देशातील गरिबीत घट होत असल्याचा अहवाल पुढे आल्यानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे.
  • जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.

ब्रिटनमधील करकपातीचा निर्णय मागे ; प्राप्तिकराचा दर पूर्वीप्रमाणेच – अर्थमंत्री हंट:

  • पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गेल्याच महिन्यात जाहीर केलेल्या जवळपास सर्वच करकपाती ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सोमवारी मागे घेतल्या. घर खरेदीवर भरलेल्या मुद्रांक शुल्कातील कपात मात्र मागे घेण्यात आली नसल्याचे हंट यांनी स्पष्ट केले.
  • ट्रस यांच्या करकपातीच्या योजनेत प्रामुख्याने एप्रिलपासून प्राप्तिकराचा मूळ दर २० पेन्सवरून १९ पेन्स एवढा कमी करण्याच्या निर्णयाचा समावेश होता. तो मागे घेण्याची घोषणा अर्थमंत्री हंट यांनी केली आहे. जोपर्यंत कपातीसाठी आवश्यक आर्थिक परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्राप्तिकराचा दर २० पेन्स एवढाच राहील, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारने ‘छोटय़ा अर्थसंकल्पात’ (मिनी-बजेट) आणखी बदल करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
  • ऊर्जा शुल्काला असलेली सरकारी हमी केवळ येत्या एप्रिलपर्यंत असेल, ती आधीच्या घोषणेनुसार वर्षांसाठी नसेल. एप्रिलनंतर घरगुती आणि व्यावसायिक वीजदेयकांचा आढावा घेण्यात येईल, असेही हंट यांनी स्पष्ट केले. आर्थिक वाढीसाठी आत्मविश्वास आणि स्थैर्याची गरज असून ब्रिटन सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढील, असेही ते म्हणाले.
  • गेल्या महिन्यात ‘छोटय़ा अर्थसंकल्पात’ पंतप्रधान ट्रस यांनी करकपाती जाहीर केल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद देशाच्या भांडवली बाजारात उमटले. ट्रस यांच्या हुजूर पक्षातील अनेक खासदारांनीही करकपातीला विरोध केला होता.

भारतीय कुस्ती संघाला स्पेनचा व्हिसा नाकारला! ; २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेला मुकावे लागणार:

  • स्पेन दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताच्या २३ वर्षांखालील कुस्ती संघाला जागतिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेला सोमवारपासून स्पेनमधील पांटेवेद्रा येथे सुरुवात झाली.
  • या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाने ३० जणांची निवड केली होती. मात्र, स्पेन दूतावासाने व्हिसाबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने भारतीय खेळाडूंना या स्पर्धेस मुकावे लागले आहे. या सर्व घटनेबाबत भारतीय कुस्तीगीर महासंघाने निराशा व्यक्त केली आहे. ‘‘भारताच्या सर्व खेळाडूंची आवश्यक कागदपत्रे स्पेन दूतावासाकडे ४ ऑक्टोबरलाच जमा केली होती. मात्र, त्यांनी स्पर्धेच्या दिवसापर्यंत त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही आणि सोमवारी व्हिसा नाकारल्याचे सांगून सर्व कागदपत्रे परत केली,’’ असे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.
  • ‘‘कागदपत्रे जमा केल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमचे फोनही उचलले नाहीत आणि आमच्या ई-मेललाही उत्तर दिले नाही. त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आमच्या खेळाडूंना जागतिक स्पर्धेस मुकावे लागले आहे आणि आम्ही याची तक्रार जागतिक संघटनेकडे करणार आहोत,’’ असेही तोमर यांनी सांगितले.
  • भारतीय कुस्तीगीरांना जागतिक स्पर्धेसाठी व्हिसा नाकारण्याचा प्रसंग पहिलाच असला, तरी याचवर्षी इटली येथे झालेल्या मानांकन मालिकेतील स्पर्धेसाठीही भारतीय कुस्ती संघाला व्हिसा नाकारण्यात आला होता.
  • भारतीय कुस्तीगीर महासंघाने स्पेनविरुद्ध तक्रार करण्याची भूमिका घेतली असून, भविष्यात स्पेनला कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद न देण्याचे आवाहन करणार असल्याचे तोमर यांनी स्पष्ट केले.

एमचेस जलद बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशकडून कार्लसनचा पराभव:

  • भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने एमचेस ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगज्जेत्या मॅगनस कार्लसनला पराभूत केले आणि कार्लसनला पराभूत करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
  • चेन्नईचा गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना २९ चालींमध्ये विजय मिळवला. बारा फेऱ्यानंतर गुकेश पोलंडच्या यान-क्रिस्तोफ डूडा (२५ गुण) आणि अजरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्ह (२३ गुण) यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. गुकेशचे २१ गुण आहे. यापूर्वी १९ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीने कार्लसनला नमवले होते.एरिगेसीचे २१ गुण असून तो चौथ्या स्थानावर आहे.
  • कार्लसनला पराभूत करणारा गुकेश सर्वात युवा खेळाडू आहे. गुकेशचे वय १६ वर्षे, चार महिने आणि २० दिवस आहे. गेला विक्रम आर. प्रज्ञानंदच्या नावे आहे. प्रज्ञानंदने एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला नमवले, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे, सहा महिने आणि १० दिवस होते.
  •  विदित गुजराती १०व्या स्थानावर असून तो बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आदित्य मित्तम १२व्या स्थानी आहे. त्याने १२व्या फेरीत एरिगेसीला पराभूत केले होते, मात्र तो गेल्या तीन सामन्यात पराभूत झाला. पी. हरिकृष्णा १५व्या स्थानावर आहे.‘‘कार्लसनला पराभूत करणे हे विशेष असते, मी ज्या पद्धतीने खेळलो त्याने मी समाधानी आहे.’’ असे गुकेश विजय मिळवल्यानंतर म्हणाला.
  • गुकेश आणि कार्लसनमधील सामना चुरशीचा झाला. गुकेश नेहमी निर्भीडपणे खेळतो. कार्लसनने एक चूक केली आणि गुकेशने या संधीचा फायदा घेतला. गुकेशविरुद्ध खेळताना मलाही हा अनुभव आला आहे. प्रतिस्पर्ध्याने चूक केल्यास गुकेश त्याला पुनरागमनाची संधी देत नाही. या लढतीतही गुकेशने आपले कौशल्य दाखवले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.