२१ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ मार्च चालू घडामोडी

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा: लवलिना, साक्षी उपांत्यपूर्व फेरीत

 • ऑलिम्पिक पदकविजेत्या लवलिना बोरगोहेनसह साक्षी चौधरीने सोमवारी महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताची अन्य एक खेळाडू प्रीतीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.हरियाणाच्या २३ वर्षीय साक्षीने ५२ किलो वजनी गटात गतवर्षी आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या झजीरा उराकबाएवाचा आणि लवलिनाने मेक्सिकोच्या व्हेनेसा ऑर्टिझचा पराभव केला. दोघींच्या खेळात निर्विवाद वर्चस्व राहिल्याने पंचांना त्यांच्या बाजूने ५-० असा कौल देताना फारसा विचार करावा लागला नाही.
 • जागतिक स्पर्धेत प्रथमच वजन गट बदलून खेळणाऱ्या लवलिनाने पदकाचा रंग बदलण्याच्या मोहिमेस अपेक्षित सुरुवात केली. आतापर्यंत जागतिक स्पर्धेत कांस्यपदकावर समाधानी राहिलेल्या लवलिनाला आता सुवर्णपदकाची आस असून, सोमवारी लवलिनाचा खेळ तसाच झाला. उंचीने छोटय़ा असलेल्या व्हेनेसाला लवलिनाने सहज पराभूत केले. आपल्या उंचीचा फायदा घेत लवलिनाने व्हेनेसावर सातत्याने ‘पंचेस’ आणि ‘जॅब’चा वापर केला. बचाव करताना व्हेनेसाला दूर ठेवण्यात लवलिना यशस्वी झाली आणि तेथेच तिचा विजय निश्चित झाला.
 • त्याआधी साक्षीनने झजीराचा सहज पराभव केला. आक्रमक पवित्रा राखलेल्या साक्षीला दूर ठेवण्यासाठी झजीराने प्रयत्न केले. मात्र, साक्षीने पदलालित्याचे सुरेख प्रदर्शन करताना झजीराला कोंडीत पकडले.५४ किलो वजनी गटात प्रीतीला थायलंडच्या जुटामसकडून पराभवाचा सामना करावा लागला. पुढील फेरीत साक्षीची गाठ आता चीनच्या वू यू कीशी पडेल. लवलिनाचा सामना अग्रमानांकित ग्रामाने रेडी अॅडोसिंडाशी होईल.

Gudhipadwa 2023: कोण होता चष्टन क्षत्रप आणि काय आहे शालिवाहन शक?

 • हिंदू नववर्षाची सुरूवात शक संवत्सर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते. हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव ‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय समाजातील महत्त्व अबाधित आहे.

राजा चष्टनने केली शक संवत्सराची सुरुवात?

 • शक संवत्सर हे फाल्गुन महिन्यातील शेवटच्या अमावस्येनंतर चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्ल पक्षात सुरू होते आणि विक्रम संवत्सर हे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येनंतर वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होते. म्हणूनच या दोन्ही संवत्सरांनुसार नूतन वर्ष आपण तितक्याच आदराने साजरे करतो. बंगाल, तमिळनाडू, आसाम, ओडिशा, पंजाब आदि राज्यांची नववर्षे वैशाख महिन्यापासून सुरू होतात.
 • महाराष्ट्र, आंध्रप्रदेश या राज्यात शक संवत्सर हे ‘शालिवाहन शक’ या नावाने प्रसिद्ध आहे. उर्वरित भारतात प्राचीन लेखांमध्ये ‘शालिवाहन शक’ असा कुठलाही संदर्भ येत नाही. हे संवत्सर केवळ शक या नावानेच ओळखले जात होते. असे असताना महाराष्ट्र किंवा आंध्रप्रदेश या भागात ‘शालिवाहन शक’ असा संदर्भ गुढीपाडवा या सणाच्या उत्पत्ति मागे का देण्यात येतो? हे जाणून घेणे गरजेचे ठरते. ‘शक’ हे मूलतः पर्शिया (इराण) येथिल ‘सिथिया’ या भागातले होते. इसवी सन पूर्व काळात त्यांनी भारतात स्थलांतर केले. सिंध, राजस्थान मार्गे ते भारतात स्थायिक झाले. त्यांनी काही काळ कुषाण राजांचे अधिकारी म्हणून काम पाहिले आणि नंतर स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. म्हणूनच काही अभ्यासक शक संवत्सराचा कर्ता कुषाण राजा कनिष्क (प्रथम) असावा असे मानत होते. परंतु कालांतराने नव्याने उघडकीस आलेल्या पुरातत्वीय तसेच ऐतिहासिक पुराव्यांनुसार शक राजा ‘चष्टन’ यानेच इसवी सन ७८ मध्ये या संवत्सराची स्थापना केल्याचे बहुसंख्य अभ्यासक मान्य करतात.

अखेर संप मागे! कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेबाबत नेमकं काय ठरलंय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत निवेदन

 • गेल्या सात दिवसांपासून राज्यभर शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. अखेर आज हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत आज झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूंनी चर्चा करून संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला. यासंदर्भात कर्मचाऱ्यांची मागणी तत्वत: मान्य करण्यात आल्याचं कर्मचारी संघटनांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी सांगितलं. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसमवेत झालेल्या बैठकीबाबत निवेदन सादर केलं. तसेच, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं. “राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना यांच्या वतीने १४ मार्च २०२३ पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने २८ मार्चपासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिव स्तरावर व माझ्या स्तरावर संबंधित संघटनेचे पदाधिकारी व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
 • “१३ तारखेलाही मी, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. आज माझ्यासमवेत संबंधित संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेनं घेतलेल्या निर्णयाचा मी स्वागत करतो. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असून यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल”, असं एकनाथ शिंदे यावेळी आपल्या निवेदनात म्हणाले.

रामदेव बाबा आता पतंजलीमध्ये संन्यास शिकवणार! इच्छुकांना केलं आवाहन, अट फक्त एकच..१२वी पास!

 • २०१२ साली दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून रामदेव बाबा व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. रामदेव बाबांच्या पतंजलीची एकूण उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जातं. आज देशभरात लाखो लोक पतंजली आणि रामदेव बाबांचं मार्गदर्शन घेतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडित किंवा सभोवताली येणाऱ्या अनेक गोष्टी किंवा वस्तूंपैकी अनेक वस्तूंचं उत्पादन रामदेव बाबांच्या पतंजलीमध्ये होतं. पण आता रामदेव बाबांनी एक विलक्षण आवाहन लोकांना केलं आहे. रामदेव बाबा त्यांच्या पतंजलीमध्ये आता संन्यासी बनण्याचं प्रशिक्षण देणार आहेत!
 • बाबा रामदेव यांच्या आयुर्वेदिक औषध आणि उत्पादनांचा फार मोठा चाहता वर्ग आज देशात आणि काही प्रमाणात परदेशातही अस्तित्वात आहे. पण आता इच्छुक उमेदवारांना संन्यास शिकवण्याचा निर्णय रामदेव बाबांनी घेतला आहे. पतंजलीकडून त्यासंदर्भात तशी जाहिरातच प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये महिला किंवा पुरुष अशा कुणालाही संन्यासी व्हायचं असेल, तर त्याचं प्रशिक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

अट फक्त एकच…१२वी पास!

 • ज्यांनी कुणी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे किंवा ज्यांची कुणाची इच्छा असेल, त्यांना प्रशिक्षित केलं जाईल, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पण यासाठी शिक्षणाची अट मात्र घालण्यात आली आहे. कोणताही इच्छुक उमेदवार किमान १२वी पास असायला हवा, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. येत्या २२ मार्चपासून ३० मार्चपर्यंत पतंजलीकडून संन्यास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये या सर्व इच्छुकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ३० मार्चला महोत्सवाच्या शेवटी यातल्या १०० लोकांना संन्यास दीक्षा दिली जाईल. अर्थात, हे सर्व ‘संन्यासी’ म्हणून घोषित होतील!

भारतातल्या १ लाख कोटींच्या ‘शत्रू मालमत्ते’ची विक्री होणार, सर्वाधिक मालमत्ता उत्तर प्रदेशात, तर महाराष्ट्रात

 • आजवर अनेक बँकांकडून जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री झाल्याचं आपण ऐकलं असेल. अशा मालमत्तांच्या विक्रीमधून बँका आपल्या कर्जाची आणि व्याजाची रक्कम वसूल करत असतात. याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर सरकारकडून काही मालमत्तांची किंवा संपत्तीची विक्री केली जाते. ही संपत्ती कर्जदारांची नसून ‘शत्रू मालमत्ता’ असते. अशा तब्बल १ लाख कोटी रुपये किंमतीच्या शत्रू मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने नुकतीच सुरू केली असून त्यापैकी सर्वाधिक मालमत्ता उत्तर प्रदेशमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

‘शत्रू मालमत्ता’ म्हणजे नेमकं काय?

 • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानमध्ये किंवा चीनमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांची किंवा फर्म-कंपन्यांची मालमत्ता भारताकडून शत्रू मालमत्ता किंवा संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात भारत सरकारने १० सप्टेंबर १९५९ रोजी पहिला अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर १८ डिसेंबर १९७१ रोजी दुसरा आदेश जारी करण्यात आला. शत्री देशात राहणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता किंवा संपत्ती म्हणजे शत्रू मालमत्ता/संपत्ती या अर्थाने या सर्व मालमत्तांचा केंद्र सरकारकडून लिलाव करण्यात येतो.

१२ हजार ६११ मालमत्ता!

 • केंद्र सरकारने गेल्या वर्षी यासंदर्भातली प्रक्रिया सुरू केली होती. यामधे आजतागायत भारत सोडून पाकिस्तान किंवा चीनमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मालमत्तांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आजघडीला तब्बल १२ हजार ६११ शत्रू मालमत्ता आहेत. याची अंदाजे किंमत १ लाख कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. या मालमत्ता सध्या कस्टोडियन एनेमी प्रॉपर्टी ऑफ इंडियाच्या (CEPI) ताब्यात आहेत.

प्रो लीग हॉकी (पुरुष) – भारतीय संघाची अर्जेटिनावर मात:

 • मनदीप सिंगने अखेरच्या मिनिटात झळकावलेल्या गोलच्या जोरावर भारताने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये अर्जेटिनावर ४-३ अशी सरशी साधली. या दोन संघांमध्ये शनिवारी झालेल्या लढतीत भारताला शूटआऊटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. मात्र, रविवारी भारताने या पराभवाची परतफेड केली.
 • या सामन्यात भारताकडून जुगराजने (२० आणि ५२ वे मिनिट) दोन गोल मारले. तर, हार्दिक सिंगने (१७ वे मि.) एक गोल झळकावला. मनदीपने सामना संपायला केवळ २६ सेकंद शिल्लक असताना निर्णायक गोल मारला. अर्जेटिनाकडून डेला टोरे निकोलस (४० वे मि.), डोमेन टॉमस (५१ वे मि.) आणि मार्टिन (५६ वे मि.) यांनी गोल केले. या विजयानंतर गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यांचे आठ सामन्यानंतर १६ गुण आहेत. अर्जेटिना चौथ्या स्थानी कायम असून त्यांचे सहा सामन्यात ११ गुण आहेत.
 • किलगा स्टेडियमवर पार पडलेल्या या लढतीतील दुसऱ्या सत्रात भारताने तीन मिनिटांच्या आत दोन गोल केले. तिसऱ्या सत्रात अर्जेटिनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने निकोलसने ४० व्या मिनिटाला गोल केला. चौथ्या सत्रात दोन्ही संघांनी मिळून चार गोल मारले. जुगराजने गोल मारत भारताची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. अर्जेटिनाने सलग दोन गोल मारत सामना बरोबरीत आणला. पण, मनदीपने निर्णायक क्षणी गोल मारत सामना भारताच्या बाजूने झुकवला.

एन. बिरेन सिंह यांची पुन्हा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी निवड:

 • एन. बिरेन सिंह हेच दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री राहतील, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी इंफाळमध्ये जाहीर केले.
 • भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाने सिंह यांची आपले नेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे भाजपने केंद्रीय निरीक्षक म्हणून मणिपूरला पाठवलेल्या सीतारामन यांनी सांगितले.
 • मणिपूर विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, बिरेन सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार विश्वजित सिंह हे दोन प्रतिस्पर्धी नेते केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी दोन वेळा दिल्लीला गेले होते. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी आपल्यात मतभेद असल्याचा इन्कार केला असला, तरी त्यांचे हे प्रयत्न म्हणजे मुख्यमंत्रिपदासाठी दबावतंत्र (लॉबिंग) असल्याचे मानले गेले.
 • १० दिवसांच्या अनिश्चिततेनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक व नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली.  सीतारामन यांच्यासह सह-निरीक्षक आणि केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू हे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी इंफाळला पोहचले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या सभागृहात ३२ जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे.

कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा ८ ते १६ आठवडय़ांदरम्यान ; ‘एनटीएजीआय’ची शिफारस:

 • करोनाच्या कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर ८ ते १६ आठवडय़ांच्या दरम्यान देण्याची शिफारस लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (‘एनटीएजीआय’ने) केली आहे. सध्या कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर १२ ते १६ आठवडय़ांदरम्यान देण्यात येते.
 • लसीकरणाबाबतची देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘एनटीएजीआय’ने केलेली ‘कोव्हिशिल्ड’बाबतची ही शिफारस अद्याप लागू करण्यात आलेली नाही. परंतु, अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत निर्णय घेतल्यास देशातील सहा ते सात कोटी लोकांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा वेगाने देता येईल.
 • कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांमधील कालावधी कमी करण्याबाबतची ‘एनटीएजीआय’ची नवी शिफारस अलीकडील जागतिक शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा आठ आठवडय़ांनी दिली काय किंवा १२ ते १६ आठवडय़ांच्या अंतराने दिली काय, निर्माण होणारी प्रतििपडे (अँटिबॉडीज रिस्पॉन्स) जवळजवळ समान असतात, असे या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.
 • ‘एनटीएजीआय’च्या शिफारशींच्या आधारे सरकारने १३ मे २०२१ रोजी कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर ६ ते ८ आठवडय़ांवरून १२ ते १६ आठवडय़ांपर्यंत वाढवले होते.

तेल आयातीच्या भारताच्या ‘स्वतंत्र’ धोरणाचे इम्रान खान यांच्याकडून कौतुक:

 • अमेरिकेच्या निर्बंधांची तमा न बाळगता भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याचे सांगून, ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे’ पालन करत असल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारताची प्रशंसा केली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे कडवे टीकाकार असलेले खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभरून कौतुक केले.
 • आपला शेजारी देश असलेल्या भारताचे ‘स्वतंत्र परेराष्ट्र धोरण’ असल्याबद्दल आपण त्याची प्रशंसा करू इच्छितो, असे खैबर- पख्तुन्ख्वा प्रांतात एका जाहीर सभेत केलेल्या भाषणात खान यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून सांगितले.
 • ‘क्वाड’चा भाग असलेल्या भारताने अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही रशियाकडून तेलाची आयात केली, असे ते म्हणाले. आपले परराष्ट्र धोरण पाकिस्तानच्या लोकांना धार्जिणे असल्याचेही पंतप्रधान खान यांनी नमूद केले. ‘मी कुणासमोर झुकलेलो नाही आणि माझ्या देशालाही झुकू देणार नाही’, असे येत्या आठवडय़ात संसदेत विश्वासदर्शक ठरावापूर्वी जनमताचा पाठिंबा मिळवू पाहणाऱ्या खान यांनी सांगितले.

भारतात ‘या’ ठिकाणी आहे चिमणीला समर्पित जगातील एकमेव फलक:

 • जागतिक चिमणी दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील अनेक देशांमध्ये चिमण्या आढळतात. लोकांमध्ये जागरूकता आणि चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वाढत्या प्रदूषणासह अनेक कारणांमुळे चिमण्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु निसर्ग आणि सर्व सजीवांबद्दलचे प्रेम प्रकट करण्यासाठी अहमदाबादमधील ढल नी पोल, अस्टोडिया येथील एका चिमणीला समर्पित एकमेव फलक आहे.
 • IFS अधिकांऱ्याची पोस्ट – IFS अधिकारी परवीन कासवान यांनी पोस्ट करत याविषयी माहिती दिली. ते लिहतात की, ” आज #WorldSparrowDay आहे. ज्यांची गाणती दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण आज एक अनोखी गोष्ट शेअर करायची आहे. चिमणीला समर्पित जगातील एकमेव फलक अहमदाबादमध्ये आहे. मार्च १९७४ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेल्या चिमणीला समर्पित हा फलक आहे. लोक सुंदर असतात!!”
 • संरचनेच्या वरच्या भागात इंग्रजी आणि गुजराती दोन्ही भाषेत कोरलेले संदेश आहेत, तर संरचनेच्या खालच्या भागात चिमणीचे एक लहान शिल्प आहे, पानांभोवती पुष्पहार आहे.
 • जगात कदाचित अहमदाबाद हे एकमेव ठिकाण आहे जिथे चिमणीची आठवण करून देणारा हा फलक आहे. या पोस्टबद्दल हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे चिमणीच्या मृत्यूची वेळ आणि कारणे यांविषयीचे सूक्ष्म तपशील नमूद केले आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.