Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२१ सप्टेंबर चालू घडामोडी
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारचं सतर्कतेचं आवाहन; मार्गदर्शक सूचना केल्या जारी!
- भारत व कॅनडा यांच्यातील वाद हळूहळू वाढू लागला आहे. हरदीपसिंग निज्जर याच्या हत्याप्रकरणावरून दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत असून आपापल्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करत आहेत. या वादात आधी दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता आपापल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. आधी कॅनडानं आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन केलं असताना आता भारतानं कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तिथल्या परिस्थितीसंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
- जून महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भारताचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं भारताच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. उत्तरादाखल भारत सरकारनं हे सर्व आरोप फेटाळतानाच कॅनडातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं नमूद करत कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.
- दुसऱ्याच दिवशी कॅनडानं आपल्या नागरिकांसाठीच्या प्रवासासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करत त्यात जम्मू-काश्मीरचा मुद्दा समाविष्ट केला. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न असून तिथे प्रवास करताना खबरदारी घेण्याची सूचना कॅनडा सरकारनं नागरिकांना केली. कॅनडाच्या या कृतीवर भारताकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते? याकडे लक्ष लागलेलं असतानाच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचनापत्र जारी केलं आहे.
कॅनडातील भारतीयांसाठी काय आहेत सूचना?
- अरिंदम बागची यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सूचनांचं परिपत्रक ट्वीट केलं आहे. “कॅनडातील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना”, असं या पत्रकाच्या सुरुवातीलाच नमूद केलं आहे.
_
आता जंगलातला वाघ अवघ्या ३० सेकंदात मोबाईल आणि संगणकावर येणार, काय आहे हे ‘ट्रेलगार्ड एआय’ तंत्रज्ञान
- भारतातील वाघांच्या अधिवासातील मानव-वन्यजीव संघर्षाचे आव्हान वाढत असतानाच आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा अलर्ट तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे.
- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, ग्लोबल टायगर फोरम, रिझॉल्व्ह ही स्वयंसेवी संस्था आणि क्लेमसन युनिव्हर्सिटीने ‘ट्रेलगार्ड एआय’ या नावाने ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान तयार केले आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येणे साेपे होणार आहे.
- भारतातील वाघांची संख्या वेगाने वाढत आहे. इतरही वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी संरक्षित क्षेत्राबाहेर जायला लागले आहेत. २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार, भारतात तीन हजार ६८२ वाघ आहेत. जगभरातील वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. यातील २६ टक्के वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर म्हणजेच संरक्षित क्षेत्राच्या सीमेवर आणि बफर क्षेत्रात आढळतात. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षावर अजूनही आळा घालता आलेला नाही. या संघर्षात माणसे, पाळीव जनावरे जखमी होतात, मृत्युमुखी पडतात. त्यामुळे गावकरी वाघांना मारण्यासाठी विषप्रयोग, वीजप्रवाह यासारख्या गोष्टींचा वापर करतात. हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनेच नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
- उत्तर भारतातील कान्हा-पेंच आणि तेराई-आर्क या सर्वाधिक वाघ असणाऱ्या लँडस्केपमध्ये आणि जवळपास पाच व्याघ्रप्रकल्पांमध्ये मे २०२२ पासून ‘ट्रेलगार्ड एआय’ वापरण्यात येत आहे. भारतात या प्रणालीची चाचणी घेण्यापूर्वी हे नवीन तंत्रज्ञान दक्षिण आफ्रिकेत प्रभावीपणे वापरण्यात आले. सुरुवातीला हे तंत्रज्ञान जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, त्यात आणखी संशोधन केल्यानंतर हत्ती, गेंडा, अस्वल, रानडुक्कर यासारखे सर्व प्राणी तसेच पक्ष्यांच्या प्रतिमादेखील यात टिपल्या जातात, हे स्पष्ट झाले. हे तंत्रज्ञान वाघांचा अधिवास असणाऱ्या राज्यांमध्ये उपयुक्त ठरू शकते.
- वन्यजीव संरक्षणासाठीदेखील ते उपयुक्त ठरू शकते. एवढेच नाही तर २४ बाय ७ ते काम करत असल्याने वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी फिरणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना ज्या मर्यादा येतात, त्याही याद्वारे टाळल्या जाऊ शकतात.
बाप्पांची आरती ‘सुखकर्ता दुखहर्ता’चे रचियता कोण? असा आहे इतिहास व अर्थ
- प्रत्येक कार्यात पहिल्या पूजेचा मान श्री गणेशाचा असतो. तो सगळ्यांचा प्रमुख आहे. बुद्धीचा देवता, विघ्नहर, संकटमोचक असलेल्या बाप्पाला भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पुजले जाते.
- ‘सुखकर्ता दुखहर्ता’ म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा हे श्री गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. ही आरती नित्य पूजेतही म्हटली जाते, ‘जोगिया’ रागात ही आरती रचली आहे. विशेष म्हणजे देशी भाषेमध्ये या आरतीची रचना करण्यात आली आहे.
- सुख देणारा, दुःख हरण करणारा असा हा गजानन त्याची कृपा झाली की प्रेमाचा वर्षाव भक्तावर करतो. सर्वांगाला उटी शेंदूराची लावलेली आहे. त्याच्या कंठात मोतयांची माळ आहे. हे देवा तुझा जयजयकार असो. तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
- तुझ्या कपाळावर रत्नजडित मुकूट आहे. कुंकू केशर, मिश्रित चंदनाची उटी लावलेली आहे. हिरे जडीत मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसतो. तसेच पायात घुंगरांचे वाळे असल्यामुळे मधुर मंजुळध्वनी रुणझुणत आहे.
- मोठे पोट आणि पीतांबर नेसलेला अशा तुझ्या कमरेला नागाचा करगोटा आहे. तिन नेत्र असलेला, सरळ सोंड वाकडे तोंड असा तुझा अवतार मनमोहक आहे. अशा देवा मी तुझा दास माझ्या घरी आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वांकडून पुजला जाणारा तु मला प्रसन्न हो.
- असा या आरतीचा संक्षिप्त अर्थ असून हे पद समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिले आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून समर्थांना ही आरती लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे मानले जाते.
तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…
- बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबरला संपली. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते.
- एकूण परीक्षेची ५७ सत्रे झालीत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये निकालाची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आहे.
नंबर १ मोहम्मद सिराज! आशिया कपमधील कामगिरीचे मिळाले बक्षीस, शुबमनचेही होणार…
- भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सिराजने हनुमान उडी घेत पहिले स्थान पटकावले आहे, त्याला आठ स्थानांचा फायदा झाला. तो थेट नवव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेला. आशिया कप फायनलमध्ये जबरदस्त गोलंदाजीचा फायदा सिराजला झाला. त्याने अंतिम सामन्यात २१ धावांत सहा विकेट्स घेतल्या.
- टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ज्याला ‘मिया’ म्हणून लाडाने ओळखतात असा मोहम्मद सिराज वन-डे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या जादुई कामगिरीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला पहिल्या स्थानावरून मागे खेचतत आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. सिराजने हे स्थान दुसऱ्यांदा मिळवले आहे.
- मोहम्मद सिराजने याआधी याच वर्षी जानेवारीत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही पहिले स्थान पटकावले होते, त्यानंतर मार्चमध्ये जोश हेझलवूडने त्याची जागा घेतली होती. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप फायनलमध्ये सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे त्याला बक्षिस मिळाले आहे. या गोलंदाजाने आशिया कपमध्ये एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिचेल स्टार्क सारख्या गोलंदाजांनाही मागे टाकले आहे.
- अफगाणिस्तानचे फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि राशिद यांनी एकदिवसीय क्रमवारीतील गोलंदाजांमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सुधारणा केली आहे. सिराज व्यतिरिक्त, अव्वल १० मध्ये फक्त दोनच गोलंदाज होते ज्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने क्रमवारीत बरीच प्रगती केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला महाराजांनी शेवटचे तीन सामने जिंकून मालिका काबीज करण्यास मदत केली. या डावखुऱ्या फिरकीपटूने पाचव्या एकदिवसीय सामन्यात ३३ धावांत चार विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने एकूण आठ विकेट्स घेतल्या. तो सध्या १५व्या स्थानावर आहे. त्याची एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २० सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १९ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १८ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १७ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १६ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |