२२ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२२ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |22 February 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२२ फेब्रुवारी चालू घडामोडी

वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक; भारतीय फलंदाज शुभमन गिलचे वक्तव्य

  • इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तीनही कसोटी सामन्यांत खेळपट्टी या फिरकी गोलंदाजांनाच मदत करणाऱ्या होत्या. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत होती. पण, यानंतरही महत्त्वाच्या क्षणी भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेली कामगिरी हीच खऱ्या अर्थाने निर्णायक होती, असे भारतीय फलंदाज शुभमन गिलने सांगितले.
  • तीन सामन्यांत आतापर्यंत अश्विन (११), रवींद्र जडेजा (१२), कुलदीप यादव (८) आणि अक्षर पटेल (५) यांनी एकत्रित ३६ गडी बाद केले आहेत. वेगवान गोलंदाजांनी २२ गडी बाद केले आहेत. हे आकडे फिरकी गोलंदाज आणि गोलंदाजीची ताकद दाखवून देत असले, तरी ते फक्त आकडे आहेत. वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी करून भारतीय संघाचे पाऊल पुढे ठेवले, असे गिल म्हणाला.
  • चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाल्यावर पहिल्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गिलने फिरकी आणि वेगवान गोलंदाजीची तुलना केली. ‘‘जेव्हा आपण भारतात खेळतो तेव्हा खेळपट्टी फिरकीला साथ देणार हे निश्चित असते. अश्विन, जडेजा गडी बाद करणारच. पण, अशा खेळपट्टीवर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपली छाप पाडली हे विसरून चालणार नाही. त्यांच्या गोलंदाजीमुळे नक्कीच फरक पडला,’’असे गिलने सांगितले.
  • ‘‘चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली असली, तरी अन्य गोलंदाज कामगिरी उंचावण्यात सक्षम आहेत. मोहम्मद सिराज जबाबदारी घेण्यात सक्षम आहे. राजकोटमध्ये त्याने चार गडी बाद केले होते. विशेषत: भारतीय हवामानात गोलंदाजी करण्याचा अनुभव त्यालाही आहे,’’असेही गिल म्हणाला.
  • ‘‘विराट नसल्याचा फायदा उदयोन्मुख फलंदाजांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी झाला. पण, ही मिळालेली संधी त्यांच्याबरोबर फार काळ राहणार नाही, ही कल्पना देखील त्यांना होती. त्यामुळे प्रत्येक संधीचे सोने कसे करता येईल हा विचार नवोदित खेळाडूंनी केला. यशस्वीने तर ही संधी जणू दोन्ही हाताने साधली असे म्हणता येईल. लागोपाठच्या सामन्यात द्विशतक झळकावणे सोपे नसते. तो खरच गुणी फलंदाज आहे,’’असे गिलने सांगितले. यशस्वीने विशाखापट्टणम व राजकोट कसोटीत द्विशतक झळकावत आपली छाप पाडली. त्यामुळे रांची येथील सामन्यातूनही त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

विरारच्या हार्दीक पाटीलचे यश, अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण

  • विरारच्या हार्दिक पाटील याने अमेरिकेत झालेली अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा ही विक्रमी वेळेत पूर्ण करून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. ३१ तास ४६ मिनिटांंत त्याने ही तीन दिवसांतील स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारा हार्दीक १९ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • दरवर्षी अमेरिकेत अल्ट्रामॅन स्पर्धा ही ३ दिवस आयोजित केली जाते. त्यात १० किलोमीटर जलतरण, ४२० किलोमीटर सायकलींग आणि ८५ किलोमीटर धावण्याचा समावेश असतो. या स्पर्धेत दिवसाला १२ तासा प्रमाणे खेळाडूंना ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यंदाची स्पर्धा ९ ते ११ फेब्रुवारी या कालवाधीत अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात पार पडली. या स्पर्धेत १७ देशातील ४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात ६ भारतीय स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील केवळ ४ स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकले. हार्दीक पाटील याने ३१ तास ४६ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली.

..असा केला विक्रम

हार्दिकेने पहिल्या दिवशी ४ तास ५ मिनिटांत स्विमिंग आणि ५ तास २० मिनिटांत १४५ किलोमीटर सायकलींग पूर्ण केली. दुसर्‍या दिवशी १० तास ४५ मिनिटांता २७५ किलोमीटर सायकलींग तर तिसऱ्या दिवशी ११ तास १० मिनिटांत ८५ किलोमीटर धावण्याचे अंतर पार केले. तीन दिवसांत विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करणारा हार्दीक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. स्पर्धेच्या इतिसाहात आतापर्यंत केवळ १८ भारतीयांनीच ही स्पर्धी पूर्ण केली होती. यापूर्वी हार्दीकने जगभरात आर्यनमॅन स्पर्धा तसेच जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक विक्रमांची नोंद केली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ८ वेळा, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये ४ वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ६ वेळा नोंद केली आहे.

राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा

  • देशभरातच वातावरणाचे चक्र पूर्णपणे बिघडले असून हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून राज्यातील आठ जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे.
  • जानेवारीच्या अखेरीस किमान तापमानात घट झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा हवामान बदलले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीसह झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
  • राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असल्याचा अंदाज खात्याने व्यक्त केला आहे. येत्या २५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. २५ फेब्रुवारीला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील यासंबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

आरोग्य विभागाची राज्यात ३५ जिल्ह्यांत डे-केअर केमोथेरपी केंद्र! टाटा कर्करोग केंद्राबरोबर सामंजस्य करार…

  • देशात व राज्यात कर्करुग्णांची वेगाने वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यात कर्करोग निदान व उपचारासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत टाटा कॅन्सर सेंटर बरोबर सामंजस्य करार करून राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये कर्करोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २७ कर्करोग निदान रुग्णवाहिका घेण्यात येणार आहे.
  • गेल्या काही वर्षात देशात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून २०२२ मध्ये १४ लाख ५० हजार एवढे कर्करुग्ण होते, ते २०२५ मध्ये वाढून त्यांची संख्या १५ लाख ७० हजार एवढी होईल, अशी भिती नॅशनल कॅन्सर रजीस्ट्रीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशात २०१२ मध्ये सात लाख ८९ हजार लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये यात वाढ होऊन आठ लाख आठ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशभरात दररोज कर्करोगामुळे २६,३०० लोक मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासानाने देशपातळीवर कर्करोग निदान व उपचाराचा कार्यक्रम राबिवण्यास सुरुवात केली आहे.
  • महाराष्ट्रातही २०२० मध्ये कर्करोगाच्या एक लाख १६ हजार १२१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २०२५ पर्यंत एक लाख ३० हजार रुग्ण असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. राज्यात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण ४०.६ टक्के, तर महिलांमध्ये प्रमाण १५.६ टक्के आहे. याशिवाय पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.१० टक्के, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ८.४ टक्के तर प्रोस्टेट कर्करुग्णांचे प्रमाण ७ टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २९.९ टक्के, गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ११ टक्के, तर ओव्हरीच प्रमाण ६.०३ टक्के एवढे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कर्करुग्णांचे प्रमाण वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कर्करोग निदान व उपचाराच्या सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचाराबाबत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम तसेच जिल्हा रुग्णालयाअंतर्गत शल्यचिकित्सक, स्त्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक तसेच अन्य विशेषोपचार तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरोग्य विभागाने २०१८-१९ मध्ये दहा जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू केले होते. सध्या १३ जिल्ह्यांमध्ये ही सुविधा असून आगामी काळात ३५ जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. यादृष्टीने आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना टाटा कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या राज्यात अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड व नंदुरबार या ठिकाणी डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू असून राज्यातील सुमारे सव्वालाख कर्करुग्णांचा विचार करून या योजनेचा विस्तार करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय

  • मराठा आरक्षणासाठीचा कायदा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे करण्यात आला होता. याउलट, कौटुंबिक उत्पन्न आणि इतर आर्थिक मागासलेपणाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) दहा टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. परिणामी, दोन्ही कायद्यांत फरक असल्याने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईएसडब्ल्यू प्रवर्गातून न्यायीक सेवेत नियुक्ती देण्याची मागणी करणाऱ्या चार मराठा समाजाच्या याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नकार दिला.
  • याचिकाकर्त्यांनी एसईबीसी कायद्यांतर्गत अर्ज केला होता. त्यामुळे,सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा घटनाबाह्य ठरवल्याच्या आदेशानंतर याचिकाकर्त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून न्यायीक सेवेत नियुक्ती नाकारण्याचा सरकारचा निर्णय योग्य होता, असेही न्यायमूर्ती अनिल चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळताना नमूद केले. कनिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश आणि प्रथमश्रेणी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती नाकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. या पदांसाठी जाहिरात काढण्यात आली त्या तारखेला यचिकाकर्त्यांचे वय पात्रता वयापेक्षा जास्त होते व ते आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील आहेत या कारणास्तव त्यात सवलत मागू शकत नाही. त्यामुळे, या पदांसाठी त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही, असे राज्य सरकारतर्फे याचिकाकर्त्यांना कळवण्यात आले होते. त्याविरोधात याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उपरोक्त पदांसाठी १ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. वकिलांसाठी वयोमर्यादा तीन वर्षांच्या सरावासह ३५ वर्षे होती आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली क्षेत्रात नुकताच प्रवेश केलेल्यांसाठी वयाची मर्यादा ही २५ वर्षे होती. त्याचप्रमाणे, नियमानुसार उमेदवार मागासवर्गीय असल्यास वयोमर्यादा आणखी पाच वर्षांनी शिथिल केली जाईल, असे जाहिरातीत म्हटले होते.
  • दरम्यान, मराठा समाज मागास असल्याचे अधिसूचित करून राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देणारा कायदा केला. उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय योग्य ठरवला. मात्र, आरक्षणाची टक्केवारी १३ टक्के करण्याची सूचना केली. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले. सुरूवातीला या प्रकरणी अंतरिम आदेश देताना ९ सप्टेंबर २०२० नंतर सार्वजनिक सेवा आणि सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पदांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी केली जाऊ नये. परंतु त्याआधीच्या नियुक्त्या संरक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी उपरोक्त पदांसाठीची परीक्षा दिली व ते पात्रही ठरले. पुढे, २१ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण घटनाबाह्य ठरवून ते रद्द केले.

बारावी परीक्षेत एकही काॅपी सापडल्यास संबंधित शाळेवर फौजदारी कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

  • यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलणार असून परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एक जरी कॉपीचा प्रकार आढळून आला तर त्याची जबाबदारी संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या शाळेवर निश्चित करून थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
  • इयत्ता बारावी परीक्षेला बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे. इयत्ता बारावी परीक्षेला एकूण ११८ परीक्षा केंद्रांमधून ५५ हजार ५४१ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी परीक्षेचा पहिला पेपर देण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांची संबंधित परीक्षा केंद्रांवर परीक्षा दालन शोधण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षार्थ्यांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
  • जिल्हास्तरावर बारावी आणि दहावी परीक्षांसाठी एकूण १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या अधिनस्त स्वतंत्र भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना आणि दोन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे (डाएट) प्राचार्य, सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्या देखरेखीखालीही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
  • १ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८२ केंद्रांमधून ६५ हजार ७४९ विद्यार्थी बसणार आहेत. दोन्ही परीक्षांच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व परीक्षा केंद्रावर काॅपीमुक्त वातावरण राहण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती दिली.

वर्क फ्रॉम होम फायद्याचं की तोट्याचं? टीसीएसच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

  • करोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देऊ केली होती. या सुविधा अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहेत. या कंपन्यातील कर्मचारी देशातील कोणत्याही काना-कोपऱ्यात बसून काम करू शकतात. परंतु, कामाची ही पद्धत कर्मचारी आणि कंपन्यांच्या मुळावर येत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. दरम्यान याबाबत आता टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. क्रितिवासन यांनी या रिमोट (घरातून काम करण्याची सोय) पद्धतीचे काम बंद करण्याचे आवाहन केले आहे. कार्यालयात काम करताना वरिष्ठांचं काम पाहून इतर सहकारी काम शिकत असतात, असं त्यांनी यावेळी नोंदवलं. ते नॅसकॉम कार्यक्रमात बोलत होते.
  • “घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही. टीसीएस टीमवर्क आणि फेलोशिपला महत्त्व देते. करोना काळात ३०-४० टक्के कर्माचारी भरती करण्यात आली. परंतु, ते कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते कंपनीची मूल्ये आणि संस्कृती कशी आत्मसात करतील?” असाही प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला.
  • “वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी कसे काम करतात हे पाहून इतर कर्मचारी शिकत असतात. टीसीएस वर्क फ्रॉम होम पद्धतीला समर्थन देत नाही. कारण पारंपरिक कार्यालयीन वातावरणच सर्वात प्रभावी पद्धत आहे. आमचे सर्व कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येण्यास इच्छुक आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

टीसीएस कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यासाठी अल्टिमेटम

  • टीसीएसमध्येही करोनाकाळात वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली होती. परंतु आता जनजीवन सुरळीत झालेले असतानाही अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये परतले नाहीत. त्यामुळे कंपनीने अशा कर्मचाऱ्यांना अजून एकदा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एनजी सुब्रमण्यम यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, आम्ही संयम बाळगत आहोत. परंतु, कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात जावे लागेल अशी तत्वतः भूमिका घेतली आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना यावर अंतिम निर्णय पाठवला आहे. जर ते कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.