२४ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२४ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२४ एप्रिल चालू घडामोडी

लॉजिस्टिक निर्देशांकात भारताला वरचे स्थान; जागतिक बँकेच्या क्रमवारीत १३९ देशांत ३८ वा

  • जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) २०२३ अर्थात या वर्षांतील वस्तूपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापनातील कामगिरी निर्देशांकात भारताने १३९ देशांत ३८ वा क्रमांक मिळविला आहे.
  • तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांत मोठी गुंतवणूक केल्याचा परिणाम म्हणून या यादीत २०१८ मध्ये ४४ व्या क्रमांकावर असलेल्या भारताने यंदा त्याहून वरचे स्थान मिळविले. २०१४ मध्ये या यादीत भारत ५४ व्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत आता भारताने या क्षेत्रात विकासाची मोठी मजल मारली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मालवाहतुकीचा खर्च कमी करून २०२४-२५ पर्यंत अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान गतिशक्ती योजनेत विभिन्न विभागांना जोडणारा राष्ट्रीय महाआराखडा जाहीर केला होता. २०२२ मध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण अमलात आणले. यात वाहतुकीच्या अनेक अडचणींवर मात करून शेवटच्या टोकाला माल जलदरीत्या पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
  • जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, पायाभूत सुविधांच्या गुणांकनात भारताचा क्रमांक २०१८ मधील ५२ व्या क्रमांकावरून २०२३ मध्ये ४७ व्या क्रमांकापर्यंत सुधारला आहे. आंतरराष्ट्रीय नौकांतून होणाऱ्या माल वाहतुकीच्या बाबतीत २०१८ मध्ये ४४ व्या क्रमांकावर असलेल्या भारताची कामगिरी २०२३ मध्ये २२ व्या क्रमांकापर्यंत सुधारली आहे. लॉजिस्टिक क्षमता आणि समानता याबाबत भारताची कामगिरी चार स्थानांनी सुधारल्याने यंदा ४८ वा क्रमांक मिळाला आहे.
  • अडथळय़ांत घट : जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, मे आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये भारत आणि सिंगापूरमध्ये मालाचे कंटेनर खोळंबून राहण्याचा सरासरी कालावधी हा तीन दिवस होता. याच दरम्यान अमेरिकेत हा कालावधी सात, तर जर्मनीत दहा दिवसांचा होता. औद्योगिकीकरण झालेल्या काही देशांपेक्षा भारताची कामगिरी कितीतरी चांगली होती.

सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे ‘इस्रो’च्या ‘पीएसएलव्ही’द्वारे प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही) शनिवारी सिंगापूरच्या दोन उपग्रहांना नियोजित कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. ‘इस्रो’द्वारे ही माहिती देण्यात आली.‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’द्वारे सिंगापूरच्या या उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जबाबदारी घेण्यात आली होती. २२.५ तासांच्या उलटगणतीनंतर ४४.४ मीटर उंचीच्या प्रक्षेपकाने येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून दुपारी दोन वाजून १९ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.
  • ‘इस्रो’चे प्रमुख व अवकाश विभागाचे सचिव एस. सोमनाथ यांनी सांगितले, की या प्रक्षेपकाने दोन्ही उपग्रहांना त्यांच्या अपेक्षित कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. नियंत्रण कक्षातून बोलताना सोमनाथ यांनी अभिमानाने सांगितले, की ‘पीएसएलव्ही’ने आपल्या ५७ व्या मोहिमेत यश मिळवून पुन्हा एकदा विश्वासार्हता आणि व्यावसायिक मोहिमांसाठी क्षमता सिद्ध केली.मोहीम संचालक एस. आर. बिजू म्हणाले की, ही मोहीम अत्यंत अचूक पद्धतीने यशस्वी झाली.

वेळ, खर्चात बचत

  • ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, या मोहिमेतील ‘पीएसएलव्ही’ मध्ये अनेक वैशिष्टय़े आणि सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे प्रक्षेपकासाठीचा खर्च, तसेच त्याच्या जुळणीसाठीचा वेळ घटवला आहे. यामुळे आगामी काळात या वैशिष्टय़ांद्वारे ‘पीएसएलव्ही’ उत्पादनात आणि प्रक्षेपणात वाढ होण्यास मदत होईल.

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत; नेपोम्नियाशीची जेतेपदाकडे कूच,डिंगविरुद्ध दहावा डाव बरोबरीत

  • इयान नेपोम्नियाशीने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या दहाव्या डावात चीनच्या डिंग लिरेनला ४५ चालींअंती बरोबरीत रोखले. या निकालासह नेपोम्नियाशीने जगज्जेतेपदासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे.
  • रविवारी झालेल्या दहाव्या डावात काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या नेपोम्नियाशीला लिरेनला बरोबरीत रोखण्यात यश आले. त्यामुळे १४ डावांच्या जागतिक लढतीत नेपोम्नियाशी आता ५.५-४.५ अशा फरकाने आघाडीवर असून विजेतेपद मिळवण्यासाठी त्याला केवळ दोन गुणांची आवश्यकता आहे.
  • दहाव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या लिरेनने पुन्हा ‘इंग्लिश ओपिनग’ केली. यानंतर त्याने नेपोम्नियाशीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेपोम्नियाशीने संयम बाळगून योग्य चाली रचताना लिरेनला विजय मिळवण्यापासून रोखले.

एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटी रुपये रक्कम प्रलंबितच

  • राज्यात सत्ता परिवर्तन होऊन शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाले. मात्र, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची आर्थिक चाके अद्याप वेगवान झाली नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे.
  • राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची आर्थिक चाके वेगवान करण्यासाठी पुढील ४ वर्षांपर्यंत (३१ मार्च २०२४) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे राज्य सरकारने संपकाळात प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात सांगितले होते. मात्र, गेले ११ महिने राज्य सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) व उपदानाची ८०० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत.
  • तसेच, नुकतेच शासन निर्णयातून राज्य सरकारने जाहीर केले की, एसटी महामंडळाच्या दरमहा उत्पन्नातून वेतनासह इतर खर्च भागविण्यासाठी दर महिना जेवढ्या रकमेची तूट निर्माण होत आहे. तेवढी रक्कम महामंडळाला राज्य सरकारकडून अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल. मात्र, गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत सुमारे १,६०० कोटी रुपयांची तूट आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने राज्य सरकारला कळवले आहे. मात्र, ही तफावत रक्कम अद्याप एसटी महामंडळाला मिळालेली नाही, असे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

“एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!” डेटा लीक प्रकरणावरून अमित ठाकरेंची टीका, म्हणाले…

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलिग्राम लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्रं लीक झाल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय ही लिंक व्हायरल करणाऱ्यांकडे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मनसेच्या विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
  • महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी याबाबत फेसबूकवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण आजचं एमपीएससी डेटा लीक (MPSC Data Leak) प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसेच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी.
  • ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘डेटा खूप मौल्यवान आहे’ हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल.

नेमकं प्रकरण काय?

  • येत्या ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘ब’ आणि गट ‘क’ ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच एका टेलिग्राम चॅनलवरील लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रमाण पत्रांचा डेटा लीक झाला आहे. दरम्यान, “हा केवळ नमुना डेटा आहे. आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉग इन आयडी, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी, अशी बरीच माहिती उपलब्ध आहे. शिवाय संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आमच्याकडे उपलब्ध आहे”, असा दावा या लिंकद्वारे करण्यात आला आहे.

‘वंदे भारत’ निर्मितीच्या कामास लातूरमध्ये ऑगस्टपासून सुरुवात

  •  ‘आयव्हीएनएल’ आणि ‘जेएससी मेट्रो वॅगन नॅश’ या रशियातील मास्को येथील कंपनीबरोबर करार पूर्ण झाले असून, त्यांनी ‘वंदे भारत’च्या रेल्वे डब्यांच्या निर्मितीच्या निविदा भरल्या आहेत. जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये प्रत्यक्षात वंदे भारत रेल्वेचे डबे लातूर येथून निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. रविवारी त्यांनी डबेनिर्मितीच्या कारखान्यास भेट देऊन पाहणी केली.
  • दानवे म्हणाले, की सात वर्षांमध्ये १२० रेल्वे बाहेर पडतील. १२, १५, १८ व २५ रेल्वेंची बांधणी होईल या टप्प्याने काम होणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास पुन्हा ८० वंदे भारत रेल्वेचे काम हे लातूरच्या कारखान्यात होणार आहे. आतापर्यंत देशात वंदे भारतच्या डब्यातील आसन व्यवस्था बसण्यासाठी केलेली आहे.
  • लातूरच्या रेल्वे डबेनिर्मिती कारखान्यात ‘बर्थ’च्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या भागात छोटय़ा उद्योजकांना कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. टप्प्याटप्प्याने तो वाढत जाईल असा दावाही दानवे यांनी केला. लातूर डबेनिर्मिती कारखान्यामध्ये वंदे भारत रेल्वे निर्मितीचे कंत्राट ४० हजार कोटींचे असून, रेल्वेची ३५ वर्षे देखभाल-दुरुस्तीदेखील हीच कंपनी करणार आहे.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा: भारतीय पुरुष संघाला रिकव्‍‌र्ह प्रकारात रौप्यपदक

  • भारतीय पुरुष संघाला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रविवारी रिकव्‍‌र्ह प्रकारात शर्थीच्या प्रयत्नांनंतरही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनविरुद्धच्या लढतीत भारतीय पुरुष संघाला शूट-ऑफमध्ये पराभव पत्करावा लागला.भारताला १३ वर्षांनी या स्पर्धा प्रकारात जागतिक सुवर्णपदक मिळवण्याची संधी होती. मात्र, अतानू दास, तरुणदीप राय आणि धीरज बोम्मादेवरा यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे प्रयत्न अपुरे पडले.
  • अंतिम लढतीत एकवेळ ०-४ अशा पिछाडीवर असताना भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना ४-४ अशी बरोबरी साधली आणि सुवर्णपदकाचा निर्णय शूट-ऑफमध्ये नेला होता. शूट-ऑफमध्ये चीनच्या ली झोंगयुआन, क्वी झिआंगशुओ, वेई शाहोक्झु यांनी अचूक लक्ष्याच्या जवळ वेध साधत बाजी मारली.
  • धीरज बोम्मादेवराने पदार्पणातील विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक गटातही पदक मिळवले. संध्याकाळच्या सत्रात धीरजने वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२४ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.