२४ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२४ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 January 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२४ जानेवारी चालू घडामोडी

जगाला करोनाहून भयंकर रोगाचा धोका, ४८००० वर्षांपासून बर्फाखाली दबलेल्या ‘त्या’ विषाणूबाबत वैज्ञानिकांचा इशारा

  • करोना विषाणूने सलग दोन वर्षे जगभर थैमान घातलं होतं. दोन वर्षे टप्प्याटप्याने जगभर लॉकडाऊन लावण्यात आले. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. करोनातून जग सावरल्यानंतर करोनाचे इतर अनेक उपप्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये आढळले आहेत. अशातच आता नव्या विषाणूचं आव्हान निर्माण झालं आहे. आर्कटिक आणि इतर बर्फाळ प्रदेशांमधील बर्फाच्या डोंगरांखाली दबलेल्या विषाणूबाबत वैज्ञानिकांनी आरोग्य संघटनेला इशारा दिला आहे. द गार्डियनच्या अहवालानुसार वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिक पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे झॉम्बी विषाणू बाहेर निघू शकतो आणि यामुळे भयावह जागतिक आरोग्य आणीबाणी निर्माण होऊ शकते. ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू येथील बर्फाखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
  • पर्माफ्रॉस्ट ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर अथवा पृष्ठभागाच्या खाली गोठलेला बर्फाचा थर आहे. यामध्ये माती आणि वाळूदेखील असते. याच्याभोवती बर्फाचा मोठा थर असतो. परंतु, अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढू लागलं आहे. परिणामी जगभरातील अनेक प्रदेशांमधला बर्फ वितळू लागला आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या बर्फांखाली दबलेल्या काही विषाणूंचा धोकादेखील वाढला आहे.
  • या नव्या विषाणूंमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी सायबेरियामधील पर्माफ्रॉस्टचे काही नमुने घेतले आणि त्यावर काही प्रयोग केले. या संशोधनादरम्यान, बर्फाखाली दबलेल्या विषाणूची माहिती मिळाली आहे. संशोधन करणाऱ्या या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिकमध्ये आम्हाला सापडलेला विषाणू हजारो वर्षे बर्फाखाली दबला होता.
  • रॉटरडॅममधील इरास्मस मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञ मॅरियन कूपमॅन्स म्हणाल्या, पर्माफ्रॉस्टखाली कोणकोणते विषाणू दबले गेले असावेत, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. परंतु, आम्हाला वाटतं की, तिथे असे काही विषाणू आहेत जे या संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात. इथल्या विषाणूंमध्ये रोगांची मोठी साथ पसरवण्याची क्षमता असू शकते. जसे की पोलिओचा एक जुना व्हेरिएंट या प्रदेशात असू शकतो. येथून नवी आव्हाने निर्माण होऊ शकतात, असं मानूनच आपल्याला संशोधन करावं लागेल.

एलॉन मस्क यांनी भारतासाठी उठवला आवाज, UN च्या कारभारावर बोट ठेवत म्हणाले…

  • भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य नाही. कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताने अनेकदा आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यासाठी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी जगातल्या शक्तीशाली देशांना आरसा दाखवत भारताची पाठराखण केली आहे. मस्क म्हणाले, जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व न देणं हा वेडेपणा आहे.
  • एलॉन मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सयुंक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. परंतु, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना त्या जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व दिलेलं नाही. हा सगळा वेडेपणा आहे. परिषदेत आफ्रिका खंडातील देशांसाठी एक जागा असायला हवी.
  • मायकल आयजेनबर्ग यांच्या पोस्टवर रिप्लाय देत मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेविषयी आपलं मत मांडलं आहे. आयजेनबर्ग यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या एका वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरच मस्क यांनीदेखील आपलं मत मांडलं. अँटोनियो गुटेरेस यांनी आफ्रिकेसाठीच्या एका स्थायी सदस्यत्वावर भाष्य केलं होतं. यावर आयजेनबर्ग म्हणाले, मग भारताबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मला असं वाटतं की, सध्याची यूएन सुरक्षा परिषद बरखास्त करावी आणि नव्या नेतृत्वांसह नवीन समिती तयार करावी.
  • भारत हा गेल्या १६ वर्षांमध्ये आठ वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. तसेच भारत जी-४ समुहाचाही सदस्य आहे. जी-४ अशा देशांचा समूह आहे जो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी एकमेकांचं समर्थन करतो.

सुंदर, गोड, निरागस आणि लोभस भगवान रामाच्या मूर्तीचं नामकरण; पूजाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!

  • अयोध्येतील राम मंदिरात बहुप्रतिक्षित असा विलोभनीय सोहळा साजरा झाला. भगवान रामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भगवान रामाची एक झलक पाहण्याकरता रामभक्त आतूर झाले होते. श्रीरामाची मूर्ती कशी असेल, या मूर्तीची वैशिष्ट्य काय असतील, असं असंख्य प्रश्न रामभक्तांच्या मनात होते. अखेर भगवान रामाची मूर्ती आता अवघ्या देशासमोर आली आहे. कृष्णवर्णीय असलेली ही मूर्ती लोभस आणि सुंदर आहे. त्यामुळे या मूर्तीला साजेसं असं नावही ठेवण्यात आलं आहे. अयोध्येतील एका पूजाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
  • “२२ जानेवारीला अभिषेक करण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीला ‘बालक राम’ असे नाव देण्यात आले आहे . प्रभू रामाच्या मूर्तीला ‘बालक राम’ असे नाव देण्याचे कारण म्हणजे ही मूर्ती बालरुपातील आहे. पाच वर्षीय बालकाचे रुप या मूर्तीत आहे, अशी माहिती येथील पूजारी अरुण दीक्षित यांनी दिली. “जेव्हा मी पहिल्यांदा मूर्ती पाहिली, तेव्हा मी रोमांचित झालो आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा मी अनुभवलेल्या भावना शब्दांत सांगू शकत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.
  • अरुण दीक्षित हे वाराणसीचे असून त्यांनी आतापर्यंत जवळपास ५० ते ६० अभिषेक केले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा अभिषेक होता, असंही ते म्हणाले. त्यांनी १८ जानेवारी रोजी मूर्तीचे पहिले दर्शन घेतले. ५१ इंच आकारमानाची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यांनी ८४ सेकंदांच्या अभिषेक मुहूर्तावर अभिषेक केला. सेलिब्रिटी, खेळाडू, व्यापारी आणि उद्योगपतींसह सात हजारांहून हून अधिक पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्या बालकांशी पंतप्रधानांच्या गप्पा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वर्षांच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी मुलांशी संगीत, संस्कृती, सौरऊर्जा आणि क्रीडा यासारख्या विषयावर आपले विचारही मांडले. पंतप्रधानांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या अधिकृत निवासस्थानी या अनौपचारिक गप्पा रंगल्या. यावेळी त्यांनी मुलांना स्मरणिकाही दिल्या.
  • या वर्षी १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १९ मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये नऊ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. या बालकांनी दाखवलेले असामान्य धैर्य, कलात्मक पराक्रम, नावीन्यपूर्ण विचार आणि निस्वार्थ सेवा याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
  • मुलांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. तसेच त्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचीही संधी साधली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना, मोदी यांनी आपल्याला संगीताची आवड असल्याचे सांगितले. त्याचा ध्यानधारणेसाठी उपयोग होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षक भरती जाहिरातींबाबत आली मोठी अपडेट…

  • स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांना शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. जास्तीत जास्त रिक्त पदांसाठी ही मुदत २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत आता संपुष्टात आली असून, नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया २४ जानेवारीपर्यंत पूर्ण करता येणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत ३० हजार पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
  • त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांचे या भरती प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. संकेतस्थळावर जाहिराती प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा दिली जाणार आहे. मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतस्थळावर जाहिराती दिल्यानंतर सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.
  • त्यानंतर पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित जाहिराती पूर्ण करून तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णयानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रात देण्याची कार्यवाही करावी. दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

  • राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर  करण्यात आली. या  परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच  जाहीर झाली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
  • तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट  ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.
  • दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले आहेत. मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
  • महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती २०२३ मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा होता. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.” असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२४ जानेवारी  चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.