२५ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 25 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ ऑक्टोबर चालू घडामोडी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत कोहली सहावा:

 • ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून देणारी खेळी करताना विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या आघाडीवर सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत कोहली आता सहाव्या क्रमांकावर आला आहे. कोहलीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४,२१२ धावा असून, यात ७१ शतके आणि १२६ अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडच्या नावावर २४,२०८ धावा आहेत. यामध्ये ४८ शतके आणि १४६ अर्धशतकांचा समावेश आहे.
 • पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ ४ बाद ३१ असा अडचणीत असताना कोहलीने कमालीच्या धीरोदात्तपणे फलंदाजी करून भारताचा विजय साकार झाला. या संपूर्ण खेळीत कोहलीने दाखवलेला संयम, आक्रमकता आणि अखेरच्या षटकात बाईज धावा काढताना दाखवलेली समयसूचकता त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत सचिन तेंडुलकर (३४,३५७ धावा) आघाडीवर असून, त्यानंतर कुमार संगकारा (२८,०१६), रिकी पॉन्टिंग (२७,४८३), महेला जयवर्धने(२५,९५७) आणि जॅक कॅलिस (२५,५३४) यांचा क्रमांक येतो.
 • भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम – या विजयाने भारतीय संघाने कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक विजय मिळविण्याचा ऑस्ट्रेलियाचाही विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाने २००३ मध्ये ४७ सामन्यांत ३८ विजय मिळविले होते. भारताने या वर्षी ५६ सामन्यांत ३९ विजय मिळविले आहेत.

भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! ‘ऋषी’ ब्रिटनच्या गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार:

 • भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान असतील.
 • सत्ताधारी हुजूर पक्षाच्या ‘१९९२ समिती’ने सुनक यांना पक्षाचा नेता म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच सुनक आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. हंगामी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून ते पंतप्रधापदाचा पदाभार स्वीकारतील.
 • शर्यत जिंकलीच – ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. याआधी जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. त्या निवडणुकीत लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. मात्र पक्षाचा पाठिंबा गमावल्यामुळे तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. यावेळी मात्र हुजूर पक्षातील खासदारांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची शर्यत जिंकली आहे.

‘फिलिप्स’कडून जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय:

 • तंत्रज्ञान कंपनी फिलिप्सने एक निवदेन जारी करत लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा केली आहे. मागील काही महिन्यांपासून कंपनीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने उत्पादन घटले आहे. तसेच कंपनीच्या उत्पन्नावरही मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे हा कठीण निर्णय घेत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
 • फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ”कंपनीची उत्पन्न वाढवण्यासाठी आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. इच्छा नसतानाही आम्ही जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी कठीण आहे. मात्र, काही कारणास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे.
 • गेल्या काही महिन्यांपासून कंपनीला महागाई, करोना आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर पडला आहे. त्यामुळे नफा वाढवण्यासाठी आता आम्हाला आमच्या खर्चात कपात करावी लागणार आहे.”

क्षी जिनिपग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष ; माओ यांच्यानंतर सर्वाधिक प्रभावशाली नेते:

 • चीनच्या अध्यक्षपदी क्षी जिनिपग यांची रविवारी तिसऱ्यांदा निवड झाली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी त्यांची निवड झाली. ते तहहयात चीनच्या सत्तेवर राहतील, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची विक्रमी कामगिरी करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाईल.
 • पक्षाच्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे, की रविवारी झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनातील पहिल्या पूर्ण सत्रात जिनिपग यांची पक्षाच्या विसाव्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. जिनिपग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात केंद्रीय समितीचे २०३ सदस्य आणि १६८ वैकल्पिक सदस्य उपस्थित होते. या अधिवेशनात जिनिपग यांची केंद्रीय सैन्य आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली.
 • चीनमधील ‘क्षी युग’ म्हणून जिनिपग यांची कारकीर्द ओळखली जाईल. आपल्या नव्या कारकीर्दीची पुन्हा सुरुवात करण्यासाठी जिनिपग स्थानिक व परदेशी प्रसारमाध्यमांसमोर रविवारी उपस्थित झाले. जिनिपग यांच्या आधी, माओंचा अपवाद वगळता, जिनिपग यांच्या आधी चीनच्या सर्व अध्यक्षांनी दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर निवृत्त होण्याचा नियम पाळला होता. मात्र जिनिपग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याने हा संकेत संपुष्टात आला. जिनिपग २०१२ मध्ये प्रथम निवडून आले होते. त्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ या वर्षी संपणार होता.
 • पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाणारे नेते पंतप्रधान ली क्विंग यांच्यासह अनेक उदारमतवादी नेते शनिवारी पक्षाच्या ३०० सदस्यीय केंद्रीय समितीत स्थान मिळवू शकले नाहीत. चीनच्या साम्यवादी पक्षाच्या पाच वर्षांतून एकदा होत असलेल्या महाअधिवेशनात त्यांची केंद्रीय समितीवर निवड झाली नाही. समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत २५ सदस्यीय राजकीय समितीची निवड करण्यात आली. या समितीने सात सदस्यीय स्थायी समितीची निवड केली. या स्थायी समितीने जिनिपग यांची पाच वर्षांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी सरचिटणीस म्हणून निवड केली.
 • शनिवारी अपेक्षेनुसार जिनिपग यांची शनिवारी केंद्रीय समितीने निवड केली. त्यानंतर राजकीय व स्थायी समितीत त्यांची सहज निवड झाली. या महाअधिवेशनात पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून, तिची मूळ स्थिती पुन्हा लागू करण्यात आली. त्यानुसार जिनिपग यांचे निर्देशांचे पालन करणे सर्व पक्षसदस्यांसाठी बंधनकारक ठरणार आहे. 

‘इस्रो’ची व्यावसायिक यशाची दिवाळी – ‘एलव्हीएम३-एम२’द्वारे ब्रिटिश कंपनीचे ३६ दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित:

 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपक ‘एलव्हीएम ३-एम२’चे रविवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ब्रिटिश कंपनीचे ३६ ब्रॉडबँड दूरसंचार उपग्रह यशस्वीरीत्या पूर्वनिश्चित कक्षांमध्ये पोहोचवण्यात आले. ‘इस्रो’ने आपल्या पहिल्याच व्यावसायिक मोहिमेत हे यश मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ब्रिटनची कंपनी वनवेब लिमिटेडने या मोहिमेसेठी ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडशी (एनएसआयएल) करार केला होता. वन वेब लिमिटेड ही अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेले जगभरात दूरसंचार जाळे असलेली कंपनी आहे. ती सरकारी सेवा आणि उद्योगांना इंटरनेट सेवा प्रदान करते.
 • भारती एंटरप्रायझेस ही ‘वन वेब’मधील प्रमुख गुंतवणूकदार आहे. ‘इस्रो’ व त्याची व्यावसायिक शाखा ‘एनएसआयएल’सोबत भागीदारी असल्याने २०२३ पर्यंत भारतात दूरसंचार सेवा प्रदान करणार आहोत असे ‘वन वेब’ने सांगितले. मात्र, या नव्या मोहिमेतील यशानंतर रविवारी पहाटे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी जाहीर केले, की ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञांसाठी दिवाळी लवकर सुरू झाली आहे.
 • ‘इस्रो’ने ‘ट्वीट’ केले, की ‘एलव्हीएम २ एम२/वन वेब इंडिया-१’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. सर्व ३६ उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचवले आहेत. श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रातून रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे ७५ मिनिटांनी सर्व ३६ उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले. ‘एलव्हीएम’ हा उपग्रह प्रक्षेपक आठ हजार किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला ‘इस्रो’चा सर्वात वजनदार प्रक्षेपक आहे.
 • सोमनाथ म्हणाले, की या यशामुळे सतीश धवन अवकाश केंद्रात दिवाळी साजरी करणे सुरू झाले आहे. उपग्रह कक्षेत स्थिर होण्याची प्रक्रिया वेळ घेते. ‘इस्रो’चे माजी प्रमुख के. सिवन आणि ए. एस. किरणकुमार आणि ‘भारती एंटरप्रायझेस’चे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल आदींनी नियंत्रण कक्षातून हे प्रक्षेपण पाहिले.या मोहिमेचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन करताना, सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या यशाचे श्रेय दिले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.