२९ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२९ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |29 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२९ डिसेंबर चालू घडामोडी

पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या सीयूईटी- पीजी परीक्षेची नोंदणी सुरू… जाणून घ्या सविस्तर…

 • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (सीयूईटी-पीजी) ही परीक्षा ११ ते २८ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 • सीयूईटी-पीजी परीक्षेच्या नोंदणीबाबतची माहिती एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे सोयीचे होण्यासाठी सीयूईटी-पीजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
 • एनटीएने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २४ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर २५ जानेवारीपर्यंत शुल्क भरता येणार आहे. ७ मार्च रोजी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता, शुल्क आणि अन्य माहिती https://nta.ac.in/, https://pgcuet.samarth.ac.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जानेवारीपर्यंत तलाठी भरतीचा निकाल लागणार! आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; १६ हजार जणांचे आक्षेप

 • बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार अशी शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.
 • तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती.
 • संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली.

टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार; जानेवारीमध्ये घोषणा होणार

 • जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला अखेर भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे होणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दरवर्षी गांधीनगरमध्ये हे जागतिक स्तरावरील समिट आयोजित करण्यात येत असते. यंदा याचे दहावे वर्ष आहे. गुजरातमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार टेस्ला कंपनीचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील चर्चा अखेरच्या टप्प्यात आली असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे स्वतः यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी बातमी अहमदाबाद मिररने दिली आहे.
 • टेस्ला कंपनीची आयात शुल्क कपात करण्याची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेक्सासमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्लाने २०२२ साली भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी अमेरिकेचा दौरा केला असताना टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले होते. मध्यंतरी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेतील टेस्लाच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सने आपल्या बातमीत दिली आहे.
 • गुजरात समाचार आणि इतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सानंद जिल्ह्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी टेस्ला कंपनीने रस दाखविला आहे. हा तोच जिल्हा आहे, जिथे टाटा मोटर्सचा वाहन उत्पादन प्रकल्प होणार होता. याशिवाय मारुती सुझुकी आणि एमजी मोटर यासारख्या बड्या कंपन्यांचेही वाहन उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये आहेत. आता टेस्लाचा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आल्यास गुजरात वाहन उत्पादनाचे मोठे हब ठरू शकते.

अयोध्येतील रेल्वे स्थानकानंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, टर्मिनल इमारतीला श्रीराम मंदिराचं रुप

 • रेल्वे स्थानकानंतर अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात आले आहे. अयोध्या विमानतळाचे ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे नामकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ३० डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देणार असून त्यादरम्यान ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
 • याशिवाय अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ते नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. जेथे ते राज्यातील १५,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
 • अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास आणि वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचा भाजपाचा दावा आहे. हे लक्षात घेऊन शहरात नवीन विमानतळ, पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचे उद्घाटन करण्यात येत आहे. अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, जे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांच्या सुशोभीकरणासाठी आणि सुधारण्यास हातभार लावतील.

अयोध्येची विमानतळाची वैशिष्ट्ये काय?

निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा १,४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग अयोध्येतील आगामी श्री राम मंदिराची मंदिर वास्तुकला दर्शवतो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी भित्तीचित्रे सजलेली आहेत.

भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची कतारमधील मृत्यूदंडाची शिक्षा रद्द, भारत सरकारच्या प्रयत्नांना यश!

 • कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, ही शिक्षा आता रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
 • कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबरला हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताने याची गांभीर्याने दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या बचावासाठी कायदेशीर उपाय सुरू केले होते. शिक्षेला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारतर्फे गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. या अपिलाचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशाही भारताकडून व्यक्त करण्यात आली.

हे भारतीय माजी नौसैनिक कोण? ते कतारमध्ये काय करीत होते?

 • कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांचं रशिया भेटीचं निमंत्रण

 • भारतात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. आपल्या मित्रांना सगळं यश मिळेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध जसे होते तसेच अबाधित राहतील असंही पुतिन यांनी म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना रशिया भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकी दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांनी रशिया दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. पुतिन यांनी हेदेखील म्हटलं आहे की युक्रेन बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला वारंवार सल्ले दिले. तसंच काय परिस्थिती आहे ते त्यांनी फोनवरुन जाणून घेतलं. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न कसा सोडवायचा या प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत हे मला ठाऊक आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
 • जगभरात काही उलटसुलट गोष्टी चालल्या आहेत. अनेक गोष्टींमुळे परिस्थिती काहीशी बिकट आहे याची मला कल्पना आहे. तरीही आशियातला सच्चा दोस्त असलेल्या भारताशी आमचे संबंध चांगले आहेत आणि यापुढेही चांगले राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी रशिया दौऱ्याचं निमंत्रण देतो आहे. जर ते रशियात आले तर आम्हा सगळ्यांनाच आनंद होईल असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
 • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुतिन म्हणाले की भारतात पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. आमचे मित्र नरेंद्र मोदी यांना मोठं यश मिळेल अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. तसंच दोन्ही देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.