Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |6 February 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
६ फेब्रुवारी चालू घडामोडी
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; २०० हून अधिक बळी घेणारा ‘हा’ प्रमुख गोलंदाज बाहेर
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून भारतात सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. नागपुरात होणार्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरे तर संघाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याचवेळी तो दुसरा कसोटी सामनाही खेळणे कठीण दिसत आहे.
- पायाला झालेली दुखापत, बरे होण्यासाठी लागणारा वेळ – ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड गेल्या महिन्यात सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जखमी झाला होता. यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी तो भारतात पोहोचला असला तरी तरीही तो खेळणे अवघड आहे.
- रविवारी बंगळुरूमध्ये सराव सुरू होण्यापूर्वी तो म्हणाला की, ”मला पहिला कसोटी सामना खेळता येईल की नाही हे माहित नाही, पण दुसऱ्या कसोटीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आम्ही सध्या वर्कलोड मॅनेजमेंट करत आहोत. मी चांगली गोलंदाजी करत होतो पण अचानक अकिलीसचा आजार हाताळू शकलो नाही.”
- जोश हेझलवूडच्या वक्तव्यावरून तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दुसरा सामनाही खेळण्याबाबत शंका आहे. जोश हेझलवूड खेळला नाही, तर त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी मिळू शकते. हा त्याचा पहिला आशिया दौरा असेल ज्यात तो गोलंदाजी करताना दिसेल.
- ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.
“शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगारांना दरमाहा १००० रुपये”, त्रिपुरा निवडणुकीसाठी TMC कडून ‘बंगाल मॉडेल’चं वचन
- ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस पक्षाने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी (०५ फेब्रुवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तृणमूलने २ लाख नोकऱ्या, चौथी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपये तसेच बेरोजगार तरुणांसाठी समाजकल्याण योजनांचं आश्वासन दिलं आहे.
- तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्यापासून (६ फेब्रुवारी) त्रिपुराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच्या आदल्या दिवशी पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्रिपुरामध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तृणमूल कांग्रेस पक्ष त्रिपुरातल्या २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
- त्रिपुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू म्हणाले की, “आमचा पक्ष त्रिपुरात सत्तेवर आला तर आम्ही पहिल्याच वर्षी ५०,००० नवीन नोकऱ्या देऊ, पाच वर्षांत २ लाख रोजगारांची निर्मिती करू. तसेच सरकारी विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरली जातील.”
- शाळकरी विद्यार्ध्यांना स्टायपेंड – बसू म्हणाले की, “तृणमूलकडून बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपयांची मदत दिली जाईल. पदावरून हटवलेल्या १०,३२३ शिक्षकांनाही याचा लाभ मिळेल. त्यांच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना देखील दर महिन्याला १,००० रुपये दिले जातील. तृणमूल काँग्रेसने एक कौशल्य विद्यापीठ, विद्यार्थी क्रेडिट कार्ड आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक १,००० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील.”
भारत-ब्रिटन सुरक्षा चर्चेत ऋषी सुनक सहभागी; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञानविषयक संबंध अधिक दृढ करण्याची ग्वाही
- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि ब्रिटिश सुरक्षा सल्लागार टिम बारो यांच्यातील चर्चेदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक उपस्थित राहिले. याद्वारे त्यांनी उभय पक्षीय संबंधांना महत्त्व देत असल्याचे संकेत दिले. यावेळी सुनक यांनी सांगितले, की व्यापार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये उभयपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर ब्रिटनचा भर आहे.
- अमेरिका दौऱ्यानंतर अजित डोवाल ब्रिटनसोबत वार्षिक द्विपक्षीय धोरणात्मक वाटाघाटींसाठी ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी अमेरिकेत त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्याशी चर्चा केली होती.
- लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी उशिरा यासंदर्भात ‘ट्वीट’ केले. त्यात या बैठकीचा संदर्भ देत नमूद केले आहे, की टिम बारो व डोवाल यांच्यातील भारत-ब्रिटनदरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारस्तरीय संवादात सहभागी होऊन, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी विशेष संकेत दिले आहेत. पंतप्रधान सुनक यांनी भारतासोबत व्यापार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाला महत्त्व आहे. सर टीम बारो यांच्या भारतदौऱ्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
- ‘बीबीसी’चा वादग्रस्त वृत्तपट ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’च्या पार्श्वभूमीवर भारत व ब्रिटनमध्ये हा संवाद झाला. भारत सरकारने पक्षपाती प्रचार अशी टीका करून या वृत्तपटावर बंदी घातली आहे.
दिल्ली : महापौर निवडीसाठी आज तिसरी सभा
- महापौर निवडीसाठी सोमवारी दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सभागृहाची सभा बोलावण्यात आली आहे. यापूर्वी महापौर निवडीसाठीचे दोन प्रयत्न फसले आहेत. ‘दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ (डीएमसी) कायद्यातील तरतुदीनुसार (१९५७) महापौर व उपमहापौरांची निवडणूक महापालिकेच्या पहिल्या सभेतच व्हायला हवी. दिल्ली महापालिका निवडणुकीला दोन महिने उलटले तरी अद्याप शहराला नवा महापौर मिळालेला नाही.
- यापूर्वी, दिल्ली महापालिका सभागृहाची सभा ६ आणि २४ जानेवारीला दोनदा आयोजित केली होती. परंतु भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या गदारोळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौर निवडणूक न घेताच कामकाज तहकूब केले. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीनंतर २५० सदस्यीय महापालिका सभागृहाचे पहिले सत्र कामकाजाविना पूर्ण वाया गेले. दुसऱ्या सत्रात नामनिर्देशित सदस्यांनी शपथ घेतल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी शपथ घेतली होती. शपथविधीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी व भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांनी सभागृहाचे दुसरे अधिवेशन पुढील तारखेसाठी तहकूब केले होते. भाजपच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर ‘आप विरोधात घोषणा दिल्या होत्या. ‘आप’च्या सदस्यांनी सभागृहात पाच तास निदर्शने केली होती.
- दिल्ली महापालिका निवडणुकीत, ‘आप’ १३४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर भाजपने १०४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत. महापौरपदासाठी भाजपकडून रेखा गुप्ता व ‘आप’च्या शेली ओबेरॉय शर्यतीत आहेत. उपमहापौरपदासाठी ‘आप’ने आले मोहम्मद इक्बाल आणि भाजप कमल बागरी यांना उमेदवारी दिली आहे.
टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही; मार्चमध्ये स्थळ ठरणार, यजमानपदाच्या शर्यतीत यूएई आघाडीवर
- शनिवारी बहरीनमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठक पार पडली. या पहिल्या औपचारिक बैठकीनंतर एक निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी स्थळाचा निर्णय घेईल, असे ठरले आहे.
- आशिया कपच्या यजमानपदाचे अधिकार सुरुवातीला पाकिस्तानला देण्यात आले. त्याचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये होणार होते, परंतु एसीसीसीचे प्रमुख शाह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले की, भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईची तीन ठिकाणे – दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे या स्पर्धेचे यजमानपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, परंतु निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
- एसीसीद्वारे खंडीय संस्थेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पीसीबी चेअरमन सेठी यांच्या आदेशानुसार बोलावण्यात आली होती. या बैठकीला एसीसी सदस्य राष्ट्रांचे सर्व प्रमुख उपस्थित होते, ज्यामध्ये पाकिस्तानचे यजमान म्हणून नाव दिले नाही.
- याबाबत माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “एसीसी सदस्यांची आज बैठक झाली आणि खूप सकारात्मक चर्चा झाली. मात्र स्थळ स्थलांतराचा निर्णय मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पण खात्री बाळगा की भारत पाकिस्तानात जाणार नाही, स्पर्धाच दुसरीकडे हलवली जाईल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या खेळाडूंशिवाय प्रायोजक स्पर्धेतून माघार घेतील.”
138 बेटिंग आणि 94 कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी:
- मोदी सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे.
- कर्ज देणाऱ्या आणि ऑनलाईन बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
- इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्राद्योगिकी मंत्रलयाने या ॲप्सवर कारवाई केली आहे.
- भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला बांधा निर्माण होत असल्याचा आरोप करत 138 ऑनलाईन जुगाराचे आणि ऑनलाईन कर्ज देणाऱ्या 94 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
- आयटी ॲक्टच्या कलम 69 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
- एएनआयने माहिती दिल्यानुसार केंद्रीय गृहखात्याने या आठवड्यात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि प्रसारण (MeitY) मंत्रालयाला या ॲप्सवर बंदी घालण्यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता.
शताब्दी वर्षांनिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी:
- विदर्भ साहित्य संघाला 100 वर्षे पूर्ण झालीत.
- यानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे दिले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
- 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सकाळी ते बोलत होते.
शार्लेट एडवर्ड्सवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी:
- भारताची माजी दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी आगामी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या पहिल्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्स संघाची प्रेरक आणि गोलंदाजी प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावणार आहे.
- तसेच इंग्लंड संघाची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्याचप्रमाणे भारताची माजी अष्टपैलू देविका पळशीकर फलंदाजी प्रशिक्षक असेल.
- तर, तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य या व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ५ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- ४ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- ३ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- २ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |