Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 8 November 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
८ नोव्हेंबर चालू घडामोडी
ट्विटरनंतर आता ‘मेटा’मधून नोकरकपातीची शक्यता, आठवड्याभरात एक हजार जणांच्या नोकऱ्या जाणार:
- फेसबुकची पॅरेंट कंपनी ‘मेटा’मधून कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठवड्याभरात या कंपनीतून जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, असं वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं दिलं आहे. मेटाचे जगभरात जवळपास ८७ हजार कर्मचारी आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह विविध प्लॅटफॉर्म्सवर हे कर्मचारी कार्यरत आहेत. या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती.
- ‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांमध्ये २०२३ या वर्षाच्या शेवटपर्यंत वाढ करण्यात येणार नाही, असं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. मेटाच्या तिसऱ्या तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली होती. २०२३ या वर्षामध्ये कंपनीचा गुंतवणुकीवर भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
- तिसऱ्या तिमाहीत मेटाचा नफा घसरून ४.४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. नफा ५२ टक्क्यांनी घसरल्यानंतर आता या कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना डच्चू मिळणार आहे. मेटाच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे बाजारमूल्य ६०० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे.
कोहली महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू:
- भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील चमकदार कामगिरीच्या आधारे कोहलीने हा पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू निदा दार या पुरस्काराची मानकरी ठरली. तिने हा पुरस्कार मिळवताना भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्माला मागे टाकले. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, ‘आयसीसी’ हॉल ऑफ फेमचे सदस्य, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि नोंदणीकृत चाहते यांच्या मतदानाच्या आधारे कोहली आणि दार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
- कोहलीला प्रथमच ‘आयसीसी’चा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविण्यात यश आले. त्याने ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये २०५ धावा केल्या. नेदरलँडविरुद्ध अर्धशतकासह कोहलीने पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) नाबाद ८२ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना मागे टाकत महिन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला. या पुरस्कारासाठी निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे कोहली म्हणाला.
- कोहलीचा ‘तो’ षटकार अविस्मरणीय -पॉन्टिंग – ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना कोहलीने १९व्या षटकात हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर समोरील दिशेला मारलेला षटकार अविस्मरणीय आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला. रौफ जगातील सर्वात तेजतर्रार मारा करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या गोलंदाजीवर कोहलीने मागील पायावर वजन असतानाही समोरील दिशेने षटकार मारला. ‘‘कोहलीने मारलेला फटका अविस्मरणीय असून त्या फटक्याची कायम चर्चा होत राहील. कोहलीच्या फटक्याची ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वोत्तम फटक्यांमध्ये गणना केली जाईल हे नक्की,’’ असे पॉन्टिंगने नमूद केले.
भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी सर्वच उत्सुक!; शेन वॉटसनचे मत:
- भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले की, चाहत्यांमध्ये वेगळीच ऊर्जा असते. जगभरातील क्रिकेटरसिक या सामन्याची आतुरतेने वाट पाहात असतात. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना या दोन संघांमध्ये झाला, तर सर्वच जण या सामन्यासाठी उत्सुक असतील, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यात या ‘अव्वल १२’ फेरीचा सामना झाला होता. ‘एमसीजी’वर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी करत भारताला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला होता. आता हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची शक्यता वाढली आहे.
- ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला, तर ते सर्वानाच आवडेल. ‘एमसीजी’वर झालेला सामना मला प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहता आला नव्हता. मी त्यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात समालोचन केले होते. मात्र ज्यांनी तो सामना स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहिला, त्यांनी हा सामना कधीही न विसरता येणारा होता, असे म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. आता पुन्हा हे संघ आमनेसामने आले, तर त्यासाठीही सर्व जण उत्सुक असतील,’’ असे वॉटसनने नमूद केले.
पूर्वकल्पना न देताच ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा कोर्टाचा आदेश? काँग्रेसचं मोठं विधान:
- खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ‘भारत जोडो’ यात्रेचं आयोजन केलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. आता ही यात्रा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर पोहोचली आहे. काँग्रेसच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सोशल मीडियात निर्माण झालं आहे.
- पण बंगळुरू येथील न्यायालयाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसकडून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओजमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराईट) आरोप ‘एमआरटी म्युझिक’ कंपनीकडून करण्यात आला.
- हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश ट्विटर कंपनीला दिला आहे. या घटनाक्रमानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संबंधित आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ७ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
- ६ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
- ५ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
- ४ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
- ३ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |