Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 November 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
३ नोव्हेंबर चालू घडामोडी
चॅम्पियन्स लीग फुटबॉल – बार्सिलोनाच्या विजयात टॉरेसची चमक:
- फेरान टॉरेसच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलानने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये व्हिक्टोरिया प्लाझान संघावर ४-२ अशा फरकाने विजय मिळवला. बार्सिलोनाने आक्रमक सुरुवात केली. सहाव्याच मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर टॉरेसने (४४व्या मि.) गोल करत संघाला मध्यांतरापर्यंत २-० अशा स्थितीत पोहोचवले.
- दुसऱ्या सत्रात प्लाझानच्या टॉमस चॉरीने गोल करत आघाडी २-१ अशी कमी केली. टॉरेसने (५४व्या मि.) यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला भेदत गोल झळकावत संघाला आघाडी ३-१ अशी केली. चॉरीने (६३व्या मि.) पुन्हा एकदा गोल करत आघाडी ३-२ अशी कमी केली. सामन्याच्या ७५व्या मिनिटाला पाब्लो टोरेने प्लाझानच्या बचावफळीला भेदत आघाडी ४-२ अशी भक्कम केली. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.
- अन्य सामन्यात, मोहम्मद सलाह आणि डार्विन न्युनेजने झळकावलेल्या गोलच्या जोरावर लिव्हरपूलने नापोलीवर २-० असा विजय मिळवला.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही वार्षिक ६० हजार निर्वाह भत्ता ; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय:
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच वर्षांला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतिगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपासून १०० मुलांचे वसतिगृह सुरू होईल, याचे कालबद्ध नियोजन करण्याची सूचना पाटील यांनी केली. याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी, वसतिगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करण्याचे आदेशही पाटील यांनी बैठकीत दिले.
- मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी परदेशातील नामांकित विद्यापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रति वर्षी ३० लाख रुपयांच्या मर्यादेत आणि पीएचडीसाठी ४० लाख रुपयांच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
फ्रान्सच्या नौदलाने दिली मुंबईला भेट:
- गेल्या काही दशकांत भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सहकार्य वेगाने वाढले आहे. भारत आणि फ्रान्स या दोन देशांचे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी फ्रान्स नौदलाच्या एकोनिट जहाजाने मुंबईतील नौदल विभागाला पाच दिवसीय सदिच्छा भेट दिली.
- एकोनिट जहाजाचे कमांडर जीन-बर्ट्रांड गयॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या नौदलाने २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत नौदलाच्या मुंबईतील तळाला भेट दिली. फ्रान्सचे नौदल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी विविध व्यावसायिक आणि सामाजिक विषयांवर संवाद साधला. या भेटीचा समारोप भारतीय नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटच्या युद्धनौकेसह समुद्रातील सरावाने झाला.
- याप्रसंगी कमांडिंग ऑफिसर कमांडर गयॉन यांनी वेस्टर्न नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भेट घेतली.
- एकोनिट जहाजाची मुंबई भेट ही बाब दोन्ही नौदलांमधील वाढत्या सहकार्याचे आणि त्यांच्यातील वाढीव आंतरकार्यक्षमतेचे द्योतक आहे. शांतता आणि स्थिरता हे समान हिताचे असल्याने दोन्ही देशांचे नौदल त्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास कटिबद्ध आहे, अशी माहिती भारतीय नौदल विभागाकडून देण्यात आली.
राज्यातील केंद्रीय मंत्र्यांकडे १६ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी:
- भाजपच्या ‘मिशन १४४’अंतर्गत राज्यातील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. आता राज्यातील आठ केंद्रीय मंत्र्यांकडे प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील बैठक दिल्लीत बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली.
- भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ जागा लढवल्या जातील. त्यासंदर्भातील पूर्वतयारी पूर्वीच सुरू झाली होती. त्यापुढील टप्प्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांकडेही १६ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
- केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, रावसाहेब दानवे या मंत्र्यांवर प्रामुख्याने ही जबाबदारी असेल. याशिवाय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी, नारायण राणे तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
- प्रत्येक मंत्र्याकडे कोणते दोन लोकसभा मतदारसंघ द्यायचे या संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भाजपची पक्ष संघटना व केंद्र-राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी मुंबईतही बैठक घेतली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश:
- ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका इलाबेन भट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. सेवा भारत या संस्थेने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलाबेन यांना आदरांजली वाहिली. ‘इलाबेन भट यांच्या निधनाबाबत ऐकून दु:ख झाले. महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि तरुणांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी केलेल्या कामासाठी त्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचे सांत्वन करतो,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले. गांधीवादी कार्यकर्त्यां असलेल्या इलाबेन यांनी १९७२ साली सेवा संस्थेची स्थापना केली. १९९६ पर्यंत सरचिटणीस म्हणून त्यांनी संस्था नावारूपाला आणली.
- मार्च २०१५ ते ऑक्टोबर २०२२ असा दीर्घकाळ गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले. त्यांना १८८५ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर रामन मॅगसेसे पुरस्कार, रॅडक्लिफ पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी इलाबेन यांचा उल्लेख ‘आपल्या आयुष्यातील हिरो’ असा केला होता.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
३ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
- १ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी
- ३१ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
- ३० ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
- २९ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |